मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३३

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३३

रवींद्रनाथांची पत्रे...

रवींद्रनाथ यांनी आपल्या सुमारे ८० वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक पत्रे लिहिली. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की त्यांच्या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत. जेवढी पत्रे त्यांनी अति महत्त्वाच्या व्यक्तींना लिहिली, आहेत तेवढीच पत्रे सर्वसामान्य व्यक्तींना आणि अगदी लहान मुलांना देखील लिहिली. त्यांची पत्रे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशा अनेक प्रकारांमध्ये मोडतात. रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये आपल्याला वास्तवता आणि कल्पकता यांचे सुंदर मिश्रण आढळते. परंतु वास्तवता हे त्यांच्या साहित्यातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. तेच वैशिष्ट्य त्यांच्या पत्रांमध्ये देखील आपल्याला आढळते. पण पत्र लेखनात सुद्धा वास्तवतेची कास धरताना त्यांनी सत्य आणि सुंदर ही मूल्ये जपली आहेत. त्यांचे साहित्य मग ते कथा, कविता, नाटक किंवा कादंबरी कोणतेही असो आजही ताजे वाटते.  तसेच त्यांची पत्रे देखील आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला कालसुसंगत वाटतात आणि मार्गदर्शक ठरतात.

रवींद्र नाथांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि विश्वकवी म्हणून ते मान्यता पावले. त्यानंतर तत्कालीन माध्यमांनी त्यांच्या पत्रांना भरभरून प्रसिद्धी दिली. रवींद्रनाथ कितीही व्यस्त असले तरी पत्रलेखन स्वतः करीत. जेवढ्या गांभीर्याने ते राजकीय व्यक्तींना पत्र लिहीत, तेवढ्याच गांभीर्याने आणि आपुलकीने एखाद्या लहान मुलीला देखील पत्र लिहून तिच्याशी संवाद साधत.

रवींद्रनाथ आपल्या वागण्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला कायमचे आपलेसे करून घेत असत. त्या व्यक्तींमध्ये चांगले गुण शोधून त्याची तारीफ करीत असत. त्यामुळे प्रत्येकाला रवींद्रनाथांशी आपले संबंध असावेत, त्यांच्याशी आपली ओळख असावी असे वाटत असे आणि एकदा त्यांच्या संपर्कात आलेला माणूस कायमचा त्यांच्याशी जोडला जात असे. देश विदेशातील नेते, मित्र, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कलाकार, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर आणि सामान्यातील सामान्य माणसे सुद्धा त्यांच्या मित्र परिवाराचा एक भाग होते. अशा विविध व्यक्तींना ते पत्र लिहीत असत किंवा त्यांच्या पत्रांना न चुकता उत्तरे देत असत. ' भानूसिंहेर पत्रावली, ' पथे वो पथेर पांत्रे ', ' चिठ्ठीपत्र ' ' छिन्नपत्र 'या आणि इतर नावाने त्यांचे पत्रसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.  त्यांनी आपली पत्नी मृणालिनी देवी यांना लिहिलेली पत्रे चिठ्ठीपत्र या संग्रहात आहेत. आपली पुतणी इंदिरा चौधरी हिला तसेच राणी मुखर्जी या लहान मुलीला लिहिलेली पत्रे देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांमधील बरीचशी पत्रे त्यांनी आपले जमीनदारीचे काम शिलाइदह येथे राहून करीत असताना लिहिली आहेत. अशी त्यांची अनेक प्रकारची प्रक्रिया असली तरी प्रामुख्याने त्यांच्या पत्रांचे वर्गीकरण औपचारिक आणि व्यक्तिगत अशा प्रकारे केले जाते. 

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊन दोन गट पडले. या दुफळीने रवींद्रनाथ उद्विग्न झाले होते. त्यांनी त्यावेळी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांना१९०८ मध्ये  लिहिलेले हे पत्र काही संदर्भ वगैर तर आजच्या परिस्थितीत सुद्धा जसेच्या तसे लागू पडते. ते आपल्या पत्रात म्हणतात, 

" ( काँग्रेसमधील ) उभय पक्ष आता एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात दिवस रात्र मग्न झाले आहेत. फाटाफुटीच्या जखमांवर  उभयपक्षांकडून व्यवस्थित मीठ चोळले जात आहे. कोणीही झाले गेले विसरायला तयार नाही आणि कोणी कोणाला क्षमा करायला तयार नाही. आत्मीयतेला परके बनवण्याच्या म्हणून ज्या ज्या तऱ्हा आहेत, त्या त्या साऱ्यांचे अवलंबन होते आहे. राजसत्तेबद्दल असंतोषाच्या, क्रोधाच्या, रोषाच्या वाऱ्याची दिशा आता बदलली आहे. स्वतःच्या घराला आग लावून ती अधिकाधिक भडकवण्याकडे त्या वाऱ्याचा उपयोग होत आहे. ' वंदे मातरम ' पत्रात स्वातंत्र्याच्या अभयमंत्राने भरलेले चैतन्यपूर्ण लिखाण आजवर आढळायचे पण कित्येक दिवसात तसे वाचायला मिळाले नाही. अथपासून इती पर्यंत भांडणाच्याच हकीकतीने आजकाल ते भरून गेलेले आढळते. आतापर्यंत देशात दोनच पक्ष होते. आता जहाल, मवाळ व मुसलमान असे तीन पक्ष झाले आहेत. आणखीही एक चौथा पक्ष आहे. गव्हर्मेंट हाऊस मध्ये बसून उपहासाने हसणाऱ्यांचा. भाग्यवानांचा भार भगवान वाहत असतो. आम्हाला नष्ट करायला दुसऱ्या कोणाची आता जरुरी नाही. मोर्लेचीही नाही किंवा किचनेरचीही नाही. स्वतःचा स्वतःच व्यवस्थित नाश करून घेणार आम्ही ! ' वंदे मातरमचा ' घोष करत आम्ही परस्परांना जमीन दोस्त करणार. "

हे त्यांचे पत्र पुरेसे बोलके आहे आणि त्यातील बराचसा मजकूर आजही लागू पडतो. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१०/१२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...