मुख्य सामग्रीवर वगळा

आणि मेट्रो रस्त्यावरून धावली...

 उगवतीचे रंग 

आणि मेट्रो रस्त्यावरून धावली...

पुण्यात १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला हजर राहण्यासाठी १५ तारखेला मी चाळीसगावहून पुण्याला निघालो. सकाळीच चार साडेचार वाजता मी पुणे स्टेशनवर उतरलो आणि माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचे म्हणून मेट्रोने जायचे ठरवले. ती मेट्रोची त्या दिवसाची पहिलीच फेरी होती. मेट्रो स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती कारण ती अगदी पहाटेची वेळ होती. मोजून पंधरा-वीस लोक तिथे  उपस्थित असतील. मी तिकीट घेतले. गाडी प्लॅटफॉर्मला लागलेली होतीच. त्यात बसलो. उपस्थित लोकांपैकी काही लोक त्या डब्यात बसले. बाकीचे दुसऱ्या गाडीची वाट पहात तिथेच थांबले. गाडी निघण्याची वार्निंग झाली. दरवाजे आपोआप बंद झाले आणि गाडी निघाली. सकाळची वेळ असल्यामुळे प्रवासी पेंगत होते. 

चालता चालता एकदम गाडी ट्रॅक सोडून केव्हा खाली उतरली ते कोणाच्याच लक्षात आले नाही. पण एका ठिकाणी रस्त्यावर चढ आल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला. काही प्रवाशांच्या गाडी नेहमीचा ट्रॅक सोडून रस्त्यावर धावत आहे हे लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब गाडीतून खाली उड्या घेतल्या. आता गाडी पूर्णपणे रिकामी झाली होती गाडीत मी एकटाच प्रवासी होतो रस्त्यावरील तो चढ संपला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. रस्त्याने ती वेगात धावू लागली. रस्त्यावर असणारी माणसे, गाडीवाले, टू व्हीलर, फोर व्हीलरवाले  सगळे घाबरून बाजूला पळू लागले. जीवाच्या आकांताने जो तो पळत होता. मेट्रो रोड वरून कशी काय धावत आहे या गोष्टीचे भययुक्त आश्चर्य लांबून पाहणाऱ्यांचे चेहऱ्यावर दिसत होते. भीतीने घाबरलेल्या लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता. ते सगळे पाहिल्यानंतर मला जाग आली. मी पाहिले तर खरोखरच मेट्रो रस्त्यावरून धावत आहे आणि लोक भीतीने बाजूला धाव घेत आहेत. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवीत धावत होत्या आणि लोकांना धोक्याची सूचना देत होत्या. आता माझ्या मनातही भीतीने घर केले. मी डब्यात आजूबाजूला पाहू लागलो तर एकही प्रवासी दिसला नाही. आता तर माझी पाचावर धारण बसली. आता ही मेट्रो कधी, कुठे आणि कशी थांबणार हे माहिती नव्हते. कदाचित आता आपला शेवट जवळ आला की काय हे वाटून मी परमेश्वराचा धावा करू लागलो. 

सगळ्या डब्यांमधील अंतर पार करून मी ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत कसातरी पोहोचलो. पाहतो तर काय आश्चर्य ! त्या ड्रायव्हरच्या जागी कोणीही नव्हते आणि मेट्रो मात्र सुसाट धावत होती. बहुतेक त्या दिवशी मेट्रो ड्रायव्हर शिवाय आपोआप सुरू होऊन धावायला लागली होती आणि चक्क रस्त्यावर उतरून धावत होती. ' बा विश्वासा, आता संपले रे सारे...' असे वाटत होते. मनातल्या मनात रामरक्षा म्हणून रामाचा धावा करू लागलो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायपतये नमः ||

आता गाडी थांबवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवे असे वाटून मी ब्रेक कुठे दिसतात का ते शोधू लागलो. परंतु गुंतागुंतीच्या असलेल्या त्या इंजिनातील रचनेमध्ये मला ब्रेक कुठे आहेत ते लवकर कळेना. पण एवढ्यात परमेश्वरच जणू माझ्या मदतीसाठी धावून आला. एका ठिकाणी बांधकामासाठीच्या फळ्यांचा मोठा ढीग रचून ठेवला होता.  त्या ढिगाला गाडीने धडक दिली आणि तिचा वेग एकदम कमी झाला. ती संधी साधून मी इंजिनातून उडी मारली.  ' हुश्श  वाचलो एकदाचे, ' असे मी मनाशीच म्हटले. गाडी मात्र न थांबता तशीच पुढे चालत राहिली आणि जवळच कच्चे बांधकाम असलेल्या एका इमारतीला तिने धडक दिली. कानठळ्या बसवणारा जोराचा प्रचंड आवाज झाला. त्या इमारतीला धडक देऊन आणि बऱ्याचश्या बांधकामाचे नुकसान करून गाडी थांबली होती. त्या प्रचंड आवाजाने मी दचकलो. दिवाळी नसतानाही बाहेर कोणातरी नतद्रष्ट कारट्याने सुतळी बॉम्ब फोडला होता आणि त्याचा सकाळच्या शांत वेळी मोठा आवाज झाला होता. मी चाळीसगावला माझ्या घरी अंथरुणावरच जागा झालो होतो. आणि सौ. मला हलवून उठवत होती, ' अहो उठा, तुम्ही केव्हाचे काय बडबडत होतात  ? मेट्रो, थांबवा, रामाय रामभद्राय... असं काही तरी ऐकू येत होतं. तुम्हाला काही स्वप्न पडले का ? उठा उठा, मी चहा ठेवते. ' असे म्हणून ती निघून गेली आणि मी डोळे चोळत जागा झालो. 

© विश्वास देशपांडे चाळीसगाव 

१६/१२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...