उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३१
( रवींद्रसंगीत - एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदय )
भारतीय संगीताला अत्यंत प्राचीन असा वारसा लाभलेला असून भारतीय संगीत परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीची समृद्ध अशी परंपरा आहे. आपले वेद आणि उपनिषदे हे सूर आणि तालाच्या माध्यमातूनच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले. तत्त्वज्ञानासारख्या रुक्ष विषयांना वेदातील गेयतेमुळे सौंदर्य प्राप्त झाले. ताल आणि सुरांमुळे निर्जीव अक्षरांना मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यातूनच भारतीय संगीत परंपरेचा उदय झाला.
भारतीय संगीताने जात-पात किंवा इतर कोणतेही भेद बाळगले नाहीत. ते भारतीय समाजाशी एकरूप झाले होते. पण ज्याप्रमाणे पारतंत्र्यांमध्ये भारतीय कला, साहित्य, नाटक, नृत्य, शिल्प इत्यादी कलांना घरघर लागली होती, तशाच प्रकारची अवस्था संगीतालाही प्राप्त झाली होती. वाहत्या पाण्याचा ओघ अचानक थांबावा आणि त्याला एखाद्या डबक्याचे स्वरूप प्राप्त व्हावे तशाच प्रकारची अवस्था भारतीय पारंपरिक संगीताची झाली होती. रवींद्रनाथांनी ज्याप्रमाणे भारतीय नाट्यपरंपरेचे पुनरुज्जीवन केले, तशाच प्रकारचे पुनरुजीवन भारतीय संगीत परंपरेचे त्यांनी केले. संगीताची परिभाषाच त्यांनी बदलून टाकली आणि रवींद्रसंगीताचा जन्म झाला.
रवींद्रनाथ ज्या कुटुंबात वाढले त्या कुटुंबामध्ये कला, क्रीडा, साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान आदींचा समृद्ध वारसा होता. भारतीय परंपरेतील एखादी गोष्ट जुनी झाली म्हणून ती टाकाऊ आहे किंवा पाश्चात्य जगतातील सर्वच गोष्टी चांगल्या आहेत अशा प्रकारची टोकाची भूमिका त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कधीच नव्हती. चांगल्या गोष्टींचा स्वीकार त्यांनी नेहमीच केला. मग ती पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य. त्यांच्या घरात साहित्यासोबतच गायन कलेची आराधना होत होती. त्यांचे वडील बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांना गायनाची अतिशय आवड होती. पाश्चिमात्य संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. मोठमोठे गायक आणि संगीतकार त्यांच्या जोराशंको वाड्यात आपली कला सादर करण्यासाठी हजेरी लावीत. लहानपणापासूनच रवींद्रनाथांना संगीताची देखील आवड असल्याने त्यांच्या घरातील या वातावरणामुळे त्यांचा संगीताचा कान आपोआपच तयार झाला. एक दृष्टी प्राप्त झाली. त्यातूनच ते कविता लिहू लागले, गीत रचना करू लागले.
तसे बंगालमधील वातावरण लोकसंगीताने समृद्ध होते निरनिराळे मेळे, किर्तन प्रवचने बाऊलांची भजने, बौद्ध दोहे आदींनी लोकसंगीत समृद्ध होते आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत होते. रवींद्रनाथांसारखी रक्तातच संगीताची जाण असणारी व्यक्ती यापासून अर्थातच अलिप्त राहणे शक्य नव्हते. हे पारंपारिक लोकसंगीत त्यांच्याही रक्तात भिनले आणि मग आपल्या या उपजत आवडीला व्यासंगाची जोड त्यांनी दिली आणि त्यातूनच त्यांच्या हातून रवींद्रसंगीताची अलौकिक अशी निर्मिती घडली.
आपल्या जीवनातील अनुभव केवळ शब्दात मांडण्यापेक्षा त्यांच्या सोबतीला जर सूर आले तर ते अनुभव अधिक श्रीमंत होतात त्यांचे सौंदर्य वाढते असे रवींद्रनाथांचे मत होते. पु लं देशपांडे रवींद्रनाथांच्या साहित्यनिर्मिती बद्दल बोलताना म्हणतात," नवनिर्मिती करताना जेव्हा ते एकरूप होऊन आपल्या साहित्यनिर्मितीत गढून जात, तेव्हा त्यांच्या मनात प्रथम सूर जागे होत आणि नंतर शब्द. म्हणूनच त्यांच्या ज्या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला त्याचं नावही ' गीतांजली ' असंच आहे.
एखादं गीत लिहिण्यापूर्वी रवींद्रनाथ स्वतः ते गुणगुणत असत किंबहुना त्याची चाल किंवा त्याचे सूर आधी त्यांना स्फुरत असत आणि नंतर त्यांचे कवितेत रूपांतर होई. मग ते गीत आपोआपच गेय होत असे. कोणाही इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे रवींद्रनाथ देखील बाथरूम मध्ये गेले की आपली गीते गुणगुणत असत. यातूनच त्यांची नवनिर्मिती होई. रवींद्रनाथ म्हणतात," बाथरूम मध्ये गाणी रचण्यात अनेक सोयी असतात. मुख्य म्हणजे एकांत असतो. दुसऱ्या कुठल्याही कामाचा तगादा मागे लागलेला नसतो. खुल्या मनानं गाता येतं आणि ऐकताही येतं .तोंड वाटेल तसं वेड वाकडं करून गाणं म्हटल्याशिवाय गाणं रचण्याची पूर्ण अवस्था कधी येत नाही. खरे म्हणजे हे तर्क शुद्ध विचारांचं काम नसून एक प्रकारचा वेडेपणा असतो. " ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१/१२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा