उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३५
रवींद्रनाथांची पत्रे
मागील दोन भागात रवींद्रनाथांनी लिहिलेली राजकीय आणि सामाजिक पत्रे आपण पाहिली. या भागात त्यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे आपण पाहू. वेगवेगळ्या व्यक्तींना लिहिलेली ही पत्रे आहेत. त्यांची पत्नी मृणालिनी, त्यांची पुतणी इंदिरा आणि छोटीशी चिमुरडी- दहा वर्षांची राणू यांना आणि इतरही अनेकांना त्यांनी वेगवेगळ्या वेळी पत्रे लिहिली आहेत. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे स्पष्ट होतात. या पत्रांमधून त्यांच्यातील महान तत्त्वज्ञ किंवा शिक्षणतज्ञ आपल्याला भेटत नाही तर एक सच्चा, साधा, प्रेमळ आणि दिलदार व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन आपल्याला घडते. पत्नीला लिहिलेल्या पत्रातून त्यांच्यातील प्रेमळ पतीचे दर्शन होते तर इंदिरा त्याचप्रमाणे राणू यांना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्यातील वात्सल्याचा वर्षाव करणारे पित्यासमान प्रेमळ हृदय दिसते. या सगळ्या पत्रांमधून आणखीही एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यांचे निसर्गप्रेम. त्यांच्या प्रत्येक पत्रांमध्ये निसर्ग प्रतिबिंबित झाला आहे आणि त्याचे सुरेख दर्शन एखाद्या सजीव चित्राप्रमाणे शब्दांच्या माध्यमातून त्यांनी घडवले आहे. राणु हिला लिहिलेली ही पत्रे त्यांनी भानुसिंह या नावाने लिहिली. त्यांच्या पत्रांचा हा संग्रह ' भानुसिंहेर पत्रावली ' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.
रवींद्रनाथ आणि राणू यांची भेट झाली त्यावेळी रवींद्रनाथ ५८ वर्षांचे होते तर राणू केवळ दहा वर्षांची. त्या सुमारास रवींद्रनाथांची कन्या माधुरीलता हिचे नुकतेच निधन झाले होते. आपल्या लाडक्या लेकीच्या निधनामुळे रवींद्रनाथ कमालीचे दुखी होते. त्यांच्या या दुःखावर मायेची हळुवार फुंकर घालण्याचे काम राणू या छोट्या चिमुरडीने केले. रवींद्रनाथांच्या साहित्याची ती मोठी चाहती, वाचक आणि अभ्यासकही होती. हीच राणू मोठी झाल्यावर कलकत्त्याच्या सांस्कृतिक चळवळीत एक मोठी प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान व्यक्ती झाली आणि लेडी राणू मुखर्जी म्हणून ती ओळखली जाऊ लागली. राणूला रवींद्रनाथांनी भानुसिंह या नावाने जवळपास २०८ पत्रे लिहिली. तिला १० जुलै १९१९ रोजी त्यांनी शांतीनिकेतनमधून लिहिलेले हे एक पत्र. या पत्रातून रवींद्रनाथांचा दिनक्रम कसा होता ते आपल्यालाही कळते. त्यातून त्यांच्यातील आदर्श शिक्षक, निसर्गप्रेमी व्यक्तीचे दर्शन आपल्याला होते आणि आपण या भव्य आणि उदात्त व्यक्तिमत्वापुढे आपोआप नतमस्तक होतो. त्या पत्रातील काही भाग आपण पाहूया.
" राणू,
तू आज काल अभ्यासाच्या खूप मागे लागलेली दिसतेस. मीही अगदी चुपचाप स्वस्थ बसून असतो असे समजू नकोस. तुला ठाऊकच आहे की सकाळी मला तीन वर्गांना शिकवावे लागते. ते आटोपले की मी स्नान करून जेवायला बसतो. मग कोणालातरी पत्रे लिहायची असली तर ती लिहून टाकतो. दुपारच्या चहा फराळाला उठण्याचा निरोप येईपर्यंत दुसऱ्या दिवशी मुलांना जे धडे शिकवायचे असतील त्यांची तयारी करतो. संध्याकाळ झाली की गच्चीवर स्वस्थ बसून राहतो. माझ्याकडे कविता ऐकायला मुले येतात. त्यांना हव्या असलेल्या कविता वाचून दाखवतो. अंधार पडला की मुले घरी परततात. सारे आकाश चमचमणाऱ्या ताऱ्यांनी भरून गेलेले असते. देवेंद्रनाथांच्या घरात गाणे गात असलेल्या मुलाचा गोड आवाज कानावर येऊ लागतो.
रात्र गंभीर गंभीर होत चाललेली असते. मुलांचे गाणेही थांबलेले असते. गुडूप अंधार पडलेला असतो. दूर दूर गावातील रस्त्यातून एखाद दुसरा दिवा क्वचित मधून मधून लुकलुकत असतो. पुढे तेही दिवे रस्त्यातून जायचे बंद होतात. आकाशातील तार्यांच्या प्रकाशाशिवाय कुठेही प्रकाश नाही दिसत. मला झोप येऊ लागते. ती येऊ लागली की मी हळूहळू उठतो आणि झोपायला जातो. नंतर बऱ्याच वेळाने केव्हातरी पूर्वेकडील दरवाज्यातून दिसणारे आकाश अंधार फिकट होत जाऊन हळूहळू उजळू लागते. जवळपासच्या झाडात एखाद दुसरी सारिका खसपस करीत असते. ढगांवर सोनेरी छटा उमटू लागते. थोड्याच वेळात साडेचारच्या घंटेचे टोल ऐकू येऊ लागतात. मी उठून पूर्वेकडील गच्चीतील दगडी चौरंगावर आसन पसरून उपासनेला बसतो. सूर्य हळूहळू वर येऊन आपल्या प्रकाशाच्या स्पर्शाने मला आशीर्वाद देतो. आजकाल अगदी सकाळीच मला न्याहरीला बसावे लागते. कारण साडेसहा वाजता आश्रमातील सर्व बालक मंडळी विद्यालयाच्या समोरील मैदानावर एकत्र होते. तेथे कोणते ना कोणते गाणे म्हटल्यानंतर विद्यालयाचे काम सुरू होते. पहिल्या घंटेला मला वर्ग नसतो. पण त्या वेळात मी माझ्या खोलीत जाऊन शिकवायची पुस्तकं आणि टिपणही नजरे खालून घालतो. मग माझे काम सुरू होते. दिवस-रात्र चालणाऱ्या माझ्या कामाचा हिशेब मी तुला दिला. किती शांतपणे दिवस जातो माझा ! मुलांसाठी हे असे काम करणे मला खूप आवडते. मी त्यांच्यासाठी हे जे काम करतो त्याला काही मोल आहे याची त्यांना कल्पना नाही. सूर्याच्या प्रकाशाचा फायदा अनायासे ती जशी घेत असतात, तशीच ती आमच्या सेवेचा फायदा घेत आहेत. पुढे ही मुले जेव्हा मोठी होतील, तेव्हा मग त्यांना येथील एक एक गोष्ट आठवू लागेल. येथील आकाशातील विपुल प्रकाश, इथे वाहणारे खुले वारे आणि सकाळी आणि संध्याकाळी झाडाखाली बसून शांतपणे देवीला केले जाणारे नमन सारे आठवेल. "
सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथांचे वडीलबंधू. ते आपल्या सेवाकाळात महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. इंदिरादेवी ही त्यांची मुलगी. १८८५ ते १८९५ या दहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी तिला अनेक पत्रे लिहिली. या काळात ते तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये असलेल्या आपल्या इस्टेटची देखरेख करण्यासाठी पद्मा नदीवर असलेल्या पद्मा नावाच्या बोटीमध्ये राहात आणि प्रवास करत. तेथूनच त्यांनी आपल्या महाराष्ट्रात असलेल्या या पुतणीला पत्रे लिहिली. ही सगळे पत्रे इंदिरादेवींनी जपून ठेवली आणि नंतर आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात ती लिहून काढली आणि आपल्या काकांना म्हणजेच रवींद्रनाथांना ती भेट दिली. रवींद्रनाथांनी या पुस्तकाला या पत्रांवर भाषेच्या दृष्टीने काही संस्कार करून ती पत्रे सामान्य वाचकांसाठी प्रकाशित केली. या पत्रांमधील काही कौटुंबिक उल्लेख गाळून टाकले आहेत. त्याचप्रमाणे भाषेच्या दृष्टीनेही काही पत्रांचे पुनर्लेखन केले असल्यामुळे या पत्रांना छिन्नपत्रे असे म्हटले जाते. यातील जवळपास प्रत्येक पत्रातून त्यांचे निसर्गप्रेम व्यक्त झाले आहे.
शिलाईदह येथून १७ जून १८९२ या दिवशी इंदिरेला लिहिलेले एक सुंदर पत्र आपण इथे पाहू या. पत्रातून त्यांच्यातील निसर्गप्रेमी तर दिसतोच पण तो निसर्ग त्यांना कशाप्रकारे प्रेरणा देत होता आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करीत होता हेही आपल्याला बघायला मिळतं. आपल्यासाठी देखील हे पत्र खूप मार्गदर्शक आहे असं मला वाटतं.
प्रिय इंदिरा,
आजकाल मी संध्याकाळच्या सुमाराला किनाऱ्यावर उतरून बराच वेळ फिरतो. पूर्वेला वळल्यावर एक सुंदर दृश्य दिसतं. पश्चिमेला वळल्यावर दुसऱ्या प्रकारचं दृश्य दिसतं. आकाशातून माझ्या माथ्यावर जणू सांत्वनाची वृष्टी होत राहते. माझ्या दोन्ही डोळ्यांमधून स्वर्गमय मांगल्याची एक धारा माझ्या अंतरंगात प्रवेश करत असते. या वाऱ्यात, आकाशात आणि प्रकाशात प्रतिक्षणी माझ्या मनातून जणू नवीन पालवी फुटते. मी नवीन प्राणाने आणि बलाने परिपूर्ण होऊन जातो. संसारातील सगळी काम करणं आणि लोकांशी व्यवहार करणं मला आता अगदी सहज वाटतं. खरंतर सगळंच सोपं असतं. एकच सरळ रस्ता असतो. तोच धरून चाललं की झालं. नाना प्रकारचे शॉर्टकट्स डोकं लढवून शोधण्याची मला गरज वाटत नाही. सुखदु:खं सगळ्याच मार्गांवरती असतात. कुठल्याही मार्गावर त्यांना टाळण्याचा उपाय नसतो. पण शांती केवळ या मोठ्या रस्त्यावरच असते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/१२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा