मुख्य सामग्रीवर वगळा

क्षितिजाच्या पलीकडे उभे...

 उगवतीचे रंग 

क्षितिजाच्या पलीकडे उभे...

जाणाऱ्याला जड अंतकरणाने निरोप द्यायचा आणि येणाऱ्याचे हसतमुखाने स्वागत करायचे अशी आपली परंपरा आहे. २०२४ हे वर्ष आपल्याला शेकहॅन्ड करून निघण्याच्या तयारीत आहे तर उंबरठ्यावर उभे आहे ते येणारे नवीन वर्ष २०२५. लवकरच सरणारे २०२४ चे वर्ष आपल्याला कडू गोड आठवणी देऊन गेले. काहीतरी मौल्यवान आपल्यातून घेऊन गेले आणि काहीतरी मौल्यवान आपल्याला देऊनही गेले. आपल्यातून काही प्रिय व्यक्तींना ते घेऊन गेले. आपल्या वयाचे एक वर्ष देखील त्याने चोरले. रिक्त हस्ते आले नाही आणि रिक्त हस्ते गेले नाही. जाता जाता आपल्याला आठवणी देऊन गेले, अनुभव देऊन गेले, त्या अनुभवातून येणारे ज्ञान आणि समृद्धी देऊन गेले. येणारे नवीन वर्ष कसे असेल त्याची झलक दाखवून गेले. आता त्यातून काय बोध घ्यायचा आणि पुढे कसे वागायचे ते त्यानं आपल्यावर सोपवलं आहे.

दरवर्षी नवीन वर्ष सुरू होण्याआधी जे नवीन संकल्प केले जातात ते याही वर्षी केले जातील आणि ते करायलाच हवे त्यात वावगे काहीच नाही. आरोग्याशी संबंधित संकल्प जसे की लवकर उठणे, रोज काहीतरी नियमितपणे व्यायाम करणे, वजन कमी करणे किंवा वाढवणे, आहारावर नियंत्रण ठेवणे यासारखे काही संकल्प असू शकतील.

दररोज सकाळी योगासने, प्राणायाम किंवा अन्य काही व्यायाम करायचा आपण ठरवला तर त्यासाठी लवकर उठावे लागेल. लवकर उठायचे असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक लवकर झोपण्याची सवय लावून घ्यायला हवी. आणि लवकर झोपायचं असेल तर त्यासाठी रोजच्या वेळेपेक्षा थोडं लवकर जेवण्याची देखील सवय लावून घ्यायला हवी. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाशी ठरवायला लागतील. उत्तम आरोग्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे, वारंवार हॉटेलमध्ये जेवण करणे, शीतपेयांचे सेवन करणे यासारख्या गोष्टी कमी करण्याचा किंवा टाळण्याचा देखील संकल्प आपल्याला करता येईल. आपल्या आहारात प्रत्येक मोसमात येणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश जाणीवपूर्वक करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आहे. त्याचा देखील आपण संकल्प करूया.

 संकल्प चांगल्या सवयी जाणीवपूर्वक स्वतःला लावून घेणे यासारखे असू शकतील. त्यामध्ये बचत करणे, हिशेब लिहिण्याची सवय स्वतःला लावून घेणे, दैनंदिनी लिहिणे यासारख्या गोष्टी असू शकतात.

यासारख्या गोष्टी आणि त्यांचा विचार बहुतेक सगळेच करतात. पण आपण एक जागरूक नागरिक या दृष्टीने थोडा वेगळा विचार करूया. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी ही एकमेव आहे. तिचे पर्यावरण नष्ट झाले तर आपण जगू शकणार नाही. आज आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी करतो आहोत त्याची शिक्षा पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने यावर्षी काही संकल्प केले पाहिजेत. त्यासाठी माझ्या परीने काही वेगळे संकल्प करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तेच आवाहन आपल्याला देखील करतो आहे. आपण सगळे मिळून त्यासाठी प्रयत्न करूया.

वाहनांमुळे होणारे प्रदूषण हा प्रदूषणाचा एक भाग आहे. कोणत्याही गावात पाहिले तरी वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि होत आहे. वाहतुकीची कोंडी सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर दिसते. या समस्येचा थोडाफार भार मी माझ्या परीने कसा कमी करू शकतो याचा या नवीन वर्षात आपल्याला विचार करता येईल. आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर मी चालत जाईन किंवा सायकलचा वापर करीन. आठवड्यातून एक दिवस तरी बाईक, स्कूटर किंवा चार चाकी न वापरता सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचा प्रयत्न करीन असा एखादा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण केला तर किती छान होईल !

दरवर्षी प्लास्टिकच्या  प्रदूषणासंबंधी आपण ओरड करतो. त्याबद्दलचे वर्तमानपत्रातील किंवा सोशल मीडियावरील लेख ही वाचतो. मुलांना शाळेत स्वच्छ पर्यावरणाचे धडे दिले जातात. त्यामध्ये प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. पण प्रत्यक्षात व्यवहारात आपण प्लॅस्टिक वापरणे कितपत टाळतो ?  किमान फळे, भाजीपाला यासारख्या गोष्टी विकत घेताना विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या प्लास्टिकच्या कॅरी बग आपण नाकारतो का ? आपण आपल्या स्वतःची कापडी पिशवी सोबत नेतो का ? याचा विचार करून यावर्षीपासून मी माझ्यासोबत कापडी पिशवी नेईन आणि प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणार नाही असं छोटासा संकल्प आपल्यापुरता का होईना पण करूया.

कारण कोणतेही असो फटाके फोडण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. फटाके फोडण्याच्या क्षणिक आनंदात आपण पर्यावरणाचे केवढे भयंकर नुकसान करतो याची आपल्याला कल्पना येत नाही. आजकाल अनेक मोठ्या शहरातील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून ती राहण्यायोग्य नाही अशा प्रकारचे अहवाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत. या प्रदूषित हवेमुळे अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळत आहे हे सगळे आपण वाचतो परंतु त्यापासून बोध घेत नाही. सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. म्हणून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी फटाक्यांचा कमीत कमी वापर करीन किंवा शक्यतो त्यांचा वापर करणारच नाही असं स्वतः पुरता तरी संकल्प करायला हरकत नाही.

सण-उत्सवातील डीजेचा वापर वाढला आहे. डीजेच्या वापरामुळे कान आणि डोळे यावर होणारा परिणाम आपणा सर्वांना परिचित आहे. त्यामुळे माझ्याकडे काही कार्य असेल तर किमान मी तरी डीजेचा वापर करणार नाही. साध्या स्पीकर्सचा वापर करेन, शहनाई किंवा सनई चौघडा यांच्या संगीताचे आयोजन करेन असे ठरवायला काय हरकत आहे ?  

वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ही वाचन संस्कृती वाढावी म्हणून पुण्यामध्ये नुकताच पुस्तक महोत्सव भरवण्यात आला होता. त्याला प्रतिसादही उत्तम लाभला. लवकरच राजधानी दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. या सगळ्या गोष्टी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पूरक आहेत पण माझ्यासाठी माझ्या परीने मला यात कोणते योगदान देता येईल याचा विचार या नवीन वर्षात करायला हरकत नाही. आजकाल वाचन करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो अशी बऱ्याच जणांची तक्रार असते आणि ती काही अंशी खरीही आहे. पण त्यात दिवसाकाठी किंवा किमान रात्री झोपताना तरी मी एखाद्या चांगल्या पुस्तकाची किमान दोन पाने तरी वाचेन असा छोटासा संकल्प करायला हरकत नाही. माझ्या झोपण्याच्या जागेजवळ टेबलावर दोन-तीन पुस्तके तरी ठेवलेली असतातच. त्यातील किमान दोन पुस्तकांची दोन-दोन पाने तरी मी झोपण्यापूर्वी आवर्जून वाचतो. अनेक वर्षांपासूनची ही माझी सवय आहे. कितीही उशीर झाला तरी काहीतरी वाचल्याशिवाय मी झोपत नाही. रात्री झोपण्यापूर्वी अशी दोन-चार पाने जरी वाचली तरी एखादे चांगले पुस्तक आपण काही आठवड्यात किंवा काही महिन्यात वाचून पूर्ण करू शकतो. घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी आवर्जून त्यांना आवडतील आणि चांगली माहिती आणि ज्ञान देतील अशी पुस्तके आपण विकत आणूया. आपणही वाचूया आणि त्यांच्यावर वाचनाचा संस्कार घडवूया असं या निमित्ताने ठरवता येईल.

नवीन वर्षात आणखीन एक गोष्ट करूया ती म्हणजे आनंदी राहण्याचा संकल्प ! मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे संत तुकारामांनी म्हटले आहे म्हणून आपले मन प्रसन्न ठेवूया. जी गोष्ट आपण इतरांना देतो, ती अनेक पटींनी आपल्याकडे परत येते हा निसर्गाचा आणि नियतीचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्या परीने इतरांना आनंद, सुख आणि समाधान देण्याचा प्रयत्न आपण करूया. तेच शतपटीने या नवीन वर्षात आपल्याकडे निश्चितपणे परत येईल.

 शेवटची गोष्ट म्हणजे काही गोष्टी सोडून द्यायला आपण शिकूया. निदान तसा प्रयत्न करून पाहायला काही हरकत नाही. हा माझ्याशी असं वागला, तो माझ्याशी तसं वागतो, अमुक एकाने मला फोनच केला नाही, मग मीच फोन का म्हणून करावा ?  तो माझ्याकडे आलाच नाही, मग मी त्याच्याकडे का जावे यासारख्या अनेक गोष्टी आपण सोडून दिल्या तर आपल्यासारखे सुखी आणि समाधानी आपणच !

स्वप्नांची समाप्ती या आपल्या सुंदर कवितेत कुसुमाग्रज म्हणतात 

प्रकाशाच्या पावलाची
चाहुल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर

तेव्हा या येणाऱ्या नववर्षाच्या रूपाने प्रकाशाच्या पावलांची चाहूल कानावर येते आहे आपण त्याच्या स्वागतासाठी सज्ज राहूया. 

क्षितिजाच्या पलीकडे दिवसांचे दूत उभे आहेत. आपल्या स्वागताच्या प्रतीक्षेत !

आपणा सर्वांना येणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२८/१२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...