मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३४

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ३४

रवींद्रनाथांची पत्रे - भाग दोन 

रवींद्रनाथांनी अनेक राजकीय व्यक्तींना पत्र लिहिली. त्यात अगदी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांचा देखील समावेश होता. या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती की त्यावेळी वंगभंगाची चळवळ हिंसक झाली होती. रवींद्रनाथ तर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या विरोधात होते. पहिल्या महायुद्धाचे भीषण परिणाम पाहिल्यानंतर तर ते आक्रमक राष्ट्रवादाचे कट्टर विरोधक बनले. त्याच सुमाराला अमेरिकेत काही हिंदी सशस्त्र संघटनांनी जर्मनीच्या मदतीने हिंसक चळवळीचा कट आखला होता आणि या कटात रवींद्रनाथांचा सहभाग आहे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात होते. अमेरिकेतील नागरिक या संदर्भात रवींद्रनाथांना दोषी समजत होते. हे समजल्यानंतर रवींद्रनाथांचे मन व्यथित झाले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांना आपल्या भूमिकेची जाणीव करून देणारे पत्र लिहिले. या पत्रात ते म्हणतात, 

" अमेरिकेतील माझे मित्र आणि माझे लिखाण ज्यांनी काळजीपूर्वक वाचले आहे, असे वाचक कधीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही याची मला खात्री वाटते तरीही यासारख्या आरोपात माझे नाव गोवल्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली आहे आणि मला अतीव दुःख झाले आहे. हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की मानवतेच्या उच्च तत्वांना विरोध करणाऱ्या राष्ट्रवादावर माझा विश्वास नाही आणि गुप्त खलबते आणि हिंसेच्या पापकृत्यांनी भरलेली देशसेवा म्हणजे स्वतःच आपल्या देशाविरुद्ध केलेले पापकृत्य आहे असे मी समजतो. माझ्या देशाला गरज भासल्यास मी खुलेपणाने त्याचा उच्चार करतो आणि माझ्या देशाच्या शासकांना आणि देशवासीयांना कटू असे सत्य सांगण्याचे संकट देखील मी नेहमी ओढवून घेत आलो आहे. मात्र कर्तव्याचे नाव घेऊन सैतानाशी हात मिळवणी करणाऱ्या काही राज्यकर्त्यांनी आणि संघटनांनी स्वीकारलेल्या पद्धतींचा मी तिरस्कारच करत आलो आहे. " 

या अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातून रवींद्रनाथांचा आपल्या भूमिकेबद्दलचा निर्भीडपणा, ठामपणा स्पष्ट होतो आणि समोरची व्यक्ती कोणीही असली तरी आपले विचार स्पष्टपणे मांडायला ते कचरत नाहीत असे दिसते. अशाप्रसंगी अमेरिकेच्या अध्यक्षांना देखील चार शब्द सुनावण्यास त्यांनी कमी केले नाही.

१९१८ च्या सुमारास रवींद्रनाथांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन शांतिनिकतन मध्ये राहणे पसंत केले. याच सुमाराला लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांची होमरूल लीगची चळवळ जोरात होती. रवींद्रनाथांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊ नये आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात सहभागी व्हावे असे डॉ. ॲनी बेझंट यांना वाटत होते पण रवींद्रनाथांचा निर्णय पक्का होता. त्यांनी डॉ.ॲनी बेझंट यांना लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या निस्पृहतेचे दर्शन आपल्याला घडते. आपल्या पत्रात ते म्हणतात,

" प्रिय मिसेस बेझंट,

मला पुढच्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष पद भूषवण्यासाठी विनंती करणारे तुमचे पत्र नुकतेच मिळाले. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या देशाविषयी तुमच्याकडून येणाऱ्या कोणत्याही आमंत्रणाचा अस्वीकार करणे माझ्यासाठी कठीण काम आहे. पण मला पक्क्या माहीत असलेल्या काही थोड्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे ती म्हणजे मी राजकारणासाठी सर्वस्वी अपात्र माणूस आहे. जेव्हा जेव्हा काही विशेष प्रसंगांच्या गरजा ओळखून मी त्यात ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न केले तेव्हा तेव्हा मी स्वतःला वेदना करून घेतल्या आहेत. परिणामी जे कार्य करण्याचे माझे ध्येय आहे, त्यांनाही धक्का पोहोचला आहे. तसेच, एका विशिष्ट काळानंतर सर्व सार्वजनिक जीवनातल्या कार्यातून निवृत्ती घेतली पाहिजे या शास्त्रमतावर माझा विश्वास आहे. "

१९४१ च्या सुरुवातीचा काळ होता. त्यावेळी रवींद्रनाथ मृत्यूशय्येवर होते. या सुमारास दुसरे महायुद्ध सुरू होते. या महायुद्धात भारताने इंग्लंडला सहाय्य करावे असे आवाहन करण्यासाठी इंग्लंड येथून मिस एलोनॉर राथबोन या भारतात आल्या होत्या. पण भारतात आल्यानंतर भारतीय पुढाऱ्यांची ठाम भूमिका पाहून त्या संतापल्या आणि त्यांनी भारतीयांवरच टीकेचा भडीमार केला. ते पाहून मृत्यूशय्येवर असताना देखील रवींद्रनाथांचा कमालीचा संताप झाला होता. त्यांनी या बाईंना एक अनावृत्त पत्र लिहिले आणि ते अनेक इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. त्या पत्रात रवींद्रनाथ जे काही म्हणतात त्याचे सार थोडक्यात असे आहे...

" आम्ही इंग्रजांबद्दल कशासाठी कृतज्ञता बाळगायची ? त्यांनी आम्हाला विद्यादान केले नसते तर आम्ही कायम अंधकार युगातच राहिलो असतो का ? इंग्रजी शिक्षणातून आमच्यापर्यंत पोहोचली ती काही विचारधारांची श्रेष्ठ संपदा नव्हे. तो नुसता त्यांच्या उष्ट्याचा नि:सत्व अंश. त्याचा परिणाम एकच झाला तो म्हणजे भारतीय स्वतःच्या देशातल्या हितकर संस्कृतीच्या योगाला मुकले. दोन शतकांच्या त्या इंग्रजी शिक्षणानंतर फक्त एक टक्का भारतीय इंग्रजी भाषा लिहिण्या- वाचण्यात साक्षर झाले आहेत.

आमच्या चारही बाजूंना पहा दंगे- धोपे, दडपशाही, हवे तितके लोक ठार मारले जात आहेत. आमची संपत्ती लुटली जात आहे, बायकांच्या जीविताला धोका आहे. तरीही शक्तिमान म्हणवणारे इंग्रज त्यांच्या संरक्षणासाठी अजिबात हालचाल करत नाहीत. उलट आम्हालाच आमच्या कुटुंबाचे रक्षण करता येत नाही अशी ओरड परदेशात बसून ते करत आहेत. आमच्या देशाचा दरिद्री, निःशस्त्र शेतकरी, रडून आक्रोश करणाऱ्या मुलाबाळांच्या भाराने वाकून गेलेला शेतकरी, हजारो गुंडांपासून आपले संरक्षण न करू शकल्यामुळे जीवाला भिऊन पळतो आणि इंग्रज अधिकारी त्याची भयग्रस्त अवस्था पाहून फिदीपिदी हसत आहेत. "

आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी देखील रवींद्रनाथ आपल्या पत्रांमधून अशा प्रकारचे परखड आणि तेजस्वी विचार मांडण्यास जराही घाबरले नाहीत. रवींद्रनाथांवर इंग्रजांचे लांगुलचालन करण्याचा आरोप करणाऱ्यांनी डोळे उघडून त्यांची ही पत्रे वाचावीत म्हणजे त्यांची निर्भयता, स्पष्टपणा आणि आपल्या मनातील विचार कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त करण्याची त्यांची तळमळ आणि देशभक्ती लक्षात येऊ शकेल. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

११/१२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या