उगवतीचे रंग
दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग दोन
दक्षिण भारतातील या मंदिरांचा बाह्य भाग जेवढा आकर्षक दिसतो, तेवढाच आकर्षक आतील भाग आहे. आतील मुर्त्या, कोरीव काम, नाजूक पण सुंदर अशी गुंतागुंतीची नक्षी मन मोहून टाकते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहात आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी मूर्ती दृष्टीस पडते. या गर्भगृहाच्या वर अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं मकर तोरण आहे. त्याच्या मध्यभागी लक्ष्मी आणि विष्णूंचे शिल्प आहे तर खाली दोन्ही बाजूला भगवान विष्णूंचे द्वारपाल आहेत. या द्वारपालांच्या मूर्ती देखील इतक्या रेखीव आणि प्रमाणबद्ध आहेत की त्या जिवंत वाटतात. द्वारपालांनी परिधान केलेले अलंकार लक्षवेधक आहेत. या द्वारपालांच्या पाठीमागे देखणी प्रभावळ आहे. द्वारपालांच्या हातात शंख आणि गदा ही आयुधे धारण केलेली आहेत. हे द्वारपाल जणू सूचित करतात की गर्भगृहाच्या आत कोणीही अपवित्र व्यक्ती जाता कामा नये. व्यक्ती मनाने आणि शरीराने पवित्र असावी. सोवळे नेसूनच आत प्रवेश करता येतो.
गर्भगृहात दोन प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे काळ्या पाषाणातून घडवलेली सहा फुटांची भगवान विष्णूंची मूर्ती आणि दुसरी म्हणजे पूजेसाठी वापरली जाणारी धातूची मूर्ती. या मूर्तींना अनुक्रमे अचल आणि चल मूर्ती म्हटलं जातं. पूजेसाठी जी वापरली जाते ती चल मूर्ती. ती धातूची असून रथोत्सवासारख्या विशेष प्रसंगी बाहेर काढली जाते. पाषाणातून घडवलेली आणि प्रतिष्ठापना केलेली ती अचल मूर्ती. विष्णू मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले दिसतात. येथे फोटो काढण्यास मनाई असल्याने भगवंताचे रूप डोळ्यात आणि मनात साठवावे हेच उत्तम !
भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेतात ते मंदिरातील स्तंभ. इतके आकर्षक स्तंभ अन्य कुठे क्वचितच बघायला मिळतात. प्रत्येक स्तंभ, त्यावरील नक्षीकाम वेळ काढून बघत राहावं इतकं अप्रतिम आहे. एरव्ही कागदावर काढण्यासही कठीण असं नक्षीकाम या दगडांवर कोरलेलं आहे.आजच्या काळात एखाद्या अत्याधुनिक लेथ मशीनवर घासून गुळगुळीत केल्यासारखे हे स्तंभ वाटतात. त्यामुळे एक हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचा परिणाम त्यांनी कसा साध्य केला असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक स्तंभावर एकावर एक असे रचलेले पाच थर आहेत. ते एकमेकांशी इंटरलॉक पद्धतीने जोडलेले आहेत. हे लॉकींग एवढं मजबूत आहे की शेकडो वर्षानंतर त्यांचा भक्कमपणा आजही कायम आहे. असे तब्बल ४८ स्तंभ या मंदिरात आहेत. असं म्हणतात की विजयनगर साम्राज्याच्या काळात इ.स. १३८१ मध्ये या मंदिरावर आक्रमण होऊन त्याचा काही भाग नष्ट झाला होता. या मंदिराच्या पडणाऱ्या भागाला सावरून धरण्यासाठी, आधार देण्यासाठी या स्तंभांची निर्मिती केली गेली.
या स्तंभांमध्ये दोन स्तंभ विशेष करून बघावे असे आहेत. त्यातील एक म्हणजे नरसिंह स्तंभ आणि दुसरा म्हणजे मोहिनी स्तंभ. नरसिंह स्तंभावर नाजूक अशी १०८ शिल्पे कोरलेली आहेत. पायापासून ते वर छतापर्यंत या स्तंभावर कोरीव काम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्तंभावरील शिल्पात एक अगदी हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराचे छोटे शिल्प आहे. हे शिल्प एका नंदीचे आहे. त्याच्याच बाजूला थोडीशी जागा रिक्त ठेवली आहे. पुढे कोणी एवढया क्षमतेचा शिल्पकार आला तर त्याने त्या जागी तसेच सूक्ष्म शिल्प निर्माण करावे असे आव्हानही त्यातून सूचित होते. हे सगळं पाहिल्यावर आपल्या पूर्वजांच्या कलाकुसरीचे, नवनिर्माणाचे आणि कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. या मंदिरातील काही स्तंभांवर मदनिका कोरलेल्या पाहायला मिळतात. प्रत्येक मदनिकेची भावमुद्रा वेगवेगळी आहे. असे सांगितले जाते की येथील हा नरसिंह स्तंभ पूर्वी हाताने फिरवता येत होता पण मंदिराचे छत खाली आल्याने तो त्यात दबला गेला आणि फिरेनासा झाला.
या मंदिरातील सभामंडप अत्यंत विशाल आहे. त्यातून ६० मार्गिका निघतात. या मंदिरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे तिथे असलेला मोहिनी स्तंभ. भगवान विष्णूंनी भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनी अवतार धारण केला होता. त्या मोहिनी रूपातील अत्यंत सुंदर शिल्प या स्तंभावर पाहायला मिळते. मोहिनी मूर्तीच्या दोन्ही बाजूला विष्णूंचे वाहन गरुड आणि चौरीवाहक आहेत.
गर्भगृहाजवळच एक घुमट असून त्याच्या अष्टकोनी छतावर अप्रतिम असे नक्षीकाम आहे. त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंडपातील चार स्तंभांच्या वरच्या बाजूला नृत्य सरस्वती आहे. एक नाट्य मुद्रेतील सुंदरी आहे. स्त्रीला मयुराप्रमाणे सुंदर नृत्य करता यायला हवं अशी अपेक्षा आपल्या पूर्वजांची होती. आणखी एका सुंदरीच्या शिल्पामध्ये तिच्या हातावर पोपट बसलेला दाखवला आहे. ती पोपटाशी संवाद करते आहे अशा प्रकारची तिची भावमुद्रा आहे. पूर्वी ज्याप्रमाणे संदेशवहनासाठी कबुतरांचा उपयोग केला जायचा त्याचप्रमाणे पोपटांचाही वापर केला जात असे. या स्तंभावर असलेल्या सुंदरींपैकी एक सुंदरी नुकतीच सुस्नात होऊन आलेली दिसते. ती आपल्या केसातील पाणी झटकत आहे. शिल्पाचे बारकाईने निरीक्षण केले तर तिच्या केसांवर असलेले जलबिंदू देखील आपल्याला दिसू शकतात, एवढी सजीवता या शिल्पांमध्ये आहे. या सुंदरींनी परिधान केलेले दागिने देखील पाहत राहावेत इतके अप्रतिम आहे. एका सुंदरीच्या हातातील बांगडया तर गोल फिरवता येतात. या मंदिरातील आणखी एक स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर सर्व देवदेवतांच्या प्रतिमा आणि सुरसुंदरी कोरल्या आहेत. मुख्य मंदिरातील पूजा झाल्यानंतर पुजारी या स्तंभाची देखील पूजा करतात आणि त्याचीही प्रदक्षिणा करतात. या स्तंभाची प्रदक्षिणा मंदिराच्या प्रदक्षिणेइतकीच महत्वाची मानली जाते.
भगवंताला आपल्याप्रमाणेच सजीव मानून दोन प्रकारे त्याची सेवा केली जात असे. रंगभोग आणि अंगभोग सेवा. रंगभोग म्हणजे भोजनोत्तर भगवंतासाठी गाणे बजावणे आणि करमणुकीची सेवा देणे. येथील गाभाऱ्यासमोर जो मंडप आहे, त्याला नृत्यमंडप असे म्हणतात. या ठिकाणी गाणी, नृत्य आणि इतरही काही कलाप्रकार सादर केले जात. राजघराण्यातील स्त्रिया याठिकाणी आपली गानसेवा, नृत्यसेवा देत असत. भरतनाट्यम सारख्या नृत्यात या स्त्रिया प्रवीण असत. अंगभोग म्हणजे भगवंताच्या मूर्तीला स्नान, उटणे, सुगंधी जलाभिषेक आदी सेवा अर्पण करणे.
मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी प्रवेशद्वाराजवळचे एक शिल्प आपले लक्ष वेधून घेते. हे शिल्प होयसळ राजांच्या वंशातील एका शूरवीराचे आहे. तो वीर सिंहाला मारतो आहे असे दाखवले आहे. या शिल्पातील प्रमाणबद्धता आणि रेखीवपणा अप्रतिम आहे. मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला महाभारतातील प्रसंग कोरलेले आपल्याला दिसतात.
याच मंदिर परिसरात इतरही तीन मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे मुख्य मंदिराशी साम्य दर्शवणारे चेन्नगरय मंदिर, वीरनारायण मंदिर आणि सौम्यानायकी मंदिर. ईशान्य दिशेला पायऱ्या असलेले वसुदेवतीर्थ म्हणून पाण्याचे एक कुंड आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अतिशय सुरेख असे कोरीव काम असून अनेक प्रसंग, देवदेवता आणि प्राणी बघायला मिळतात. मंदिराच्या तळाशी असणाऱ्या बाहेरच्या आडव्या रांगेत वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती कोरलेले आहेत. काही शांत, तर काही आक्रमक.हे गजराज म्हणजे समृद्धी, स्थैर्य आणि ताकदीचे प्रतीक आहेत. त्याच्याच वरच्या पट्ट्यात नक्षीकाम, सिंहमुखे, विविध प्रकारची नाजूक आणि आकर्षक नक्षी, नारी, यक्ष आदींचे रेखीव शिल्पकाम बघायला मिळते. मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीवर विविध भावमुद्रेतील घोडेस्वार दाखवले आहेत. काम करणारे कारागीर आपापल्या हत्यारांसह कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रेमी युगुले, रामायण-महाभारतातील प्रसंग, धर्म, अर्थ, काम आदी गोष्टी दर्शवणारे दैनंदिन जीवनातील प्रसंग, नर्तक, वादक अशा खूप काही गोष्टी बघायला मिळतात. त्या काळातील इतिहास जणू जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. बारकाईने पाहावीत अशा खूप गोष्टी या मंदिरात आहेत. सर्वांचेच वर्णन करणे इथे शक्य नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी एकदा तरी या मंदिराला अवश्य भेट द्यावी.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/१२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा