मुख्य सामग्रीवर वगळा

गा प्रकाशगीत

 उगवतीचे रंग 

गा प्रकाशगीत...

परवाच्या दिवशी एक सुंदर व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओत दोन माणसे बोलताना दाखवली होती. त्या व्यक्तींची नावे त्यात दाखवली नाहीत. पण मला तो व्हिडिओ फार आवडला. जीवनाचे सत्य तो सांगून जातो. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बहुधा डेव्हिड शॅड्स असावा. तो दुसऱ्या एका तरुण व्यक्तीशी बोलत होता. झाडांवरून त्यांची चर्चा सुरू होती. डेव्हिड त्या तरुणाला म्हणत होता," तुला माहिती आहे का झाडांची वाढ दोन दिशेने होत असते ? जमिनीच्या वरच्या बाजूला आणि जमिनीच्या खाली सुद्धा. "

तो तरुण आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. खरंतर झाडे जेवढी जमिनीवर वाढतात तेवढीच ती जमिनीखाली देखील वाढतात हे सत्य मला माहीत नव्हते असे नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली कारण यापूर्वी मी तसा विचारच केला नव्हता. मग झाडांबद्दल बोलताना डेव्हिड केवळ झाडांबद्दलच नव्हे तर जीवनाचे सत्यही उलगडू लागला. तो म्हणाला," आपल्याला सर्वांना जमिनीच्या वर वाढणारे झाड दिसते, त्याला येणारी फळे फुले दिसतात. आपण आनंदीत होतो आपल्याला फळे देणारा वृक्षच माहिती असतो. पण ही फळे किंवा फुले देणारा वृक्ष स्वतःला जमिनीत गाडून घेतो तेव्हाच आपल्याला तो फळे किंवा फुले देऊ शकतो. 

झाडांच्या या दोन दिशेने होणाऱ्या वाढीसाठी त्यांनी दोन शास्त्रीय शब्द वापरले. त्यातील एक होता Gravitropic तर तर दुसरा शब्द होता Phototropic. पहिल्या शब्दाचा अर्थ म्हणजेच जमिनीच्या खाली गुरुत्वाकर्षणाचा सामना करत वाढणारा झाडाचा भाग आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ म्हणजे जमिनीचे वर सूर्यप्रकाशात वाढणारा झाडाचा भाग. आपल्या सगळ्यांना हा जमिनीच्या वर वाढणारा झाडाचा भाग दिसतो झाड हळूहळू मोठे होत जाते त्याला फुले फळे येऊ लागतात. डेव्हिड म्हणतो, " Fruit system is very similar to the route system. " जेवढे झाड वर वाढते आणि पसरते तेवढेच त्याला जमिनीखाली देखील वाढावे आणि पसरावे लागते. झाडाचे बी जमीन भेदून एकदा वर आले की मग त्याला विरोधाचा सामना करावा लागत नाही. आता त्याचा सामना वेगळ्या गोष्टींशी असतो म्हणजे ऊन, वारा, वादळे, पाऊस यासारख्या नैसर्गिक गोष्टींशी. 

पण त्याच वृक्षाच्या मुळांना जमिनीखाली वाढताना मात्र अनेक प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागतो. जमीन कठीण असू शकते, खाली कठीण असा खडक असू शकतो, अंधार तर असतोच. ओलावा असेल किंवा नसेल. पण जमिनीखाली वाढताना मुळांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जमिनीच्या वर वाढायचे असेल, आपला विकास करून घ्यायचा असेल तर या सगळ्या अडचणींना तोंड द्यावेच लागते. त्यासाठी जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. 

फुले आणि फळे देणारे झाड सर्वांनाच आवडते. अशी झाडे सर्वांनाच हवी असतात. पण ही फुले फळे देण्यासाठी त्या वृक्षाने स्वतःला जे अंधारात गाडून घेतले, ते कोणाच्या लक्षात येत नाही. मानवी जीवनाला देखील ही गोष्ट लागू होते. आपल्याला जीवनामध्ये अनेक यशस्वी माणसे दिसतात. ती उच्च पदावर पोहोचलेली असतात, त्यांचा पैसा, त्यांचे ऐश्वर्य, त्यांचे दैदीप्यमान यश सर्वांनाच दिसते. आपल्यालाही आपण तसेच व्हावे असे वाटते. पण या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेले असतात, ते फार कमी लोकांच्या लक्षात येतात. वृक्षाचा जमिनीखाली अंधारात वाढणारा भाग लोकांना जसा दिसत नाही, तसेच यशस्वी लोकांनी यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेल्या अपयशाचा सामना, जीवनातील अनेक अडचणींना दिलेले तोंड याची फारशी दखल आपण घेतलेली नसते. 

रात्रीच्या वेळी आकाशात लखलखणारे एखाद्या नक्षत्र आपले लक्ष वेधून घेते, आपल्याला आकर्षित करते. पण सभोवताली असणाऱ्या अंधाराचा भेद करून त्या नक्षत्राचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. आपल्या भोवती असणाऱ्या अंधाराचा सामना त्या नक्षत्रालाही करावा लागतो, तेव्हाच त्याचे तेज जगाला दिसते. कोणत्याही महान व्यक्तीचे जीवन आपण पाहिले तर त्यांना या अंधाराचा अडचणींचा सामना करावा लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना केवढ्या प्रचंड विरोधाचा आणि मानहानीचा सामना करावा लागला हे आपल्याला माहिती आहे. लालबहादूर शास्त्री, सर विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना घरच्या अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. विपरीत परिस्थिती असतानाही शिक्षण घ्यावे लागले. महर्षी कर्वे यांनी देखील अशाच विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पण या सगळ्यांनी आपण ज्या परिस्थितीत आणि समाजात वाढलो त्याची जाणीव ठेवून पुढे आपल्या परीने समाजाचे ऋण फेडले  

संतांचे जीवन देखील यापेक्षा वेगळे नाही. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाचा केवढा छळ सहन करावा लागला. संत तुकारामांना देखील लोक निंदेला तोंड द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपले स्वराज्य अक्षरशः शून्यातून निर्माण केले. या सगळ्या महान व्यक्तिमत्त्वांनी अंधाराचा, संकटांचा, समस्यांचा सामना करण्याची इच्छाशक्ती दाखवली नसती तर जीवनात ते यशस्वी होऊ शकले नसते.

आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनीही अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. प्रसंगी वर्तमानपत्र टाकण्याचे काम त्यांना करावे लागले पण शिकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांचे वडील तर एक सामान्य नावाडी होते. नाव चालवताना वल्हे मारावे लागतात. शक्ती लावून त्या वल्ह्यांच्या सहाय्याने पाणी मागे सारावे लागते, तेव्हा कुठे नाव पुढे जाते. जीवनातही असेच वल्हे मारून कठीण परिस्थितीचे, समस्यांचे पाणी मागे सारावे लागते तेव्हा कुठे जीवनाची नाव यशाच्या दिशेने वाटचाल करायला लागते.

सूर्यप्रकाशात फुललेल्या, फळलेल्या वृक्षाकडे आपली नजर जाते आणि ते साहजिक आहे. पण त्याने जमिनीखाली स्वतःला गाडून घेऊन अंधाराचा जो सामना केलेला असतो, त्याची जाणीव देखील ठेवणे आवश्यक आहे. हे रहस्य आपल्याला लक्षात आले तर जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळते. आपल्या जीवनातील अडचणींवर, संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. जयवंत कुळकर्णी यांनी गायलेले एक सुंदर गीत मला याप्रसंगी आठवते. ते म्हणतात अंधाराची खंत तू कशाला करिसी रे

 गा प्रकाश गीत...

 आपणही अंधाराची खंत न करता प्रकाश गीत गात जावं. मग आपलाही जीवनवृक्ष फळा फुलांनी बहरल्याशिवाय राहणार नाही.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२९/१२/२०२४ 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...