उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २०
कथाकार रवींद्रनाथ
मागील काही भागात रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काव्यविश्व अफाट आहे. दोन अडीच हजारांवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्यामुळे काही निवडक कवितांबद्दल आणि त्यांच्या काव्यलेखनातील प्रतिभेबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या भागापासून त्यांच्या कथाविश्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू या.
रवींद्रनाथ हे प्रकृतीने, स्वभावाने मूलतः कवी होते. असे जरी असले तरी जेव्हा कवितेचे माध्यम त्यांना व्यक्त होण्यासाठी अपूर्ण वाटले, तेव्हा त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, संगीत, चित्रकला आदी वाङ्मय आणि कलाप्रकारांचा देखील अवलंब केला. चतुरस्त्र प्रतिभेचे धनी असलेले रवींद्रनाथ कलेच्या विविध अंगानी व्यक्त झाले. शिक्षण, साहित्य, तत्वज्ञान अशा वेगवेगळ्या प्रांतात संचार करून आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा त्यांनी उमटवला. त्यासोबतच प्रचंड कार्यही केले. प्रवास केला. एकाच व्यक्तीच्या प्रतिभेचे हे अफाट कर्तृत्व पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.
काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी बालवयातच सुरुवात केली होती. पण आपण कथा देखील लिहू शकतो याचा साक्षात्कार त्यांना बऱ्याच उशीरा झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांनी त्यांना जमीनदाराच्या कामात लक्ष घालायला सांगितले. तसा त्यांना या कामात रस नव्हता. पण वडिलांची आज्ञा त्यांनी पाळली. त्याचा त्यांना फायदाच झाले. त्यांचे अनुभवविश्व संपन्न होण्यास मदत झाली. त्यांना कलकत्ता शहर सोडून जमीनदाराच्या क्षेत्रात राहायला जावे लागले. पद्मा नदीच्या काठी आणि पद्मा नावाच्या हाऊसबोटीवर त्यांचा बऱ्याच वेळा मुक्काम असायचा. त्यावेळी दिसणारा निसर्ग, खळाळणारी पद्मा नदी, निसर्गाचे बदलते रंग त्यांच्या मनाला मोहवीत होते. पण त्याचबरोबर त्यावेळी विविध स्तरांमधील माणसांशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या जीवनात आणि दृष्टिकोनात बदल घडून यायला ही परिस्थिती कारणीभूत ठरली.
खेड्यातील माणसांमध्ये ते मिसळून गेले. ते जमीनदार म्हणून वागले नाहीत. गोरगरीब माणसे, स्त्रिया यांचे जगणे त्यांनी जवळून अनुभवले. ते पाहून त्यांचे अंतर्मन ढवळून निघाले. खेड्यापाड्यातील लोकांना हा तरुण जमीनदार आपला वाटायला लागला. त्यांची सुखदुःखं ते त्याच्याजवळ सांगू लागले. आपलं मन मोकळं करू लागले. रवींद्रनाथांचे कलासक्त मन नित्य नवनवीन गोष्टींच्या शोधात असायचे. निसर्ग, मानवी भावभावना यांच्या सखोल जाणिवांचे ते अभ्यासक होते. मानवी मनाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या कथेतील पात्रे मनावर खोल ठसा उमटवून जातात. मग ती काबुलीवाल्याची कथा असो वा पोस्टमास्टरची. काबुलीवाला कथेतील काबुलीवाला, मिनी आणि पोस्टमास्टरच्या कथेतील निर्मळ मनाची पोर रतन आपल्या मनात दीर्घकाळपर्यंत घर करतात.
आपल्या दीर्घकालीन चिंतनाची, वाचनाची जोड त्यांनी वास्तवातील अनुभवाला दिली. त्यातूनच त्यांच्या कथा जन्माला आल्या. त्यांच्या कथा वास्तवाशी कुठेही फटकून वागताना दिसत नाहीत. आपल्या लघुकथांबद्दल ते एका ठिकाणी स्वतःच म्हणतात, " माझ्या लघुकथा वास्तवाला सोडून आहेत हे मी कधीच कबूल करणार नाही. मी जे जे काही लिहिले आहे, ते ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे. "
त्यांच्या कथांमधील ग्रामीण जीवन, सामान्य माणसांची सुखदुःखे यांच्या सखोल जाणिवा जाणून घेण्यास त्या काळातील काही मंडळी असमर्थ ठरली. साहजिकच त्यांनी रवींद्रनाथांच्या कथांवर टीका केली. त्याबद्दल बोलताना रवींद्रनाथ एका सभेत म्हणाले होते, " लोक म्हणतात रवीबाबू तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. खेड्यातल्या दरिद्री लोकांच्या गोष्टी त्यांना काय कळणार ? मला असं म्हणावसं वाटतं की, जे असं बोलतात त्यांनाच ह्या खेडवळ जनतेबद्दल कमी कळतं. कशाच्या आधारावर हे लोक त्यांना जाणतात ? केवळ अभ्यासजड दृष्टीने त्यांचं अंतःकरण कळणं अशक्य आहे. त्यांच्यावर प्रेम करावं तेव्हाच त्यांचं अंतःकरण उघड होतं. " अशा दूर राहून टीका करणाऱ्या लोकांना रवींद्रनाथ एक सुंदर उपमा देतात. ते म्हणतात, " फुलझाडांच्या कुंडीत जन्मणाऱ्या किड्याला, तो त्याच्या आसपास वावरत असला तरी त्यातील फुलांची ओळख त्याला कधी होणार नाही. दुरून फुलाकडे पाहून जो आनंद उपभोगतो तोच त्याला खरं ओळखतो. "
टागोरांच्या कथा जन्माला आल्या त्या अशा वास्तवातून. मराठीतील काही समीक्षक टागोरांना लघुकथेचे जनक मानतात. कविवर्य बोरकर त्यांच्या कथांबद्दल लिहिताना म्हणतात, " रवींद्रनाथांच्या स्पर्शाने लघुकथेला नवा अवतार प्राप्त झाला. एवढेच नव्हे तर दिशीमासी सर्वांगांनी परिपुष्ट होऊन ती आपल्या नवनव्या लावण्याकला प्रकट करू लागली. " त्यांनी पहिली लघुकथा लिहिली ती १८९० मध्ये. त्यावेळी ते साधारण तिशीचे असतील. लहानपणी त्यांनी रामायण महाभारतातील कथा देखील वाचल्या होत्या. नंतर यथावकाश बंगाली, भारतीय आणि पाश्चात्य कथाकारांचे वाचन त्यांनी केले होते. पण टागोरांच्या कथा या टागोरांच्याच कथा आहेत. त्यांनी कोणाचेही अनुकरण केले नाही. त्यामुळेच एक कथाकार म्हणूनही अजरामर झाले. त्यांच्या कथा या जगभर औत्सुक्याचा विषय झाल्या. त्यांनी आपल्या बऱ्याचशा कथा त्यांनी १८९५ पर्यंत लिहून पूर्ण केल्या. या कालावधीत कथांचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या इतर कथा नंतर वेगवेगळ्या वेळी लिहिल्या गेल्या. त्यांची शेवटची कथा लिहिली गेली ती १९१७ मध्ये. त्यानंतर त्यांनी कथाप्रकार हाताळला नाही. त्यांच्या कथांचे तीन खंड बंगालीत ' पुष्पगुच्छ ' या नावाने प्रसिद्ध झाले होते. त्यात साधारणपणे त्यांच्या ८४ कथा आपल्याला आढळतात.
टागोरांना कथा लिहून शंभर वर्षे सहज झाली असतील. पण त्यांच्या कथा आजही टवटवीत वाटतात. बंगालमधील मातीचा गंध त्यांना आहे. त्या कथांमध्ये प्रतिबिंबित होणारा निसर्ग हा तर त्या कथेचा एक अविभाज्य भाग होऊन जातो. तिथली संस्कृती, भाषा, माणसांचे स्वभाव त्यांच्या कथांमधून प्रकट होतात. हल्लीच्या नाटक, चित्रपट किंवा धारावाहिकांमध्ये घडतात तशा वेगवान घटना त्यांच्या कथांमध्ये घडताना आपल्याला दिसत नाहीत. पण लक्षात राहतात ती त्यांच्या कथेतील पात्रं. त्यांच्या कथेतील पात्रं कृत्रिम किंवा काल्पनिक वाटत नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच सहजतेने वागताना दिसतात. त्यांचे गुण दोष, स्वभाव आणि त्यांचे वागणे या साऱ्यात एक नैसर्गिक सहजता आहे. या कथा लिहिताना रवींद्रनाथ या पात्रांच्या बऱ्यावाईट वागण्याबद्दल कोणतेही भाष्य करीत नाहीत. ते फक्त परिस्थिती आपल्यापुढे ठेवतात.
एक उदाहरण म्हणून त्यांची पोस्टमास्तर ही कथा आपण थोडक्यात पाहू. शहरी भागात वाढलेला एक तरुण बंगालमधील उलापूरसारख्या एका छोट्याशा खेड्यात पोस्टमास्तर म्हणून नोकरीसाठी येतो. तो एकटाच राहून दिवसभर आपले काम करीत असतो. रतन नावाची १२/१३ वर्षांची एक अनाथ मुलगी त्याच्याजवळ राहून त्याचे सारे काम करते. शहरात वाढलेल्या या तरुणाला निरस वाटावे अशा या ग्रामीण भागात रतनच्या सहवासामुळे काहीसा दिलासा मिळतो. त्याचे तेथील राहणे काहीसे सुखकारक होते. रतन त्याच्यासाठी स्वयंपाक, घराची स्वच्छता आदी कामे करते. तोही तिला लिहावाचायाला शिकवतो. एकदा हा पोस्टमास्तर आजारी पडतो. तापाने फणफणतो. अशा वेळी त्याची सेवाशुश्रूषा आईच्या मायेने आणि स्त्रीसुलभ भावनेने रतन करते. त्याचे पथ्यपाणी सांभाळते. तो त्यातून बरा होतो. पण त्याला आता या ग्रामीण जीवनाचा कंटाळा आलेला असतो. तो कलकत्याला बदलीसाठी अर्ज करतो. पण तो अर्ज नामंजूर होतो. मग तो राजीनामा देऊन आपल्या गावी जायला निघतो. रतनला तो सांगतो की मी उद्या माझ्या घरी माझ्या गावी जाणार आहे.
रतन काही बोलत नाही. त्याच्यासाठी स्वयंपाक करते. तिच्या मनात भावभावनांचे काहूर दाटून आले आहे. जेवण झाल्यावर ती त्याला विचारते, " मला आपल्या घरी घेऊन जाल का दादाबाबू ? " पण तो नकार देतो.
दुसऱ्या दिवशी होडीत बसतो. जायला निघतो. त्याच्याही मनात आता विचारांचे काहूर माजलेले असते. त्याला एकदा वाटतं की परत जाऊन रतनला आपल्याबरोबर घेऊन जावं. पण या विचाराला बाजूला सारून तो तसाच पुढे निघून जातो. इकडे बिचारी रतन त्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर चकरा मारत असते. बाहेर पाऊस सुरु असतो आणि तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. तिच्या मनात अंधुकशी आशा असते, " दादाबाबू परत येतील ?"
इथे कथा संपते. झालेल्या परिस्थितीवर रवींद्रनाथ कोणतेही भाष्य करीत नाहीत. पण अनाथ असलेली रतन दीर्घकाळ आपल्या मनात रुतून राहते. रतनाचं निष्पाप, निर्व्याज प्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा आपल्या मनात घर करतात. त्याचबरोबर पोस्टमास्टरच्या कोरडेपणाचाही राग येतो. रवींद्रनाथांच्या कथेत आणि रसिकांच्या हृदयात या अश्राप पोरीला कायमचे स्थान मिळते. रवींद्रनाथांसारखा श्रेष्ठ कलाकार मातीचे सुद्धा कसे सोने करतो हे यासारख्या कथांतून आपल्याला पाहायला मिळते.
रवींद्रनाथांच्या कथांमध्ये घटनांची भाऊगर्दी नाही. महत्वाचा आहे तो माणूस. या माणसाचे महत्व स्पष्ट करताना आपल्या ' मी ' या कवितेत ते म्हणतात,
" माझ्याच चेतनेच्या रंगानं पाचू झाला हिरवा
माणिक झालं लाल
मी नजर टाकली आकाशाकडे -
आणि उजळला प्रकाश
पूर्वपश्चिमेस,
गुलाबाकडे पाहून म्हणालो, ' सुंदर '
आणि सुंदर झाला तो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/१०/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा