मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २१

उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २१ 

कथाकार रवींद्रनाथ : भाग दोन 

मागील भागापासून रवींद्रनाथांच्या कथाविश्वाचा आढावा घ्यायला आपण सुरुवात केली आहे. रवींद्रनाथांच्या कथांना निसर्गाची नुसतीच पार्श्वभूमी लाभली आहे असे नाही. त्यांच्या कथांमध्ये निसर्ग आणि माणूस हातात हात घालून चालतात. किंबहुना माणूस हा निसर्गाचा एक भाग झालेला दिसतो. निसर्गात होणाऱ्या फेरबदलांची पार्श्वभूमी मानवी भावभावनांना लाभलेली दिसते. परंतु शेवटी त्यांच्या कथेत महत्वाचा आहे तो माणूस. माणसाच्या स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे एवढे जिवंत वर्णन त्यांच्या कथेत आलेले असते की त्यांची पात्रे दीर्घकाळ आपल्या मनात घर करून राहतात. या भागात आपण त्यांच्या तीन कथा थोडक्यात पाहू. काबुलीवाला, अंध भिकारीण आणि अतिथी. 

काबुलीवाला ही रवींद्रनाथांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. या कथेवर पूर्वी चित्रपटही निघाला होता. या चित्रपटात अभिनेते बलराज साहनी यांची प्रमुख भूमिका होती. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिलाही असेल. शालेय पाठ्यपुस्तकातही या कथेचा समावेश होता. ही कथा थोडक्यात अशी आहे. मिनी नावाची एक छोटी पाच सहा वर्षांची गोड पोरगी आपल्या आईवडिलांसह राहत असते. मिनीचा स्वभाव चौकस आहे. ती सतत निरनिराळे प्रश्न विचारून आपल्या आईवडिलांना भंडावून सोडत असे. एक दिवस सुका मेवा विकणारा काबुलीवाला तिच्या दारावरून जात असतो. त्याला ती हाक मारते. हा काबुलीवाला उंचपुरा, धिप्पाड आहे. त्याच्या खांद्यावर एक मोठी झोळी असते. मिनी त्या काबुलीवाल्याला पाहून सुरुवातीला घाबरते. पण नंतर त्यांच्यात चांगली मैत्री होते. काबुल प्रांतातून बदाम, किसमिस आदी सुकामेवा घेऊन हा रहमत पठाण विक्रीसाठी भारतात येत असतो. वर्षातून एकदा ठराविक वेळी तो आपल्या घरी जातो. या काबुलीवाल्याला मिनीच्या वयाचीच एक मुलगी असते. मिनीला पाहून त्याला आपल्या मुलीची आठवण येते. तिच्यातच तो आपल्या मुलीला पाहतो. खरेतर मिनीच्या आईला काबुलीवाला आणि मिनी यांच्यातील मैत्रीचे संबंध आवडत नाहीत. काबुलीवाला तिला पळवून नेईल असाही संशय तिच्या मनात असतो. पण तरीही त्यांची ही मैत्री सुरु असते. एक दिवस काबुलीवाला मिनीला म्हणतो, ' तू सासुरवाडीला जाऊ नकोस. ' सासुरवाडी म्हणजे काय ते कळण्याचे मिनीचे वयही नसते. ती उलट त्यालाच विचारते, ' तू जाणार का सासुरवाडीला ? ' तेव्हा काबुलीवाला म्हणतो, ' मी सासऱ्याच्या नाकावर एक ठोसा ठेवून देईन. ' दोघेही हसतात. असे त्यांचे हास्यविनोद सुरु राहतात. एक दिवस रस्त्यावर गलका ऐकू येतो. काबुलीवाल्याला पोलीस पकडून नेत असतात. मिनी त्याला पाहते. त्याने कोणावर तरी सुरीने हल्ला केलेला असतो. त्याच्यावर हल्ल्याचा आणि चोरीचा आळ येऊन त्याला जवळपास पंधरा वर्षे तुरुंगात काढावी लागतात. या मधल्या काळात मिनीला नवीन मैत्रीणी मिळतात. आणि ती काबुलीवाल्याला विसरूनही जाते. पण नंतर खऱ्या चोराचा शोध लागतो आणि काबुलीवाल्याची सुटका होते. तो मिनीच्या घरी तिला भेटायला येतो. आता काबुलीवाला जरा थकला आहे. त्याचे कपडे खराब झाले आहेत आणि अवतार न ओळखता येण्यासारखा झाला आहे. तो मिनीच्या घरी येतो तो दिवस विशेष असतो. मिनी आता मोठी झालेली असते आणि तिचं लग्न ठरलेलं असतं. सुरुवातीला तर मिनीचे बाबा त्याला ओळखत नाहीत. पण नंतर त्यांच्या लक्षात येते. आजच्या शुभ दिनी असा चोर माणूस त्यांना घरी आलेला नकोसा वाटतो. ते त्याला नंतर यायला सांगतात. पण तो म्हणतो, ' एकदा तरी बच्चीला भेटू द्या. ' पण तिचे वडील नाही म्हणतात. तो जाताना एक पुडा त्यांच्या हातात देतो. त्यात किसमिस, बदाम आदी सुका मेवा असतो. एवढे मिनीला द्या असे विनवतो. तो त्यांना म्हणतो, साहेब मी चोर नाही. माझ्यावर चोरीचा खोटा आळ आला होता. तो त्याच्या लांब झग्यात हात घालून एक कागद काढतो. त्यावर एका छोट्या मुलीच्या हाताचे ठसे असतात. तो म्हणतो, ' माझ्या मुलीचा फोटो तर माझ्यापाशी नाही. तिची माझी भेट नाही. पण हे तिच्या हातांचे ठसे मी सांभाळून ठेवले आहेत. ' ते पाहून मिनीच्या बाबांचे डोळे भरून येतात. या काबुलीवाल्याचा देश, धर्म, संस्कृती सगळे वेगळे असले तरी त्याच्यातही बापाचे हृदय आहे. मी आणि तो यात फरक नाही. ते मिनीला बोलावतात. मिनी वधूच्या वेशात येते. ती काबुलीवाल्याला सुरुवातीला ओळखत नाही. काबुलीवालाही ती मोठी झालेली पाहून बावरतो. तो म्हणतो, ' बच्ची, सासुरवाडीला निघालीस का तू ? ' यावेळी मिनी लाजते. ती घरात गेल्यावर काबुलीवाला जमिनीवर बसकण मारतो. त्याला कळते की आपली छोटी मैत्रीण आता पूर्वीची राहिली नाही. ती मोठी झाली आहे. आता त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलगी येते. तीही एवढीच मोठी झाली असेल असे त्याला वाटते. मिनीचे वडील त्याला लग्नखर्चासाठी बाजूला काढून ठेवलेल्या पैशातले काही पैसे देतात. त्याला म्हणतात, 'रहमत, तू आता आपल्या प्रांतात आपल्या गावी जा. आपल्या मुलीला भेट. तुला तुझी मुलगी भेटली की जो आनंद होईल, त्यातूनच माझ्या मुलीचं कल्याण होईल. ' कथेचा शेवट करताना रवींद्रनाथ लिहितात, ' लग्नखर्चात कपात करावी लागली. घरातली बायकामंडळी नाराज झाली होती. पण मंगलप्रकाशाने आमचा शुभ उत्सव अधिक उजळून निघाला होता. '

या कथेत रवींद्रनाथांनी वडिलांचे नाते वैश्विक पातळीवर नेऊन ठेवले आहे. वडील मग ते मिनीचे असोत वा रहमत सारखे परप्रांतातील. शेवटी पित्याचे हृदय सगळीकडे सारखेच ! त्याशिवाय आपण जेव्हा दुसऱ्याला आनंद देतो, तेव्हा तो शतपटीने आपल्याकडे परत येतो हेही ही कथा सांगते. मिनीचे वडील रहमतला आपल्या मुलीला भेटण्यासाठी पैसे देतात. रहमतला त्याची मुलगी भेटल्याने जो आनंद, सुख मिळणार आहे, ते सुख, तो आनंद परत येईल आणि मिनीचे कल्याण करील अशा प्रकारची उदात्त भावना या कथेत आहे. 

दुसरी कथा एका अंध भिकारीणीची आहे. ही अंध भिकारीण गावातील एका मंदिरासमोर सकाळ संध्याकाळ उभी राहून भीक मागते. लोक तिला अन्न, पैसे देतात. त्यावर ती आपली गुजराण करते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा ती भीक मागून आपल्या घराकडे परत जाते तेव्हा एक छोटा मुलगा येऊन तिच्या कमरेला मिठी मारतो. तिला आई म्हणतो. म्हातारी त्या मुलाला प्रेमाने जवळ घेते, त्याच्या अंगावरून हात फिरवते. त्याला आपल्याजवळ जे आहे त्यातील चांगले खाऊपिऊ घालते. त्या दोघांना एकमेकांचा लळा लागतो. दोघेही तिथेच राहू लागतात. त्या गावात एक सावकार असतो. एक दिवस म्हातारी आपले साठलेले पैसे त्याच्याकडे सांभाळण्यासाठी म्हणून ठेवते. एकदा तो मुलगा खूप आजारी पडतो. त्याला औषधोपचार करण्यासाठी आता तिच्याकडे पैसे नसतात. ती सावकाराकडे जाऊन आपल्या पैशाची मागणी करते. त्यावेळी तो तिने असे काही पैसे आपल्याकडे ठेवलेच नाहीत असे सांगून तिला हाकलून लावतो. म्हातारी जाता जाता त्याला म्हणते, ' तुला खूप मिळू दे. ' खरं म्हणजे हा तिचा आशीर्वाद नसून संतापातून आलेला शाप आहे. 

म्हातारी घरी जाऊन त्या मुलाला सोबत घेते आणि सावकाराच्या घरासमोर ठाण मांडून बसते. तो मुलगा तिच्या मांडीवर झोपलेला असतो. सावकार येऊन त्या मुलाला पाहतो तर त्याला तो आपलाच मुलगा वाटतो. त्याचा मुलगा काही दिवसांपूर्वी जत्रेत हरवलेला असतो. तो म्हातारीजवळून त्या मुलाला बळजबरी घरात घेऊन जातो. आता त्याच्यासाठी पैसे खर्च करायला तो तयार होतो. म्हातारी भिकारीण घरी निघून जाते. मुलगा जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला वेगळीच माणसे समोर दिसतात. तो म्हणतो, ' माझी आई कुठे आहे ? ' तो पुन्हा तापाने फणफणतो. वैद्य म्हणतात, ' त्याच्या आईला बोलवा. ' सावकार घरी जाऊन म्हातारीला घेऊन येतो. म्हातारी काही दिवस तिथेच राहते.तिला पाहून मुलगा लवकर बरा होतो. जे काम औषधाने, पैशाने होत नाही, ते प्रेमाने होते. मग म्हातारी आपल्या घरी जायला निघते. सावकार तिला आपल्या घरीच राहा म्हणतो पण ती नकार देते. त्याचे मन पालटते. तो म्हातारीने ठेवलेले पैसे तिला देऊ करतो. तो म्हणतो, ' हे घे. हे तुझेच पैसे आहेत. ' यावेळी म्हातारी पैसे घेत नाही. ती म्हणते, ' ते पैसे मी त्या मुलासाठीच ठेवले होते. ते त्याच्यासाठीच खर्च करा. ' गोष्ट संपते पण लक्षात राहते ती स्वाभिमानी अंध भिकारीण. स्वतःजवळ काही नसताना अनाथ मुलासाठी प्रेमाचा हात पुढे करणारी, त्याची आई होणारी. आणि शेवटी तर ती दाता बनते आणि सावकार याचक ! माणुसकीचे उदात्त दर्शन या कथेतून रवींद्रनाथांनी घडवले आहे. ही कथा वरवर पाहिली तर लहान मुलांसाठी वाटते पण तिच्यातील मतितार्थ मात्र सगळ्यांनीच लक्षात घ्यावा असा आहे. 

' अतिथी ' ही देखील रवींद्रनाथांची एक सुंदर कथा आहे. या कथेत मतिलाल नावाचे एक जमीनदार, त्यांची पत्नी अन्नपूर्णा, मुलगी चारूशी आणि कथेचा नायक असलेला एक मुलगा तारापद अशी प्रमुख पात्रे आहेत. तारापद हा पंधरा सोळा वर्षांचा एक ब्राह्मण मुलगा आहे. तो आपलं घर सोडून बाहेर पडला आहे. सहृदय असलेले मतीलाल बाबू बोटीतून आपल्या कठालिया या आपल्या गावी परतत असतात. बोटीवर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अन्नपूर्णा, आणि नऊ वर्षांची असलेली एक सुंदर मुलगी चारूशी आहे. तारापद  त्यांच्याकडे येतो. त्याला नंदिग्रामला जायचे असते. मला नंदिग्रामला सोडाल का असे तो मतीलाल बाबूंना विचारतो. तारापद हा मुलगा देखणा आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज आहे. कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाहता क्षणीच प्रभाव पडावा असा तो आहे. त्याच्याकडे पाहून मतीलाल त्याला ठेवून घेतात आणि नंदिग्रामला सोडण्याचे आश्वासन देतात. 

तारापद म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा एक मनमौजी मुलगा. तो बोटीवरील सगळ्यांचीच मने जिंकून घेतो. त्याला संगीताची आवड आहे. त्याचा आवाज उत्तम आहे. त्याला स्वयंपाक करणे, खरेदी करणे इथपासून ते बोट चालवणे आदी कौशल्ये सहज जमतात. अन्नपूर्णा तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे एवढ्या आकर्षित होतात की त्याला पाहून त्यांच्यातील वात्सल्यभाव जागृत होतो. त्याला कसे खुश ठेवता येईल याचा प्रयत्न त्या करतात. त्या त्याला त्याचा भूतकाळ किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी विचारतात पण त्याबद्दल तो फारसे बोलत नाही. त्याच्या आईला चार मुलगे आणि तीन मुली आहेत. तसा तो घरातही सगळ्यांचा लाडका असतो. पण एकाच ठिकाणी अडकून पडणे वा बंधनात राहणे हा त्याचा स्वभाव नाही. त्यामुळे तो दोन तीन वेळा घरातून पळून गेला आहे. 

 रवींद्रनाथांच्या इतर कथांप्रमाणेच या कथेलाही निसर्गाची सुंदर पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळी नदी, हिरवीगार कुरणे, गाणारे पक्षी आदी निसर्गाचे घटक कथेबरोबर साथसंगत करतात. तारापद या निसर्गाच्या सहवासातच रमून जातो. वाटेत नंदीग्राम गाव केव्हा निघून जाते ते कळत नाही. जमीनदार त्याला आपल्यासोबत आपल्या गावी घेऊन जातात. तिथे तो दोन वर्षे राहतो आणि थोड्याच कालावधीत सगळ्या गावकऱ्यांची सुद्धा मने जिंकून घेतो. 

पण या सगळ्या कालावधीत छोट्या चारुशीचे मन मात्र तो जिंकू शकत नाही. आपल्या आईवडिलांसह सगळे लोक या तारापदवर प्रेम करू लागल्यामुळे चारुशीचा जळफळाट होतो आणि  ती त्याचा द्वेष करू लागते. पण काही क्षण असे येतात की नकळत का होईना मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी तिला त्याच्याबद्दल ओढ वाटते. या सगळ्या संमिश्र आणि गुंतागुंतीच्या भावना आहेत. जमीनदार आपल्या लाडक्या मुलीचे म्हणजे चारुशीचे लग्न तारापदशी करायचे ठरवतात. पण मनमौजी असणारा आणि कुठेही अडकून न पडणारा तारापद तेथून गुपचूप पळ काढतो. तो ' अतिथी ' बनूनच राहतो. 

या कथेत रवींद्रनाथांनी सगळ्या पात्रांच्या मानवी स्वभावाचे विविध रंग दाखवले आहेत. पित्याचे हृदय असलेला आणि तारापदवर पित्याप्रमाणे प्रेम करणारा जमीनदार मतीलाल, तारापदवर मुलासारखी माया करणारी आई अन्नपूर्णा, हट्टी, दुराग्रही आणि द्वेष करणारी पण मनातून चांगली असलेली चारूशी. सगळ्यात लक्षात राहतो तो तारापद. तो सगळ्यात असूनही कशातही लिप्त होत नाही. रवींद्रनाथ त्याला गढूळ पाण्यात पोहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पंखाच्या राजहंसाची उपमा देतात. त्याने जग पाहिले आहे, अनेक लोकांना तो भेटला आहे. पण त्याने त्यांच्यातील सद्गुण तेवढे घेतले आहेत. वाईट गुणांपासून तो कोसो दूर आहे. एक प्रकारे हा मुलगा म्हणजे रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे असे म्हटले जाते. कारण त्यांचे निसर्गाबद्दलचे प्रेम, संगीत आणि कलागुणांची आवड, त्याचप्रमाणे सगळ्यात राहूनही सगळ्यांपेक्षा वेगळा अशा गुणांचे सुरेख मिश्रण असलेला हा तारापद आहे. रवींद्रनाथांच्या आणखी काही कथांबद्दल पुढील भागात जाणून घेऊ या. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१६/१०/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...