उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २४
कादंबरीकार रवींद्रनाथ
मागील भागात आपण रवींद्रनाथांच्या ' नष्टनीड ' या लघु कादंबरीचा आढावा घेतला. आज त्यांच्या आणखी काही कादंबऱ्यांविषयी जाणून घेऊया. काव्यलेखनाला रवींद्रनाथांनी अगदी लहान असतानाच सुरुवात केली होती परंतु कादंबरीच्या प्रांतात त्यांनी त्या मानाने बऱ्याच उशिरा प्रवेश केला. साधारणपणे वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्यांच्या आधी बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहून कादंबरी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. बंकिमचंद्र यांच्या ' आनंदमठ ' या कादंबरीला बंगालमध्ये अतिशय लोकप्रियता लाभलेली होती. बंकिमचंद्रांच्या इतर अनेक चाहत्यांप्रमाणे या कादंबरीचे वाचन रवींद्रनथांनी सुद्धा केले होते. त्यातूनच आपणही कादंबरी लेखन केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.
' बौ ठाकुरणीर हाट ' ही त्यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी म्हणजे कौटुंबिक कथाच आहे. यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ' राजर्षी ' ही दुसरी कादंबरी लिहिली. ही त्यांची एक ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीने रवींद्रनाथांचा कादंबरी लेखनाचा आत्मविश्वास वाढला. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये रवींद्रनथांनी स्वतः अनुभवलेल्या परिस्थितीचे चित्रण तर केलेच परंतु त्याबरोबरच त्याला आपल्या कल्पनाशक्तीची आणि प्रतिभाशक्तीची उत्तम जोड दिली. त्यानंतर त्यांची वहिनी कादंबरी देवी हिच्या मृत्यूचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी त्यांनी नष्टनीड ही कादंबरी लिहिली. यानंतर त्यांच्या ' चौखेरबाली ', ' नौका डुबी ' या कादंबऱ्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्या.
रवींद्रनाथांच्या लेखणीला ' मिडास टच ' होता असे म्हणता येईल. त्यांनी ज्या ज्या साहित्य प्रकाराला हात लावला, त्याचे सोने झालं. कादंबरी या प्रकारात लेखन करताना काही नवीन प्रयोगही त्यांनी केले. काही ठिकाणी कथा पुढे नेण्यासाठी आत्मनिवेदनाचे तंत्र वापरले. साहित्यकृतीतील सौंदर्य हे साध्य नसून साधन आहे असे ते मानत होते. तसेच साहित्यिकाने कलेचा आणि परिस्थितीचा सुरेख संगम घडवून आणला पाहिजे असे त्यांना वाटत होते. एखादी साहित्यकृती जेव्हा मानवी जीवनाशी एकरूप होते तेव्हाच तिच्यातून चिरंतन मूल्य प्रकट होतात असे ते मानत होते. यातूनच एखादी साहित्यकृती कशी असावी हे ही स्पष्ट होते. मानवी जीवन आणि त्यातील भावभावना समृद्ध करण्याचे कार्य रवींद्रनाथांच्या कादंबऱ्यांनी केले आहे. रवींद्रनाथांनी एकूण १४ कादंबऱ्या लिहिल्या पण त्यांच्या कादंबऱ्यांच्या संख्येबद्दल समीक्षकांमध्ये मतभेद आहेत कारण नष्टनीड, दुई बोन, मालंच आणि चार अध्याय यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींना काही मान्यवर लेखकांनी दीर्घकथा म्हटले आहे.
' चौखेर बाली ' ही त्यांची कादंबरी अतिशय वाचकप्रिय झाली. या कादंबरीत अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी भावभावनांचे चित्रण त्यांनी केले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर आदी भावना किती प्रभावी असतात आणि त्यामुळे मानवी जीवनात किती परिवर्तन घडून येत असते याचे सुरेख वर्णन करणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीत एक सुंदर सुस्वाभावी मुलगी आपल्या पतीच्या अकाली निधनामुळे विधवा होते आणि तिच्या नैसर्गिक भावभावना दडपल्या जातात. तारुण्यामध्ये जे सुख तिला मिळायला हवे होते, त्यापासून ती पारखी होते. तिचे जीवन म्हणजे या भावभावनांचा एक मोठा संघर्ष आहे. पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत आणि बऱ्याचदा मुलीचा काहीही दोष नसताना ती विधवा होत असे अशावेळी तिच्या मनातील दाहक आणि प्रभावी वासनांचे चित्रण ' चौखेर बाली ' ही कादंबरी करते. या कादंबरीने बंगाली साहित्यात मानाचे स्थान प्राप्त केले. रवींद्रनाथांचे मानवी जीवनाचे असलेले निरीक्षण आणि मानवी भावभावनांचा असलेला सूक्ष्म अभ्यास याचा पट उलगडलेला यातून दिसून येतो. मानवी जीवनात असलेले कामवासनेचे स्थान आणि त्याचे महत्त्व या कादंबरीत रवींद्रनाथ स्पष्ट करतात.
' नौका डुबी ' या कादंबरीत हिंदू धर्मात असलेले वैवाहिक निष्ठेचे पावित्र्य आणि त्याची मुळे किती खोलवर रुजली आहे ते रवींद्रनाथ स्पष्ट करतात. मनुष्याचे वेगळेपण हे त्याच्या आचार विचारांवर आणि संस्कारांवर त्याचप्रमाणे आयुष्यात तो करीत असलेल्या मेहनतीवर ठरते असे ही कादंबरी स्पष्ट करते. या कादंबरीत दोन प्रकारची तरुणाई त्यांनी दाखवली आहे. त्यातील एका बाजूला असतो कमलनयन सारखा उदात्त विचारांचा आणि लढाऊ बाण्याचा तरुण आणि दुसऱ्या बाजूला रमेश, योगेंद्र, अक्षय कुमार यांच्यासारखे स्वार्थी आणि सुखलून तरुण. या कादंबरीतील कमला या तरुणीचे पात्र रवींद्रनाथांनी अतिशय सुरेख चितारले आहे. कमला ही स्त्रीच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. जीवनात येणाऱ्या संघर्षाचा सामना ती सहनशीलतेने करते पण त्याचबरोबर ती कमालीची आनंदी वृत्तीची आहे. आजही स्त्रियांना सामाजिक जीवनात दुय्यम स्थान देणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीला ही कादंबरी खूप काही सांगून जाणारी आहे.
यानंतर १९१० मध्ये त्यांनी ' गोरा 'ही कादंबरी लिहिली. ' गोरा ' ही रवींद्रनाथांची पाचवी कादंबरी आहे. या कादंबरीत राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय अशा विविध विषयांवर रवींद्रनाथांनी कथेच्या माध्यमातून प्रतिकात्मक भाष्य केलेले आढळते. या कादंबरीतील जवळपास सर्वच पात्रे प्रतीकात्मक आहेत. तरीही त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा भरलेला आहे. ही कादंबरी म्हणजे व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या यांचे स्वरूप कसे असावे त्याचा एक आराखडा आहे. या कादंबरीला एक आधुनिक महाकाव्य म्हटले तरी चालेल एवढी तिची व्याप्ती मोठी आहे. गौरमोहन उर्फ गोरा हा या कादंबरीचा नायक आहे. गोरा हा एका आयरिश दाम्पत्याचा मुलगा आहे. गोरा ची आई त्याला युद्धकाळा दरम्यान जन्म देते आणि नंतर तिचा मृत्यू होतो. त्यानंतर कृष्णदयाळ आणि आनंदमयी हे बंगाली दांपत्य त्याला मुलाप्रमाणे वाढवते आणि त्याचा सांभाळ करते. विनय हा त्याचा जिव्हाळ्याचा मित्र आहे. कृष्णदयाळ आणि आनंदमयी यांच्या शेजारी एक ब्राम्हो समाजाचे अनुयायी असलेले दांपत्य राहत असते. त्यांचे नाव परेशबाबू आणि वरदासुंदरी असे असते. या दांपत्याला लावण्या, ललिता आणि लता तीन मुली असतात. सुधीर नावाचा एक मुलगा असतो. याच कुटुंबामध्ये परेश बाबू यांच्या एका स्वर्गवासी मित्राची मुलगी सुचरिता आणि तिचा सख्खा भाऊ सतीश हे सुद्धा राहत असतात. या कुटुंबाशी विनय आणि गोरा यांचा परिचय होतो. विनय आणि गोरा यांच्या वैचारिक अधिष्ठानामुळे ललिता आणि सुचरिता त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे या कथेमध्ये हरीमोहिनी, पानुबाबू, शशिमुखी ही पात्रे देखील कथेच्या आवश्यकतेनुसार येतात. ही कथा रवींद्रनाथांनी अतिशय रंजक पद्धतीने सादर केली आहे. ती वाचकांना खिळवून ठेवते.
वरदासुंदरीला तिच्याकडे राहत असणारे सुचरिता आणि सतीश ही मुले आवडत नाहीत. परेशबाबू उदार मनाचे असतात तर वरदासुंदरी ही त्यामानाने संकुचित विचारांची आहे. त्यामुळे जेव्हा सुचरिता आणि सतीश दुसरीकडे राहायला जातात तेव्हा तिला आनंद होतो. तिला वाटते की सुचरिताने हरणबाबुशी विवाह करावा आणि ब्राह्मो समाजात यावे. याच दरम्यान गोरा परेशबाबू यांच्या कुटुंबात जात येत असतो. तो आणि सुचरिता एकमेकांकडे आकर्षित होतात. पण गोराच्या डोळ्यापुढे देशसेवेचे ध्येय असल्यामुळे तो या नात्यात पुढे जात नाही. परेशबाबू आणि वरदासुंदरीची मधली मुलगी ललिता स्वतंत्र विचाराची असते. ती विनयकडे आकर्षित होते आणि त्याच्याबरोबर समुद्र सफरीवर जाते. विनय आणि ललिता एकमेकांशी लग्न करतात. या गोष्टीमुळे ब्राह्मो समाजात खळबळ उडते. गोरा हा कट्टर हिंदू असल्यामुळे त्याला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो संतापतो, अस्वस्थ होतो परंतु नंतर या गोष्टीचा स्वीकार करतो.
कृष्णदयाळ मरताना गोराला आपल्याजवळ बोलावून घेतात आणि त्याला सांगतात की मी मेल्यानंतर तू माझे श्राध्द करू शकणार नाहीस कारण तू माझा मुलगा नाहीस. हे कळल्यावर गोराला प्रचंड धक्का बसतो आणि तो आपल्या आईला म्हणजे आनंदमयीला विचारायला जातो. मग त्याला त्याच्या जन्माची सगळी हकीगत कळते. आपण आयरीश आहोत हेही त्याला कळते आणि आनंदमयीच्या महानतेची त्याला कल्पना येते.
या कथेत आनंदमयीचे पात्र रवींद्रनाथांनी फार सुंदर चितारले आहे आणि त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आनंदमयी ही भारत मातेचे प्रतिनिधित्व करते. ती मदर इंडियाची प्रतिमा आहे. सुरुवातीला कट्टर सनातनी हिंदू असलेली आनंदमयी आपल्या नंतरच्या जीवनात बदलते आणि उदार हृदयी होते सर्व धर्म, पंथ, जाती यांना समान मानू लागते. या कादंबरीत हिंदू आणि ब्राह्मो समाजाचा संघर्ष दाखवला आहे. आनंदमयी ही हिंदू समाजाची प्रतिनिधी आणि परेशबाबू हे ब्राह्मो समाजाचे प्रतिनिधी दाखवले आहेत. यातील खलनायक हरणचंद्र बाबू उर्फ हरण हा आहे.
ब्राह्मण कुटुंबात वाढलेला आणि संस्काराने हिंदू असलेला गोरा जन्माने मात्र आयरिश आहे. ब्रिटिशांनी भारतावर केलेल्या अन्यायाबद्दल त्याच्या मनात प्रचंड संताप आहे तो राष्ट्रभक्त आहे. आणि भारतमातेसाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी आहे. भारताची सामाजिक, आर्थिक प्रगती होण्यासाठी तो शर्थीने प्रयत्न करतो. त्याच्या रूपाने एका देशभक्ती करणाऱ्या तरुणाचे तेजस्वी चित्र रवींद्रनाथांनी रेखाटले आहे परंतु ज्यावेळी गोराला आपण आयरिश असल्याचे कळते, तेव्हा मात्र तो मनाने खचतो आणि त्याचे प्रयत्न लुळे पडतात.
रवींद्रनाथांनी ही कादंबरी ज्या काळात लिहीली त्या काळात हिंदू आणि ब्राम्हो समाजात संघर्ष सुरू होता. त्याची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. त्या काळात असलेले जातीभेदाचे विष आजही लोकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांनी रेखाटलेले आनंदमयीचे पात्र मात्र अद्भुत आहे. काळाच्या मानाने ती पुढचं विचार करताना दिसते. गोराला मुलगा मानून प्रचलित धर्म आणि जातव्यवस्थेच्या पलीकडे विचार करण्याची तिची क्षमता दिसते. म्हणूनच काही विचारवंतांनी या कादंबरीला आधुनिक महाभारताची उपमा दिली आहे. या कादंबरीवर चित्रपट आणि दूरदर्शन मालिकाही निघाल्या आहेत.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/१०/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा