उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग २३
आणखी एक कथा - नष्टनीड
रवींद्रनाथांच्या कथांचा आढावा आपण घेत आहोत. मागील २१ आणि २२ या भागात आपण त्यांच्या काही लघुकथा पाहिल्या. आजच्या या भागात त्यांची एक दीर्घकथा किंवा जिला लघु कादंबरी असेही म्हणता येईल, अशा नष्टनीड कथेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. नष्टनीड ही टागोरांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. या कादंबरीवर सत्यजित रे यांनी ' चारुलता ' या नावाचा सुंदर चित्रपट काढला आहे. १९६४ मध्ये हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये तत्कालीन बंगालमधील वातावरण बघायला मिळते. अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सत्यजित रे यांचा हा स्वतःचा अतिशय आवडता असा चित्रपट. या चित्रपटाचे कथानक थोडक्यात असे आहे. भूपती हा एक लिहिण्याची आवड असलेला पत्रकार आहे. पण साहित्यविषयक लेखन त्याला आवडत नाही राजकीय घटनांमध्ये त्याला रस आहे. तो स्वतःचे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू करतो. खरे तर भूपती हा गर्भश्रीमंत आहे आणि त्याला काही कामधंदा करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपली आवड म्हणून तो ही पत्रकारिता करीत असतो. या भूपतीचे लग्न चारुलता नावाच्या एका मुलीबरोबर झाले आहे. भूपती आपल्या पत्रकारितेला सुरुवात करतो तेव्हा चारुलता ही नुकतीच यौवनात पदार्पण करीत असते. परंतु आपल्याच नादात असलेल्या या भूपतीला त्याची खबरबात नाही. आपल्या पत्नीच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतील याचीही त्याला गंधवार्ता नाही. नात्यातीलच कोणीतरी जेष्ठ व्यक्ती त्याला चारुलतेने आता तारुण्यात पदार्पण केले आहे आणि तू तिच्याकडे लक्ष दे. ती घरी एकटीच असते असे सुचवले. पण त्यानंतरही नेमके काय करायचे हे त्याला कळत नाही किंबहुना त्या गोष्टीकडे तो जाणूनबुजून दुर्लक्ष करतो.
त्या भव्य असलेल्या घरामध्ये चारुलता आपला वेळ कसातरी घालवत असते. ती बुद्धिमान आहे तिला वाचनाची आणि लेखनाचीही आवड आहे. परंतु तिच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही. ती घरी एकटीच असते हे जेव्हा भूपतीच्या लक्षात येतं तेव्हा तो चारुलतेच्या भावाला त्याच्या पत्नीला म्हणजे मंदाला तिथे घेऊन येण्यास सांगतो. खरे तर चारुलतेच्या या तारुण्याच्या काळात तिला गरज आहे ती तिच्या पतीच्या सहवासाची आणि प्रेमाची. परंतु भूपती त्यासाठी अगदी वेगळाच उपाय योजतो. खरं तर हा उपाय मूर्खपणाचा आहे. त्याला वाटते आपल्या मेहुण्याच्या पत्नीची म्हणजे मंदाची चारुलतेला सोबत होईल आणि तिला कंटाळवाणे होणार नाही. ज्या उद्देशाने भूपतीने मंदाला तिथे आणण्यास सांगितले होते तो उद्देश तर बाजूलाच राहिला परंतु कथानकाने एक वेगळेच वळण घेतले असे आपल्याला दिसते.
भूपतीचा एक आतेभाऊ त्याच्याकडे शिक्षणासाठी येऊन राहिलेला असतो. त्याचे नाव अमल. हा अमल साधारणपणे चारुलतेच्या वयाचा असतो. त्याचे कॉलेजात शिक्षण सुरू असते. हा अमल तिला लिहिण्या वाचण्यात मदत करतो. तिला काही गोष्टी शिकवतो परंतु त्याची गुरुदक्षिणा म्हणून तिच्याकडून तो आपले लाड पुरवून घेतो. त्या दोघांमध्ये मैत्रीचे एक अनोखे नाते निर्माण होते. अमलने काही लिहिलेले तिला वाचून दाखवावे, तिने लिहिलेले त्याने वाचावे असे त्यांचे रोज सुरू होते. त्या दोघांचे एक वेगळे जग निर्माण झाले. या जगात त्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश नव्हता.
भूपतीच्या घराच्या मागील बाजूस थोडीशी पडीक जमीन होती. या जमिनीवर एक करमळाच झाड होतं. या जमिनीवर आपण एक सुंदर बाग निर्माण करावी अशी स्वप्न चारुलता आणि अमल पाहत होते. त्यासाठी त्यांचं वेगवेगळं प्लॅनिंग सुरू असायच. त्या दोघांच्या त्या झाडाखाली बसून गप्पा सुरू असायच्या. आपण इथे सुंदर बाग निर्माण करून भूपतीला चकित करायचं असाही त्यांचा विचार होता.
नंतर काही कारणाने हा विचार बाजूला पडला आणि त्या दोघांनी आपल्या लेखनाचा एक अंक सुरू करायचा आणि त्यात लिहायचे असे ठरवले. अर्थात हा अंक काल्पनिकच होता. दोघेही एकमेकांना आपले लेखन वाचून दाखवत परंतु एकदा दोघांमधीलच असणारे हे लेखन अमलने बाहेर प्रसिद्ध करायला सुरूवात केली. त्याचबरोबर चारुलतेने लिहिलेले देखील त्याने बाहेर छापून आणले आणि त्या दोघांमध्ये जो अलिखित करार झाला होता तो मोडला. इथेच त्यांच्या संबंधातील पहिली ठिणगी पडली.
हळूहळू अमल बदलू लागला. आपले लेखन तो चारुलतेला वाचून दाखवण्याऐवजी सामान्य कुवतीच्या मंदाला वाचून दाखवू लागला. चारुलतेला चिडवण्यात त्याला आनंद वाटू लागला. तशातच समीक्षकांनी त्याला धक्का दिला. समीक्षकांनी त्याच्या लेखनापेक्षा चारुलतेचे लेखन उजवे आहे असा शेरा दिला. त्यामुळे अमल दुखावला गेला आणि चारुलता आणि अमल यांच्यातील गैरसमजाची दरी रुंदावत गेली.
याच दरम्यान भूपतीचा व्यवसाय तोट्यात येऊ लागला. परंतु चारूबरोबर त्याला संवाद साधता येत नव्हता किंवा तिलाही त्याच्याबरोबर मोकळेपणाने वागता बोलता येत नव्हते अशा प्रकारचं वातावरण घरात निर्माण झालं होतं. दोघंही आपलं नवरा- बायकोचे नातं काहीशा औपचारिकपणेच निभावत होते.
अमलला आपल्या चुकांची जाणीव आता होऊ लागली होती. आपल्या वागण्याबद्दल गांभीर्याने तो विचार करू लागला होता आणि त्यातूनच त्याने तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतला. संधी मिळताच तो परदेशात निघून गेला. जाताना त्याने चारुलतेचा मोकळेपणाने निरोपही घेतला नाही. त्याचे असे जाणे चारुलतेच्या मनाला खूप लागले. ती सतत त्याचाच विचार करू लागली.
त्याचवेळी तिचे संस्कारी मन आपण आपल्या पती कर्तव्यात कुठेही कमी पडू नये म्हणूनही धडपडत होते. भूपतीला सुद्धा आपण आपल्या पतीकर्तव्यात कमी पडलो याची जाणीव होऊ लागली होती. पण आता सगळीच गडबड झाली होती. दोघांच्याही वागण्या बोलण्यात अंतर पडले होते. एक घरटे उध्वस्त झाले होते. एकमेकांना समजून घेऊन दुसरे घरटे उभे करण्याची दोघांचीही धडपड केविलवाणी ठरत होती.
चारुने आता आपल्या मनाचा एक वेगळाच कप्पा उघडला होता. त्यातील आनंदात ती रममाण होऊ लागली होती. तिला अंमल बरोबर घालवलेले क्षण आठवत होते. तो आपला निरोप न घेता असा अचानक निघून गेला त्याचे तिला वाईट वाटत होते. त्याने आपल्या जाण्याबद्दल तिला मोकळेपणाने सांगितले असते तर तिला त्याचे काही वाटले नसते. तिची अवस्था उदासवाणी झाली. कामात तिच्या चुका होऊ लागल्या.
भूपतीलाही आता या घरात राहणे नकोसे वाटू लागले. घरातील जीवनरस जणू आटून गेला होता. संबंधात एक प्रकारचा शुष्कपणा आला होता. मैसूरला एक नवीन वर्तमानपत्र सुरू होणार होते. तिकडे संपादक म्हणून जाण्याचे त्याने ठरवले. चारूला हे कळल्यानंतर तिने त्याला विचारले की आता परत कधी येणार ? तेव्हा तो म्हणाला, ' तुला जर एकटं वाटलं तर कळव. मी येईन.'
अशा रीतीने एक घरटं, एक संसार उध्वस्त झाला होता. या कथेमधील हा विवाहबाह्य संबंधांचा विषय टागोरांनी इतरही काही कथा कादंबऱ्यांमधून हाताळला आहे. आज आपल्याला विवाहबाह्य संबंधांचे काही विशेष वाटत नाही. आज तर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून या विषयाचेच कथानक दाखवले जाते. परंतु त्या काळात टागोरांनी या विषयाला हात घातला. अर्थातच त्यावेळी त्यामुळे बरीच खळबळ माजली. परंतु यातून काळाच्या पुढे असणारी टागोरांची दूरदृष्टी आपल्याला दिसते.
नष्टनीड या कथेतील सर्वच माणसे सुसंस्कृत आणि समंजस आहेत. ती कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्याला दिसत नाहीत. त्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार सामंजस्याने केलेला दिसतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ते शांतपणे बाजूला होतानाही दिसतात. खरे तर या कथेचा शेवट वेगळ्या प्रकारेही टागोरांना करता आला असता. कथेतील कोणत्यातरी एका पात्राचा शेवट किंवा मृत्यू दाखवता आला असता. भूपतीला आपला नवरेपणा गाजवून बायकोला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करताना दाखवता आले असते किंवा चारुलतेला आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळताना दाखवता आले असते. परंतु यापैकी काहीच त्यांनी केले नाही. टागोरांचे कथाकार म्हणून वैशिष्ट्य हे की त्यांच्या कथांमध्ये माणसे ही माणूस म्हणून वागतात. ती पुरुष किंवा स्त्री म्हणून वागत नाहीत. माणसांच्या वागण्याबोलण्यातील आणि विचारातील नैसर्गिकता,सहजता त्यांच्या कथांमध्ये आपल्याला आढळते. या कथेत भूपतीचे दूर जाणे हाच त्या क्षणी एक योग्य पर्याय होता. जाताना ती त्याला विचारते की परत केव्हा येणार ? तेव्हा तो उत्तरतो, ' तुला एकटं एकटं वाटेल तेव्हा मला पत्र लिही. मी निघून येईन. ' याचा अर्थ असा की दोघांनीही आपल्या संबंधातील सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद केलेले नाहीत, एकमेकांवर कोणतेही आरोप केले नाहीत आणि आहे ती परिस्थिती शांतपणे स्वीकारली आहे. त्यामुळेच ही कथा अक्षर वाङ्मयात गणली गेली आहे.
आपल्या काही कथांमध्ये टागोरांनी विवाहबाह्य संबंध दाखवले परंतु ते दाखवताना कुठेही अश्लीलता किंवा शृंगारिक वर्णने आलेली नाहीत. हे त्यांचे कथाकार म्हणून कौशल्य आहे. त्यांच्या कथांमधील पात्रे आपल्या वागण्या बोलण्यातून जीवनाच्या पुढच्या टप्प्याला नैसर्गिकपणे सामोरे जात असतात त्यांच्या संबंधाबद्दल चांगले वाईट योग्य किंवा अयोग्य नैतिक किंवा अनैतिक अशा प्रकारचा कोणताही शेरा किंवा शिक्का टागोर मारत नाहीत त्या संबंधात गुंतलेल्या व्यक्तींची जी होरपळ होताना दाखवली आहे ती त्यांच्या स्वतःच्या वागणुकीमुळे झाली आहे आणि त्या होरपळीच्या यातना ती पात्रे मूकपणे सहन करताना दिसतात. त्यांच्या इतर कथांमध्ये असणारी निसर्गाची पार्श्वभूमी देखील या सगळ्या कथांना विलक्षण परिणामकारकपणे लाभली आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/१०/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा