उगवतीचे रंग
अर्थ नवा...
एका प्रसन्न सकाळी घरासमोरील बागेत मला जास्वंदीच्या झाडावर एक सुंदर फुल उमललेलं दिसलं. ते जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतं. मी थोडावेळ तिथंच थांबलो. त्या फुलानं माझ्या विचारांना गती दिली. ते विचार तुमच्यासमोर मांडतोय. रचना म्हटली तर गद्यात, म्हटली तर पद्यात. पण रचनेपेक्षा मनातील भाव महत्वाचा, काहीसा काव्यात्मकच !
अर्थ नवा..
हे फुला, तू इतका सुंदर उमलला आहेस की
असं वाटतं तुझ्यापासून क्षणभरही दूर जाऊ नये.
किती लालभडक रंग तुझ्या त्या पाकळ्यांचा !
पाकळ्यांची नाजूकता तरी केवढी !
जणू उलगडलेली रेश्माची लडी !
सांगशील का मला तुझ्या जन्माचे रहस्य
आलास तू कुठून कसा, घेऊन हे सुहास्य ?
फांदी हिरवी, पाने हिरवी, खोड सावळ्या रंगाचे
तरी लाभले कुठून तुला रे हे लेणे प्रसन्न वर्णाचे ?
काल पाहिली तुझ्याच जागी नाजूक एक कळी ती कोमल.
कळी कसली ती ? मजला वाटे एक चिमुकली गोड परी.
हिरवे हिरवे वस्त्र तिचे अन् ओठांवरती नाजूक लाली.
ऐकले होते कधी कुठे मी, जीवनात अपुल्याही येते परी
आणि जाताना देऊन जाते भेट तिची सुंदर न्यारी.
तशीच ही कळी परी भेटली होती मजला,
पण कसे कोण जाणे ओळखले होते मी तिजला.
परी आली आणि गेली सकाळी कुठेतरी पळून
पण जाताना गेली जागी तिच्या सुरेख लाल पुष्प ठेवून.
काय दिले होते त्या गोड परीने मला ?
जणू मला ती सांगून गेली, सल्ला लाख मोलाचा एक भला.
आयुष्य असतं अल्प, एक दिवसाचं देणं
म्हणून का सोडायचं असतं आतून उमलून येणं ?
अरे, येतच असतात जीवनात वारा वादळं
संघर्षातच असते जीवन, घे समजून सगळं.
जीवन म्हणजे असतो उत्सव
निमंत्रण त्या निर्मात्याचं
सामील व्हावे हसत खेळत
करण्या सार्थक जन्माचं.
डोळे उघडून जरा पहा मजकडे
नसे सुगंध वा रूप देखणे मजपाशी
कधी असते भुईवर, कधी गजाननाच्या पायाशी.
फिकीर मजला नसे जराही
अनिश्चित त्या भवितव्याची.
ऐक ऐक जरा तुला म्हणून सांगते,
अंतरीचे भाव तुझ्याजवळ मांडते.
जे जवळी आहे अपुल्या, यावे त्यातच पूर्णपणे उमलून
जगणं व्हावे इतके सुंदर की द्यावं आयुष्य उधळून !
दुःख ठेवूनी अंतर्यामी, वाटत जावी हास्यफुले
अर्थ जगण्याचा असे नवा हा धरून मनी तू चाल पुढे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३/१०/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा