मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २२

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग २२

रवींद्रनाथांच्या काही स्त्रीपात्र प्रधान कथा 

आजच्या या भागात रवींद्रनाथांच्या काही स्त्रीपात्र प्रधान कथा आपण पाहणार आहोत. या कथांमधून त्यांनी सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनातील सुखदुःखे मांडली आहेत. त्यांच्या अंतरातील व्यथा, वेदना, तळमळ या गोष्टी यातून व्यक्त झाल्या आहेत. काही कथांमध्ये ही स्त्री सोशिक आहे, अन्याय, अत्याचार सहन करणारी आहे.  काही ठिकाणी ती अत्यंत स्वाभिमानी आणि बाणेदार आहे. परिस्थितीविरुद्ध बंड करणारी आहे. पण रवींद्रनाथांच्या सर्व कथांमध्ये एक समान धागा आपल्याला दिसतो. त्यांनी स्त्रीची प्रतिष्ठा जपली आहे. तिच्या सन्मानाला धक्का लागू दिलेला नाही. काही कथांमधील स्त्रिया या काळाच्या दृष्टीने खूपच पुढारलेल्या वाटतात. त्यातूनच रवींद्रनाथांचा सामाजिक आणि स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. काही ठिकाणी पुरुषी मानसिकतेला त्या पुरून उरताना दिसतात. त्यांना दोन शब्द सुनावण्याची हिम्मत त्यांच्यात आहे. समाजाला दिशा देण्याची मानसिकता त्यांच्यात आहे. एक स्त्री म्हणून स्वतःच्या विकासाकडे त्या वाटचाल करताना दिसतात. 

' वही ' सारख्या त्यांच्या कथा समाजातील पुरुषी मानसिकता प्रकट करतात. स्त्रियांबद्दलचा त्यांचा मागासलेला दृष्टिकोन स्पष्ट करतात आणि शेवटी वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. ' वही ' या कथेची नायिका एक लहान गोड मुलगी आहे. तिचं नाव उमा. उमा लिहावाचायाला शिकते आणि तिला कोण आनंद होतो ! तिच्या लिहिता येण्याचा आनंद ती भिंतीवर, पुस्तकावर, जमिनीवर असा सगळीकडे लिहून व्यक्त करीत असते. सुरुवातीला तिचं लेखन अगदी बाळबोध आहे. पण त्यातून तिला आनंद मिळत जातो. तिच्या घरातील मंडळी मात्र तिचा हा आनंद समजून घेण्यास अपात्र दिसतात. त्या काळात लहान वयात लग्नं होत असत. तसंच उमाचं लग्नं नवव्या वर्षीच लावून दिलं जातं. प्यारीमोहन हे तिच्या नवऱ्याचं नाव. त्याला तीन बहिणी असतात. उमा एकदा गुपचूप दार बंद करून वहीत काहीतरी लिहिते आहे हे त्या पाहतात आणि प्यारीमोहनला सांगतात. प्यारीमोहन हा जुनाट विचारांचा तरुण आहे. त्याला वाटतं की एकदा लिहिणं वाचणं सुरु झालं की घरात नाटक-कादंबऱ्या येणार आणि संसाराकडे दुर्लक्ष होणार. त्याचे असेही मत होते की स्त्रीशक्ती आणि पुरुषशक्ती यांच्या मिलनातून पवित्र अशा दाम्पत्यशक्तीचा उदय होतो. पण स्त्रीनं शिक्षण घेतल्यास स्त्रीशक्ती पराभूत होते आणि फक्त पुरुषशक्तीच निर्माण होते. पुरुषशक्तीचा पुरुषशक्तीशी आघात होऊन अशी प्रलयशक्ती निर्माण होते की ज्यामुळे दांपत्यशक्ती विनाशशक्तीत विलीन होते आणि मग स्त्री विधवा होते. 

तसा तर त्याच्या विचारांना काहीच शास्त्रीय आधार नव्हता पण त्याला कोणी विरोधही करू शकत नव्हतं. उमेकडून तिची वहीच हिसकावून घेतली जाते. वही कसली, तर तिचा आनंद आणि जगण्याचा आधारच एक प्रकारे हिरावून घेतला जातो. कथेत शेवटी रवींद्रनाथ म्हणतात, ' प्यारीमोहनचीही ' सूक्ष्मतत्त्वकंटकीत ' विविध लेखांनी परिपूर्ण अशी एक चोपडी होती. ती काढून घेऊन माणसांच्या हिताचं काम करणारं मात्र कुणीच नव्हतं. ' इथे वाचकाला अंतर्मुख करण्याची रवींद्रनाथांची ताकद आपल्याला दिसते. 

त्यांची ' महामाया ' या नावाची एक सुंदर कथा आहे. महामाया ही एक सुंदर तरुणी या कथेची नायिका आहे. ती सुंदर तर आहेच, पण तेजस्वी आणि बाणेदार आहे. ती चोवीस वर्षांची झाली आहे, पण तिचं लग्न राहिलं आहे. रवींद्रनाथ तिच्या सौंदर्याचं वर्णन फार सुरेख शब्दात करतात. ' महामाया म्हणजे जणू काही शरदाच्या उन्हात तळपणारी शुद्ध सोन्याची पुतळी. ' राजीव हा तरुण तिच्यावर मोहित झालेला असतो. तो भर दुपारी मोठी हिंमत  करून नदीकाठच्या एका पडक्या देवळात तिला बोलावतो आणि लग्नाची मागणी घालतो. ती त्याला सांगते, ' मी येईन, वाट पहा. 'याच वेळी तिचा भाऊ भवानीचरण तिथे येतो. तो स्वभावाने अत्यंत तापट वाटतो. घरी गेल्यावर तो महामायेला एक विशेष वस्त्र देतो. ते असतं लाल रंगाचं रेशमी महावस्त्र. तिला ते परिधान करायला लावून तो तिला आपल्याबरोबर स्मशानात घेऊन जातो. तिथे एका मरणासन्न वृद्धाशी तिचं लग्न लावून देतो. दुसऱ्याच दिवशी महामाया विधवा होते. तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जातं. हातपाय बांधून चितेवर ठेवलं जातं. पावसाळ्याचे दिवस असतात. पावसाने चिता विझते. तिच्या बांधलेल्या दोऱ्या तुटतात. महामाया चितेवरून उठते राजीवला सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे येते. त्याला ती फक्त एक अट घालते की त्याने कधीही तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर म्हणून हट्ट धरायचा नाही. राजीव ती गोष्ट मान्य करतो आणि त्यांचं लग्न होतं. महामायेनं त्याला अशी अट घालण्याचं कारण हे असतं की चितेवर तिच्या चेहऱ्याची डावी बाजू होरपळलेली असते आणि ती त्यामुळे कुरूप दिसते. शरीराने जरी ती बदलली असली तरी मनानं मात्र ती पूर्वीचीच असते. पण शेवटी तिचा झाकलेला चेहरा त्यांच्या संबंधाआड येतोच. राजीव आपला दिलेला शब्द पाळत नाही. महामायेनं त्याच्यावर जो विश्वास टाकलेला असतो, त्याला तडा जातो. स्वाभिमानी आणि बाणेदार महामाया तडक तिथून निघते आणि बाहेर पडते ती कायमचीच ! 

मला आवडलेली आणखी एक कथा म्हणजे ' स्त्रीर पत्र. ' ही कथा सांगण्यासाठी रवींद्रनाथांनी पत्ररूपी माध्यम वापरले आहे. मृणाल ही या कथेची नायिका आहे. ती सुंदर आणि बुद्धिमान आहे. एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या आणि सामान्य कुटुंबातील मृणालचं लग्न एका मोठ्या जमीनदाराच्या मुलाशी होतं. या जमीनदार कुटुंबातील मोठी सून म्हणजे मृणालची मोठी जाऊ रूपाने अगदीच सामान्य आहे. तिच्या रूपाची उणीव भरून काढण्यासाठी मृणालला सून म्हणून करून आणलं जातं. या जमीनदारांच्या घरात स्त्रियांना फारशी किंमत नसते. मृणालच्या सौंदर्याचं चार दिवस कौतुक होतं पण एक स्त्री म्हणून तिला नंतर अपमानास्पद वागणूक दिली जाते. एक दिवस तिच्या मोठया जाऊबाईंची आई वारते आणि जावेची लहान बहीण बिंदू त्यांच्याकडे राहायला येते. बिंदुला तिच्या घरी तिचे चुलत भाऊ त्रास देतात म्हणून ती आपल्या या मोठ्या बहिणीकडे येते. पण तिच्या अशा येण्याने घरातल्या सर्वांनाच जणू मोठं संकट पडतं आणि कुठून आली ही बया म्हणून कपाळावर आठ्या पडतात. बिंदू दिसायला कुरूप असते. तिचाही घरात छळ सुरु होते. तिला मोलकरणीपेक्षाही खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. अशा वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती मृणाल. ती मृणालला आपल्या खोलीत आश्रय देते. मृणालही तिच्यावर प्रेम करते. एक दिवस बिंदूचे लग्न एका ठार वेड्या माणसाशी लावून दिले जाते. मृणाल आपले काही दागिने तिच्या अंगावर घालून तिला रवाना करते. पण तिची सासू महाभयंकर असते. बिंदू सासरच्या छळामुळे पळून येते. मग बिंदू आपल्या चुलतभावाकडे आश्रयासाठी जाते. पण तो तिची रवानगी पुन्हा सासरी करतो. बिचाऱ्या बिंदूचा काहीही दोष नसताना हे जग तिचं वैरी बनलेलं असतं. बिंदूपुढे एकच पर्याय असतो. ती मरणाला जवळ करते. आता मृणालला सुद्धा सासरी राहायचं नसतं. तिला मुक्त व्हायचं असतं. सासरच्या वातावरणात तिची घुसमट होते, श्वास कोंडतो. ती घर सोडून बाहेर पडते. कायमची, परत न येण्यासाठी आणि नवऱ्याला पत्र लिहिते. खरंतर तुला आपल्या सोबत बिंदूला घेऊन जायचं असतं आणि त्या कष्टदायक संसारातून तिची मुक्तता करायची असते परंतु त्यापूर्वीच बिंदूने आपल्या जीवनाचा शेवट करून घेतलेला असतो. मृणाल एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येते. तिच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत परंतु या पंधरा वर्षात तिने आपल्या घरच्यांना कधीही जाब विचारला नाही. तो जाब या पत्रातून आपल्या नवऱ्याला ती विचारते आणि या पत्रात तिची भाषा अधिकाधिक धारदार होत जाते. तेच ' स्त्रीर पत्र ' हे पत्र आपल्याला अंतर्मूख करतंच पण त्या काळातील स्त्रियांच्या परिस्थितीवर आणि सनातनी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढतं. मृणालने आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या या पत्रातून स्त्रियांनी स्वतंत्र आणि मुक्त जीवनाचा कसा विचार करायला हवा आणि आपला आत्मसन्मान कसा जपायला हवा हे नकळत रवींद्रनाथ आपल्यापुढे ठेवतात.

या पत्रात ती शेवटी म्हणते, ' आज मी बाहेर आलेय. आणि बाहेर आल्यावर मला कळलं की माझ्या गौरवाला ह्यापरती दुसरी जागा नाही. माझं दुर्लक्षित रूप ज्याच्या नजरेत भरलं तो ह्या संपूर्ण सुंदर आकाशातून मला निरखतोय. आता मधली सून संपली. ' ती पुढे म्हणते, ' तुम्हाला वाटत असेल की मी मरायला निघालेय- भिऊ नका. अशी जुनी थट्टा मी तुमच्याशी करणार नाही. मीराबाईही माझ्यासारखीच बाईमाणूस होती. तिची बेडीही काही कमी वजनाची नव्हती. तिला जगण्यासाठी मरावं लागलं नाही. मीराबाई गाताना म्हणाली होती, " सोडून दे आईबाप, सोडून दे जे जिथं असेल ते. प्रभू, मीरा आता गुंतलीय. आता जे व्हायचं ते होईल. " हे गुंतणं म्हणजेच जगणं. मीही जगेन. मी जगलेच. ' 

अशा या रवींद्रनाथांच्या जिवंत आणि जोमदार व्यक्तिरेखा. वाचकांना हलवून सोडतात, अंतर्मुख करतात. या कथांना शंभर वर्षे होऊन गेली तरी त्यांचे सौंदर्य, त्यांच्यातील सच्चेपणा आजही टवटवीत आहे. त्यांच्या कथेतील या स्त्रिया दुःख सोसतात, प्रसंगी मृत्यूला कवटाळतात पण स्वाभिमानशून्य जिणं जगत नाहीत, लाचार होत नाहीत. स्त्रीजातीची एक प्रतिष्ठा त्या जपतात. टागोरांच्या कथांमधून स्त्रीची प्रतिमा उजळून निघते. 

मी या ठिकाणी फक्त तीनच कथांचा उल्लेख केला आहे. सर्व कथांबद्दल लिहिणे शक्यही नाही. रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्व आणि साहित्य यांची व्याप्ती अमर्याद आहे. जो जो आपण वाचत जातो, तो तो आपल्याला कळते की आपल्याला फक्त हिमनगाच्या वर दिसणाऱ्या भागाएवढेच कळले आहे. खूप मोठा भाग अज्ञात राहिला आहे. 

त्यांच्या जीवित आणि मृत, समाप्ती, शिक्षा, ऊन-सावली, क्षुधित पाषाण, अतिक्रमण, पहिला नंबर, वर-वधू या सारख्या कथांतून अशा स्त्रीपात्रांचे दर्शन आपल्याला घडते. वाचकांनी त्या मुळातूनच वाचाव्या अशा आहेत. रवींद्रनाथांच्या २१ कथांचे भाषांतर मामा वरेरकर यांनी ' एकविंशति ' या नावाने केले आहे. मृणालिनी गडकरी यांनीही त्यांच्या काही कथा ' पोस्टमास्तर आणि इतर कथा ' या नावाने अनुवादित केल्या आहेत. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१८/१०/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...