मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १९

  उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १९

रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी 

गेल्या काही भागांपासून रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचाआढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. हा आढावा म्हणजे टागोरांच्या काव्यसृष्टीला केलेला केवळ स्पर्श आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या मोठया प्रासादात विविध दालने असावीत आणि त्यातील काही दालनेच पाहता यावीत, त्यानेच डोळे दिपून जावेत तसे माझे झाले आहेत. त्याची काव्यसृष्टी म्हणजे सागर आहे. कितीही वेळा खोल बुडी मारली तरी प्रत्येक वेळी मौल्यवान रत्ने, मोती हाताला लागतील. 

टागोरांनी जवळपास दोन अडीच हजार कविता लिहिल्या. नुसत्या कविताच लिहिल्या असं नाही तर त्यातील बऱ्याच कवितांना चाली दिल्या. रवींद्रनाथ थोर साहित्यिक असले तरीही त्यांचा जीव जडला होता तो कविता या साहित्यप्रकारावर. कवितेशी त्यांचं नातं अतूट होतं, आजन्म होतं. आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात ते आपलं आणि कवितेचं नातं स्पष्ट करतात. 

" कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या ( रवींद्रनाथाचा मुलगा रथींद्रनाथ )वयाचा होतो तेव्हाच तिच्याशी माझा वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणीच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धूसर पण अपूर्व अशी अवस्था समजून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन - की त्या काळी माझं कवितेबरोबरच शुभमंगल झालं होतं. पण ह्या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊ दे, पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते, पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतुन हृदपिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनं एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणण्याची सोय नाही. तरीसुद्धा माझं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ' साधने 'त लिहितो, जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला बसतो, त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगलं ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधीच खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे आश्रयस्थान. " 

' स्वातंत्र्याचा स्वर्ग ' Heaven of  Freedom ' ही त्यांची कविता मला फार आवडते. या कवितेत परमेश्वराकडे जी मागणी रवींद्रनाथांनी केली आहे, तिची कधी नव्हे तेवढी आवश्यकता आजच्या घडीला आहे. ही कविता म्हणजे रवींद्रनाथांनी देशाच्या संदर्भात पाहिलेले सुंदर स्वप्नच आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागितले, तशाच प्रकारची मागणी रवींद्रनाथ या कवितेत परमेश्वराकडे करताना दिसतात. आपल्या देश नुसता स्वतंत्र व्हावा असं ते म्हणत नाहीत, तर तो ' स्वातंत्र्याचा स्वर्ग ' व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. 

अनेकांना ही कविता म्हणजे निव्वळ आदर्शवाद वाटेल. अशा तऱ्हेचं जग अस्तित्वात येणं शक्यच नाही असंही वाटेल. पण तशा प्रकारचा विचार, तशी मागणी परमेश्वराकडे करायला काय हरकत आहे ? स्वप्न पाहायचीच असतील तर ती उदात्त, भव्यदिव्य पाहायला हवीत. रवींद्रनाथांच्या जीवनात आणि कल्पनेत क्षुद्र कल्पनांना स्थान नव्हते. ते आनंदयात्री आणि सौंदर्ययात्री होते. ' सत्य, सुंदर मंगलाची नित्य आराधना ' करणारा हा महाकवी होता. 

या कवितेची अनेक जाणकारांनी भाषांतरे केली आहेत. प्रा. नरेंद्र जाधव यांनी या कवितेचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. या कवितेला सुंदर चाल देऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलं आहे. मूळ इंग्रजीतील कविता अशी आहे -

Where the mind is without fear and the head is held high;
   Where knowledge is free;
   Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
   Where words come out from the depth of truth;
   Where tireless striving stretches its arms towards perfection;
   Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
   Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action
   Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

या कवितेचा प्रा नरेंद्र जाधव यांनी केलेला हा भावानुवाद बघा 

भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा, 
मम देशही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता. 
हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा 
गर्भातूनी सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता 
अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता 
रूढींना नाही थारा, विचारी अखंड निर्मलता
तव प्रेरणेमुळे ही नव-उन्मेषी व्यापकता 

या कवितेचा आनंद घेण्यासाठी रवींद्रनाथांचा काळ आपल्याला समजून घ्यावा लागेल. रवींद्रनाथ ज्या काळात जन्मले, वाढले तो काळ परकीय राजवटीचा होता. ब्रिटिशांची अनिर्बंध सत्ता आपल्या आणि इतर अनेक देशांवर होती. इंग्रजी सत्तेविरुद्ध आपली स्वतंत्र मते मांडण्याचा, लिहिण्याचा अधिकार प्रजेला नव्हता. प्रजेला त्यांच्या जुलूम, दडपशाहीला सामोरे जावे लागत होते. भारतीय संस्कृती, धर्म, तत्वज्ञान इ. गोष्टी शिक्षणातून हद्दपार होऊन ब्रिटिशाना हवे तसेच शिक्षण देण्यावर भर होता. शरीराने भारतीय पण मनाने इंग्रज असे तरुण त्यांना राज्यकारभार करण्यासाठी हवे होते. हे लक्षात घेतले की सुरुवातीच्या काही ओळींचा अर्थ स्पष्ट होतो. लोक रूढी, परंपरांच्या बेड्यात अडकले होते. स्वतंत्र विचार करणे, अविरत प्रयत्न करीत राहणे आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करणे लोक विसरले होते. 

या कवितेच्या सात ओळी आहेत. मी म्हणेन की हे इंद्रधनुषी सप्तरंग आहेत. या कवितेच्या पहिल्या ओळीत ते म्हणतात 
' भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा ' 

जगण्याचे स्वातंत्र्य असे असावे की तेथे मन निर्भय म्हणजे भयशून्य असावे. गर्वाने माथा सदैव उन्नत हवा. जिथे भीती असते, लाचारी असते, तिथे माना खाली असतात. माझा देश स्वातंत्र्याचा असा मुक्त स्वर्ग हवा. अशा वातावरणात माझा देश जागृत व्हावा. 

हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा 

ज्ञान हे मुक्त असले पाहिजे, त्यावर कोणतीही बंधने नकोत. ते सर्वांना हवे, सर्वांसाठी हवे. त्या ज्ञानाला नियम, मर्यादांच्या भिंती घालून त्याला संकुचित करता उपयोगी नाही. आज निरनिराळ्या भिंती घालून आपण जगाचे म्हणजे पर्यायाने माणसांचे विभाजन केले आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत इ. अनेक गोष्टींनी माणसामाणसातील मुक्त संबंधाच्या नात्यांना शृंखलांमध्ये बांधून ठेवले आहे. रवींद्रनाथांना कोणतीही बंधने नसलेले मुक्त जग अपेक्षित होते. अर्थातच मुक्त म्हणजे चांगल्या अर्थाने. कारण जेथे हक्क असतात, तेथे कर्तव्यही अपेक्षित असते. पसायदानात ज्ञानेश्वर माउलींना जी संतांची मांदियाळी अपेक्षित आहे, तशीच इथे रवींद्रनाथांना असावी. 

गर्भातूनी सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता 

जे काही बोलले जाईल त्याला सत्याचा आधार असावा. त्यातूनच शब्दांना सौंदर्य प्राप्त व्हावे. सत्याचा आधार नसलेले शब्द म्हणजे केवळ पोकळ शब्दांचे बुडबुडे. जेव्हा रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला स्वातंत्र्याचा स्वर्ग या भूमीवर अवतरेल, तेव्हा त्यात सत्य, शिव आणि सुंदर ही मूल्यं असतीलच. अशा या जगात शब्द जेव्हा सत्याचा आधार घेऊन येतील, तेव्हा ते सुंदरच असतील यात शंका नाही. 

अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता

अशा स्वातंत्र्याचा स्वर्ग असलेल्या या जगात मानव सततच्या प्रयत्नांनी परिपूर्णतेकडे वाटचाल करील. परिपूर्णतेचा ध्यास त्याला असेल. त्यासाठी अविश्रांत मेहनत, परिश्रम तो करील. त्यातूनच तो स्वतःला आणि भोवतालच्या जगाला सुंदर आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करील. 

रूढींना नाही थारा, विचारी अखंड निर्मलता

या जगात निरर्थक, जुनाट झालेल्या रूढी परंपरांना थारा असणार नाही. त्यातील अयोग्य, अमंगल असलेले टाकून चांगले तेवढे स्वीकारार्ह असेल. अंधानुकरण, वाईट विचारांना थारा नसेल. नदीच्या पात्रात घाण, गाळ अडकला की तिची प्रवाहितता खंडित होते, पाणी दूषित होते. पण तो गाळ, ती घाण काढून टाकली की पाणी पुन्हा निर्मळ आणि प्रवाही होते. त्याचप्रमाणे एकदा का हे वाईट, अमंगल, रुढींचे अंधानुकरण करणारे विचार काढून टाकले की निर्मळ विचारांचा प्रवाह अखंड वाहू लागेल. 

तव प्रेरणेमुळे ही नव-उन्मेषी व्यापकता 

रवींद्रनाथ परमेश्वराला म्हणतात, अशा या जगात तुझ्या कृपेने, प्रेरणेने आमचे विचार आणि कृती सतत विशाल आणि उदात्त होत जातील. म्हणजे जे काही आमच्या हातून निर्माण होईल, ते सुंदर आणि उदात्तच असेल. अखिल मानवजातीच्या हिताचे असेल. 

रवींद्रनाथ आपल्या कवितेची सुरुवात where या शब्दाने करतात. शेवटची ओळ वगळता कवितेच्या सगळ्या ओळींची सुरुवात याच ' where ' शब्दाने झालेली आहे. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा स्वर्ग म्हणजे अशी जागा, असा देश अपेक्षित आहे, की जिथे त्यांनी प्रत्येक ओळीत अपेक्षिलेल्या गोष्टी असतील. आणि शेवटच्या ओळीत परमेश्वराला प्रार्थना आहे की, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजेच हे परमेश्वरा, माझा देश असा स्वातंत्र्याचा स्वर्ग होऊ दे अशी प्रार्थना ते त्याला करतात. ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी जे मागणे मागितले आणि शेवटी विनंती केली की 

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ।। 

अगदी तशाच प्रकारचे मागणे रवींद्रनाथांनी देवाकडे केले आहे. शब्द वेगळे असतील, पण अंतरीच्या भावना त्याच आहेत. म्हणूनच या कवितेत ते शेवटी परमेश्वराला विनंती करतात 

   Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

असा स्वातंत्र्याचा स्वर्ग आपला देश व्हावा अशी रवींद्रनाथांसोबत आपणही परमेश्वराकडे प्रार्थना करू या. निदान त्या दृष्टीने प्रयत्न करू या. त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करू या. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

५/१०/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...