मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २५

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २५

रवींद्रनाथांच्या आणखी काही कादंबऱ्या 

१९१६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्यापैकी एक होती 'घरे बाहिरे 'आणि दुसरी होती ' चतुरंग.' ' चतुरंग ' ही एक सामाजिक कादंबरी आहे. या कादंबरीत नावाप्रमाणेच चार व्यक्तींच्या स्वभावाचे चार रंग रवींद्रनाथांनी दाखवले आहेत. या चारही व्यक्ती म्हणजे गावोगावी फिरणारे आणि कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार आहेत. जेव्हा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष सुरू होतो तेव्हा मानसिक संतुलन राखण्यासाठी व्यक्ती जी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, त्याचे सूक्ष्म चित्रण या कादंबरीत रवींद्रनाथांनी केले आहे. त्यातून त्यांचा मानवी स्वभावाचा सूक्ष्म अभ्यास दिसून येतो. रवींद्रनाथांच्या कादंबऱ्यांमध्ये ' गोरा 'या कादंबरीचा अपवाद वगळला तर अनेक साहित्य रसिकांना त्यांची ' चतुरंग ' ही कादंबरी खूप भावते.

त्यांच्या ' घरे बाहिरे ' या कादंबरीला बंगालच्या फाळणीची पार्श्वभूमी आहे. या कादंबरीत निखिल, संदीप आणि विमला अशी तीनच पात्रे आहेत. त्यांच्या आत्मनिवेदनातून ही कादंबरी पुढे जात राहते. या कादंबरीत रवींद्रनाथांनी व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा परस्पर संबंध चितारला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य, निरक्षरता, स्त्रियांचे प्रश्न, नैतिकता धार्मिक रुढी आदी अनेक समस्या नवभारताचे निर्माण करू पाहणाऱ्या समाजसुधारकांसमोर होत्या. 

या कादंबरीत निखिल, विमला आणि संदीप यांच्या स्वभावाचे मनोरम चित्रण रवींद्रनाथांनी केले आहे. निखिल हा एक स्वतंत्र विचारांचा आणि उमद्या मनाचा तरुण आहे. त्याचे जसे आपल्या राष्ट्रावर प्रेम आहे तसेच आपल्या पत्नीवर देखील आहे. आपल्या पत्नीचे निर्व्याज आणि नैसर्गिक प्रेम त्याला हवे आहे. हे प्रेम कोणत्याही दबावातून किंवा रुढीपरंपरेतून आलेले नसावे असे त्याला वाटते. त्यामुळे आपल्या पत्नीला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचे तो पूर्ण स्वातंत्र्य देतो. 

संदीपचे व्यक्तिमत्व मात्र पूर्णपणे राजकीय पुढार्‍यासारखे आहे. सत्य, अहिंसा, मानवता, नीतिमत्ता यासारखी अनेक मानवी मूल्ये गुंडाळून ठेवून तो जहाल राष्ट्रवादाचा अवलंब करतो आणि लोकांना भडकावणारी भाषणे करतो. त्यातून तो आपला राजकीय फायदा करून घेत असतो. त्यासाठी तो अनेक भल्याबुऱ्या मार्गांचा अवलंब करतो त्याचे हे वागणे निखिलला अजिबात पसंत नसते.

पण निखिलचे दुर्दैव हे की त्याची बायकोच संदीपच्या जाळ्यात अडकते. संदीपच्या भाषणांना भुलून जाऊन ती त्याच्याकडे ओढली जाते. प्रसंगी आपल्या पतीला भ्याड, नामर्द दुर्बल आणि राष्ट्रद्रोही म्हणण्यापर्यंत तिची मजल जाते. आपल्याच घरातील पैसे चोरून नेऊन ती संदीपला देत असते. त्यामुळे निखिल आणि विमला यांचा संसार मोडण्याची वेळ येते परंतु अशावेळी निखिल आपल्या मनावर ताबा ठेवतो तो स्वतःचा संयम सुटू देत नाही पुढे कालांतराने विमलाला संदीपचे सत्य स्वरूप कळते आणि आपल्या वागण्याचा तिला पश्चाताप होतो आणि मग ती निखिलला शरण जाते. पण त्यांचा संसार मात्र पुन्हा रुळावर येऊ शकत नाही. धार्मिक दंगलीत स्त्रियांना सोडवण्यासाठी धावून गेलेल्या निखिलवर प्राणघातक हल्ला होतो आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि विमलाच्या नशिबी विधवेचे जिणे येते. अशी ही सामाजिक विषयांना स्पर्श करणारी अप्रतिम कादंबरी !

या कादंबरीला स्वदेशी चळवळीची पार्श्वभूमी सुद्धा आहे. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीत रवींद्रनाथांनी सुद्धा भाग घेतला होता. त्यातून आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब या कादंबरीत पाहायला मिळते. रवींद्रनाथांच्या मते केवळ विदेशी मालाची होळी करून भागणार नाही तर स्वदेशी वस्तू निर्माण करण्याचे कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. स्वदेशी वस्तू मुबलक, उत्तम दर्जाच्या आणि स्वस्त मिळणे आवश्यक आहे म्हणजे लोकांचा विदेशी वस्तूंचा वापर कमी होईल. बळजबरीने एखाद्या विदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानावर आक्रमण करून त्यातील माल आणि दुकान जाळणे हे त्यांच्या दृष्टीने नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. 

या कादंबरीतील संदीपच्या मते राष्ट्रभक्ती ही भीतीच्या भावनेतूनच निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची दहशत तो विदेशी माल विकणाऱ्या दुकानदारांना बसवू इच्छितो. रवींद्रनाथांच्या मते असे लोक देशाला देवी देवतेचे स्वरूप देऊन स्वतः त्यांचे पुजारी बनून बसतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. जगाच्या इतिहासातील हिटलर आणि मुसोलिनी ही अशाच प्रकारची उदाहरणे आहेत. 

रवींद्रनाथ यांची ' शेषेर कविता ' ही एक आगळी वेगळी कादंबरी आहे. या कादंबरीत गद्य आणि पद्य शैलीच्या सुरेख संगम आहे. वैचारिक मतभेदांमुळे मैत्रीमध्ये कशाप्रकारे अंतर पडू शकते ते ही कादंबरी उत्तम प्रकारे दाखवते. एकमेकांचे मित्र असलेले दोन विद्वान आपल्या वैचारिक मतभेदांमुळे एकमेकांपासून कसे दूर जातात हे या ठिकाणी बघायला मिळते.

तीन पिढ्यांचे कथानक सांगण्यासाठी रवींद्रनाथांनी ' योगायोग ' ही कादंबरी लिहिली परंतु यात मात्र एकाच पिढीची कथा येते. या कादंबरीचा विषय प्रामुख्याने कौटुंबिक असला तरी त्याला सामाजिक पार्श्वभूमी आहे. माणूस हा समाजात वाढतो, त्याच्यावर समाजाचे संस्कार होतात. त्यामुळे त्याच्या पुढील जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे या कादंबरीत सांपरंतुले आहे.

कुमुदिनी ही या कादंबरीची नायिका आहे. ती साध्या सोज्वळ भारतीय पतिव्रता स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. तिचा पती मधुसूदन हा मात्र अत्यंत जुलमी, क्रर आणि स्वार्थी आहे. त्याच्या अत्याचारांना कंटाळून ती माहेरी निघून जाते. पण माहेरी गेल्यानंतर आपल्या पोटात मधुसूदनचा गर्भ वाढतो आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती पुन्हा सासरी परत येते पण परत आल्यावर तिच्या लक्षात येते की तिच्या गैरहजेरीत तिच्या पतीने त्याच्या भावजयीला जवळ केले आहे हे समजल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसतो परंतु आपल्या संस्काराच्या आणि जीवनशक्तीच्या जोरावर हे दुःख ती झेलत राहते भारतीय पतिव्रता स्त्रीची ही कहाणी रवींद्रनाथांनी अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. 

' चार अध्याय ' ही रवींद्रनाथ यांची शेवटची कादंबरी. १९२० मध्ये गांधीजींनी असहकार चळवळीची सुरुवात केली होती. या चळवळीचा परिणाम म्हणजे बंगालमध्ये देखील क्रांतीची लाट उसळली. या घटनेची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे काय ? राष्ट्र कसे बनते ? केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय ?  अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते. 

रवींद्रनाथांपेक्षा २१ वर्षांनी जेष्ठ असणाऱ्या बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगालमध्ये कादंबरीकार म्हणून आपले स्थान प्राप्त केले होते. रवींद्रनाथांनी त्यांच्या कादंबऱ्यांचे अनेक वेळा वाचन केले होते. रवींद्रनाथांचे समकालीन असलेले शरदचंद्र बाबू सुद्धा बंगालमध्ये एक प्रतिष्ठित कादंबरीकार म्हणून मान्यता पावले होते. अशा या वातावरणात रवींद्रनाथांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली आणि आपल्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीने आणि प्रतिभेने स्वतःचे एक स्वतंत्र स्थान निर्माण केले. रवींद्रनाथांच्या कादंबरी लेखनाबद्दल शरदचंद्र बाबूंनी फार सुंदर उद्गार काढले आहेत ते म्हणतात की मी रवींद्रनाथ यांची ' गोरा ' ही कादंबरी अनेक वेळा वाचली किंबहुना तिचे पारायण केले. हिंदू धर्म म्हणजे काय हे कदाचित स्वामी विवेकानंद, डॉ. राधाकृष्णन यांच्यासारख्या विद्वानांची पुस्तके वाचून समजणार नाही ते हिंदू धर्माचे रूप ' गोरा ' या कादंबरीतील आईचे चरित्र वाचून आपल्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभे राहते. रवींद्रनाथांच्या लेखणीची ही ताकद आहे. कोणत्याही श्रेष्ठ कादंबरीकाराला हेवा वाटावा अशा प्रकारचे हे त्यांचे सामर्थ्य आहे.

कादंबरीकार म्हणून रवींद्रनाथांचे साहित्य जगतावर मोठेच ऋण आहे हे मान्य केले पाहिजे.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१/११/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...