मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग सहा

 उगवतीचे रंग

भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग सहा
दीनानाथ पर्वाची अखेर...
मास्टर दीनानाथ संगीतसूर्य म्हणून तळपत असताना, लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही मंगेशकर भावंडे संगीतक्षेत्रात आपल्या पित्याकडून प्रकाश, उष्णता, शक्ती ग्रहण करीत होती. ही छोटी छोटी रोपटी रुजून वर यायला सुरुवात झाली होती. या सगळ्यात लतादीदी आणि तिच्या खालोखाल मीनाताई या मोठ्या असल्याने त्यांना मास्टर दीनानाथांकडून जास्त शिकायला मिळाले. सगळी मुलं आपल्या आईबाबांची लाडकी असतात, तशी ही भावंडं देखील होती. आईबाबा आपल्या मुलांना लाडाने वेगळं नाव ठेवतात आणि ती मुलं नंतर कितीही मोठी झाली तरी त्याच नावाने त्यांना ते हाक मारतात. अशीच ही भावंडं दीनानाथांची लाडकी होती. त्यांनी त्यांची मोठी मजेशीर नावं ठेवली होती. छोट्या लताला बाबांशिवाय क्षणभरही करमत नसे. ती सारखी बाबा बाबा करायची म्हणून लाडाने ती झाली लताबाबा आणि तताबाबा, मीनाताईंचं बारसं मिणको म्हणून करण्यात आलं तर आशाताई आणि हृदयनाथ यांचे नामकरण अनुक्रमे हबं आणि बाळ असे झाले.
दीनानाथांचा गाण्याबरोबरच ज्योतिषविद्येचाही उत्तम अभ्यास होता. त्यांनी भाकीत केलेल्या गोष्टी कधी खोट्या ठरल्या असे झाले नाही. आपली लताबाबा आणि सगळीच मुले संगीतकलेत आपले नाव उज्वल करतील हे त्यांनी जाणले होते आणि त्या दृष्टीने त्यांना योग्य ते शिक्षण देण्यासही त्यांनी सुरुवात केली होती. लताची संगीत क्षेत्रातील गती प्रचंड होती. गायकीचा प्रत्येक पैलू तिने सहजगत्या आत्मसात केला होता. दीनानाथांनाही आपल्या या लाडक्या लेकीला शिकवताना अभिमान वाटत होता. लताने गायिलेली प्रेमकल्याण रागातील ' पिया का घर नही ...' सारखी बंदिश असो की खजांची तील ' लौट गयी ' हे गीत किंवा सावन के दिन आये रे या सारखं चित्रपटातील गीत असो, तिच्या आवाजात त्या गीताला एक वेगळेच माधुर्य प्राप्त होत असे. सांगलीत तर तिने के एल सैगल यांचं ' मै क्या जानू क्या जादू है.. ' हे गीत सादर करून प्रचंड टाळ्या मिळवल्या.
संगीत शिकवता शिकवता मास्टर दीनानाथ संस्कारांचे देखील संस्कार या भावंडांवर करत. लताला ते म्हणत, ' आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे, सत्य आहे असा तुझा एकदा ठाम विश्वास असला तर मग कोणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. ' आपल्या पित्याची ही शिकवण या सगळ्या भावंडानी कायम पाळली आहे. पुढील आयुष्यात आपल्याला जो योग्य वाटला तोच निर्णय लतादीदींनी घेतला आहे. कारण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण करतो ते योग्य आहे का , सर्वांच्या हिताचे आहे का हा विचार त्या करतात, त्यामुळे कधी पश्चातापाची वेळ येत नाही.
दीनानाथांची संगीत नाटक क्षेत्रातील घोडदौड ऐन भरात असताना चित्रपटसृष्टीचा उदय झाला होता. त्यामुळे नाटकांना चित्रपटाशी स्पर्धा करावी लागत होती. नाटकांचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. तरी दीनानाथ आपल्या उदार स्वभावामुळे आणि धैर्याने बलवंत नाटक मंडळीच्या सुमारे दीडशे लोकांना सोबत ठेवून त्यांचा खर्च करीत होते. अशातच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते. महागाई प्रचंड वाढली होती. ज्या बलवंत नाटक मंडळीने ऐन भरात असताना ऐश्वर्य आणि प्रसिद्धी भोगली तीच मंडळी आता नुकसानीला तोंड देताना मेटाकुटीला आली होती. नाटक मंडळींच्या कर्मचाऱ्यांचे पगार देणेही अवघड झाले होते. दीनानाथांनी आतापर्यंत ज्या लोकांना जवळ ठेवून मायेने पोसले होते, तेच लोक आता दिवस फिरताच बेईमान झाले होते. बरेचसे लोक हाती लागेल त्या वस्तू घेऊन कंपनीतून बाहेर पडले. असतील शिते तर जमतील भुते ही म्हण त्यांनी सार्थ केली होती. ज्या कंपनीने त्यांना आजपर्यंत आश्रय दिला होता, त्याच कंपनीला त्यांनी ओरबाडून खायला मागेपुढे पाहिले नाही.
दीनानाथ म्हणजे अत्यंत स्वाभिमानी आणि स्व-कर्तृत्वावर विश्वास असलेली व्यक्ती होते. त्यांनी निराश न होता. परिस्थिती पाहून बलवंत पिक्चर्स कार्पोरेशन ही संस्था स्थापन करून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालबलवंत नाटक मंडळी ही संस्था सुरु केली. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. बुडत्याचा पाय खोलात अशी त्यांची अवस्था होत गेली. नियतीने त्यांना जेवढया वेगाने ऐश्वर्याच्या शिखरावर नेले होते, त्याहीपेक्षा जास्त वेगाने खाली उतरवले.
अशातच त्यांचा रक्तदाबाचा विकार बळावला. संकटे आली म्हणजे सगळीकडून येतात. आता रंगमंचावर चार चार तास भूमिका करणं दीनानाथांना कठीण होऊ लागलं. अशा वेळी लताकडे ते आपला ज्येष्ठ पुत्र म्हणूनच पाहत असत. तीही गणेशोत्सवातील कार्यक्रमात कधी आपल्या वडिलांसोबत तर कधी नाटकांमध्ये काम करून आपल्या वडिलांचा भार हलका करण्याचा प्रयत्न करीत असे.
नाटक व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे दीनानाथांना कमालीची निराशा आली. त्यातच ढासळत्या प्रकृतीने पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. त्यांना असलेल्या रोजच्या दारूच्या सवयीचे व्यसनात आणि गरजेत रूपांतर झाले होते. आता जेवण कमी दारू जास्त असा प्रकार सुरु झाला होता. जवळ असलेली शिल्लक, माईच्या अंगावर असणारे दागदागिने मोडावे लागले होते. दीनानाथांना आता आपले काही खरे नाही याचीही जाणीव झाली होती. ज्योतिषाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांना कुठेतरी हा संकेत मिळाला होता की शुक्रवारी ( २४ एप्रिल १९४२ रोजी )११ वाजून २० मिनिटानंतर मी काही जिवंत राहणार नाही जर परमेश्वर कृपेने जगलोच तर मला दीर्घायुष्य लाभेल. पण दुर्दैवाने त्यांनी सांगितलेल्या भविष्यातील पहिला अर्धा भाग खरा ठरला. ते दीर्घायुषी होऊ शकले नाहीत. केवळ ४२ वर्षांचे आयुष्य घेऊन आलेला हा एक महान कलाकार आपली कला मागे ठेवून या दुनियेतून निघून गेला होता. परिस्थितीमुळे सख्या नातेवाईकांनी देखील पाठ फिरवली होती. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पुण्याच्या स्मशानभूमीत फक्त सहाच व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांचे एक जवळचे मित्र आणि अभिनेते श्रीपाद जोशी यांनीच त्यांना अग्नी दिला.
पण मृत्यूपूर्वी दीनानाथांनी जिला ते आपला ज्येष्ठ पुत्र मानत होते अशा लताला जवळ बोलावले. तंबोऱ्यावर हात ठेवून म्हणाले, ' मी तुम्हा मुलांना लौकिक अर्थाने फार काही देऊ शकलो नाही. पण हा तंबोरा तुझ्या हाती सोपवतो आहे. हा आपल्या घराण्यातील साधुपुरुष आहे असे समजून त्याची सेवा कर. त्यावर धूळ बसू देऊ नकोस. ' त्या तंबोऱ्यासोबतच त्यांनी आणखी एक गोष्ट तिच्या ताब्यात दिली. ती म्हणजे त्यांच्या गाण्याच्या ' चिजांची वही. ' जगातील कोणत्याही पित्याने आपल्या अंतिम समयी दिली नसेल अशी भेट देऊन हा भूलोकी आलेला गंधर्व आपल्या अंतिम प्रवासाला निघून गेला. या वेळी त्यांची लाडकी लताबाबा १२ वर्षांची तर मीनाताई १० वर्षांच्या होत्या. आशा, उषा आणि हृदयनाथ यांचे वय तर काही समजण्याच्या पलीकडे होते. मंगेशकर परिवाराचा आधार गेला होता. गानसूर्य मावळला होता. माईंवर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुले पित्याच्या मायेला पारखी झाली होती पण ती अनाथ झाली नव्हती. दीनानाथ देहाने जरी निघून गेले असले तरी आपला संगीतरूपी वसा त्यांनी मुलांसाठी मागे ठेवला होता. ' कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा ' निघून गेला होता '
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...