मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग एक

उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंद घन : लता मंगेशकर - भाग एक 

स्वरसम्राज्ञी, गानसम्राज्ञी अशा बिरुदांनी मिरवावं ते लता दीदींनी. मास्टर दीनानाथांनी लावलेलं रोपटं आकाशाला स्पर्श करतं झालं. वेल गगनाला भिडला. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगायचं तर ' मोगरा फुलला. ' या मोगऱ्याला एवढा बहर आला की त्याची खाली पडलेली फुलं वेचता वेचता झाडावरच्या कळ्या फुलतच राहिल्या. हा सुगंध दशदिशांना पसरत राहिला. जो जो या झाडाच्या सान्निध्यात आला, तो तो या दिव्य सुगंधाने मोहरून गेला. भारतीय आणि जगभरातील रसिक या दिव्य सुरांचा आस्वाद अनेक पिढयांपासून घेत आहेत. हा कल्पवृक्ष अनेक वर्षांपासून अव्याहतपणे रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. त्याची जागा कोणीही घेतली नाही आणि घेऊ शकत नाही. 

लतादीदी या नावाने संगीत सृष्टीत, चित्रपट सृष्टीत ख्यातकीर्त असणारं हे गाणारं झाड. तसा लौकिक अर्थानं दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. स्वर्गलोकीचे सूर दीदींच्या रूपाने धरतीवर अवतरले. जन्मतःच गळ्यात सुरांचे दैवी चांदणे घेऊन आलेली ही लता पाहता पाहता आभाळाइतकी उंच झाली. त्या आभाळातून सुरांची बरसात होऊ लागली. ही बरसात रसिकांना चिंब भिजवू लागली. लतादीदींच्या या सुरात काय नव्हते ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर ' जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते... ' हे सगळे घेऊन दीदींचा स्वर आला आहे. शारदेच्या वीणेचा झंकार, श्रीकृष्णाच्या बासरीचे माधुर्य, गंधर्वांच्या ताना हे सगळं सगळं दैवी लेणं लेऊन आलेल्या दीदींच्या स्वरांची श्रीमंती काय वर्णावी ...! गेल्या अनेक वर्षांपासून हा दैवी आवाज अनेकांना जगण्याचा बळ देत आला आहे. आपली दिवसाची सुरुवात होते ती लतादीदींच्या मधुर सुरांनी आणि दिवसाचा शेवटही त्याच सुरांनी होते. हे स्वर आपल्याला पहाटे जाग आणतात आणि दिवसभर आपली प्रसन्न सोबत करतात. रात्री त्याच सुरांचा रेशमी मोहमयी शेला आपल्या अंगावर पांघरून आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. कल्पना करा की लतादीदींचा सूर आपल्या जीवनात नसता तर...! त्या नीरस आयुष्याची कल्पनाही करवत नाही. 

आचार्य अत्रे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. अनेक दिग्गजांना आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने ताळ्यावर आणणारे आचार्य अत्रे. पण ते जेव्हा लतादीदींबद्दल लिहितात, तेव्हा त्यांच्या लेखणीलाही जणू अलौकिकाचा दिव्य स्पर्श होतो. ते म्हणतात, ' स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताला केवळ लोखंडाच्या निफेतून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिच्या चरणाखाली जाड्याभरड्या गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूंमध्ये भिजवून बनवलेल्या शाईनं, कमलतंतूच्या लेखणीनं आणि वायुलहरींच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखांवर लिहिलेलं मानपत्रच गुलाबकळीच्या करंडकातून तिला अर्पण करायला हवं. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनिसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीची साद हे सर्व एकवटून विधात्याने लताचा कंठ घडवला असला पाहिजे. ' 

लता दीदींवर लिहिणं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य लेखकाला शिवधनुष्य पेलण्याइतकं कठीण काम आहे. पण माझे रसिक वाचक इतके सुज्ञ आहेत की माझ्या साध्या शब्दांनाही ते गोड करून घेतील. माझ्या लेखनात काही गोडवा जाणवला, काही चांगले आढळले तर त्याचे श्रेय या दैवी व्यक्तिमत्वाचे. त्यात काही हिणकस आढळले तर ती जबाबदारी माझी. आज एवढेच...! 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१७/०३/२०२१

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )








 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...