भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग चार
मुलाचे ( मुलीचे ) पाय पाळण्यात दिसतात...
लताचा जन्म झाला आणि आपल्या सोबत ती दीनानाथांसाठी समृद्धी घेऊन आली. सुरांची समृद्धी तर ती सोबतच घेऊन आली होती. आता दीनानाथांना गायक नट म्हणून देशभर प्रसिद्धी मिळत होती. गावोगाव त्यांच्या बलवंत नाटक मंडळीचे दौरे होत. त्यातून अमाप पैसा मिळू लागला होता. १९२९ मधील त्या काळात जेव्हा सोने वीस रुपये तोळा होते, तेव्हा बलवंत नाटक मंडळीचा खर्च एका नाटकासाठी सत्तर हजार रुपये होता. नाटक मंडळींचा सर्व खर्च जाऊनही दीनानाथांना भरपूर पैसा शिल्लक राहू लागला. त्यातून त्यांनी गोव्यात आमराई व काजूच्या बागा घेतल्या शिवाय दोन लाख रुपये देऊन एक डोंगरही खरेदी केला.बलवंत नाटक मंडळीने काही नवीन प्रथाही सुरु केल्या. यापूर्वी मराठी नाटकांचे प्रयोग रात्रीच होत असत. या नाटक मंडळीने नाटकाचा ' मॅटिनी शो ' सादर करायला सुरुवात केली. त्या काळी त्यांच्या मुंबईतील नाटकाचे पहिल्या रांगेतील तिकिटाचा दर होता पाच रुपये. त्या दराची तुलना आजच्या काळातील दोनशे ते अडीचशे रुपयांच्या तिकिटाशी होऊ शकेल. लताच्या जन्मानंतर दीनानाथ आणि माईंच्या संसारवेलीवर यथावकाश मीना, आशा , उषा आणि हृदयनाथ अशी चार फुले अपत्यरूपाने उमलली. आपल्या सर्वच अपत्यांवर दीनानाथ यांचे प्रेम असले तरी आपली समृद्धी आणि ऐश्वर्य हा लताचा पायगुण आहे अशी दीनानाथांची श्रद्धा होती.
जसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तशीच लता मधील संगीताची जाण लहानपणापासूनच दीनानाथांना जाणवू लागली होती. केवळ सहा महिन्यांची असताना तिने याची झलक दाखवून आपल्या पित्याला चकित केले होते. झाले असे की एकदा दीनानाथ घरात सारंगीवर रियाझ करत असताना, छोटी लता अंगणात खेळत होती. रांगत रांगत तिने खेळताना माती तोंडात घेण्याचा प्रयत्न केला. तिला थांबवण्यासाठी म्हणून दीनानाथांनी सारंगीची छडी उगारली. लताने त्यांच्याकडे केवळ पाहिले मात्र आणि त्यांनी थोड्याच वेळापूर्वी वाजवलेला सारंगीचा सूर हुबेहूब गाऊन दाखवला. लेकीच्या या सुरांनी दीनानाथांना चकित केले. तिथेच त्यांना तिच्यामधील दैवी सुरांची पहिली चुणूक दिसली. पुढे असे अनेक प्रसंग आले आणि त्यातून लताने आपल्याला लाभलेल्या दैवी सुरांचे दर्शन घडवून सर्वाना आश्चर्यचकित केले.
बलवंत नाटक मंडळीचे गावोगावी नाटकाचे जे प्रयोग सादर होत, त्या प्रयोगांना बऱ्याच वेळा दीनानाथ आपल्या कुटुंबियांना सोबत नेत असत. त्यातूनच या लहानग्यांवर कलेचे आणि सुरांचे संस्कार होत असत. घरी असताना ते जेव्हा रियाझ करायला बसत, तेव्हा लता त्यांच्यासोबत बसलेली असायची. ते गात असताना ते गीत, ते राग, त्या बंदिशी ती सहज न शिकवता आत्मसात करत असे. एकदा एक प्रसंग घडला. दीनानाथ आपल्या एका शिष्याला पुरिया धनश्री हा राग शिकवत होते. शिकवत असताना मध्येच ते उठून बाहेर गेले पण जाताना त्यांनी त्या शिष्याला त्या रागाचा सराव करायला सांगितले. तो शिष्य त्या रागाचा सराव करीत होता पण म्हणताना बऱ्याच चुकाही करत होता. छोटी लता त्या वेळी जवळच खेळत होती. तिने त्या शिष्याचे गायन ऐकल्याबरोबर त्याला म्हटले, ' हा राग असा नाही म्हणायचा .' तो शिष्य त्या चिमुरडीकडे पाहत म्हणाला, ' मग कसा म्हणायचा तू सांग बरं . ' हे ऐकल्याबरोबर लताने तो राग त्याला हुबेहूब गाऊन दाखवला. एवढ्यात दीनानाथ बाहेरून आले. लताला तो राग गाताना पाहून त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना ! त्यावेळी लताचे वय असेल केवळ पाच सहा वर्षांचे. त्याच क्षणी त्यांनी निश्चय केला की आता हिलाच आपण गायन शिकवायचे.
दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच तिची शिकवणी सुरु झाली. तिच्या हाती तानपुरा देण्यात आला. तिला त्यांनी शिकवायला सुरुवात त्याच पुरिया धनश्री रागाने केली. काही दिवसातच तिच्यासोबत तिची लहान बहीण मीनाही संगीत शिकण्यासाठी बसू लागली. अशा रीतीने मंगेशकर भावंडाना घरातच संगीताचे बाळकडू मिळत होते. हे सगळे सुरु असतानाच देवीच्या रोगाची साथ आली. त्याचा संसर्ग लहानग्या लतालाही झाला. तिला त्याचा खूपच त्रास झाला. पण नियतीला पुढे लता मंगेशकर नावाचे भारतरत्न देशाला प्रदान करायचे होते. देवीच्या रोगातून ती बचावली. तिचा जणू पुनर्जन्म झाला. याचा दीनानाथांना एवढा आनंद झाला की त्यांनी गावात बँड लावून आणि दानधर्म करून हा आनंद साजरा केला.
लताला एकदा शिकवलेलं पुन्हा शिकवावं लागत नसे. कठीण राग, चिजा ती सहज म्हणत असे. गायनाबरोबरच तिला चित्रकला, अभिनय यांच्यातही गती होती. तिचे हस्ताक्षर तर उत्तमच होते. कोणाच्या आवाजाची नक्कल ती जेवढी हुबेहूब करीत असे, तेवढीच एखाद्याची सही जशीच्या तशी करून दाखवणे ही तिची खासियत होती. एकदा तर एक गंमतच घडली. माईंनी सही करून बँकेत दिलेला एक चेक एकदा त्यांची सही जुळत नाही म्हणून परत आला. मग लतानेच दुसऱ्या चेकवर स्वतःच माईंची सही केली. तो चेक परत आला नाही.
लता आणि तिच्या भावंडाना जसे गायनाचे धडे घरातच मिळत होते, तसेच संस्कारांचे बाळकडूही मिळत होते. दीनानाथ आपल्या मुलांना क्वचितच रागवत किंवा मारत असत. पण त्यांच्या नजरेचा धाक मुलांना होता. लताच्या लहानपणाचा एक प्रसंग मीनाताईंनी त्यांच्या ' मोठी तिची सावली ' या आपल्या पुस्तकात सांगितला आहे. त्यावेळी मंगेशकर कुटुंबीय सांगलीला राहत होते. त्यांचे मोठे तेरा खोल्यांचे घर होते. त्यांच्या घरासमोर एक वाण्याचे दुकान होते. एक दिवस त्यांच्या घरातील एक नोकर दोन आण्यांचे नाणे घेऊन साबण आणण्यासाठी त्या दुकानात गेला. ते दोन आण्याचे नाणे खोटे आहे असे त्या दुकानदाराने सांगितल्याने नोकर परत आला. तेव्हा लताने त्याच्या हातातील ते नाणं हिसकावून घेतलं आणि म्हणाली, ' पाहू बरं तो साबण कसा देत नाही ते ! ' ती रागारागात त्या दुकानात गेली. तिने ते नाणं त्याच्या गल्ल्यात भिरकावलं. आता त्या दुकानदाराला खोटे नाणं कोणतं ते ओळखता येईना. त्याने दीनानाथांची मुलगी आपल्याला कशाला फसवेल असा विचार करून तिला साबण दिला.
तिने हा साबण आणलेला पाहून दीनानाथांच्या मनात शंका आली. त्यांनी तिला काय घडलं ते खरं सांग म्हणून खडसावलं. जेव्हा त्यांना कळलं की आपल्या पोरीने त्या दुकानदाराला फसवून तो साबण आणला आहे, तेव्हा ते फार रागावले. लबाडी, खोटेपणा त्यांच्या रक्तातच नव्हता. त्यांनी खिशातून दोन आणे काढले आणि लताजवळ देत म्हटले , ' या दोन आण्यांसाठी तू त्या दुकानदाराला फसवलंस. आता अशीच त्याच्या दुकानात जा. त्याला खरा प्रकार सांग. माफी मागून हे पैसे त्याला दे. ' लताला तो अपमान वाटला पण वडिलांसमोर ती काही बोलू शकत नव्हती. ती मुकाट्याने त्या दुकानात गेली आणि आपली चूक कबूल करून माफीही मागितली. मीनाताई म्हणतात की त्या दोन आण्यांनी एवढं शिकवलं की बाबांनी घडवलेली पाचही नाणी पुढे काळाच्या कसोटीवर पुरेपूर खरी उतरली. असे असतात संस्कार !
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२४/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा