मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग पाच

  उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंद घन : लता मंगेशकर - भाग पाच 

' स्वर ' लता घडताना... 

काही वर्षांपूर्वी लतादीदींची मुलाखत घेताना कोणीतरी त्यांना विचारलं होतं की आपण महान गायिका आहात पण आपल्याला आणखी कोणत्या क्षेत्रात जायला आवडलं असतं  ? त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्या म्हणाल्या, ' मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातील लता मंगेशकरच झाले असते. त्यांनी दिलेल्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर मला खूप आवडलं. त्यांना विचारलं होतं की पुढील जन्मी आपल्याला काय व्हायला आवडेल ? त्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. त्या म्हणाल्या, ' पुढील जन्मी मला शास्त्रीय संगीत शिकायला आवडेल. ' हे उत्तर खूप काही सांगून जाणारं आहे. प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असणारी एक गायिका असं म्हणते. आजच्या काळात प्रसिद्धीच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना हे दीदींचे उद्गार खूप काही शिकवून जातात. अशा या महान गायिकेची जडणघडण काही अचानक झालेली नाही. गळ्यात जन्मजात गंधार घेऊन आलेल्या लतादीदी लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द देखील घेऊन आल्या आहेत. संघर्ष त्यांनाही चुकला नाही.  दीनानाथांसारखा श्रेठ गायकी लाभलेला पिता त्यांना गुरु म्हणून मिळाला हे त्यांचे मोठे भाग्य ! पण या संधीचं त्यांनी सोनं केलं. 

आपल्या मुलीने श्रेष्ठ गायिका व्हावं आणि आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्वल करावं ही मास्टर दीनानाथांची आंतरिक इच्छा होती. त्याच आंतरिक तळमळीतून लता आणि मीना यांची शिकवणी बाबांच्या म्हणजेच दीनानाथांच्या मार्गदर्शनाखाली चालू होती. आपल्या मुलांचे उच्चार शुद्ध आणि स्वच्छ व्हावेत असे त्यांना वाटे. यावेळी मंगेशकर कुटुंबीय पुण्यात राजिवडेकरांच्या चाळीत राहत होते. त्यांच्या शेजारी शर्मा नावाचे गुरुजी राहत. ते मंत्रपठण शिकवीत. त्यांच्याकडे ही मंगेशकर भावंडे संस्कृत शिकण्यासाठी जात असत. संस्कृत वेद, मंत्र इ च्या उच्चाराने वाणी शुद्ध होते यावर दीनानाथांची श्रद्धा होती. मंगेशकर भावंडांच्या शुद्ध आणि स्वच्छ वाणीचे, उच्चारांचे मूळ आपल्याला इथे सापडते. 

लतादीदी लहान असतानाची गोष्ट आहे. त्यावेळी पुण्यातील ग्लोब थिएटरमध्ये ' खजांची ' या चित्रपटातील गाण्यांची स्पर्धा ठेवण्यात आली होती. दीदींच्या मावशींचे यजमान त्यांना आग्रहाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी घेऊन गेले. अर्थात ही गोष्ट दीनानाथांना फारशी आवडली नाही. आपली मुलगी या स्पर्धेत पहिले बक्षीस नाही मिळवू शकली तर ते आपल्या नावाला शोभणारे नाही असे त्यांना वाटत होते. स्पर्धेच्या वेळी ग्लोब थिएटरमध्ये स्पर्धकांची गर्दी होती. प्रत्येक स्पर्धकाने पुढे जाऊन परीक्षकांना आपले नाव सांगावे आणि मग गायला सुरुवात करावी असे सांगितले गेले. छोटी लता धिटाईने स्टेजवर गेली आणि ' मी लता दीनानाथ मंगेशकर ' असे तिने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी तिला आपल्या बाबांची लाडकी लेक असल्याचा अभिमान फुलून आला. या स्पर्धेत तिने दोन गाणी म्हटली आणि ' मा. दीनानाथांची ही मुलगी ' पहिला नंबर घेऊन घरी आली. सोबत होती छातीवर लखलखणारी दोन चांदीची पदकं आणि बक्षीस म्हणून मिळालेला दिलरुबा. 

पुढे एक प्रसंग घडला. एकदा दीनानाथ तोच दिलरुबा वाजवीत असताना त्यांच्या समोरून बहुधा एक उंदीर पळत गेला असावा. त्याला मारण्यासाठी म्हणून त्यांनी त्या दिलरुबाचा छड फेकून मारला. दुर्दैवाने तो तुटला. लताला याचे खूप वाईट वाटले. ती रडू लागली. तेव्हा दीनानाथ म्हणाले, ' एवढ्याशा गोष्टीसाठी रडतेस ! असं यश डोक्यात जाऊ देऊ नकोस. अजून तुला खूप शिकायचे आहे, पुढे जायचे आहे. खूप बक्षिसे मिळवायची आहेत. ' मातीतून मूर्ती घडवायची असेल तर माती ओली असतानाच आकार द्यावा लागतो. तसेच लहानपणी संस्कारक्षम मन असताना केलेले संस्कार आयुष्यभर पुरतात हे दीनानाथांनी ओळखले होते. 

दीदी म्हणतात की बाबांचे शब्द खरे ठरले. त्यांच्या आशीर्वादाने मला सामान्य माणसांचे अलोट प्रेम लाभले, पुरस्कार मिळाले, पुष्कळ मानसन्मान मिळाले. देशात आणि परदेशातही. पण बाबांचा कोणतंही यश संयमानं स्वीकारण्याचा शब्द मी पाळला. त्यानंतर कधीही गाताना नकळत सुद्धा मा. दीनानाथांच्या प्रतिष्ठेचे भान ढळले नाही. प्रसिद्धीचे लोट अंगावरून जात असताना सुद्धा अविचल राहण्याचे सामर्थ्य बाबांच्या शब्दांमुळेच आले. 

आपल्या नाट्यप्रयोगासाठी दीनानाथांचे अविरत दौरे सुरु होते. याच काळात बोलपटांचा उदय झाल्याने नाटकांना स्पर्धा निर्माण झाली होती. त्या सगळ्या धावपळीत लताची संगीत शिकवणी नियमित घेणे त्यांना शक्य होत नव्हते. तिने गायनात कितपत प्रगती केली हे बघण्यासाठी देखील त्यांना वेळ नव्हता. एकदा बलवंत नाटक मंडळीचा संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग मनमाडला होता. त्यावेळी दीनानाथांचं सारं कुटुंब देखील त्यांच्यासोबत दौऱ्यावर होतं. त्या नाटकात नारदाची भूमिका करणारा गायक नट अचानक आजारी पडला. नाटकाचा प्रयोग कसा सादर करायचा ही चिंता दीनानाथांना पडली. त्यावेळी लता पुढे येऊन म्हणाली, ' बाबा, मी आहे ना. चिंता कशाला करता ? मी  नाटकातील नारदाची भूमिका करीन. नाटकातली सगळी गाणी आणि संवाद मला तोंडपाठ आहेत. चिमुकल्या लताचे हे बोल आत्मविश्वासपूर्ण होते. त्याचा दीनानाथांना विचार करावाच लागला. ती पुढे म्हणाली, ' बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. माझं गाणं नाही पसंत पडलं तर मग बोला. ' दीनानाथांना तिच्याबद्दल विश्वास होता. पण एक मोठीच अडचण होती. नाटकात अर्जुनाची भूमिका करणारा नट होता छत्तीस वर्षांचा आणि त्याच्यासमोर लताच्या रूपातील हा बालनारद होता केवळ सात वर्षांचा. 

पडदा वर गेल्यानंतर या छोट्या नारदाला पाहून प्रेक्षकांच्या मनातही चलबिचल झाली. पण नाटकातील संवादिनीचे सूर सुरु होताच हा छोटा नारद आत्मविश्वासपूर्ण गाऊ लागला. शब्द, सूर, ताल, लय, तानांची फेक इतकी अचूक आणि निर्दोष होती की प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षक या नारदाचं वयही विसरून गेले. 

असाच एक प्रसंग. बलवंत नाटक कंपनी आता दिवसेंदिवस तोट्यात जात होती. दीनानाथ मात्र सर्वांना सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. एकदा कंपनीचा मुक्काम सोलापुरात होता. पुढच्या प्रयोगासाठी कंपनीला पंढरपूरला जायचे होते. पण पुढे जाण्यासाठी आणि कंपनीचा खर्च भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे सोलापूरला संगीत जलसा करायचे ठरले. या कार्यक्रमात आपल्यासोबत आपली केवळ नऊ वर्षांची कन्या लता देखील गाईल असं दीनानाथांनी जाहीर केलं. त्यांच्या घोषणेनं खळबळ उडाली. खुद्द बलवंत नाटक मंडळीतले लोक देखील लताच्या या कामगिरीबाबत साशंक होते. पण या कार्यक्रमात आयोजकाला एवढा नफा झाला की एखाद्या नाटकाचा प्रयोग करून देखील मला एवढा नफा झाला नसता असे उद्गार त्याने काढले. या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरली अर्थातच छोटी लता. 

पुढे मग अशा कार्यक्रमातून ती गाऊ लागली. ' शूरा मी वंदिले ', ' सुहास्य तुझे मनास मोही ' यासारखी नाट्यपदे लताने लीलया सादर करीत असे. गात असताना मधूनच ती आपल्या प्रेमळ पित्याकडे एक कटाक्ष टाकत असे. आपण बरोबर गातो आहोत हे त्यांच्या नजरेतून तिला कळायचे. मग शास्त्रीय संगीतातही ती आपल्या वडिलांना साथ देत असे. गाणं संपताच बरेचदा छोटी लता आपल्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपी जाई. अशी लताची जडणघडण होत होती.  हा ' बालपणीचा काळ सुखाचा ' फार दिवस टिकला नाही. या सुखाला लवकरच दृष्ट लागली. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२६/०३/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...