मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग आठ

  उगवतीचे रंग

भारतरत्नावली

आनंद घन : लता मंगेशकर - भाग आठ
वाटचाल नव्या क्षितिजाकडे...

लताच्या संघर्षाचा काळ सुरु होता. परिस्थती प्रतिकूल होती. प्रतिकूल परिस्थतीत मी मी म्हणणारी माणसे मोडून पडतात. पण ज्यांच्या डोळ्यांसमोर ध्येयाचा ध्रुवतारा अढळ असतो, ती माणसे पराभूत न होता वाटचाल करत राहतात. ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात

अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला.

प्रतिकूल परिस्थितीचा अग्नी आपल्याला भाजून काढत असतो. जे त्यातून तावून सुलाखून निघतात, त्यांना सुवर्णाप्रमाणे झळाळी प्राप्त होते. लता हे प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीतून भाजून निघालेले असेच बावनकशी सोने आहे. १४/१५ वर्षांची अल्लड पोर. वडिलांचे छत्र हरपलेले. स्वतःचे घर नाही, पैसा नाही, लहान भावंडांची असलेली जबाबदारी यासारखी संकटे तिची परीक्षा पाहायलाच उभी होती. पण अशाही परिस्थितीत हार न मानता स्व कर्तृत्वाने यशाचा मंडप तिने उभारला. त्या काळी स्टुडिओत चौदा चौदा तास काम करावे लागत असे. पगार होता दरमहा ऐंशी रुपये. जेवण वेळेवर मिळेलच असे नाही. कधी कधी तर अंगात ताप, पायाला सेप्टिक झालेले अशाही परिस्थितीत तिच्या चेहऱ्यावर कधी दुःख, दैन्य दिसले नाही. काम करून घरात परतायची तेव्हा बाहेरचे सगळे बाहेरच ठेवून घरातल्यांसाठी आनंदाची बरसात व्हायची. सकाळी कामावर जाण्यापूर्वी आणि रात्री घरी परत आल्यावर घरचा रियाज कधी चुकला नाही.

' गजाभाऊ ' या मराठी चित्रपटात एक देशभक्तीपूर्ण गीत त्यावेळी लताने गायिले. गीताचे बोल होते ' माता एक सपूत की दुनिया बदल दे तू...' १९४३ मध्ये तिचं हे गाणं रेकॉर्ड झालं. या गीताचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. या चित्रपटात तिने अभिनयही केला होता. पण तिचं पहिलंवहिलं हिंदी गाणं होतं ' एक नये रंग मे ...' आणि चित्रपट होता ' आपकी सेवामे ' १९४७ मध्ये आलेल्या या चित्रपटालाही दत्ता डावजेकरांनीच संगीतसाज चढवला होता. चित्रपटात अभिनय आणि पार्श्वगायन अशी दुहेरी कसरत सुरु होती.

' बडी माँ ' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. पुढील शूटिंगसाठी ' प्रफुल्ल पिक्चर्स ' ची टीम मुंबईत आली. ते वर्ष होते १९४५. लता दिदींनाही विनायकरावांनी मुंबईला बोलावून घेतले. यावेळी माई आशा, उषा आणि बाळ ( हृदयनाथ ) यांना घेऊन धुळ्याजवळील थाळनेरला गेल्या होत्या. लता दीदींसोबत त्यांच्या पाठची बहीण मीनाताई होत्या. मीनाताई या लतादीदींच्या जीवनातील सर्व स्थित्यंतराच्या साथीदार आहेत. त्या काळात नवीन होतकरू कलाकारांना ते ज्या कंपनीत काम करत ती सोडून दुसरीकडे काम करायला बंदी असायची. मास्टर विनायकरावांनी मात्र उदार मनाने दीदींना अन्य निर्मात्यांबरोबर काम करण्याची अनुमती दिली. त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने इथूनच सुरुवात झाली.

१९४६ मध्ये व्ही शांताराम यांचा ' जीवन यात्रा ' हा चित्रपट आला. या चित्रपटात दीदींची गाणी आणि अभिनयही होता. संगीतकार होते वसंत देसाई. या चित्रपटानंतर दीदींनी चित्रपटातच काम करावं अशी चर्चा सुरु झाली होती. दीदींना स्वतःला मात्र चित्रपटातील नाटकी संवाद, तोंडाला रंग फासून उभे राहणे, लाईट्स, कृत्रिम सेट इ गोष्टी मनापासून आवडत नसत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला तो कायमचाच ! त्या क्षेत्रातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला आणि आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले.

मुंबईत आल्यानंतर काही दिवस दीदी आणि मीनाताई मास्टर विनायकरावांसोबतच त्यांच्या बंगल्यात राहत. पण काही दिवसांनी माई आशा, उषा आणि हृदयनाथ यांना घेऊन मुंबईत आल्या. सोबत येताना आपली मावसबहीण आणि तिच्या तीन मुलांनाही माईने आणले होते. आता त्यांनी नाना चौकात एक घर भाड्याने घेतले. ते घर म्हणजे एक छोटी खोली आणि तिला लागून असलेला एक सार्वजनिक चौथरा होता. सगळी मुलं या चौथऱ्यावरच झोपायची. घराशेजारी एक शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिरात वेळ मिळाला की दीदी गात बसायच्या. मंदिराचा पुजारी एक गुजराथी व्यक्ती होती. ते दीदीला विचारायचे, ' बेटी, क्यू गाती हो ? ये तो भगवान की निद्रा का समय है. ' दीदी म्हणायची, ' बाबा, आप नही समझोगे. ' ती दीदीची संगीतसाधनाच होती. तिच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून ती वागत होती. असं म्हणतात की कोणत्याही कलाकाराचा सर्वात मोठा गुरु तो स्वतःच असतो. त्याची विवेकबुद्धी त्याला मार्गदर्शन करीत असते. आवाज आणि विवेकबुद्धी हीच दीदींची सर्वात मोठी संपत्ती होती. त्याच बळावर त्यांनी पार्श्वगायनातील गौरीशंकर सर केले.

दीदींनी आपल्याला मिळालेल्या पैशातून कुटुंबियांसाठी बचत करणे सुरु केले होते. याच पैशातून त्यांनी गाणी ऐकण्यासाठी एक रेडिओ विकत घेतला. या रेडिओची किंमत त्यावेळी सव्वापाचशे रुपये होती. त्या काळात ही फार मोठी रक्कम होती. त्यांनी आणलेला रेडिओ काही वर्षांपूर्वी आलेल्या टीव्ही इतका मोठा होता. एका कपाटावर हा रेडिओ त्यांनी ठेवला. घरात फारसे फर्निचर नव्हतेच. दीदी खाली सतरंजी अंथरून रेडिओ ऐकण्यासाठी बसल्या. रेडिओ लावताच त्यातून पहिली बातमी ऐकू आली ती त्या काळातले प्रख्यात गायक कुंदनलाल सैगल यांच्या निधनाची. दीदी ज्यांना गायनाच्या क्षेत्रातील आदर्श मानत होत्या, त्यांच्याच निधनाची बातमी पहिल्यांदा रेडिओने दिल्याने त्यांना तो अपशकुनी वाटला. दुसऱ्याच दिवशी बाजारात जाऊन त्यांनी येईल त्या किमतीला तो विकून टाकला.

१९४७ मध्ये दीदींवर आणखी एक मोठा आघात झाला. त्यांना पितृवत आधार देणाऱ्या मास्टर विनायकरावांचे निधन झाले. आतापर्यंत दीदींनी पै पै बचत करून चौदा हजार रुपये जमवून विनायकरावांच्या सल्ल्याने एका बँकेत ठेवले होते ती बँक बुडाली. हा त्यांना फार मोठा धक्का होता. दीनानाथांच्या मृत्यूनंतर आता कुठे कुटुंब सावरत होते पण आता पुन्हा रस्त्यावर यायची पाळी आली. ते ज्या घरात राहत होते, त्या घरमालकाने त्यांना भाडे देणार असाल तरच येथे राहा असे सांगून त्यांना घरातून बाहेर हाकलण्याचेच बाकी ठेवले. विनायकरावांकडे काम करीत असताना त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांशी दीदींचे अतिशय चांगले संबंध होते. पापा बुलबुले या नावाचा विनायकरावांचा कॅमेरामन होता. तो दीदींना घेऊन सेंट्रल स्टुडिओत गेला. तेथे त्याने त्यांची ओळख संगीतकार हरिश्चंद्र बाली यांच्याशी करून दिली. बालींनी दीदींचं गाणं ऐकलं आणि त्याच क्षणी त्यांना आपल्या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी करारबद्ध केले. गीतासाठी मानधन म्हणून चारशे रुपये द्यायचे ठरले. त्यातील तीनशे रुपये दीदींच्या विनंतीवरून लगेच देण्यात आले. त्याकाळात मुंबईत भाड्याचे घर घेण्यासाठी पगडी घेण्याची पद्धत सुरु झाली होती. आता दीदी पगडी देऊन नवीन घर घेऊ शकणार होत्या.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०२/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...