उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग तीन
निसर्गानं माणसाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे तारुण्य ! तारुण्य म्हणजे सळसळते चैतन्य ! तारुण्यातच ती शक्ती असते, जी माणसाच्या पुढील आयुष्याचा पाया रचते. माणसाकडून जर काही अफाट, अचाट कर्तृत्व घडण्याची शक्यता असेल, तर ती तारुण्यात. तारुण्यातील कर्तृत्वाच्या पायावरच पुढील जीवनाची इमारत उभी असते. लहानगा दीना आता तारुण्यात पदार्पण करून दीनानाथ झाला होता. गायकीची जन्मजात प्रतिभा आणि रूपाचं लेणं तर नियतीनंच त्याला बहाल केलं होतं. अभिषेकी हे आडनाव टाकून देऊन त्याने मंगेशकर हे आडनाव धारण केलं होतं आणि आता काळाच्या कसोटीवर त्याला मंगेशकर हे नाव सिद्ध करून दाखवायचं होतं. त्या रस्त्यानं त्याची घोडदौडही सुरु झाली होती.
अनेक नाटक कंपन्या पायघड्या घालून दीनानाथला आपल्या कंपनीत येण्यासाठी आमंत्रित करीत होत्या. त्याप्रमाणे त्याने विविध नाटक कंपन्यातून कामही केले. हिंदी, उर्दूतूनही नाटके केली. त्यातूनच त्याचे या भाषांवरही प्रभुत्व निर्माण झाले. पुढे प्रख्यात किर्लोस्करांच्या नाटक कंपनीत काही काळ काम करून त्याने रंगभूमी गाजवली. पण दुसऱ्यांच्या नाटक कंपनीत काम करून त्याच्या कर्तृत्वाला पुरेसा वाव मिळत नव्हता. त्याला स्वतःला काहीतरी करून दाखवायचे होते. म्हणून त्याने बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. यावेळी दीनानाथचे वय होते अवघे १८ वर्षांचे. ' शाकुंतल ' या नाटकाचे प्रयोग करून बलवंत नाटक मंडळीने आपल्या कामाला सुरुवात केली. आता बलवंत नाटक मंडळीचे गावोगावी दौरे सुरु झाले. दीनानाथ मंगेशकर आणि बलवंत नाटक मंडळी या नावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. बलवंत नाटक मंडळीसाठी नाटक लिहायला आता मोठमोठी लेखक मंडळी उत्सुक असत.
दीनानाथला गायनाची दैवी संपदा लाभली असली तरी त्या गायकीला शास्त्रीय गायकीची जोड देणे आवश्यक होते. त्यासाठी त्याला एखादा उत्तम गुरु हवा होता. तो त्याला वझेबुवांच्या रूपानं गवसला. वझेबुवांचं नाव त्या काळी शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्यांमध्ये आदराने घेतलं जाई. त्यामुळे शास्त्रीय संगीतासाठी वझेबुवांची शिकवणी सुरु झाली. एकदा वझेबुवा कोणत्या तरी अपरिचित रागातील एक अवघड ' बंदिश ' गात होते. दीनानाथला ती बंदिश खूप आवडली. आपल्याला ती बंदिश शिकवावी अशी विनंती त्याने गुरूंना केली. त्यावेळी वझेबुवांनी गमतीने त्याला म्हटले, ' तुझ्या हातातील सोनेरी घड्याळ मला दिलेस तर तुला ही बंदिश मी शिकवीन. ' गुरूंची ही मागणी दीनानाथला अजिबात रुचली नाही. त्यानं गुरूंना जास्त आग्रह केला नाही. पण उठता उठता त्याच अप्रचलित रागातील काही बंदिशी आपल्या गुरूंना ऐकवल्या. आता चकित होण्याची गुरूंची पाळी होती. त्यांनी दीनानाथाच्या या बंदिशी ऐकून तोंडात बोट घातले. दीनानाथला ते म्हणाले, ' मी तुला काय शिकवणार ? शिष्य म्हणून मीच तुझ्याकडून गंडा बांधून घ्यायला हवा ! '
अशी गायकीची निसर्गदत्त देणगी नियतीने दीनानाथला बहाल केली होती. आता त्याची प्रगती कोणी रोखू शकत नव्हते. पण हाच प्रगतीचा आणि यशाचा काळ सावध राहण्याचाही असतो. या मार्गावर वेगवेगळी प्रलोभने आणि अडथळे तुमच्या प्रगतीत बाधा आणायला तयारच असतात. त्या गोष्टी वेळीच ओळखायच्या असतात. दीनानाथचा आवाज गोड होता आणि त्याच्या साधनेची प्रचिती देणारा होता, सर्वांना मोहवणारा होता पण त्याच्या आवाजाचा पोत काहीसा पातळ होता. त्यामुळे एका हितचिंतकाने त्याला सल्ला दिला की तू रोज थोडीशी ब्रँडी घेतली तर तुझा पातळ असलेला आवाज गहिरा होईल, त्याला एक प्रकारचे वजन प्राप्त होईल. ज्या दीनानाथने सारंगी शिकवणाऱ्या आपल्या गुरूंची शिकवणी केवळ दारू आणायला सांगितली म्हणून सोडली होती, तोच दीनानाथ आपल्या कोण्या मित्राच्या या बदसल्ल्याला बळी पडला. अशा रीतीने विनाशकारी दारूने त्याच्या जीवनात चोरपावलांनी प्रवेश केला तो कायमचाच !
बलवंत नाटक मंडळीचे गावोगावी दौरे सुरु झाले होते. राजसंन्यास या नाटकाचे प्रयोग सुरु होते. या प्रयोगानिमित्ताने ही मंडळी इंदोरला आली. तेथील प्रयोगानंतर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना धुळ्याला येण्याचा आग्रह केला. इथेच दीनानाथांच्या जीवनातील नवीन वळण आले. शिरपूरजवळील थाळनेर या गावात त्यांना नेण्यात आले. या गावी हरिदास रामदास लाड या नावाचे श्रीमंत सावकार राहत होते. त्यांची त्या गावात अनेक घरे, जमीनजुमला आणि गोधन होते. त्यांनी आजबाजूच्या गावात अनेक मंदिरे बांधली होती. लोकांना पाणी मिळावं म्हणून विहिरी बांधल्या होत्या. हरिदास लाड यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता. त्यांना सुरुवातीला पाच अपत्ये झाली होती. पाचही मुलगे होते पण दुर्दैवाने एकही जगले नाही. त्या नंतर त्यांना नर्मदा नावाची एक मुलगी झाली. नंतरची तिसरी मुलगी शेवंती. नर्मदा ही दिसायला अत्यंत सुंदर होती. पाच मुलांच्या पाठीवर झाल्याने आई तिचे खूप लाड करीत असे. शेवंती ही दिसायला साधारण आणि सावळी होती. पण तिच्या डोळ्यांत बुद्धिमत्तेची चमक होती आणि रूपात एक अनोखे आकर्षण. शेवंती ही सावळी आणि तिच्या आईच्या दृष्टीने नको असलेली मुलगी होती. त्यामुळे आई नर्मदाचे लाड करी आणि शेवंतीच्या वाट्याला मात्र घरातील कामे आणि छळ आला.
ही शेवंती शंकराची एवढी निस्सीम भक्त होती की तिचे वडील तिला लाडाने शिवबा म्हणूनच हाक मारीत. तिची आई तिचा करीत असलेला छळ त्यांना आवडत नसे. पण तिच्यासमोर त्यांचे फार काही चालत नसे. तिला गायनकला मात्र बऱ्यापैकी अवगत होती. गायन शिकवताना ती नर्मदाला घेऊन बसत असे. शेवंती मात्र समोर आलेली तिला चालत नसे. असे सगळे सुरु असताना दीनानाथांना त्या ठिकाणी आणून त्यांच्यासमोर नर्मदाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा आला. दीनानाथांना आता गायक आणि नट म्हणून प्रतिष्ठा प्राप्त होती. अशी व्यक्ती आपली जावई व्हावी ही लाड कुटुंबीयांची इच्छा होती. नर्मदाला दीनानाथांसमोर आणण्यात आले. तिचे त्यांच्यासमोर गाणेही झाले. पण कशी कोण जाणे त्यांच्या दृष्टीला शेवंती पडली. या पहिल्याच नजरभेटीत शेवंतीकडे ते आकर्षित झाले. पण ठरल्यानुसार नर्मदा आणि दीनानाथांचा विवाह पार पडला. यावेळी दीनानाथांचे वय होते २२ वर्षांचे आणि नर्मदेचे १९. चार वर्षानंतर नर्मदाला एक मुलगी झाली. ती शेवंतीने केलेल्या शुश्रुषेने वाचली. नर्मदा मात्र या बाळंतपणातून वाचू शकली नाही.
आता हरिदासांनी शेवंतीला पदरात घ्या अशी विनंती दीनानाथांना केली. दीनानाथांनी या विनंतीचा स्वीकार केला पण त्याचवेळी त्यांना सांगितले की माझ्याकडे ही मुलगी अशी मोलकरणीसारखी राहणार नाही. ती माझ्या घराची स्वामीनी बनून राहील. अशा रीतीने सुरुवातीलाच एकमेकांकडे आकर्षित झालेले हे दोन जीव नियतीने नर्मदा हिच्या मृत्यूनंतर एकत्र आणले. ते वर्ष होते १९२७. आता दीनानाथ आणि शेवंती यांचा सुखाचा संसार सुरु झाला होता. या संसारवेलीवर २८ सप्टेंबर १९२९ रोजी एक फुल उमलले. एका कन्यारत्नाने जन्म घेतला. ठिकाण होते इंदूरच्या शीख वस्तीतील श्रीमती ( शेवंती ) मंगेशकर यांच्या बहिणेचे घर. हीच मुलगी पुढे जागतिक कीर्ती प्राप्त करती झाली. तीच आपली चरित्रनायिका. लता. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा