मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग दोन


 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंद घन : लता मंगेशकर - भाग दोन 

हृदयनाथ मंगेशकरांचं ' मराठा तितुका मेळवावा ' या चित्रपटातलं एक अतिशय सुंदर गाणं आहे. मला ते खूप आवडतं. ते गाणं आपणा सर्वांच्याही परिचयाचं असेल याची मला खात्री आहे. ते गाणं आहे 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती 

देव देस अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती... 

हे गाणं आठवण्याचं कारण म्हणजे ज्या आनंदघन लता मंगेशकरांबद्दल आपण बोलतो आहोत, त्यांच्या पूर्वजांना हे शब्दशः लागू पडतं. त्यांचे पूर्वज गोव्यातले. मंगेशी गाव आणि मंगेशीचा सुंदर, पावन, पवित्र परिसर. मंगेश म्हणजे शंकर. याच मंगेशच्या छत्रछायेखाली जगणारं शूर, स्वाभिमानी, देवभक्त आणि देशभक्त हर्डीकर घराणं. त्या काळात पोर्तुगीज लुटारू आणि मोगलांचे हल्ले होत. हिंदूंच्या देवस्थानांचा विनाश करून त्यांच्या श्रद्धेवर आघात करणं  हे या आक्रमकांचं आवडतं काम.  पण हर्डीकर घराण्यातले पुरुष आपल्या देवस्थानाचं प्राणपणानं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी मंदिरात आपल्या रक्ताचा अभिषेक करून देवस्थानचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ते ' अभिषेकी ' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात या जातीतील पुरुषांच्या नावापुढे ' भट्ट ' हे शब्द लावण्याची प्रथा होती. भट्ट या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे देवीचा भक्त आणि दुसरा अर्थ म्हणजे कर्मकांड करणारा ब्राह्मण. 

याच घराण्यातील भिकंभट्ट अभिषेकींचे पुत्र म्हणजे गणेशभट्ट अभिषेकी. मास्टर दीनानाथांचे वडील. गणेशभट्ट यांना खणखणीत आवाजाची जन्मजात देणगी लाभलेली होती. मंगेशीच्या पावन परिसरात त्यांची आख्याने आणि प्रवचने होत असत. गणेशभट्ट यांचा आवाज एवढा भरदार आणि खणखणीत होता की ध्वनिक्षेपकाशिवायही तो लांब अंतरापर्यंत ऐकू येत असे. त्या आवाजाच्या जोडीला त्यांचे विदवत्तापूर्ण आणि रसाळ आख्यान ऐकायला मिळे. म्हणून त्यांचं आख्यान ऐकण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही लोक येत असत. त्यांच्या पत्नी येसूबाई. त्या उत्सवात आपल्या गोड गळ्याने भजने म्हणत. त्यांची संगीताची जाण उत्तम होती. 

जिथल्या पावन मातीलाही स्वरांचा सुगंध आहे अशा मंगेशीच्या पवित्र परिसरात २९ डिसेंबर १९०० या दिवशी दीनानाथ नावाचा स्वर्गलोकीचा गंधर्व भूवर अवतरता झाला. गणेशभट्ट आणि येसूबाई यांच्या आवाजाचा, बुद्धिमत्तेचा वारसा घेऊन दीनानाथ जन्माला आला होता. नियतीनं रूप आणि गुणांचा दैवी खजिना दीनानाथाला भरभरून बहाल केला होता. असं म्हणतात की गवयाचं पोरं रडलं तरी सुरात रडतं. दीनानाथाच्या बाबतीत हे अक्षरशः खरं होतं. छोटा दीना खेळता खेळता दोन चार ओळी जरी सहज गुणगुणला तरी त्याच्या आजूबाजूला असणारे लोक मोहित व्हायचे. त्या काळात आजच्या सारखे सिनेमा, टीव्ही इ माध्यमे नसल्याने कीर्तन, प्रवचन, तमाशा आणि नाटक हीच मनोरंजनाची आणि प्रबोधनाची देखील साधने होती. त्या काळी बहुतांश नाटके ही संगीत नाटके असल्याने नाटकात गाणाऱ्या नटाची गरज असायची. दीनानाथला  देखणे राजबिंडे रूप आणि गायकी हे जन्मजात दैवी गुण लाभल्याने आजूबाजूचे लोक त्याला नाटकात घाला, त्यात तो चांगले नाव काढील असा सल्ला त्याच्या आईवडिलांना देत असत. 

दीनाच्या आईला मात्र कलेची जाण असण्यासोबतच व्यवहारी शहाणपणही लाभले होते. नाटकातील काम म्हणजे अळवावरचे पाणी. त्याचा काय भरवसा ! आज आहे तर उद्या नाही. तिला वाटायचे की माझ्या दीनाने सारंगी वादन शिकावे. सारंगी वादन शिकलेल्या कलाकाराला त्या काळात खाण्यापिण्याची ददात पडत नसे. आईच्या इच्छेनुसार छोट्या दीनाची सारंगी वादनाची शिकवणी सुरु झाली. त्यासाठी त्याला गुरूच्या घरापर्यंत पाच मैलांची पायपीट करून जावे लागे. दीनाची बोटे आता सारंगीवरून फिरू लागली. दीना म्हणजे जणू स्वर्गलोकीचा गंधर्व ! त्यामुळे मुळातच संगीताची जाण. त्याच्या गळ्यात जसा दैवी स्वर होता, तशीच बोटात जादू होती. सारंगी वादनात माधुर्य होतं. त्याचं कौशल्य पाहून गुरुही प्रभावित झाले. त्या दिवशी ती अघटित घटना घडली नसती, तर दीनाची शिकवणी तशीच सुरु राहिली असती आणि कदाचित दीना पुढे चालून फक्त उत्तम सारंगीवादक झाला असता. पण नियतीला ते मंजूर नव्हतं. दीनाच्या हातून नाट्यकलेचा आणि गायनकलेचा इतिहास लिहिला जायचा होता. 

झालं असं की छोट्या दीनाला गुरुजींनी त्या दिवशी सांगू नये ते सांगितलं. त्यांनी त्याला दारू आणण्यासाठी पाठवलं. दारू हा शब्द ऐकताच निष्पाप, निरागस दीना मुळातून हादरला. दारू जीवनाचा सत्यानाश करते हे त्यानं ऐकलं होतं. त्यामुळे त्यानं त्या क्षणी तिथून जो पळ काढला तो कायमचा. ( पण पुढेआणखी काही वर्षांनी  हीच दारू दीनानाथच्या आयुष्यात चोरपावलांनी प्रवेश करती झाली आणि त्याला विनाशाच्या वाटेवर घेऊन गेली. त्याचा उल्लेख पुढे येईलच. )

आता दीनाच्या आईने त्याला तबल्याची शिकवणी लावली. कदाचित दीना उत्कृष्ट तबलावादक बनू शकला असता. पण नियतीला तेही मंजूर नव्हते. दिनाच्या तळहातांना एवढा घाम येत असे की तबल्याचा सूर उतरून जाई. पण दीना तबला शिकत असताना कधी कधी गाणं म्हणत असे. ते बोल दीनाला तबला शिकवणाऱ्या माशेलकर यांच्या पत्नीच्या कानावर पडत असत. तिने दीनानाथला ' तू गाणं शीक ' असा सल्ला दिला. अशा रीतीने नियतीने एक एक दरवाजा बंद करीत दीनानाथाला गायनाचा दरवाजा खुला केला. 

दीनानाथाच्या गंधर्वगायकीची ख्याती दशदिशात पसरु लागली. कमळाचा सुगंध भ्रमरांना सांगावा लागत नाही. ते आपोआप त्याला शोधत येतात. तशी दीनानाथच्या गायकीची कीर्ती एका नाटकमंडळीपर्यंत पोहोचली. त्याच्या शोधात ते त्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचले. त्यावेळी दीनानाथ आपल्या मित्रांसोबत खेळण्यात मग्न होता. कोणीतरी त्याला सांगितले, ' दीना, तुझा शोध घेत एक मोठे गायक तुझ्या घरी आले आहेत आणि तुला त्यांनी ताबडतोब बोलावले आहे. ' स्वाभिमान आणि करारी बाणा हा दीनानाथचा बालपणापासूनचा स्वभाव. त्याने उत्तर दिले, ' त्यांना माझे गाणे ऐकायचे असेल तर त्यांनी इथे यावे. मी खेळता खेळता दोन चार ताना, हरकती म्हणेन. त्या त्यांनी ऐकाव्यात. '

दीनानाथजवळ मुळातच देखणे राजबिंडे रूप आणि गोड गळा असल्याने नाटकातील स्त्री आणि पुरुष पात्र यांच्या भूमिका तो लीलया करीत असे. त्याची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली. त्याने आपल्याकडे यावे म्हणून त्या काळातील नाटक कंपन्या तो सांगेल त्या अटींवर त्याच्याशी करार करायला उत्सुक होत्या. त्यावेळी दीनानाथ असेल चौदापंधरा वर्षांचा. बालगंधर्व त्या काळातील प्रख्यात नट आणि गायक. काही लोकांनी दीनानाथला तू बालगंधर्वांची गाणी गा असा सल्ला दिला. पण स्वाभिमानी आणि स्वतःची क्षमता माहित असलेल्या दीनानाथाला कोणाचे अनुकरण करणे मंजूर नव्हते. त्याला त्याची क्षमता सिद्ध करायची होती. दुसऱ्यांचे अनुकरण करून कोणीही फार मोठे होऊ शकत नाही. आपल्याला स्वतःची क्षमता सिद्ध करावी लागते. परीक्षेत कॉपी करणारी मुले आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाहीत. 

बालगंधर्वांच्या कानावर जेव्हा दीनानाथाची कीर्ती गेली तेव्हा ते उद्गारले, ' हा मुलगा जर माझ्या नाटक कंपनीत यायला तयार झाला असता तर मंगेशीपासून ते मुंबईपर्यंत पैशांच्या पायघड्या घालून आणि अत्तर शिंपडून मी त्याला आणलं असतं. त्याच्या गळ्यात समोरच्याचं काळीज हलवून टाकण्याचं सामर्थ्य आहे. ' बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाचे हे बोल दीनानाथचे गायनकौशल्य सांगण्यासाठी पुरेसे बोलके आहेत. दीनानाथला स्वतःची गायक म्हणून श्रेष्ठता प्रस्थापित करायची होती. त्यासाठी त्याला आपल्या पूर्वजांच्या नावाशी असणारी ओळख पुसून टाकून नवीन ओळख करायची होती. मंगेशी हे त्याचं गाव आणि मंगेश हे त्याचं दैवत होतं. त्याच मंगेशाचे आपण कर म्हणजे हात आहोत ही त्याची भावना होती. म्हणून अभिषेकी या नावाऐवजी त्याने मंगेशकर हे नाव लावायला सुरुवात केली. याच मंगेशकर नावाने पुढे गायन क्षेत्रात त्यांच्या नावाशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही असा इतिहास निर्माण केला. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१९/०३/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

दीनानाथ मंगेशकर 






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...