उगवतीचे रंग
‘ एक संवाद : बाप्पाशी ...’
गजानना, गणराया, मंगलमुर्ती असलेल्या बाप्पा, तुझे मनापासून स्वागत. अरे, किती दिवसांपासून वाट पाहत असतो आम्ही तुझी. तुझ्या स्वागतासाठी आबालवृद्ध सारेच उत्सुक असतात. तू आलास ना बाप्प्पा की काय जादूची कांडी फिरवतोस ते तुलाच माहिती बाबा. पण सगळे वातावरणच बदलून टाकतोस. कालपर्यंत शांत शांत असलेले सारे वातावरण मंगलमय होऊन जाते. तू येताना चैतन्य घेऊन येतोस. आणि खरेच मंगलमुर्ती असलेला तू आमची मनेही भक्तिमय करून टाकतोस. तू येतोस फक्त दहा दिवस. पण जणू काही आमच्या घरातील एक सदस्यच तू होऊन आलेला असतोस. म्हणून तर तू जेव्हा जातोस ना तेव्हा आमच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतात. एखाद्या आईबाबांचा मुलगा वर्षभर परदेशात जावा, त्याच्या वाटेकडे त्यांनी वर्षभर डोळे लाऊन बसावे, आणि मग त्याचा निरोप यावा. हो, मी येतोय. मला सुटी मिळालीय. दहाबारा दिवसांचीच आहे. शुक्रवारी २५ तारखेला मी सकाळी हजर आहे. आणि त्या आईबाबांचा हर्ष गगनात मावत नाही. त्याला आल्यावर कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्यांना होऊन जाते. तसेच, अगदी तसेच रे बाप्पा, तसेच आतुरलेले असतो आम्ही. तुझी वाट पाहत असतो, तुझ्या स्वागताची तयारी करीत असतो. पण खरे तर तू येतही नाहीस आणि जातही नाहीस. तू आत्मरूपाने सदैव राहतोस. या सृष्टीच्या चराचरात तू आहेस. पण तुझे हे प्रतिकात्मक आगमन आम्हाला प्रेरणा देणारे असते.
तुझ्या अवताराची कथा मोठी रम्य आहे. माता-पार्वतीने एका विशिष्ट उटण्यापासून, एक प्रकारच्या विशिष्ट माती पासून तुझी मूर्ति तयार केली असे सांगितले जाते आणि त्या मूर्तीला त्या आदिशक्ती पार्वतीने स्पर्श केला आणि गणेशा तू अवतीर्ण झालास. भगवान शंकरांनी तुला वर दिला की यापुढे तू गजमुख, गणेश, विनायक अशा नावाने ओळखला जाशील आणि पूजा, यज्ञादी पवित्र कार्यात तुझी प्रथम पूजा केली जाईल. तुला प्रथम पूजेचा मान मिळेल. तेव्हापासून हे मंगलमूर्ती, तुझी कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला पूजा करतात तुला आवाहन करतात आणि तुला प्रार्थना करतात की हे गणराया तू प्रसन्न होऊन हे कार्य सिध्दीस न्यावे आणि या कार्यातील संकटे दूर करावीत आणि तू ती करतोस.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशा चतुर्थीला आम्ही तुझी पार्थिव मूर्ती घरी आणतो आणि तिचे पूजन करतो. पार्थिव म्हणजे जड असे आम्ही समजतो पण खरे म्हणजे त्या पार्थिवात चैतन्याचा अंश असतो. अनेक वर्षे एखाद्या शिलेप्रमाणे पडून राहिलेल्या अहल्येला श्रीरामांच्या चरणांचा पावनस्पर्श झाला आणि त्या जड पाषाणामध्ये चैतन्य निर्माण झाले. जाणिवेचा, शक्तीचा स्पर्श झाल्यावर त्यातून अहल्या बाहेर आली. तुझी पार्थिव मूर्ती ही या सृष्टी मध्ये अस्तित्वात असलेल्या पंचमहाभूतांपासूनच निर्माण होते ज्यांचा या चराचरामध्ये ईश्वरी शक्तीचा वास आहे असा विश्वास आहे, अशा व्यक्तींना तुझी ही पार्थिव मूर्ती त्या ईश्वरीशक्तीचेच प्रतीक आहे असे प्रतीत होते. तुझ्याशी ते एकरूप होतात. तुला ते आपल्यातीलच एक समजतात आणि आपली सुखदुःखे तुझ्याजवळ मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने व्यक्त करतात. तू त्यांचे दुःख निवारण करशील, समृद्धी आणि ज्ञान प्रदान करशील आणि सर्व जीवन मंगलमय करशील अशी त्यांची भावना असते. तुझ्या प्रति दृढ श्रद्धा असते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुझ्या पार्थिव मूर्तीचे जलामध्ये विसर्जन केले जाते. बा गजानना, आम्ही म्हणजे तुझ्या भक्तांनी हे लक्षात ठेवायला हवे की तुझी मूर्ति मातीची असेल तरच ती निसर्गशी एकरूप होऊ शकते. म्हणजेच तुझी मूर्ति जर नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेली असेल तर ती जलामध्ये विरघळू शकत नाही. जलाचा अथांग सागर असलेल्या समुद्रातही ती विरघळू शकत नाही ज्या चैतन्यातून तुझी मूर्ति निर्माण झाली आहे ते चैतन्य पुन्हा निसर्गात विसर्जित होऊ शकत नाही. खरंतर पावसाळ्याच्या या दिवसात ओल्या मातीपासूनच तुझी मूर्ति करणे अपेक्षित असते, नाही का ? जे स्वतःला निसर्गप्रेमी म्हणवतात त्यांनी तरी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे आणि अनैसर्गिक गोष्टींपासून तुझ्या मूर्ति तयार करणे थांबवले पाहिजे.
तुझ्या मूर्तीचे जे पूजन आम्ही करतो, प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा तुझी मूर्ति चैतन्याने भारीत होते. जेव्हा ही मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित होते तेव्हा हे चैतन्य जळामध्ये मिसळते आणि पाण्याच्या माध्यमातून त्याची वाफ होऊन आकाशापर्यंत जाते आणि पावसाच्या रूपाने हे पाणी परत पृथ्वीकडे येते. अशा प्रकारे हे गजानना तुझे आशीर्वाद आम्हाला पुन्हा प्राप्त होत असतात. हा केवढा मोठा चमत्कार आहे !
अठराशेब्याण्णव मध्ये तुझा पहिला सार्वजनिक उत्सव झाला. तेव्हापासून तू नित्यनियमाने दरवर्षी सार्वजनिक उत्सवांमध्ये हजेरी लावतोस. पहिला उत्सव कोणी सुरु केला लोकमान्य टिळकांनी की भाऊसाहेब रंगारी यांनी हे मला फार महत्वाचे वाटत नाही. कारण त्यापेक्षाही तू महत्वाचा आहेस. पण तुझा सार्वजनिक उत्सव सुरु झाला आणि स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळाच रंग भरला. एक वेगळेच चैतन्य आले. तुझ्या भेटीच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले आणि जनजागृती होऊ लागली. स्वातंत्र्य जवळ आले. तसा तू आधी घराघरात येतच असायचास. अगदी ऋग्वेदापासून अनेक ग्रंथात आणि पुराणांत तुझे उल्लेख आढळतात. तुझ्या जन्माविषयी तर निरनिराळ्या कथा प्रचलित आहेत. आणि केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही तुझी मंदिरे आहेत. तुझे आराधना करणारे भक्त आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात जशी जनजागृती तुझ्या सार्वजनिक उत्सवातून झाली, तशी आणि तेवढ्या प्रमाणात आज होताना दिसत नाही. पण तरी आज विविध चलचित्र देखावे उभे केले जातात. त्यातून काहीतरी सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न होतो. आणि त्यातून कळत नकळत जनजागृती होते. कधी कधी ऐतिहासिक वास्तूचा देखावा उभा केला जातो. कधी कधी एखाद्या पौराणिक कथेवर आधारित देखावा असतो. कलाकार खूप मेहनत घेऊन हे देखावे तयार करतात. आणि तुझे भक्त आपल्या कामातून वेळ काढून हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. ते दिवसभराचे थकलेले असतात. पण तुझ्या दर्शनाने त्यांचा शीण कुठल्या कुठे पळून जातो. पण काळानुसार या चांगल्या गोष्टींसोबत काही वाईट गोष्टीही तुझ्या उत्सवात शिरल्या आहेत. तुझ्या उत्सवाचा राजकीय फायदा उठवणारे नेते आहेत. बळजबरीने वर्गणी वसूल करणारे आहेत. तुझ्या उत्सवासाठी विजेची चोरी करणारे आहेत. भले मोठे स्पीकर किंवा कानठळ्या बसवणारे डी जे लाऊन सर्वसामान्यांना दहा दिवस वेठीला धरणारी मंडळी आहेत. कदाचित नको ती गाणी कर्कश आवाजात तुझ्यापुढे वाजवली जातात. दांडिया खेळला जातो. जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण इ. ना हातभार लागतो. हे खचितच तुला आवडत नसावे. पण बाप्पा, तूच बुद्धी दे. आणि हे मळभ दूर कर रे बाबा. खरे तर तुझ्याकडे काही मागावे अशी आमची पात्रता नाही. कारण तू न मागता देणारा आहेस. विघ्नहर्ता आहेस.
खरं तर तुझ्याकडून काही गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत. तुझे सुपासारखे मोठे कान आम्हांला सांगतात की भरपूर ऐका. श्रवणाद्वारे ज्ञान ग्रहण करा. उत्तम श्रोते व्हा. लहान मोठ्या गोष्टी कानात साठवा. तुझे बारीक असलेले डोळे सांगतात की कुठल्याही गोष्टीचे नीट बारकाईने निरीक्षण करा. त्याशिवाय निष्कर्षाला पोहचू नका. तुझे विशाल उदार सांगते की जीवनातील सुखदुःख आपल्या उदरात सामावून घ्या. मोठी सोंड म्हणजे एखाद्या व्यक्तीची वा गोष्टीची चांगले किंवा वाईट दुरूनच ओळखण्याची क्षमता दर्शवते. तसेच संकटाना घाबरू नका धैर्याने सामोरे जा हे ही ती सांगते.
समर्थ रामदासांनी तुझी आरती लिहिली ती किती सुंदर आहे ! त्यांनी अगदी योग्य विशेषणे वापरलीत तुझ्यासाठी. सुखकर्ता, दु:खहर्ता. खरंच तू सुखकर्ता आहेस. तुझ्या दर्शनाने दुःख नाहीसे होते. तू विघ्नहर्ता आहेस. म्हणून तर प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला तुझे पूजन होते. अग्रपूजेचा मान तुलाच दिला जातो. सर्व वेद, शास्त्र, पुराणे तुझीच महती गातात.
त्यांची सुरुवात तुझ्या वंदनानेच होते. तू आदिदेव आहेस. बुद्धी देणारा आहेस. अथर्वशीर्षात तर तुझे किती छान वर्णन केले आहे. ‘ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. ‘ असा तू आहेस. ज्ञानेश्वर माउलींनी तर ज्ञानेश्वरीची सुरुवात तुझ्या वंदनाने केली आहे. शब्दरूप, तत्वरूप, नादरूप आणि ओमकार स्वरूप तू आहेस. लता मंगेशकरांनी आपल्या सुंदर आणि गोड आवाजात तो अभंग अजरामर केला आहे. तुलाही तो ऐकायला आवडत असणारच. मी ही तोच म्हणतो आणि थांबतो. गोड मानून घे.आणि तुझ्या मायेची पाखर सदैव आमच्यावर राहू दे.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्द्ब्रम्ह कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
७/९/२०२४
प्रतिक्रियेसाठी 9403749932
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
प्रतिक्रियेसाठी 9403749932
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा