मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १४

 उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १४

युरोपवारीचे आतापर्यंत १३ भाग झालेत. हा १४ वा भाग. खरं तर प्रवास वर्णन आता करून झालं आहे. मग मी असं काय सांगणार आहे आता ? पण आता आहेत मागे रेंगाळणाऱ्या मनातील आठवणी. एखाद्या मंदिरातील घंटा वाजल्यानंतरही नंतर मंद असा नाद ऐकू येतो, त्याला अनुनाद असा सुंदर शब्द आहे. घंटा कंपन पावत असते. अशाच अनुनादमय काही आठवणी, दृश्ये डोळ्यासमोर येतात. त्याच तुमच्याशी शेअर करण्याचा आनंद घेतोय. 

लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवरून फिरत असताना एक सुंदर दृश्य नेहमी दिसायचे. एखादी तरुण आई किंवा वडील छोट्या बाबागाडीतून आपल्या सानुल्याला फेरफटका मारायला घेऊन जायचे. कधी कधी आजी आजोबाही हा आनंद घ्यायचे. त्या बाबागाडीत बसलेली किंवा क्वचित झोपलेली मुलं इतकी गोड, गोजिरवाणी, सुंदर आणि नाजूक दिसायची की असा मोह व्हायचा की पुढे जाऊन या मुलांना उचलून घ्यावं आणि त्या गोड चिमण्या बाळांचा मुका घ्यावा. लहान मुलं, मग ती कोणत्याही देशातील असो, कोणत्याही वर्णाची असो, ती गोडच दिसतात. तेव्हा अशा मुलांना उचलून घ्यावं हा मोह कोणालाही होणं साहजिकच आहे. अर्थात कोणी तसं केलं नाही हा भाग वेगळा. पण आपल्याकडे असं दृश्य दिसलं असतं तर, समोरच्या माणसांनी त्या मुलाला उचलून घेतलं असतं, त्याचे मुके घेतले असते. एखाद्या स्त्रीने उचलून घेतलं असतं तर पटापट मुके घेऊन म्हणाली असती, ' अय्या, कित्ती गोड ! ' 

पण तिकडे असं काही केलेलं चालत नाही असं ऐकलं. एवढंच नाही तर असं करणं गुन्हा आहे असंही मानलं जातं. आमच्या गाईडने असाच एका पर्यटकांसोबत घडलेला किस्सा सांगितला. एका भारतीय आजोबांनी अशाच एका युरोपिअन नातवाला उचलून घेतलं. त्याचे मुके घेतले आणि 'सो स्वीट, सो क्युट...' वगैरे म्हणत त्याला त्याच्या आईवडिलांकडे परत दिलं. ते आईवडील त्यांना काहीच बोलले नाहीत. पण त्यांनी सरळ पोलिसांना फोन लावला. लंडनमधील पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्या भारतीय व्यक्तीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याचा पासपोर्ट जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रीपचा आनंद तर कुठल्याकुठे गेला. फार मोठी किंमत त्या व्यक्तीला मोजावी लागली.  

या युरोपिअन देशात श्वानप्रेमीही मोठ्या प्रमाणावर आढळले. जसे लहान मुलांना फिरायला घेऊन जाणारे आढळले तसेच आपल्या श्वानांना अपत्यवत प्रेम लावून फिरायला घेऊन जाणारे आढळले. त्या श्वानांसाठी बऱ्याच सायकल प्रेमींनी छान बास्केटवजा कॅरिअर लावून घेतली होती. काही कुत्री दिमाखात कारमधून फिरत होती. तर काही गौरवर्णीय ललनांच्या हातात छोटी अगदी मांजरासारख्या आकाराची कुत्री होती. त्यांना कडेवर घेऊन त्या हिंडत होत्या. त्यांना कपडे घातलेले होते. एकंदरीतच त्यांचे श्वानप्रेम वाखाणण्यासारखे होते.

युरोपात सर्वत्र उत्तम रस्ते आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अतिशय उत्तम आणि चोख आहे. ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळेअपघात फार कमी होतात. आपल्याकडे जसे जसे ड्रिंक अँड ड्राइव्ह, हिट अँड रन मुळे अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडतात, तसे तिकडे होत नाही. गाड्यांचे हॉर्न शक्यतो कोणी वाजवीत नाही. तेथील युरेल ही वेगवान रेल्वे बऱ्याच देशांना जोडणारी आहे. आम्हीही लंडन ते पॅरिस असा प्रवास युरोस्टार ट्रेनने केला. या गाडीने पाचशे किमी चे अंतर केवळ दोन तासात पार केले. युरेलच्या काही गाड्या जलद तर काही अति जलद आहेत. या गाड्यांमध्ये कमालीची स्वच्छता, प्रशस्त डबे, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छ प्रसाधनगृहे आहेत. या गाड्यांनी प्रवास वेगवान होतो, प्रवासाचा वेळ वाचतो शिवाय त्यांनी प्रवास करणे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर असते. आपल्या देशातही या सुविधा हळूहळू विकसित होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.  

 चोऱ्यामाऱ्या, लूटमार, खून, बलात्कार यासारखे गुन्हे तिकडेही घडतातच पण प्रमाण कमी आहे. सर्वसामान्य माणसाची वृत्ती प्रामाणिकपणाची आहे. देशप्रेम अंगात भिनले आहे. तिकीट न काढता प्रवास करणे, कर न भरणे यासारख्या गोष्टी तिकडे क्वचितच आढळतील. शिक्षणातून आणि संस्कारातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात त्यांना जसे यश आले आहे, तसे आपल्याला अजूनही आले नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. 

 युरोपात वाखाणण्यासारखी कोणती गोष्ट आढळली असेल तर ती आहे स्वच्छता. रस्त्यावर कोठेही घाण नाही. लोक डस्टबीनमध्येच कचरा टाकणार. आपण म्हणू की त्यांच्याकडे लोकसंख्या कमी असल्याने ही स्वच्छता ठेवणे शक्य होते पण खरे म्हणजे हा सवयीचा आणि वृत्तीचा प्रश्न आहे. या सवयी अंगी बाणवाव्या लागतात. या बाबतीत भुतानसारखा छोटा देश सुद्धा आघाडीवर आहे. एखादी गोष्ट रांगेत उभी राहूनच घेणे, वेळ पाळणे, इतरांच्या वेळेची कदर करणे हे त्यांचे गुण घेण्यासारखे आहेत. पण आम्ही त्यांच्याकडून पिझ्झा आणि कोक घेतला, ड्रिंक अँड डान्स घेतलं, साहेबी पोशाख घेतला, डेटिंग घेतलं पण त्यांच्याकडील स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा यासारख्या गोष्टी घेण्यात आम्ही कमी पडलो. 

युरोपात आहेत तशी जागतिक वारसास्थळे भारतातही काही कमी नाहीत. किंबहुना भारतात जास्त असावीत. पण तेथील ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे त्या लोकांनी जीवापाड जपली आहेत. त्यांचे केवळ जतनच नाही तर देखभाल, संवर्धन आणि विकास त्यांनी केला आहे. त्या वारसास्थळांचा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी उपयोग ते करून घेत आहेत. लंडनमधील जुन्या इमारती, फ्रान्समधील व्हर्सायचा राजवाडा, पिसा येथील झुकता मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर ही पर्यटकांना आकर्षित करून घेणारी ठिकाणे आहेत. पण भारतातील जुने किल्ले, दिल्लीतील कुतुबमिनार, राजस्थानातील जयपूर आदी ठिकाणी असलेले देखणे राजवाडे युरोपातील पर्यटनस्थळांपेक्षा काही कमी प्रेक्षणीय नाहीत. उणीव जाणवते ती आपल्याकडे त्यांची काळजी घेण्याची. आम्हाला आमच्या ऐतिहासिक वारशाची किंमत वाटत नाही. त्या परिसरात आम्ही केरकचरा टाकतो, भिंतींवर वाटेल ते खरडतो. अशी पर्यटनस्थळे म्हणजे आपली अस्मिता आहे, आपला अभिमान आणि वारसा आहे ही जाणीव आम्हाला कधी होणार ? 

स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा तेथील पारदर्शी सरोवरे, आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे पाहून मन आनंदले. आपल्याकडे हिमालयातील निसर्ग देखील असाच सुंदर आहे. पण स्वित्झर्लंडमधील लोकांनी निसर्गाची ही देणगी जीवापाड जपली आहे. म्हणूनच ती पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे. आपल्याकडेही हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. तेथील आल्प्सच्या पर्वतरांगा सुंदर आहेत. आपल्याकडील हिमालयाची आठवण करून देणाऱ्या आहेत. पण आपल्याकडेही हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगांना आध्यात्मिक वारसा आहे. म्हणून ती केवळ पर्यटनस्थळे नसून पवित्र भूमी देखील आहे. हिमालयाच्या कुशीत बदरीनाथ, केदारनाथ आणि अन्य कितीतरी तीर्थस्थळे आहेत. आपल्याला आपल्या देशातील पर्यटनस्थळांचे ब्रॅंडिंग करता आले पाहिजे म्हणजे त्यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेता येईल. योगशास्त्र, आयुर्वेद, तत्वज्ञान ही भारतीयांची जगाला मोठीच देणगी आहे. 

भारतात जशा प्राचीन हडप्पा, मोहेंजोदडो, विजयनगर आदी प्रगत संस्कृती होत्या, तशाच युरोपातही ग्रीक, रोमन संस्कृती होत्या. आपण जशा जलदेवता, अग्निदेवता आदी निसर्गातील शक्तींना मानतो, तसेच तेही लोक मानतात. भाषा, वेशभूषा, चित्रकला, संगीत, शिल्पकला, बांधकामाची शैली यासारख्या गोष्टींमध्ये दोन्हीकडे समृद्धता आढळते. युरोपातील तंत्रज्ञान प्रगत आहे. त्याचा ते शेती करण्यापासून सर्व गोष्टींसाठी वापर करून घेतात. लोकसंख्या कमी असल्याने दरडोई उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे तिकडे गरीब, भिकारी यांची संख्या अत्यंत अल्प आहे. काही लोक पैसे मागतात पण आधी विविध वाद्य वाजवून लोकांचे मनोरंजन करतात. कोणी उत्तम चित्रे काढतात. त्या बदल्यात ते पैशांची मागणी करतात. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये क्रूझमध्ये फिरण्याचा आनंद घेत असताना, तेथील स्थानिक कलाकारांनी वाद्ये वाजवून आमचे मनोरंजन केले. त्या बदल्यात लोकांनी त्यांना यथाशक्ती मदत केली. 

विविध देश का पाहायचे ? पर्यटन का करायचं ? तर आपल्याकडे पर्यटनाचे महत्व आधीच थोरांनी सांगून ठेवले आहे . 

केल्याने देशाटन, पंडित -मैत्री सभेत संचार, 

शास्त्र ग्रंथ विलोकुनी मनुजा चातुर्य येतसे फार. 

पर्यटनाने आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान मिळते. अनुभवविश्व समृद्ध होते. जाणिवांची खोली वाढते. विविध देशांचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती मिळते. पुस्तके वाचून माहिती मिळवणे आणि प्रत्यक्ष स्वतः हिंडून ती ठिकाणे पाहणे यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. पर्यटनामुळे मन सुसंस्कृत होते. उत्तुंग व्यक्तिमत्वाची, थोर मनाची माणसे भेटतात. आपल्या मनाचा कोतेपणा दूर व्हायला मदत होते. माणसाचा मूळ स्वभाव, सुखदुःखाच्या कल्पना,चिरंतन आनंदाचे स्रोत सर्वत्र सारखेच आहेत हा अनुभव येतो. प्रख्यात लेखक पु लं देशपांडे जेव्हा इंग्लंडला गेले होते, तेव्हा त्यांनी तेथे बसमध्ये प्रवास करताना आपल्या मुलीची काळजी करणारी ब्रिटिश आई पाहिली. त्यांना आपल्या मुलीची तशीच काळजी करणारी भारतीय आई आठवली. आई मग ती कुठलीही असो, ती आपल्या अपत्यांची काळजी करणारच या वैश्विक सत्याची जाणीव त्यांना झाली. जगाची विशालता लक्षात घेतली की या विश्वात आपले स्थान किती नगण्य आहे हे लक्षात येते. प्रवास हा आत्मविश्वास देणारा, चिरंतन आनंद देणारा उत्तम मार्ग आहे. आपल्याकडे आदी शंकराचार्य, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद आदींनी भारतभ्रमण केले ते याचसाठी. त्यातूनच त्यांना आपल्या पुढील आयुष्याची दिशा सापडली. 

आपणही शक्य होईल तसा आणि आपल्या क्षमतेप्रमाणे देशातील किंवा विदेशातील पर्यटनाचा आनंद घ्यावा असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी परदेशातच गेले पाहिजे असेही काही नाही. /आपल्या देशातही खूप उत्तम आणि सुंदर स्थळे आहेतच. अशा या भ्रमंतीसाठी आपल्याला शुभेच्छा ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२२/९/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...