मुंगीताई मुंगीताई…
मुंगीताई मुंगीताई थांब ना थोडं
सोडवतेस का जरा मला पडलेलं कोड
एवढासा जीव, एवढेसे पाय
जातेस कुठं, तुझं काम तरी काय ? ।। १ ।।
जायचं असो कुठेही
खाली अथवा वर
कशाची नाही फिकीर
चालतेस किती भरभर ! ।। २ ।।
भिंतीवरून चालताना, छतावरून पळताना
तू पडत नाहीस कशी ?
खाली पडण्याची भीती
तुला अजिबात नाही कशी ? ।। ३ ।।
जाताना शाळेत तू दिसली नाहीस कधी
पण शिस्त पाळण्याची घाई तुला आधी.
कितीही असो गर्दी, कितीही असो घाई
रांगेची शिस्त तू कधी मोडतच नाही. ।। ४ ।।
दिवस असो वा रात्र, नाही तुला विश्रांती
दीर्घोद्योगानेच होते का जीवनात क्रांती ?
ऐकून सारे प्रश्न माझे
मुंगीताई थांबली क्षणभर. ।। ५ ।।
म्हणाली, ऐक बाळा, अरे जीवन हीच आमची शाळा.
जीव असला छोटा, तरी पाळतो आम्ही शिस्त
कार्यरत राहण्यावरच असते आमची भिस्त.
उद्योगातच जगणे रमणे, जीवन आमचे मस्त ! ।। ६ ।।
कणाकणाने करतो संचय, क्षणक्षणाचा करून वापर
आयुष्याचे सूत्र असे हे, व्यर्थ न दवडा कण वा क्षण
जगणे म्हणजे असे लढाई, प्रति क्षण प्रति क्षण
धैर्याने लढा लढाई, सफल होतसे तरीच जीवन. ।। ७ ।।
वारूळ म्हणजे घर आमचे
राहतो असतो जमिनीखाली
बोलत होती मुंगीताई, एवढ्यात हाक ती आली
अग चिंगे, थांबलीस कुठे, जायचं ना खाली ? ।। ८ ।।
एवढं बोलून मुंगीताई गेली सुद्धा भराभरा
पण सांगून गेली मला जाताना, तिच्या जीवन जगण्याची तऱ्हा.
ठरवून टाकलं मीही आता, राहावे कार्यरत नित्य निरंतर
शिस्त आणि उद्योगाला कधीच नाही द्यायचे अंतर. ।। ९ ।।
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/९/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा