उगवतीचे रंग
आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १३
प्रवास आणि चहा याचं एक अनोखं नातं आहे. पाऊस आणि चहा यांच्यासारखं. अशा वेळी चहाच्या चाहत्यांना चहाची चाह असतेच असते. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो हे खरेच ! अशा वेळी चहाची जी ओढ लागते ना महाराजा, ती खरा चहाप्रेमीच समजू जाणे ! असाच आमच्या प्रवासातला एक प्रसंग ! फ्रान्समधील पॅरिस, तेथील आयफेल टॉवर आणि व्हर्सायचा राजवाडा वगैरे प्रेक्षणीय ठिकाणे पाहून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाण्यासाठी निघालो. तारीख होती ६जून २०२४. एकूण अंतर होते साधारण ६०० किमी चे. सगळा प्रवास बसने होता. साधारण सात आठ तासांचा प्रवास. फ्रान्सची सीमा संपते आणि स्विसची हद्द सुरु होण्याच्या सुमाराला एक रमणीय शहर लागते. त्या शहरात आम्हाला दुपारी १२ च्या सुमारास एका भारतीय पद्धतीचे जेवण मिळणाऱ्या हॉटेलमध्ये जायचे होते. आमच्या बसने हायवे सोडून गावात प्रवेश केला. हॉटेलच्या जवळ बस पार्क करण्यास जागा नव्हती म्हणून बस जरा दूरच उभी करण्यात आली. तेथील अरुंद रस्त्यातून वाट काढत आमचे गाईड राहुलजी आम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन गेले. तेथे आम्ही छान गरमागरम जेवणाचा आनंद घेतला आणि लगेच पुढील प्रवासासाठी निघालो.
आता दुपारचे चार वाजले होते. झुरिचला पोहोचायला अजून दोन तीन तास तरी लागणार होते. चहाप्रेमींना चहाची आठवण झालीच होती. इथे कुठे झकास चहा मिळाला तर बरेच होईल असे वाटत होते. पण युरोपमध्ये आपल्याकडे मिळतो तसा चहा सहजासहजी मिळत नाही. आपल्याकडे जागोजागी चहाची दुकाने असतात. युरोपमध्ये मात्र अस्सल चहाबाजांची पंचाईत होते. ब्रेक घ्यायचा म्हणून एका ठिकाणी बस थांबली. जवळच्याच एका हॉटेलमध्ये राहुलजी आम्हाला घेऊन गेले. त्या हॉटेलमालकाशी त्यांची ओळख होतीच. त्यांच्याच भाषेत राहुलजींनी त्यांच्याशी संवाद साधला. आम्हाला म्हणाले, ' बसा, सगळ्यांनी. तुम्हा सगळ्यांना मस्त गरमागरम चहा देतो. ' आम्हालाही जरा शंका होती की इथे आपल्याकडे मिळतो, तसा चहा कुठून मिळणार ?
पण राहुल द ग्रेट टीम मॅनेजर ! अशा प्रसंगी काय करायचे त्यांना माहिती होते. त्यांनी चहा, साखर यांचे एक झकास मिश्रण आपल्यासोबत ठेवलं होतं. सगळ्यांना त्यांनी असा फर्मास चहा बनवून दिला की सगळे खुश ! शिवाय आपल्या हाताने प्रत्येकाला आग्रहाने सर्व्ह केला. राहुल यांच्याजवळ अशी समयसूचकता नसती तर !
युरोपवारीचे मी आतापर्यंत १२ भाग लिहिले. सर्वांना ते आवडले. काहींनी काही भाग पुन्हा मागवून घेतले. भाग वाचकांना आवडले म्हणून त्यांनी ते मागवून घेतले आणि आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवले. हे भाग वाचकांना का आवडले ? तर याचं उत्तर आहे की युरोपवारी छान झाली म्हणून. युरोपवारी छान झाली म्हणून मी त्यावर लिहू शकलो. आणि युरोपवारी का छान झाली ? तर त्याचं श्रेय मोठ्या मनाने द्यायला हवं ते आमच्यासोबत असणारे आमचे टूर मॅनेजर श्री राहुल देसाई यांना. त्यामुळे आजचा हा भाग खास त्यांच्यासाठी समर्पित ! आम्ही युरोप ट्रीपसाठी वीणा वर्ल्डची निवड केली त्यावेळी आमच्यासोबत कोण टूर मॅनेजर येणार हे माहित नव्हतं. ते बऱ्याच उशीरा कळलं. आणि त्यांची भेट झाली ती अगदी प्रवासाच्या सुरवातीला मुंबई विमानतळावर. त्यांच्याशी फक्त आधी एकदा फोनवर बोलणं झालं होतं.
वीणा वर्ल्डच्या प्रवाशांपैकी मुंबई विमानतळावर सर्वात आधी पोहोचणारे आम्ही होतो. त्यावेळी पुणे मुंबई रेल्वेमार्ग काही कामासाठी बंद होता. त्यामुळे पुण्याहून रस्त्याने मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सुट्या असल्याने ट्रॅफिकही प्रचंड होता. म्हणून आम्ही पहाटे लवकर निघून मुंबई विमानतळावर पोहोचलो. तिथे वीणा वर्ल्डचं कोणीच दिसेना म्हणून मी राहुल यांना फोन लावला. ते म्हणाले, ' मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो आहे. तुम्ही तेथील चेकिंग वगैरे करून अमुक एका ठिकाणी थांबा. थोड्याच वेळात ते आले. त्यांचा यलो कलरचा वीणा वर्ल्डचा लोगो असलेला टी पाहून त्यांना ओळखणे कठीण गेले नाही. त्या क्षणापासून त्यांचे आणि आमचे सूर जुळले ते कायमचेच !
सावळा वर्ण, साधारणपणे सहा फूट उंची. चेहऱ्यावर करारी भाव आणि आवाजात एक प्रकारची जरब असं काहीसं रांगडं वाटणारं हे व्यक्तिमत्व. पण तेवढंच प्रेमळ आणि सौजन्यशील. ज्येष्ठांना मान देणारं, तरुणांना आणि लहानांना आपल्या मित्रत्वाच्या नात्यानं जिंकून घेणारं. आम्ही लंडन विमानतळावर उतरलो आणि तेव्हापासून त्यांचं खरं काम सुरु झालं. सर्व प्रवाशांची मने त्यांनी आपल्या वागण्याने लवकरच जिंकून घेतली.
आमच्या युरोप टूरच्या संपूर्ण प्रवासात राहुल यांचा उत्साह कायम होता. सगळे थकलेले असले तरी ते थकलेले दिसले नाहीत. थकले असतील तरी त्यांनी तसे जाणवू दिले नाही. सकाळी सर्वांनी लवकर उठावं म्हणून प्रत्येकाला वेक अप कॉल करणार. नाश्त्याच्या ठिकाणी सर्वांच्या आधी हजर राहून कोणाला काय हवं नको ते पाहणार. पुन्हा लागलीच बसमध्ये पुढील प्रवासासाठी हजर. जेवणाच्या ठिकाणी देखील सर्वांच्या आधी उपस्थित राहून प्रत्येकाला हवं ते मिळालं की नाही हे बघणार. स्वतः थोडंफार खाऊन पुन्हा सर्वांच्या आधी तयार ! या सगळ्या गोष्टींसाठी एक जिगर लागते, उत्साह लागतो आणि तो या माणसाजवळ काठोकाठ भरलेला होता.
बसमध्ये प्रवास करताना सर्वांशी हिंदी, मराठी, इंग्रजीत संवाद साधणार. वेगवेगळी माहिती सांगणार, किस्से, गमतीजमती सांगणार, मनमुराद हसवणार आणि तेवढ्याच काळजीपूर्वक सूचनाही देणार, कुठे काय खबरदारी घ्यायची ते सांगणार या सगळ्या त्यांच्या गुणांबद्दल, कौशल्याबद्दल त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच ! युरोपची या माणसाला खडानखडा माहिती ! प्रत्येक ठिकाणचे रस्ते, नावं अगदी तोंडपाठ. मला अमुक एक गोष्ट आठवत नाही असं त्यांच्याबाबतीत कधी झालेलं दिसलं नाही. प्रत्येक ठिकाणचे विक्रेते, हॉटेलमालक यांच्याशी त्यांनी खास मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले. भारतातून येताना त्यांच्यासाठी त्यांना आवडणारी काहीतरी भेट आठवणीने ते न्यायचे. कुणाला मिठाई, कुणाला चितळेंची बाकरवडी, कुणाला एखादी शाल तर कुणाला टी शर्ट असं काहीतरी प्रत्येकाला द्यायचे. प्रत्येकाची गळाभेट तर ठरलेलीच. शिवाय त्या त्या व्यक्तीच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधणार. पूर्ण भाषा आलीच पाहिजे असं नाही पण त्या भाषेतील आपुलकीचे, प्रेमाचे, धन्यवादाचे चारदोन शब्द तर त्यांचे पाठच असायचे.
एखाद्या ज्येष्ठ युरोपिअन व्यक्तीला गमतीने ' तात्या, अण्णा ' म्हणायचे. त्यांना कळायचं नाही पण आम्हाला त्याची गंमत वाटून हसू यायचं. कुणी युरोपिअन बाई त्यांची ' मावशी ' व्हायची. आपल्या ' तात्या, मावशी ' यांचे हे युरोपिअन अवतार बघून हसू यायचं. पण त्यांचा अनादर करण्याचा त्यात कुठेही हेतू नसायचा. साऊथ आफ्रिकन माणसे ज्यांचा निग्रो म्हणून अवमानकारक उल्लेख पूर्वी केला जायचा, ती युरोपात ठिकठिकाणी आढळतात. त्यातील काही मंडळी अधिकारपदावर आहेत तर काही सर्वसामान्य विक्रेते आहेत. रंग काळा असला म्हणून काय झाले ? तीही तर माणसेच ना ! अशा माणसांना ' शामसुंदर ' असा सुंदर शब्द राहुलजींनी वापरला. मग आम्हीही त्यांच्याबद्दल बोलताना त्याच शब्दाचा वापर करीत असू.
युरोपमध्ये पर्यटक म्हणून वावरताना काही डूज आणि डोंट्स लक्षात ठेवणे आणि त्याप्रमाणे वागणे फार आवश्यक असते. त्याबद्दल आम्हाला ते वेळोवेळी सावध करीत असत. व्हेन यु आर इन रोम, बिहेव लाईक रोमन्स. हे वाक्य आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे. युरोपमध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी आपला पासपोर्ट, आपले पैसे आपल्याला जीवापाड सांभाळावे लागतात. एक वेळ पैसे गेले तर दुसरी काहीतरी व्यवस्था करता येऊ शकते पण पासपोर्ट जर हरवला किंवा चोरीला गेला तर मात्र मोठी बिकट अवस्था होऊ शकते. या सगळ्या गोष्टी ते वेळोवेळी आम्हाला सांगून सावध करीत असत. त्यांच्या सगळ्या वागणुकीचे सार एकाच वाक्यात सांगता येईल. ' ते केवळ टूर मॅनेजर नव्हते, तर आमचे पालक झाले होते. '
राहुल यांचे शिक्षण मुंबईत दादरला झाले. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून ते आले. चाळीत राहणारे त्यांचे कुटुंब ! वडील मिल कामगार तर आई शिक्षिका. वडिलांचे निधन झाल्यानंतर आईनेच त्यांना घडवले, शिकवले. बी कॉमची पदवी घेतल्यानंतर त्यांनी टूर गाईडच्या कामाला सुरुवात केली. फिरण्याची आवड तर त्यांना होतीच. खरं तर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून त्यांना हॉटेल व्यवसायात पदार्पण करायचं होतं. पण आर्थिक अडचणींमुळे ते करता आलं नाही. पण आपल्या आवडीच्या पर्यटन क्षेत्रात मात्र ते आले आणि तिथे त्यांनी झोकून देऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला देशांतर्गत सहली केल्या आणि आता तर युरोप आणि जगातील इतरही देशात ते पर्यटकांना घेऊन जातात. आता राहुल साधारण मध्यमवयीन आहेत. लग्न झालेलं आहे. घरी आई, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून त्यांचं आपल्या आईवर असणारं प्रेम, त्यांची कुटुंब वत्सलता यांचं दर्शन आम्हाला घडलं. स्विसमधून आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांनी आठवणीने चॉकलेट्सची खरेदी केली.
महाकवी कालिदासाच्या ' रघुवंश ' या नाटकात एक प्रसंग आहे. राजकन्या इंदुमतीचे लग्न असते. मोठमोठे राजे तिच्या स्वयंवराला आलेले असतात. ती वरमाला हातात घेऊन राजांचे निरीक्षण करत असते. कालिदासाने तिच्यासाठी ' दीपशिखा ' असा सुंदर शब्द वापरला आहे. ती ज्या ज्या राजाजवळ जायची, तेव्हा तिच्या तेजाने तो उजळून जायचा आणि त्याच्यापासून दूर जायची तेव्हा त्याचा चेहरा पुन्हा पूर्ववत काळवंडून जायचा. अशी ती दीपशिखा ! जिथे जाईल, तिथलं जग उजळून टाकणारी. राहुल यांच्यासारखा एखादा टूर मॅनेजर असा असतो. जिथे जातो, तिथली परिस्थिती तो आपल्या वागण्याबोलण्याने उजळून टाकतो. लोकांना जिंकून घेतो. चांगला व्यवस्थापक व्हायचं असेल तर आपल्या कामाप्रती निष्ठा, समर्पण भाव या गुणांची आवश्यकता असते. त्याशिवाय येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याची आणि निभावून नेण्याची तयारी असावी लागते. प्रवासात तर कधी काय अडचणी येतील हे सांगता येत नाही. कधी विमानच रद्द होऊ शकते, कधी एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. त्यासाठी तयार असणे आणि बरोबरीच्या लोकांना सुद्धा अशा परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढणे या गोष्टींची तयारी असावी लागते. मला वाटते या सगळ्या दृष्टीने राहुल हे आदर्श टूर मॅनेजर आहेत. त्यामुळेच जेव्हा आमची सफर संपली तेव्हा, प्रत्येकाच्या मनात राहुलजींबद्दल कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्यामुळेच ही ट्रीप सुंदर आणि यशस्वी झाली होती. प्रत्येकाने त्यांना आपल्या घरी येण्याचे आणि पुन्हा भेटण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्यासोबत फोटो तर सगळ्यांनी काढलेच पण प्रत्येकाच्या मनातही त्यांनी कायमचे स्थान पटकावले आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/९/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा