उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग १५
रवींद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली
ज्योतिरिंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू यांची पत्नी कादंबरीदेवी यांनी रवींद्रनाथांवर खूप माया केली. आईचे प्रेम त्यांना दिले. पण मुख्य म्हणजे त्यांना तिने लिहिण्याची प्रेरणा दिली. लिहिते केले. जे लिहिले त्याला उत्तेजन दिले आणि त्यांच्या काही चुका असल्या तर त्याही हसत खेळत लक्षात आणून दिल्या. दुर्दैवाने त्यांची ही आईसमान प्रेम करणारी वहिनी काही कारणाने लवकर गेली. पण तिचे प्रेम रवींद्रनाथ कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी आपला ' शैशव कविता ' हा काव्य संग्रह वहिनीला अर्पण केला.
सुरुवातीला रवींद्रनाथ त्या काळातील प्रख्यात कवींच्या कवितांच्या शैलीचे अनुकरण केले. त्यामध्ये बिहारीलाल चक्रवर्ती, भानू सिंह ठाकूर आदींच्या कवितेचा समावेश होता. पण लवकरच त्यांनी ही अनुकरण शैली सोडून स्वतःची शैली विकसित केली. त्यात ते लिहू लागले. अनुकरणातून मनुष्य फार प्रगती करू शकत नाही. रवींद्रनाथांना स्वतःची शैली गवसली, आपल्या आतील आवाज त्यांनी ऐकला. त्यांची हीच गोष्ट त्यांना महाकवी बनण्यासाठी उपयोगी पडली. आपल्या स्वतंत्र लेखन शैलीने ते एवढे मोठे झाले की आज त्या काळातील इतर साहित्यिकांची नावे वाचकांना फारशी आठवणार नाहीत पण प. बंगालमधील साहित्यिक म्हटले की रवींद्रनाथांचे नाव ठळकपणे नजरेसमोर येते.
रवींद्रनाथांनी वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी लिहिलेले ' वाल्मिकी प्रतिभा ' हे नाटक आजच्या परिस्थितीतही अत्यंत वास्तवदर्शी आहे हे आपण मागच्या भागात पाहिले. रवींद्रनाथ या काळात एक कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्धीला आले होते परंतु आपल्या सुरुवातीच्या काळातच त्यांना त्या काळातील प्रथितयश साहित्यिकांची टीका देखील सहन करावी लागली होती असे आपल्याला आढळून येते. पण साहित्यिकांची ही टीका टिप्पणी रवींद्रनाथांनी अतिशय धीराने आणि शांतपणे सहन केले यात त्यांचे मोठेपण दिसून येते. त्या टीकाकारांमध्ये त्यांच्यातील लेखकाचे किंवा कवीचे असलेले मोठेपण मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणा नव्हता असेही म्हणता येईल. परंतु रवींद्रनाथांनी त्यांना कधीच कमी लेखले नाही आणि त्यांच्या टीकेची पर्वाही केली नाही किंवा त्यांच्यावर प्रतिहल्ला केला नाही. त्यांच्या टीकेला शांतपणे तोंड दिले एवढेच नाही तर त्यांनी अशा या साहित्यिकांना त्या बदल्यात उदार मनाने शुभेच्छाही दिल्या.
तत्कालीन साहित्यिकांनी त्यांच्यावर टीका करण्याचे एक कारण असेही सांगता येईल की रवींद्रनाथांची लेखनशैली ही पारंपारिक नव्हती. ते आपल्याला जे वाटेल ते मुक्तपणे आपल्या भाषेत आणि आपल्या लेखन शैलीचा वापर करून ते लिहीत होते. त्यामुळेच तत्कालीन वाचकांना आणि साहित्यिकांना त्यांची शैली अंगवळणी पडण्यास काही काळ जावा लागला.
प्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ याला देखील आपल्या सुरुवातीच्या काळात अनेक टीकाकारांची टीका सहन करावी लागली होती. त्या काळातील प्रख्यात कवी ड्रायडन, पोप यांच्याप्रमाणे भडक आणि कृत्रिम लेखन शैलीचा अवलंब त्याने केला नव्हता. आणि वाचकांना त्यांच्याच लेखनशैलीची सवय झाली होती. परंतु पुढे काळाच्या ओघात वर्ड्सस्वर्थच्या लेखनातील सच्चेपणा, साधेपणा वाचकांना भावला. आणि तो एक प्रथितयश कवी म्हणून प्रसिद्धीला आला.
पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथांचे समकालीन असलेलेक एक प्रथितयश कवी द्विजेंद्रलाल हे रवींद्रनाथ यांच्या कविता आणि लेखनावर टीका करत असत आणि त्यांचा उपहास करीत असत. टागोरांचा ' गीतांजली ' हा काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळी द्विजेंद्रलाल यांच्या रवींद्रनथांवरील टीकेने कळस गाठला होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या ' आनंद बिदय ' या नाटकात उमटले आहे. द्विजेंद्रलाल रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच वारले. रवींद्रनाथ यांना नोबेल पारितोषिक प्राप्त होईपर्यंत ते जर जगले असते तर त्यांना रवींद्रनाथांच्या साहित्याचे मोल नक्कीच कळले असते.
त्या काळातील आणखी एक काव्यविशारद असलेल्या कालीप्रसन्न यांनीसुद्धा रवींद्रनाथांच्या लेखनशैलीवर टीका केली होती. द्विजेंद्रलाल आणि कालीप्रसन्न या दोघांच्याही रवींद्रनाथांवरील टीका त्यांना रवींद्रनाथांचा साहित्यविषयक नवीन दृष्टिकोन न मानवल्यामुळे झाल्या.
पण असेही अनेक साहित्यिक होते की ज्यांनी रवींद्रनाथ यांच्या साहित्याचे मोल जाणले होते या संदर्भात त्या काळातील प्रख्यात कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे नाव घ्यावेसे वाटते. बंकिमचंद्र यांनी रवींद्रनाथांची विलक्षण बुद्धिमत्ता आणि साहित्यिक गुण अचूक हेरले. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. हा प्रसंग बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या मनाचा मोठेपणाही दर्शवतो.
रमेशचंद्र दत्त नावाच्या एका थोर साहित्यिकाच्या मुलीचे लग्न होते. या लग्नाचे आमंत्रण रवींद्रनाथ आणि बंकिमचद्र चॅटर्जी या दोघांनाही होते. योगायोग असा की हे दोघेही एकाच वेळी लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचले बंकिमचंद्र थोडेसे पुढे होते. रमेशचंद्र दत्त यांनी बंकिमचंद्र यांचे स्वागत त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून केले. या गोष्टीकडे त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या रवींद्रनाथांचेही लक्ष होतेच. तेवढ्यात बंकिमचंद्र चॅटर्जींनी आपल्या स्वतःच्या गळ्यातील हार काढला आणि तो रवींद्रनाथांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले," खरंतर हा हार याच्याच गळ्यात घालायला हवा. रमेश, तू याचे ' संध्या संगीत ' वाचले आहेस का ? " बंकिमचंद्र यांच्या या बोलण्यामुळे आणि कृतीमुळे रवींद्रनाथांचे आणि त्यांच्या साहित्याचे मोल उपस्थिततांना कळले.
खरंतर रवींद्रनाथ यांच्या कविता या आशावादी आहेत. मानव जातीच्या कल्याणाचा उद्देश त्यातून व्यक्त होतो. परंतु त्यांच्या ' संध्यासंगीत ' या काव्यसंग्रहातील कविता मात्र याला अपवाद आहेत कारण त्यातील बऱ्याच बऱ्याचश्या कविता दुःख, विषाद आणि निराशा व्यक्त करणाऱ्या आहेत. स्वतः रवींद्रनाथांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती आणि आपल्यातील या एक प्रकारच्या या एक प्रकारच्या उणीवेची दुरुस्ती करण्याचे सामर्थ्यही त्यांच्यामध्ये होते. ही निराशा, हा विषाद त्यांच्या कवितात येण्याचे एक कारण असेही असावे की काही कारणाने त्यांच्यातील आणि निसर्गातील नेहमी असणारा सहसंवाद संपुष्टात आला होता. परंतु एका प्रसंगामुळे त्यांच्यातील या मन:स्थितीत बदल घडून आला.
कोलकत्यातील ज्योतिरिंद्रनाथांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात रवींद्रनाथ देखील राहत होते. सदर स्ट्रीटवरच्या या घरातून बाहेरचे दृश्य मोठे छान दिसत होते. बाहेर रस्त्याच्या कडेला असलेले विशाल वृक्ष नजरेस पडत होते. अशाच एका सकाळी जेव्हा ते घरातील बाल्कनीचा दरवाजा उघडून बाहेर आले तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक असा अनुभव आला. त्यावेळी सभोवताली सर्वत्र दाट धुके पसरले होते. परंतु त्या धुक्याचे पारदर्शक पटल दूर करून सूर्याची सोनेरी किरणे सभोवार पसरली. वृक्षाच्या पाठीमागून होणारी सूर्योदयाची तेजस्वी आणि सुंदर प्रभा त्यांनी पाहिली. त्या दिव्य प्रकाशाने त्यांच्या मनाचा गाभारा उजळून निघाला. सोनेरी सूर्यकिरणांबरोबरच त्यांच्या मनातील निराशेचे पटलही जणू दूर झाले. एका वेगळ्याच चैतन्याने आणि आनंदाने त्यांचे मन भरून गेले. एखाद्या बंदीवासातून मुक्त झालेल्या माणसासारखा आनंद त्यांच्या मनाला झाला आणि हा आनंद त्यांच्या ' निर्झरेर स्वप्नभंग ' ( झऱ्याचे स्वप्नभंग ) या कवितेतून व्यक्त झाला. ही कविता त्यांच्या ' प्रभात संगीत ' या दुसऱ्या कवितेच्या पुस्तकात आली आहे. पुढील कवितांमध्येही मग हा आनंद प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो. त्यांच्या या दिव्य अनुभूतीबद्दल ते स्वतःच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, " सरतेशेवटी कसे कुणास ठाऊक पण बंद दरवाजा उघडला जाऊन माझे हरवलेले मला गवसले. ते मला फक्त परत मिळाले एवढेच नाही तर, या बंधमुक्तीमुळे माझी प्रतिमाही अधिक समृद्ध झाली. ह्यायोगेच प्रभात संगीताच्या रूपाने माझं बालपणीचं हरवलेलं जग अधिकांश रूपानं मला परत मिळालं. " या ठिकाणी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात लिहिलेल्या ओव्या आठवतात. ते म्हणतात
जैसे डोळ्या अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ।।
का चिंतामणी जालया हाती । सदा विजयवृत्ती मनोरथी ।
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ।।
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२/९/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा