मुख्य सामग्रीवर वगळा

वतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १६

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १६

विश्वकवी रवींद्रनाथ 

रवींद्रनाथांनी साहित्याच्या आणि कलेच्या सर्व प्रांतात मुक्तपणे संचार केला आणि आपला एक वेगळा ठसा सर्व प्रांतात उमटवला. परंतु रवींद्रनाथ हे प्रामुख्याने कवी होते असे म्हणावे लागेल. मागच्या एका भागात मी त्यांना रवींद्रनाथ हे कवींद्रनाथ होते असे म्हटल्याचे आपल्याला आठवत असेलच. मागच्या भागांमध्ये रवींद्रनाथांना निसर्गाचा झालेला साक्षात्कार आणि त्याची त्यांनी ' निर्झरेर स्वप्नभंग ' या कवितेत केलेली अभिव्यक्ती याचा उल्लेख मी केला होता.

त्या कवितेत ते म्हणतात 

आज पहाटे घेऊनी किरणे तो आला 

कैसा न कळे, प्राणा माझ्या स्पर्शूनी तो गेला 

गुहेत अंधाऱ्या गाणे प्रभात पक्षाचे सामावले, कैसे न कळे 

दिवसांनी इतक्या जागृत झाला प्राण माझा,  कैसा न कळे.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी रवींद्रनाथांनी ही कविता लिहिली. त्यात कल्पना अशी आहे की नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणांचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कड्यावरून उड्या टाकत अभेद्य खडक फोडत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेत त्यांनी केला.

आपल्या आयुष्यात रवींद्रनाथांनी केवळ सत कर्मेच केली. आपल्या कार्यातून, साहित्यातून विविध प्रकारे समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे रवी किरणांचा स्पर्श झाल्यानंतर तो निर्झर जागृत झाला, त्याला आपले जीवन ध्येय गवसले; त्याप्रमाणेच रवींद्रनाथांच्या प्राणांनाही विश्वशक्तीच्या चैतन्याचा स्पर्श झाला आणि त्यांनी मग आपले सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले.

आपल्याला आणि जगाला देखील रवींद्रनाथांची ओळख आहे ती त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहाला काव्यसंग्रहाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे. या काव्यसंग्रहात प्रामुख्याने भक्तीरसात भिजलेल्या कविता आहेत. गीतांजली म्हणजे गीतांची ओंजळ त्यांनी परमेश्वराला अर्पण केली आहे. रवींद्रनाथांच्या कवितांमध्ये ज्या विविध प्रकारच्या भाव-भावना व्यक्त झाल्या आहेत, त्यात परमेश्वराची, निसर्गाची आणि देशाची भक्ती यांना महत्त्वाचे स्थान आहे. 

रवींद्रनाथांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या गीतांजली या काव्यसंग्रहात एकूण १५७ कविता होत्या परंतु त्यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त इंग्रजी ' गीतांजली ' या काव्यसंग्रहात १०३ कवितांचा समावेश आहे. त्यातही गंमत अशी की मूळ बंगाली भाषेतील गीतांजली मधील केवळ ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत आणि उर्वरित ५० कविता त्यांच्या इतर काव्यसंग्रहातून घेतलेल्या आहेत. 

' गीतांजली ' म्हणजे रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचा आणि प्रतिभेचा एक छोटासा नमुना आहे असे म्हणता येईल. केवळ गीतांजली या काव्यसंग्रहातील त्यांच्या कविता या सर्वश्रेष्ठ आहेत असे त्यांचे चाहते देखील म्हणणार नाहीत.

तरी ' गीतांजली ' या काव्यसंग्रह त्यांचे नाव अखिल विश्वात पोहोचवले. ते विश्वकवी ठरले. ते विश्वकवी झाले कारण त्यांच्या कवितेचे नाते अखिल विश्वाशी आहे. विशाल आणि व्यापक आहे. त्यात उदात्तता आहे. रवींद्रनाथांनी जगावर प्रेम केले आणि आपल्या कवितेच्या माध्यमातून ते व्यक्तही केले. ते जसे जगले, तसेच व्यक्त झाले आणि व्यक्त झाले तसेच ते जगले. त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही अंतर नव्हते. त्यामुळेच त्यांचे कवितेला त्यांच्या व्यक्तिमत्वापासून वेगळे काढता येत नाही. त्यांच्यासाठी हे जग म्हणजे एक कविता होती तसंच ही कविता लिहिणारा कवी म्हणजेच परमेश्वर. त्याला ते विश्वकर्मा कवी म्हणजेच मास्टर पोएट म्हणत.  त्यांची कवितेमागील ही भूमिका एकदा का समजून घेतली की आपल्यालाही त्यांच्या कवितेचा आस्वाद घेणे सोपे होते.

या विश्वकर्मा कवीबद्दल रवींद्रनाथ फारच सुंदर शब्दात आपल्याला सांगतात. ते म्हणतात, " या जगाच्या निर्मात्याने जीवनाचा एक उत्सव मांडला आहे आणि आपल्याला देखील त्या उत्सवात सामील होण्याचे निमंत्रण आहे. म्हणूनच आपण या जगात आलो आहोत मग असे जर असेल तर या उत्सवात आपण कशाप्रकारे सामील व्हायला हवे ? आनंदाने की रडत कढत ? या परमेश्वर रुपी विश्व कवीने हे जे सुंदर जग निर्माण केले आहे, त्याचा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभव घेतला पाहिजे, सजग राहून सृष्टीतील होणारे बदल न्याहाळले पाहिजेत, ऋतुचक्रातील बदलांना दाद दिली पाहिजे. कारण त्या सगळ्या मास्टर पोएटच्या कलाकृती आहेत. तो नित्य नूतन काहीतरी घडविण्यामध्ये मग्न असतो, त्यातून स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या या उत्सवात आपणही आपले सर्वस्व अर्पून भाग घ्यायला नको का ? त्यांची एक कविता फार सुंदर रीतीने हा भाव व्यक्त करते. या कवितेत एक मुलगी आपल्या आईला म्हणते...

" अग आई, घाई कर ना ! आज आपल्या घरावरून राजकुमार जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला नीटनेटके सजून धजून जायला नको का कदाचित त्यांचे आपल्याकडे लक्ष जाणार नाही म्हणून काय झाले पण या एका क्षणा करतात मी स्वतःला जास्त आकर्षक बनवेल माझ्या चेहऱ्यावरील ओढणी दूर करून मी त्यांच्याकडे पाहीन माझ्याकडे जे काही सर्वोत्तम आहे ते मला त्यांना द्यायचे आहे. 

झाले !  त्यांचे दर्शन झाले ! माझ्या गळ्यात असणारी लाल कंठी मी त्यांच्याकडे फेकली. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले नाही. पण जाऊ दे. त्यांचे लक्ष त्या कंठीकडेही गेले नाही. हरकत नाही. ती त्या मिरवणुकीच्या गडबडीत पायाखाली तुडवली गेली. हे कळले मला. पण ती माती बघ. त्या कंठीमुळे लाल लाल झाली. ती कोणी दिली आहे हे कोणाला सुद्धा कळले नाही. पण ही गोष्ट महत्त्वाची नाहीच. त्यांचे दर्शन घेत असताना मला माझ्याकडील चे सर्वोत्तम आहे ते देता आले याचा आनंद आहे. "

किती सुंदर समर्पणाची भावना आहे या कवितेत ! या कवितेतील राजकुमार म्हणजे परमेश्वराचे प्रतीक आहे. रवींद्रनाथांचे आयुष्य म्हणजे जणू ही कविताच असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते स्वतः ही कविता जगले. आपल्याजवळील जे जे उत्तम, ते ते त्यांनी परमेश्वराला अर्पण केले. जीवनावर असे रसरसून प्रेम करणारी माणसे विरळी !  जीवनाप्रती असे प्रेम आणि संपूर्ण समर्पण असल्याशिवाय जीवन जगण्याची कला साधत नाही. असे जगता येणे ही सुद्धा एक कला आहे. या परमेश्वराने आयोजित केलेल्या विश्वरूपी उत्सवात आपल्या कलेचे दर्शन घडवण्याचा ध्यास हवा असे त्यांचे म्हणणे होते.

रवींद्रनाथांच्या इंग्रजीतील ' गीतांजली ' चा पहिला मराठी अनुवाद प्रसिद्ध कादंबरीकार हरि नारायण आपटे यांनी 1917 मध्ये केला. त्याचप्रमाणे बंगालीतील ' अभंग गीतांजली ' वामन मंगेश दुभाषी यांनी मराठीत आणली. यानंतर त्र्यंबक रघुनाथ देवगिरीकर, काका कालेलकर आणि राम म्हैसाळकर यांनीही गीतांजलीचे गद्य अनुवाद प्रकाशित केले आहेत. गोविंद वासुदेव कानिटकर यांनी देखील इंग्रजीत अनुवाद केला आहे. प्रा. नरेंद्र जाधव यांनी देखील टागोरांच्या कवितांचा सुरेख अनुवाद केला आहे. खरंतर बंगाली भाषेतील लय आणि शब्द यांची जादू अनुवादात पकडणे अवघड आहे पण तरीसुद्धा अशा अनुवादातून त्यातील उदात्त असा आशय आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचतो.

जे साहित्य जीवनावर प्रेम करायला शिकवते आणि माणूसधर्म शिकवते तेच खरे शिक्षण असे त्यांना वाटत होते. परंतु अशा शिक्षणाचा अभाव असल्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होऊ शकली नाही याची खंत त्यांना होती.  त्यासाठीच तर त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली होती.

 जीवनात कितीही अडचणी, अडथळे आले तरी खचून जाऊ नये, निराश होऊ नये अशी आपली वृत्ती असावी. त्याप्रमाणेच ते आयुष्यभर वागले. आपल्या ध्येयाशी ते ठाम राहिले. विचलित झाले नाहीत.त्यांची एक कविता अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारी आहे. 

जदी तोर डाक शुने केउ ना आशे,

तबे एकला चलो रे |

एकला चालो, एकला चालो, एकला चालो रे ||

म्हणजेच...

तुझी हाक ऐकून कोणी आले नाही तर तू एकटाच चालू लाग.

अरे, एकटाच चालू लाग. 

तुझ्याशी कोणी शब्दसुद्धा बोलले नाही, तर तू एकटाच चालू लाग.

सारे जण भय वाटून, तोंड फिरवून बसले, तर काळीज उघडून मनातील गोष्टी स्वतःचीच मोकळेपणाने बोल !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

१६/९/२०२४

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...