उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १७
अष्टपैलू साहित्यिक
रवींद्रनाथ टागोरांवर ' रवींद्रनाथ : तीन व्याख्याने 'असं छोटेखानी पु ल देशपांडे यांचं एक पुस्तक आहे. त्याचा उल्लेख मी मागच्या एका भागात केला होता. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की मोठमोठ्या ग्रंथांमध्ये देखील जो आशय आणि जे सौंदर्य क्वचितच दृष्टीस पडेल, ते केवळ या ११२ पाने असलेल्या पुस्तकात बघायला मिळतं. पु ल देशपांडे नावाच्या एका सिद्धहस्त लेखणीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा हा चमत्कार आहे. पु ल देशपांडे टागोरांबद्दल म्हणतात," रवींद्रनाथांची अशरीरिणी प्रतिभा मला त्यांच्या कथा कविता कादंबरी नाटक निबंध आहेत चित्र संगीत अशा रूपाने भेटत असते."
रवींद्रनाथांसारखे महान साहित्यिक जरी देहाने आज आपल्यात नसले तरी आपल्या साहित्याच्या रूपाने ते अजरामर आहेत. प्रसंगी हयात असणाऱ्या माणसाच्या भेटी देखील दुर्मिळ होतात किंवा मोठ्या कष्टाने होतात परंतु रवींद्रनाथांसारखी माणसे की ज्यांनी अपार असे साहित्यधन, अक्षर वाङ्मय मागे ठेवले आहे, ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला हवे तेव्हा भेटू शकतात किंवा आपण त्यांना हवे तेव्हा भेटू शकतो. त्यांचे कोणतेही पुस्तक उघडावे आणि त्यांच्या सहवासात रमून जावे.
हे केवळ रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दलच खरे आहे असे नाही. कोणत्याही महान साहित्यिकाच्या बाबतीत ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. ही माणसे जेव्हा आपल्याला त्यांच्या साहित्यरूपाने भेटतात, तेव्हा ती त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात, आपल्या समस्यांवर उत्तर सांगतात, आपल्याला धीर देतात आणि आपले अनुभव अधिक समृद्ध करतात, जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रदान करतात. अशा व्यक्तींनी काळावर मात केलेली असते. ते आणि त्यांचे साहित्य कालातीत असते. असे साहित्य हे पिढ्यानपिढ्यांचा वारसा बनते. त्यांना मार्गदर्शन करीत राहते. त्यांच्यापुढे आदर्श ठेवते.
रवींद्रनाथांच्या शब्दात सांगायचे तर ते म्हणतात
मरणसागरपारे तोमरा अमर
तोमादेर स्मरि|
रेखे गेले बानी से जे अभय अशोक
जय होक, जय होक तारि जय होक
तोमादेर स्मरि |
( मरणसागरपार तुम्ही अमर
तुमचं स्मरण करतो
अभय अशोक अशी वाणी तुम्ही मागे ठेवून गेला आहात.
जय असो जय असो तिचा जय असो.
तुमचं स्मरण करतो )
टागोरांनी एवढं अक्षरधन मागे ठेवलं आहे की बंगालमधील नामवंत लेखक, कवी, संगीतकार, चित्रकार या साऱ्यांना त्यांचा मागोवा घेत घेत, मार्गदर्शन घेत वाटचाल करावी लागते. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात टागोरांच्या साहित्याचे, कलेचे संस्कार भिनलेले आहेत.
रवींद्रनाथानी कलेच्या ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला, त्या त्या ठिकाणी आपला ठसा उमटवला. त्यांचा स्पर्श हा सुवर्णस्पर्श ठरला. रवींद्रनाथांनी आपल्या जीवनात ज्या ज्या गोष्टींना स्पर्श केला, तो एका चैतन्याचा, एका प्रतिभावंताचा आणि एका महाकवीचा स्पर्श होता. मग त्या गोष्टी म्हणजे त्यांनी निर्माण केलेले शांतीनिकेतन, विश्वनिकेतन किंवा श्रीनिकेतन यासारख्या पार्थिव गोष्टी असो किंवा साहित्य कला यासारख्या अपार्थिव प्रांतात केलेली मुशाफिरी असो. त्यांनी जवळपास अडीच हजार गाणी लिहिली. केवळ गाणी लिहूनच ते थांबले नाहीत तर त्यांना चालीही दिल्या. चाळीशी पन्नाशीनंतर चित्र काढायला सुरुवात केली आणि दोन अडीच हजारांवर अक्षरचित्रे ते मागे ठेवून गेले.
टागोरांच्या कवितेत बहुतेक सर्व विषय आलेले आपल्याला दिसतात. त्यात देशप्रेम आहे, परमेश्वराची भक्ती आहे, निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन आहे, निर्व्याज उदात्त अशी प्रेमभावना आहे. पण त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये आपल्याला निसर्ग प्रतिबिंबित झालेला दिसतो. निसर्गातील सौंदर्यामागे असणारे ईश्वराचे अदृश्य हातही त्यांना वेळोवेळी जाणवतात. त्यात त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे.
एका प्रसंगी त्यांनी पाहिले की शारदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छाया धरीत तरंगत होते. ह्या अद्भुत दृश्याचा त्यांच्या मनाने ताबा घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली. आपल्या कवितेत ते म्हणतात
खेळ चालिला आज लपंडावाचा
छाया आणि प्रकाशाचा
भाताच्या शेतातून,
झपाट्याने जाताना,
निळ्या आकाशात
तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा ,
ताफा हाकणारा तो कोण आहे बरं ? ( शरदोत्सव )
त्या अदृश्य हातांचा शोध घेण्याची उत्कंठा त्यांच्या मनात सदैव जागृत होती. अशाच एका प्रसंगी वर्षाऋतूच्या आगमनाच्या वेळी आकाशात जमलेल्या ढगांच्या विविध रंगांमुळे रवींद्रनाथ थरारून जातात. त्या विविधरंगी आकाशाची तुलना ते मोराच्या पिसाऱ्याशी करतात. पावसाळी ढगांच्या सौंदर्याने ते मोहित झालेले आहेत. एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते आनंदी झाले आहेत. त्यातच परमेश्वराला शोधण्याची त्यांची उत्कंठा पुढील ओळीत स्पष्ट दिसते.
मयुरापरी नाचे आज मन माझे रे
शत शत रंगात उसळती मम भावना
फुललेल्या मयूर पंखापरी
मोहोरलेली मम दृष्टी आकाशी लावूनी
त्या उल्हासी कर्त्यासी मी शोधितो रे, शोधितो रे ।
पुढे त्यांनी कथा, कादंबरी, नाटक असे अनेक साहित्यप्रकार हाताळले. पण त्यातही त्यांची कविता आणि कविमन प्रामुख्याने दृग्गोचर होते. त्यांच्या कवितेत रसिकांना भरभरून देण्याचे सामर्थ्य आहे. आपलीच ओंजळ घेण्यासाठी अपूर्ण पडते. आपल्या प्रत्येक रचनेत ते काहीतरी मौल्यवान संदेश देऊन जातात. त्यांची ' झोळीची गोष्ट ' सांगणारी एक कविता आहे. त्या कवितेत एक भिकारी भिक्षा मागत सर्वत्र हिंडत असतो. एकदा सकाळी तो असाच भिक्षा मागत हिंडत असताना आकाशातून एक सुवर्णरथ त्याला त्याच्या दिशेने येताना दिसतो. रथ त्याच्याजवळ येऊन थांबतो. आता आपल्याला काहीतरी मौल्यवान भिक्षा मिळणार अशा अपेक्षेत तो असताना, रथातील राजा खाली उतरतो आणि चक्क त्याच्यापुढे हात पसरून , ' ओम भवती भिक्षांदेही ' म्हणतो. भिकारी एकदम बावरून जातो. ही कसली क्रूर चेष्टा असे त्याला वाटते. तरी तो आपल्या झोळीत हात घालून चिमूटभर धान्य त्या राजराजेश्वराच्या ओंजळीत टाकतो. घरी येतो आणि पाहतो तर झोळीत काही सुवर्णकण चमकत असतात.
इथे गोष्ट ( कविता ) संपते. पण आपले विचारचक्र सुरु करते. मनात काहीतरी पेरून जाते. प्रत्येकाकडे देण्यासारखे काहीतरी असतेच. तो विश्वाचा निर्माता रिकाम्या हाताने कोणालाच या धरेवर पाठवत नाही. ज्याने जीवनाचा हा उत्सव मांडला आहे आणि तुम्हाला त्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे, तो तुम्हाला या जगात भिकारी म्हणून कसे पाठवेल ? भिकारी म्हणून तुम्ही या उत्सवात सामील व्हावे अशी त्याची इच्छा असेल का ? त्यामुळे परमेश्वराने जर तुमच्याकडे काही मागितले तर माझ्याकडे काहीच नाही असे न म्हणता तुमच्याकडचे जे सर्वोत्तम आहे, ते त्याला देऊन टाका. तुम्ही जे द्याल, त्याचे सोने होईल, ते शतपटीने परत मिळेल. जीवनाचा अमूल्य संदेश देणारी ही ' झोळीची गोष्ट ! '
कवी मंगेश पाडगावकर म्हणतात तसे ' या जन्मावर या जगण्यावर अपार प्रेम करणारा ' हा कवी होता. त्यांची एक छोटीशी कविता आपल्याला सांगते
फुल फुलले हीच फुलाची अंतिम कथा
फुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे.
फुल विचारते, ' फळा, तू कुठे आहेस ? '
फळ उत्तरते, ' मी तुझ्या हृदयात आहे. '
या कवितेतून ते आपल्याला सांगतात की प्रत्येक फुलाला उमलण्याच्या पूर्ण अधिकार आहे. त्याला कुणी अडवता कामा नये. आजही आपल्या अवतीभवती पाहिलं तर आपण किती फुलांना पूर्णपणे फुलू देतो ? किती कळ्या अकाली तोडतो ? किती कळ्यांचे निर्माल्य होते, किती फुले अकाली कुस्करली जातात ? यासाठीच तर तसे संस्कार करणारी शिक्षणपद्धती हवी होती. जी ' मनुष्यधर्म ' शिकविते. त्यातूनच शांतिनिकेतनची निर्मिती झाली. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२४/०९/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा