महर्षी वाल्मिकी
रामायण... केवळ चार अक्षरी शब्द ! हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनामनात वसलेली आद्याक्षरे. हे नाव भारतीय संस्कृतीत दुधात साखर मिसळून जावी तसे मिसळून गेले. रामायण भारतीय संस्कृतीतून वगळलं तर नुसतीच चारित्र्यहीन, संस्कारहीन संस्कृती शिल्लक राहील. ही श्रीरामांची पुण्यकथा युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देत आली आहे. रामायणावर आधारित अनेक महाकाव्ये ,रामायणे, रामकथा, विविध ग्रंथ निर्माण झाले. रामायणाने अनेक कवी, लेखकांना प्रेरणा दिली. रामायणाच्या सकस दुधावर पोसल्या गेलेल्या अनेक पिढ्या त्यातील संस्कार ग्रहण करून बलशाली, आदर्शवत ठरल्या. श्रीरामाच्या दिव्य चरित्राने अनेकांना प्रेरणा दिली. एकवचनी, एकपत्नी आणि एकबाणी श्रीराम युगांयुगांचा दीपस्तंभ ठरला.
हे रामायण आणि श्रीरामांचे दिव्य चरित्र लिहिले महर्षी वाल्मिकी यांनी. महर्षी वाल्मिकी म्हणजे आद्यकवी. हा आद्यकवी तर इतका महान होता की त्याने श्रीरामांचे चरित्र आपल्यासमोर ठेवताना त्यांच्यातील मानव्याचा उद्घोष केला. श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार. पण वाल्मिकींना तुमच्या आमच्या समोर त्यांचा मानव रूपातील आदर्श ठेवायचा होता. एक मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू आणि हो, आदर्श शत्रू देखील. या सगळ्या भूमिकांना श्रीरामांनी आपल्या आचरणाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
या श्रीरामांचा आदर्श आपल्या समोर ठेवणारे महर्षी वाल्मिकी. रामायणातील आदर्श पात्रे आपल्या डोळ्यांसमोर उभे करणारे वाल्मिकी. रामायणाला रत्नांची खाण बनवणारे वाल्मिकी. आदर्श शिष्य घडवणारे वाल्मिकी. श्रीरामांनी त्यागलेल्या सीतामातेला आपल्या आश्रमात आश्रय देऊन तिची पितृवत काळजी घेणारे वाल्मिकी. मानवतेचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर उभे करणारे वाल्मिकी. वाल्मिकींची किती रूपे सांगावीत !
महर्षी वाल्मीकींच्या जीवनाबद्दल अधिकृत माहिती कोठेही उपलब्ध नाही. त्यांच्याविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यांची भारतात विविध ठिकाणी मंदिरे आहेत. अनेक आख्यायिका आहेत. मात्र त्यांच्या मोठेपणाविषयी कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. ते सर्वाना सर्वकाळ वंदनीयच आहेत. कोळी, आदिवासी, भिल्ल इथपासून ते सुमति नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून असल्याच्या विविध आख्यायिका त्यांच्याबद्दल प्रसृत आहेत. पण रामायणाच्या उत्तरकांडात स्वतः वाल्मिकी म्हणतात
प्रचेतसोഽहं दशमः पुत्रो राघव नंदन ।मनसा कर्मणा वाचा भूतपूर्वं न किल्विषम ।।
ते म्हणतात, ' हे श्रीरामा, मी प्रचेतसाचा दहावा पुत्र असून मी आपल्या जीवनात कधीही पापाचरण केले नाही. प्रचेता म्हणजे वरुण. त्याला भृगु आणि वाल्मिकी असे दोन पुत्र होते. वाल्मिकी हे शंकरभक्त असल्याचे मानले जाते. वाल्मिकींचा जन्म अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेचा अर्थातच कोजागिरी पौर्णिमेचा असल्याचे मानले जाते.
महर्षी वाल्मिकी हे श्रीरामाचे समकालीन होते. आपल्या तपश्चर्येनंतर झालेल्या ज्ञानप्राप्तीनंतरच नारद आणि ब्रह्मदेव यांच्या आशीर्वाद प्राप्त करून त्यांनी रामायणाची रचना केली. श्रीरामांच्या जीवनातील सर्व प्रसंगांचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. त्यामुळे वाल्मिकी रामायण हे त्या काळातील घटनांचा अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवज समजायला हरकत नाही. रामायणात अनेक घटनांचे वर्णन करताना महर्षींनी त्या त्या वेळी असलेल्या सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र आदींचे अचूक वर्णन केले आहे. त्यावरून महर्षी हे ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांचे सखोल जाणकार असल्याचे अनुमान आपल्याला काढता येते. वाल्मिकींनी श्रीरामांच्या जन्माच्या आधी रामायण लिहिले होते, ही गोष्ट खरी वाटत नाही. त्याची कारणे दोन. एक म्हणजे श्रीराम वनवासात असताना वाल्मीकींच्या आश्रमात गेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मीकींनीच सीतेला आश्रय दिला होता. लव, कुश यांना शिक्षण दिले.
वाल्मिकींचा वाल्ह्यापासून ते महर्षी वाल्मिकी पर्यंतचा प्रवास मानवाच्या उत्थानाचा आहे. मानवाकडून ऋषित्वाकडे होणारा हा प्रवास आहे. ही कथा आहे हृदय परिवर्तनाची. माणूस कसाही असला तरी त्याच्या हृदयात दया, क्षमा, शांती हे दैवी गुण वसत असतातच. परिस्थितीमुळे कधी कधी कधी त्यांना प्रकट व्हायला अवसर मिळत नाही. पण संधी मिळताच हे गुण प्रकट होतात. आधीच्या सर्व दुर्गुणांवर मात करून व्यक्तीचा उत्कर्ष घडवून आणतात. वाल्ह्याचा वाल्मिकी होतो. आपल्या लव आणि कुश या शिष्यांना ते शिक्षण देऊन एवढे बलशाली, पराक्रमी बनवतात की आपण प्रत्यक्ष रावणाचा पराभव केला, आपण आता अजिंक्य, अजेय आहोत अशांचा समज ते आपल्या पराक्रमाने दूर करतात. अशा या महर्षींची जीवनगाथा आपल्यासमोर ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न...!
__________________________________________________________________________________
क्रौंच पक्ष्याचा हत्या आणि महर्षींची शापवाणी...
तमसा नदीचं खळखळणारं पात्र. स्वच्छ, पारदर्शक पाणी. जलात आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं. विविध जलचर पाण्यात सुखनैव विहार करताहेत. नदीच्या दोन्ही तीरावर घनदाट वृक्षांनी वेढलेलं वन. विविध पक्ष्यांचे आवाज तेथील वातावरण माधुर्याने भारून टाकताहेत. मधूनच जंगलात वावरणाऱ्या प्राण्यांचा आवाज ऐकू येते. कधी मोराचा केकारव तर कधी वाघाची डरकाळी. हरणांचे कळप जंगलातून उड्या मारत जात आहेत. अशा रम्य वातावरणात नदीच्या एका काठावर वृक्षराजींनी वेढलेला एक आश्रम. विस्तीर्ण परिसर. आश्रमात निवासी विद्यार्थ्यांच्या अनेक कुट्या ( झोपड्या ) नजरेत भरतात. मध्यभागी एक प्रशस्त कुटी महर्षी वाल्मिकींची. आश्रमात काही विशाल वृक्षांच्या भोवती बसण्यासाठी पार बांधलेला. आश्रमात जाणाऱ्या येणाऱ्या शिष्यांची लगबग सुरु दिसते.
एका झाडाच्या खाली दाट सावलीत महर्षी वाल्मिकी बसलेले आहेत. समोर शिष्यगण उपस्थित आहेत. काही येऊन त्यांना प्रणाम करताहेत. महर्षी विद्यार्थ्यांना सांगताहेत, ' आतापर्यंत आपण विविध गोष्टी शिकलो. वेदशास्त्र आदींचे ज्ञान मी तुम्हाला यथाशक्ती देण्याचा प्रयत्न केला. युद्धप्रसंगी कसे वागायचे, आपले, आपल्या नगराचे, आपल्या राज्याचे रक्षण कसे करायचे हे तुम्हाला सांगितले. धनर्विद्येसह विविध शस्त्रविद्या शिकवण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही ते यथाशक्ती आत्मसात केले आहे. परंतु सर्वात महत्वाची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एखादी गोष्ट केवळ मी सांगितली आहे म्हणून ती बरोबरच आहे असे समजू नका. आजपर्यंत तुम्हाला शिकवलेल्या विविध निकषांवर ती ताडून पहा. तुमच्या बुद्धीला ती योग्य वाटली तरच अमलात आणा. आपली सद्सद्विवेक बुद्धी नेहमी जागृत ठेवा. तिच्याशी कधीही प्रतारणा करू नका. आपल्या जीवनात कितीही मोठे प्रलोभन आले तरी आपले तत्व, आपले आदर्श यांचा त्यासाठी त्याग करू नका. आणखी काही गोष्टी मी तुम्हाला संध्याकाळच्या पाठाच्या वेळी सांगेन. थोडा वेळ सर्वांनी आपापल्या निवासात जाऊन प्रार्थना, ध्यान करा. मी सांगितलेल्या गोष्टींचे मनन करा. '
महर्षी आपल्या जागेवरून उठले. आपली काही वस्त्रे, कमंडलू आदी घेऊन ते तमसा नदीकडे दुपारचं स्नान, आन्हिक आदींसाठी निघाले. त्यांच्यासोबत काही शिष्यगणही निघाले. घनदाट रम्य अशा जंगलातून पायवाट नदीकडे जात होती. आजूबाजूला वृक्षांची दाट छाया पसरलेली. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. झाडांना नवीन पालवी फुटली आहे. विविध पक्षी कूजन करताहेत. कोकिळेच्या मधुर ताना जंगलातील वातावरण प्रसन्न करीत आहेत. आपल्या शिष्यांशी हितगुज करीत महर्षी वाटचाल करत आहेत. चालत असताना मध्येच एक विशाल वृक्ष त्यांना दिसतो. त्या वृक्षाच्या एका फांदीवर क्रौंच पक्ष्यांची एक जोडी त्यांना दिसते. ते पक्षी आपल्या प्रणयात गढून गेलेले असतात. एकमेकांच्या चोचीत चोच देऊन अत्यंत प्रेमाने त्यांचा एकमेकांशी संवाद सुरु असतो. महर्षींची पाऊले त्या जागी थबकतात. त्या पक्ष्यांची प्रणयक्रीडा ते एकाग्रतेने पाहत असतात. आपल्या शिष्याला म्हणतात, ' पाहिलंस या पक्ष्यांचं प्रेम ? किती निर्मळ आणि पवित्र ! मनामध्ये एकमेकांबद्दल कोणताही किंतु नाही. स्वार्थ नाही. आपल्या आनंदात ते किती रममाण झाले आहेत !
एवढ्यात सर्रर्रर्र आवाज करीत एक बाण येतो आणि आपल्या आनंदात प्रणयक्रीडा असलेल्या त्या पक्ष्यांच्या जोडीपैकी एका पक्षाच्या छातीत घुसतो. तो पक्षी वेदनातिरेकाने विव्हळ होऊन आवाज करत खाली कोसळतो. फांदीवर बसलेला पक्षी आपल्या जोडीदाराच्या अशा अचानक जाण्याने शोकमग्न होतो. हे दृश्य पाहून वाल्मीकींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. तेवढ्यात तो शिकारी तेथे येतो. अत्यंत निर्दयतेने तो त्या खाली पडलेल्या पक्ष्याला उचलून घेतो. ते पाहताच वाल्मिकी उद्गारतात, ' हे परमेश्वरा, काय हा दैवदुर्विलास ! झाडावरचा एक पक्षी आपल्या जोडीदाराच्या जाण्याने दुःखी होतो. तोच पक्षी दुसऱ्याच्या हाती लागल्यानंतर ती व्यक्ती आनंदित होते. निसर्गातील निरपराध, निष्पाप जीवांवर अशी दुःख करण्याची वेळ येते. अरेरे ! ' ते त्या शिकाऱ्याला म्हणतात, ' हे निर्दयी माणसा, तुला या निष्पाप जीवाची हत्या करताना काहीच वाटले नाही का ? तुझे हात कसे कापले नाहीत ? तुला थोडीही दया आली नाही का ? '
हे ऐकल्यावर तो शिकारी मोठ्याने हसला. तो म्हणाला, ' दया ? दयेसारखा शब्द तर मला माहितीसुद्धा नाही. मी प्राण्यांवर, पक्ष्यांवर दया केली तर काय खाऊ ? दया शब्द आपल्यासारखेच लोक वापरतात. तुमचा उपदेश ऐकून काही माझे पोट भरायचे नाही. ' असे म्हणून तो पुन्हा हसतो. झाडावरील पक्षी आता शोकमग्न होऊन आर्त स्वरात विलाप करीत असतो. हे सगळे पाहून वाल्मिकींचे हृदय कळवळते. त्यांच्या तोंडून त्या निषादासाठी ( शिकाऱ्यासाठी ) शापवाणी बाहेर पडते.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः ।
यत् क्रौन्चमिथुनादेकमवधी; काममोहितम ।।
हे निषादा, तू प्रणयक्रीडेत रममाण असलेल्या एका क्रौंच पक्ष्याचा निर्दयीपणे वध केला आहेस. आपल्या जीवनात तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही.
वाल्मीकींच्या तोंडून बाहेर पडलेली ती काव्यात्मक शापवाणी संगीत, नाद आणि लयीसह त्या शांत वातावरणात पुन्हा पुन्हा घुमली. वाल्मिकी एका जागी आसनस्थ झाले. क्षणकाल त्यांचे नेत्र मिटले गेले आणि त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या मागील आयुष्याचा पट सरकू लागला.
_________________________________________________________________________________
पूर्वायुष्य...
घनदाट पर्वतराजी. सगळीकडे प्रचंड जंगल. अशा या वातावरणात पर्वताच्या पायथ्याशी काही झोपड्या. काही लोकांचा या झोपड्यांमध्ये निवास. जंगलात कंदमुळे, फळे गोळा करावीत. प्रसंगी शिकार करावी. त्यावर उपजीविका करावी. काही प्रसंगी जंगलातून मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूंना लूटूनही आपल्या चरितार्थाला हातभार लावण्यात या मंडळीला काही गैर वाटत नव्हते.
अशाच एका झोपडीत रत्नाकर, त्याची पत्नी आणि लहान मुलगा राहत होते. रत्नाकर जंगलात जाई. आपल्या कुटुंबासाठी कंदमुळे, फळे गोळा करून आणत असे. प्रसंगी मिळेल ती शिकार करणे, त्यासाठी दिवसातील बराचसा वेळ जंगलात घालवणे तो करत असे. अगदीच प्रसंग आला तर जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटणे, त्यांच्याकडून काही मिळाले नाही तर त्यांची हत्या करणे हा त्याचा दिनक्रम होता.
असाच एक दिवस. रत्नाकरची पत्नी त्याला म्हणाली, ' आज घरात खायला काही नाही. आज तुम्ही काही आणलं नाही तर आपल्याला आणि आपल्या बाळाला उपाशी राहावं लागेल. '
' तू काळजी करू नकोस. मी आता जंगलात जातो. काहीतरी शिकार मिळेलच. ' असे म्हणून रत्नाकरने आपली कट्यार, दोर,धनुष्यबाण आदी शिकारीची साधने आपल्या सोबत घेतली आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. रत्नाकरचे व्यक्तिमत्व कोणालाही पाहताक्षणीच भय वाटावं असं होतं. रत्नाकर उंचापुरा,धिप्पाड होता. दाढी वाढलेली, मानेपर्यंत रुळणारे केस, नजरेत जरब आणि आवाजात हुकमत. शिकारीसाठी जाताना कमरेला दोर बांधलेला, कमरेच्या डाव्या बाजूला लटकणारी धारदार कट्यार आणि उजव्या खांद्यावर धनुष्य .
दाट जंगलात गेल्यानंतर सावज हरण्यासाठी तो एका ठिकाणी लपून बसला. काही वेळानंतर त्याला जंगलातून हरणांचा एक कळप उड्या मारत जाताना दिसला. रत्नाकर आता शिकारीसाठी सावध होऊन आपले धनुष्यबाण सरसावून तयार होता. पण हायरे दैवा. हरणांचा कळप त्याच्या शिकारीच्या टप्प्यात आलाच नाही. हरणं नजरेआड होऊ लागली, तसा रत्नाकर त्यांच्या मागे धावू लागला. आज काही करून त्याला शिकार मिळवायला हवीच होती. रत्नाकरला त्या हरणांनी खूप पळवले. पण एकही हरीण त्याच्या हाती लागले नाही. संतापाने त्याच्या डोळ्यात क्रोध गोळा झाला. डोळे लाल झाले. थकून तो एका दगडावर बसला. तेवढ्यात त्याला पानांची खसपस ऐकू आली. तो सावध होऊन तिकडे लक्ष देऊ लागला. त्या कळपातील एक हरीण बहुधा वाट चुकून मागे राहिलं होतं. ते उड्या मारत आपल्या कळपाला शोधत निघाले होते. रत्नाकरच्या हाती ही आयतीच संधी चालून आली होती. त्याने धनुष्याला नेम लावला आणि हरीण आपल्या नजरेच्या टप्प्यात येताच बाण सोडला. बाण सूं सूं करत निघाला आणि भक्ष्याच्या छातीत जाऊन रुतला. एक आर्त किंकाळी मारून ते हरीण जमिनीवर कोसळले.
रत्नाकरने आनंदाने टाळ्या वाजवल्या. आपल्या शिकारीजवळ जाऊन त्याने त्याच्या उरात रुतलेला बाण उपसून काढला. आणि ते हरीण खांद्यावर टाकून तो आपल्या घराकडे निघाला. तो घराजवळ पोहोचला तशी वस्तीतील लहान मुले त्याच्या भवती गोळा झाली. ' रत्नाकर काका , किती छान शिकार आणली तुम्ही.. ' असे त्याला म्हणू लागली. तो आपल्या घरी पोहोचला तेव्हा पत्नीने त्याचं हसतमुखानं स्वागत केलं. त्या हरणाच्या शरीरावरुन हात फिरवत ती म्हणाली, ' किती छान शिकार आणली नाथ तुम्ही. मला खात्री होती की तुम्ही शिकार आणणारच. '
' एवढी खात्री होती माझ्याबद्दल ? ' रत्नाकर म्हणाला.
पत्नी म्हणाली, ' हो, मला खात्री आहे आणि तुमच्यावर विश्वासही आहे. '
' अरे वा. प्रिये, तुझा माझ्यावरील हा विश्वास पाहून मला खूप आनंद झाला. पण एक सांगू ? '
' हो, सांगा ना. तुम्ही काही सांगितले आहे आणि मी ऐकले नाही असं कधी आजपर्यंत झालं आहे का ? '
' प्रिये, शिकार तर मी नेहमीच करतो. पण या शिकाऱ्याची शिकार कोणी केली ठाऊक आहे का ? '
' नाही ठाऊक मला, सांगा ना..' पत्नी लाजून म्हणाली.
' प्रिये, तुझ्या बाणांसारख्या असलेल्या तीक्ष्ण नजरेने मला घायाळ केलं. हा शिकारी पण त्यांची शिकार झाला.'
' चला, तुमचं काहीतरीच ! समोरच्याला कसं खुश करायचं ते तुमच्याकडूनच शिकावं. '
' बरं, आता आणखी एक काम करा. ' पत्नी म्हणाली.
' आता काय आणखी ? '
' हे बघा, तुम्ही शिकार तर आणली. पण त्यासाठी काहीतरी मीठ, मिरची मसाला नको का ? घरात तर काही शिल्लक नाही. मी स्वयंपाक कसा करणार ? '
' ठीक आहे. मी बघतो काही मिळतं का ? ' असं म्हणून रत्नाकर पुन्हा जाण्यासाठी उठला. तेवढ्यात त्याचा मुलगा त्याच्याजवळ आला. त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारून म्हणाला, ' बाबा, मी येतो ना, तुमच्याबरोबर. मला पण पाहायचं आहे की तुम्ही कशी शिकार करता, आईला लागणारं सगळं सामान कुठून आणि कसं आणता ? ' रत्नाकरने त्या मुलाला दूर करत म्हटलं, ' नाही बेटा, शिकारीला नाही नेता येणार तुला अजून. तू लहान आहेस. मोठा झालास की नेईन तुला बरोबर. तोपर्यंत तू आईला मदत कर. बाजूच्या मुलांमध्ये खेळ. '
रत्नाकर घाईघाईने घराबाहेर पडला. तेवढ्यात एका वृद्ध गृहस्थाने त्याला पाहिलं. ते त्याला म्हणाले, ' रत्नाकर, परत बाहेर पडलास ? आता तर तू शिकार करून घरी आलास. थोडा आराम पण करत जा. ' रत्नाकर म्हणाला, ' काका, काम केल्याशिवाय खायला कसं मिळेल ? हेच तर वय आहे काही करण्याचं. 'असं म्हणून तो तडक निघाला.
जंगलातून जवळच्या गावाकडे जाणारा एक रस्ता होता. त्या रस्त्याने वाटसरू वाटचाल करत. पायी, घोडागाडी, बैलगाडी ही त्यांच्या प्रवासाची त्या वेळी साधने होती. रत्नाकर पायवाटेने लवकरच त्या रस्त्याजवळ आला. एका झाडाआड लपून येणाऱ्याजाणाऱ्यांची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला एका घोडागाडीचा आवाज ऐकू आला. आता तो सावधान होऊन त्याकडे लक्ष देऊन बघू लागला. त्या घोडागाडीला दोन उत्तम घोडे जोडले होते. गाडीवान गाडी हाकत होता. गाडीत एक वृद्ध माणूस, त्याची पत्नी, तरुण मुलगा आणि सून होते. गाडी पुरेशी जवळ येताच रत्नाकर झाडाआडून पुढे झाला. गाडीच्या पुढे उभा राहून तो गाडीवानाला दरडावून म्हणाला, ' थांबा, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ...' त्याच्या हातात कट्यार होती. चेहरा उग्र होता. त्याचे हे उग्र रूप पाहून गाडीवाल्याची भीतीने बोबडी वळली. त्यानं गाडी थांबवली. रत्नाकर गाडीतल्या माणसांना म्हणाला, ' मुकाट्यानं खाली उतरा. ' त्याचा आवेश आणि आवाजातील जरब पाहून गाडीतील मंडळी घाबरतच खाली उतरली.
गाडीतून खाली उतरलेला वृद्ध गृहस्थ रत्नाकरला म्हणाला, ' काय झाले बाबा ? आम्हाला का अडवतोस ? आमचा काही अपराध झाला का ? '
रत्नाकर म्हणाला, ' जास्त बडबड नको आहे मला. मी काय सांगतो ते ऐका आणि त्याप्रमाणे करा. नाहीतर तुम्ही इथून जिवंत परत जाऊ शकणार नाही. '
' ठीक आहे, बेटा. तुला काय हवं ते सांग. आम्ही त्याप्रमाणे करू. '
' तुमच्याजवळ जे काही असेल ते सगळं मला द्या. मगच तुम्ही पुढे जाऊ शकाल. ' रत्नाकर म्हणाला.
' बेटा, आम्ही तीर्थयात्रेला निघालो आहोत. मी आणि माझी पत्नी आता थकलो आहोत. मुलगा आणि सुनेला त्यासाठी सोबत नेतो आहोत. आमच्याजवळ काय असणार ? '
' ते मला माहिती नाही. मात्र तुम्ही काही दिले नाहीत तर ही तुमची शेवटचीच तीर्थयात्रा ठरेल असे समजा. ' रत्नाकर दरडावून म्हणाला. तुमच्याजवळ पैसा, सोनंनाणं जे काही आहे, ते मुकाट्यानं खाली ठेवा. '
त्या चौघांनी आपापल्या जवळ असलेले पैसे आणि गाडीतील सामान काढून दिले. त्यात काही किमती वस्तू, खाण्याचे पदार्थ होते. ते पाहून रत्नाकर आनंदला. पण तेवढ्याने त्याचे समाधान झाले नाही. त्याने त्यांच्या अंगावरील किमती वस्त्रे आणि दागिने सुद्धा उतरवून घेतले. तो सगळा ऐवज घेऊन तो आनंदाने घराकडे निघाला.
सप्त ऋषींची भेट...
अशा रीतीने दिवस जात होते. शिकार, लूटमार करणे यावर रत्नाकरचा उदरनिर्वाह होत होता. दिवसेंदिवस त्याची तहान वाढतच होती. कितीही पैसे, सोनेनाणे मिळाले तरी त्याला समाधान नव्हते. सगळे व्यवस्थित सुरु असूनही रत्नाकर सुखी नव्हता. कुठेतरी मनातून त्याला अस्वस्थ वाटत होते. पण त्याचे कारण त्याला समजत नव्हते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवायला कोणी नव्हते.
एक दिवस अशीच लूटमार करण्यासाठी रत्नाकर बाहेर पडला. आपल्या ठराविक ठिकाणी जाऊन झाडाआड लपून येणाऱ्या सावजाची वाट पाहू लागला. काही वेळानंतर त्याला माणसांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. त्याने पाहिले तो समोरून काही ऋषी येताना दिसले. त्यांच्या हातात कमंडलू, दंड आणि अंगावर भगवी वस्त्रे होती. ते सात ऋषी होते. त्या सगळ्यांना पाहून रत्नाकरला मोठा आनंद झाला. काहीतरी मोठे घबाड आपल्या हाताला लागेल असे त्याला वाटले. ते ऋषी पुरेसे जवळ येताच रत्नाकर झाडाआडून उडी मारून पुढे आला. आपल्या हातातली कट्यार त्यांच्यापुढे नाचवित म्हणाला, ' खबरदार, पुढे जाल तर. जिथे आहात तिथेच थांबा अन्यथा आपले प्राण गमवून बसाल. '
रत्नाकरचे बोलणे ऐकून ते ऋषिवर्य जागच्या जागी थांबले. पण त्यांच्या चेहऱ्यावर भयाचे कोणतेही चिन्ह नव्हते. इतर यात्रेकरू, वाटसरू आपल्याला जसे घाबरतात तसे हे घाबरत नाहीत हे पाहून रत्नाकरला जरा आश्चर्य वाटले. त्या ऋषींमधील एक ज्येष्ठ आणि तेजस्वी ऋषी म्हणाले, ' ठीक आहे बाळ. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबलो आहोत. आम्हाला मृत्यूचे भय नाही. पण आम्हाला येथे थांबवून तू काय करणार आहेस ? '
' तुमच्याजवळ जे काही धनदौलत, पैसाअडका असेल, ते मला दिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तेव्हा मुकाट्याने आपल्याजवळ जे काही असेल ते काढून मला द्या. '
' हे मुला, आम्ही संन्यासी आहोत. आमच्याजवळ कसले सोनेनाणे,धनदौलत ? आम्हाला फक्त भगवंताचे नाम प्रिय आहे. त्याचेच गुणगान करत आम्ही फिरत असतो. '
रत्नाकर म्हणाला, ' माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही. तुमच्याकडे जे काही असेल ते मुकाट्याने माझ्या हवाली करा. नाहीतर तुम्ही इथे संपलात म्हणून समजा. '
ते ऋषिवर्य पुन्हा अतिशय प्रेमाने रत्नाकरला म्हणाले, ' ठीक आहे बेटा. तुला आमच्याजवळ जे काही आहे ते द्यायला आम्ही तयार आहोत. पण त्याआधी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. '
' ठीक आहे, पण काय बोलायचं ते लवकर बोला, माझ्याजवळ जास्त वेळ नाही. ' रत्नाकर नाराजीने म्हणाला.
' हे बघ बेटा, हे तू जे काही करतो आहेस ते पाप आहे हे तुला माहिती आहे का ? '
' पाप पुण्याचा विचार करायला मला वेळ नाही. माझ्यासाठी माझा परिवार महत्वाचा आहे. मी जे काही करतो ते माझ्या कुटुंबासाठी. ' रत्नाकर म्हणाला.
ऋषी म्हणाले, ' पण तू आपल्या परिवारासाठी जे काही करतोस, ते चांगल्या मार्गानेही मिळवू शकतोस. तू काही काम, कष्ट, व्यापार, व्यवसाय करून देखील आपल्या कुटुंबाला मदत करू शकतोस. ही वाटमारी करून तुझ्या वाटेला जे पाप येईल त्याचे फळ तुला एकट्यालाच भोगावं लागणार आहे हे लक्षात येतंय का तुझ्या ? '
' हे कसं शक्य आहे ? माझ्या कमाईत, पापपुण्यात, सुखदुःखात सगळ्या गोष्टीत माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. कारण मी त्यांच्यासाठीच हे सारं करतो आहे. ' रत्नाकर म्हणाला.
' भल्या माणसा, तुझं कुटुंब तू करीत असलेल्या सगळ्या गोष्टीत सहभागी आहे हा तुझा गैरसमज हा तुझ्या गैरसमज आहे. तू त्यांचा या बाबतीत विचार घेतलास ? त्यांना एकदा विचार आणि मग ठरव की हा पापकमाईचा मार्ग सुरु ठेवायचा की नाही. ' ऋषी उत्तरले.
' ठीक आहे. आजपर्यंत मला कोणी असा प्रश्न केला नव्हता. आपण मला पेचात टाकले आहे. मी माझ्या बायको मुलाचा विचार घेऊन येतो. पण तोपर्यंत आपल्याला इथेच थांबून राहावं लागेल. ' रत्नाकर म्हणाला.
' त्याची तू काळजी करू नकोस. आम्ही एखाद्याला शब्द दिला की तो प्राणापलीकडे जपतो. तू परत येईपर्यंत आम्ही कोठेही जाणार नाही. ' ऋषी म्हणाले.
' मी तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवू ? मी तुम्हाला असं सोडून जाऊ शकत नाही. ' रत्नाकर उद्गारला.
हे ऐकल्यावर दुसरे एक ऋषी रत्नाकरला म्हणाले. ' तुझा आमच्यावर विश्वास नसेल तर तू आम्हाला तुझ्याजवळ असलेल्या दोराने झाडाला बांधून ठेवू शकतोस. '
' हे ठीक राहील, ' रत्नाकर म्हणाला. त्याने आपल्या कमरेला गुंडाळलेला दोर सोडला आणि जवळच असलेल्या झाडाला त्या ऋषींना बांधून ठेवलं. तो मग घराकडे निघाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रत्नाकरची पत्नी दारातच उभी होती. तिने हसून त्याचं स्वागत केलं. ' लवकर आलात घरी आणि शिकार कुठे आहे ? '
' प्रिये, मी जरा वेगळ्या कामासाठी घरी आलो आहे. मला तुला काही विचारायचं आहे. '
' अरे वा. खास काहीतरी गोष्ट दिसते, त्याशिवाय तुम्ही असे येणार नाही. तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. '
' माझ्या प्रश्नाचं तू खरंखरं उत्तर देशील ना ? ' रत्नाकरने विचारलं.
' आज असं का बोलत आहात आपण स्वामी ? मीआपल्याशी आजपर्यंत कधी खोटं बोललं आहे का ? '
' तसं नाही प्रिये, पण आज माझ्या मनात आज एक वेगळीच शंका आहे, ' रत्नाकर म्हणाला.
' मला तू सांग की मी शिकार करतो, लुटमारी करतो. कदाचित हा पापाचा मार्ग असेल. पण मी हे सगळं जे काही करतो ते कोणासाठी ? '
' एवढंच विचारायचं होतं का तुम्हाला ? हे सगळं तुम्ही माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी, आपल्या कुटूंबासाठीच करता ना...? '
' अगदी बरोबर, प्रिये. पण मला आता सांग की या कमाईत जसे तुम्ही वाटेकरी आहात तसेच माझ्या पापातही वाटेकरी होणार ना ? रत्नाकरने विचारले.
' नाथ, मी तुमच्या या पापाच्या कमाईत घरसंसार चालवते हे सत्य आहे. पण हे जे पाप तुम्ही करता त्याची फळं मृत्यूनंतरच मिळतात ना ...? ते कोणी पाहिलं आहे ? शिवाय मी असं ऐकलं आहे की पाप असो की पुण्य, त्याची फळं ज्याची त्यालाच भोगावी लागतात. त्यामुळे या पापाचे वाटेकरी आम्ही होऊ शकत नाही. ' पत्नी म्हणाली.
आपल्या पत्नीचे हे स्पष्ट बोल ऐकून रत्नाकरला धक्काच बसला. आता शेवटचे आपल्या मुलाला विचारावे असं त्याने ठरवलं. त्याने त्याला जवळ बोलावले.
' बेटा, मला एक सांग. मी ही जी वाटमारी करून, लोकांना लुटून जे काही तुमच्यासाठी आणतो, ते पाप आहे असे म्हटले जाते. मला माझ्या पापाचे जे काही फळ मिळेल, त्यात तू सहभागी होशील ना ? '
रत्नाकरचा मुलगा क्षणभर विचारात पडला. खरंतर एवढ्या कठीण प्रश्नाचं उत्तर देण्याचं त्याचं वय नव्हतं. पण तरी तो विचार करून म्हणाला, ' बाबा, पापाचा वाटेकरी होणं म्हणजे मी पण पापी होणं. मला कोणी पापी म्हटलेलं नाही आवडणार मला. तुम्हाला तरी आवडेल का तुमच्या मुलाला कोणी पापी म्हटलेलं ? '
आपल्या प्रिय पत्नीचे आणि मुलाचे हे बोलणे ऐकून रत्नाकर विचारात पडला. त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरु झाला. आपण एवढे दिवस ज्या प्राणप्रिय पत्नी आणि मुलासाठी जीवाचे रान करीत होतो, त्यांच्यासाठी शिकार, वाटमारी आणि प्रसंगी हत्या देखील करीत होतो, त्यांच्यापैकी कोणीही आपल्या वाईट कृत्यांची जबाबदारी, पापाचं वाटेकरू व्हायला तयार नाही. आपल्या जगण्याला आता काय अर्थ उरला आहे ? त्याला त्या ऋषींच्या सांगण्याची आठवण झाली. आपण त्या आपल्या हिताचे सांगणाऱ्या निरपराध ऋषींना बांधून ठेवले आहे ही जाणीव होऊन त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि घाईघाईने तो त्या सप्तऋषींकडे परत आला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रत्नाकरने त्या साधूंना बंधनातून मुक्त केले. त्याच्या डोळ्यातून आता केलेल्या कर्माबद्दल पश्चात्ताप होऊन घळघळा अश्रू ओघळत होते. तो त्या ऋषींच्या पायावर कोसळला. ' महाराज, मला क्षमा करा. मी अत्यंत पापी आहे. माझ्या ज्या अत्यंत प्रिय अशा कुटुंबासाठी मी हे सगळे पापकर्म करीत होतो, त्यांच्यापैकी कोणीही माझ्या पापाच्या कर्मात भागीदार व्हायला तयार नाही. माझ्या पापकर्माची फळे मला एकट्यालाच भोगावी लागणार आहेत. मी खूप पाप केले आहे. परमेश्वर तरी मला क्षमा करील का ? मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगावा महाराज. आता आपण जसे सांगाल, तसेच मी करीन. '
' ऊठ रत्नाकर, आता तुला तुझ्या पापकर्मांची जाणीव होऊन पश्चात्ताप झाला आहे. पश्चात्तापाने मन शुद्ध होते. पण तुझ्या पापांचे क्षालन होण्यासाठी तुला सगळे सोडून परमेश्वराचे नाम घ्यावे लागेल. परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करावी लागेल. जोपर्यंत तुला आत्मसाक्षात्कार किंवा परमेश्वराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तू आपली ही साधना सुरु ठेव. रामनाम हे सगळ्या पापातून मुक्ती देणारे आहे. तेव्हा तू ' राम राम ' असा जप करीत राहा. '
' जशी आपली आज्ञा महाराज. ' असे म्हणून रत्नाकरने पुन्हा ऋषींचे पाय धरले.
' रत्नाकर, आमचा तुला आशीर्वाद आहे. तुला नक्कीच परमेश्वर प्राप्ती होईल. आम्ही येतो आता. पुन्हा योग्य वेळ आली की आम्ही तुझ्या भेटीसाठी येऊच. ' असे म्हणून ऋषी मार्गस्थ झाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सफल तपश्चर्या...
रत्नाकरने आता स्वतःच्या मनाशी ऋषींच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा निर्धार केला होता. एका वटवृक्षाखाली बसण्यासाठी योग्य जागा शोधून त्याने आपल्या तपश्चर्येला आरंभ केला. आता त्याच्यासमोर आपली बायको, मुलगा यांच्यापैकी कोणी नव्हते. सगळे पाश त्याने निर्धारपूर्वक तोडले होते. पश्चातापाने त्याचे मन शुद्ध झाले होते. कधी रामनाम न घेतलेल्या रत्नाकरच्या तोंडून सुरुवातीला ' मरा मरा ' शब्द बाहेर पडत होते. काही वेळातच ते शब्द रामनामात परावर्तित होऊन ' राम राम ' असे ऐकू येऊ लागले.
दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षामागून वर्षे सरली. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऋतुमागून ऋतू सरले पण रत्नाकर जागचा हलला नाही. त्याच्या आसनाभोवती मुंग्यांनी हळूहळू वारूळ बांधायला सुरुवात केली. रत्नाकरला कशाचीच शुद्ध नव्हती. फक्त रामनामात तो बुडून गेला होता. आता मुग्यांनी रत्नाकरच्या पूर्ण शरीराला वेढून वारूळ बांधले होते. दुरून पाहणाऱ्याला फक्त वारूळच दिसत होते. फक्त त्या परिसरात ' रामनामाचा ' ध्वनी गुंजत होता. वृक्ष, वेली आणि साराच परिसर रामनामाने पवित्र झाला होता.
योगायोगाने ज्या सात ऋषींनी रत्नाकरला रामनाम घेण्यास सांगितले होते, त्यांची फेरी त्या वनात पुन्हा झाली. ते त्या परिसरात आल्यानंतर त्यांना वेगळी स्पंदने जाणवू लागली. रामनामाचा ध्वनी कानी पडू लागला. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नजरेस पडेना. शेवटी त्यांनी प्रार्थना केली. ' हे महात्मन, अखंडित रामानामाचा जप करणारे आपण कोण आहात ? कृपा करून आम्हाला दर्शन द्यावे. '
त्यांनी असे म्हटल्याबरोबर एक मोठा आवाज होऊन रत्नाकरच्या अंगावरील वारूळ तुकडे होऊन बाजूला पडले. त्या जागी रत्नाकरची तेजस्वी आकृती प्रकट झाली. त्याच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज होते. सप्तऋषींपैकी जे ज्येष्ठ होते त्यांनी विचारले, ' हे महात्मन, आपल्याला आपले आधीचे नाव, परिवार आदी काही आठवते आहे का ? '
' हे महर्षी, मला एका रामनामाशिवाय दुसरे काहीही आठवत नाही. आपल्याला माझ्यात हा जो बदल झालेला दिसतो आहे, ही प्रभू श्रीरामांची असीम कृपा, आपला आशीर्वाद आणि आपले मार्गदर्शन यांचा परिणाम आहे. आपण मला त्यावेळी योग्य उपदेश केला आणि माझे डोळे उघडले त्याचा हा सर्व परिणाम आहे. ' रत्नाकर उत्तरला.
ऋषी म्हणाले, ' ज्या क्षणी तुला आपल्या कर्मांचा पश्चाताप झाला आणि रामनाम घेण्यासाठी तू स्वतःचे उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवले, त्याच क्षणी रत्नाकर नावाच्या पापी, लूटमार करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता जो समोर आहे तो रत्नाकर नसून ' वल्मातून ' म्हणजे वारुळातून बाहेर पडलेला म्हणजे वाल्मिकी आहेस. आपण आता आपल्या तपसाधनेने जगातील सर्वश्रेष्ठ महर्षी वाल्मिकी झाले आहात. आपली तपश्चर्या सफल झाली आहे. आपल्या हातून लोककल्याणाचे, जगाच्या उद्धाराचे मोठे कार्य घडेल. आपले कल्याण असो. ' असा आशीर्वाद देऊन ते सप्तऋषी मार्गस्थ झाले.
महर्षी वाल्मिकी वाटचाल करत करत तमसा नदीकाठी आले. त्यांनी तेथे एक आश्रम स्थापून आपल्या पुढील जीवनाला सुरुवात केली. त्याची कीर्ती हळूहळू भवतालच्या परिसरात पसरू लागली. त्यांचा उपदेश, प्रवचन ऐकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक आश्रमात येऊ लागले. हळूहळू महर्षी वाल्मिकींचा परिसर त्यांना अनुसरण करणाऱ्या शिष्यांनी गजबजून गेला.
अशी एकेक दृश्ये वाल्मीकींच्या डोळ्यापुढे तरळत होती. तेवढ्यात शिष्याने आवाज दिला. ' गुरुदेव, आपल्याला नदीवर स्नानासाठी जायचे होते ना ? ' शिष्याच्या आवाजामुळे आपल्याच विचारात हरवलेले वाल्मिकी भानावर आले. शिष्यासह ते तमसा नदीकाठी आले. आपले आन्हिक उरकून ते पुन्हा आपल्या आश्रमाकडे निघाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ब्रह्मर्षी नारदांची भेट...
महर्षी वाल्मिकींचा आश्रम नेहमीप्रमाणे गजबजला आहे. शिष्य लगबगीने आपली आन्हिके उरकून महर्षी वाल्मिकींची अमृतवाणी कानात साठवून घेण्यासाठी नेहमीच्या वटवृक्षाखाली असणाऱ्या पाराभोवती शिस्तीने बसले आहेत. गुरुजनांचं, मातापित्यांचं आज्ञापालन, जीवनातील शिस्तीचं महत्व अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची याची शिकवण विविध उदाहरणांसह महर्षी शिष्यांना देत आहेत.
दुपारची वेळ होते. महर्षी आता आपलं ज्ञानदानाचं कार्य करून आपल्या कुटीत भोजन आणि विश्रांतीसाठी जातात. भोजन घेतल्यानंतर काही काळ ते जवळच्याच चौपाईवर विश्रांतीसाठी अंग टाकतात. डोळे मिटल्यानंतर त्यांना तो क्रौंचवधाचा प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर येतो. त्या निष्पाप पक्ष्यांची तडफड आठवून त्यांना अस्वस्थ व्हायला होते. त्याचवेळी त्यांच्या तोंडून शापवाणी रूपाने बाहेर पडलेल्या श्लोकाच्या ओळी त्यांना पुन्हा आठवतात.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः ।
यत् क्रौन्चमिथुनादेकमवधी; काममोहितम ।।
त्याच विचारात ते काही काळ घालवतात. थोड्या वेळाने संध्याकाळच्या आन्हिकासाठी ते तमसा नदीकडे जाण्यासाठी निघतात. रस्त्याने जाताना ज्या ठिकाणी त्या शिकाऱ्याने क्रौंच पक्ष्याची हत्या केलेली असते, तिथे त्यांची पाऊले थबकतात. आपल्या विचारात ते गढलेले असताना त्यांना ' नारायण नारायण ' असा ध्वनी आणि वीणेचे स्वर कानी पडतात. समोर उभी असलेली एक तेज:पुंज व्यक्ती त्यांना दृष्टीस पडते. आपल्या तप:सामर्थ्याने ती गाणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ते नारद मुनी आहेत हे ओळखायला त्यांना वेळ लागत नाही. नारदमुनींना पाहून त्यांना परमानंद होतो. महर्षी वाल्मिकी नारदमुनींना प्रणाम करतात.
" मुनीवर, माझे अहोभाग्य म्हणून आज आपले दर्शन झाले. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझा आश्रम इथून अगदी जवळ आहे. मुनीवर आपण आश्रमात येऊन माझ्या आदरातिथ्याचा स्वीकार करावा. " महर्षींनी म्हटले
" जरूर. मलाही आपल्यासारख्या महान ऋषिवर्यांच्या आश्रमात येऊन आनंदच होईल. " असे म्हणून नारद आणि महर्षी आश्रमाकडे वाटचाल करू लागले. महर्षींच्या आश्रमात नारद मुनींची यथोचित सेवा आणि स्वागत करण्यात आले. ते आदरातिथ्य पाहून नारद मुनींना मनस्वी आनंद झाला. ते वाल्मिकींना म्हणाले, " महर्षी, मी आपल्या भेटीने हर्षित झालो आहे. आपण निःसंशय प्रभूचे श्रेष्ठ भक्त आहात. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. "
" मुनीवर, आपण आपल्या मनात माझ्यासाठी जे काही कार्य योजून आला आहात, ते अवश्य कथन करावे. आपण मला आज्ञा करावी. मला त्यात आनंदच आहे ! "
" नारायण ! नारायण ! महर्षी आपण अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली आहे. त्यामुळेच आपण वाल्मिकी म्हणून वंदनीय ठरला आहात. पण ज्या नामाचा जप करून महर्षी पदापर्यंत पोहोचला आहात त्या नारायणाने पृथ्वीवर मानव अवतारात जन्म घेतला आहे हे आपणास माहीत आहे का ? "
" नाही मुनीवर. ही आनंदवार्ता मला आपण आताच सांगितल्याने माहिती झाली. ही तर माझ्या दृष्टीने आणि या पृथ्वीवरील सर्वांच्याच दृष्टीने महद्भाग्याची गोष्ट आहे. आपले हे बोलणे ऐकल्यानंतर मला भगवंतांच्या मानव अवताराबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा लागली आहे. कृपया मला त्यासंबंधी अधिक माहिती कथन करावी मुनीवर. मला हेही सांगावे की मला त्यांचे दर्शन होऊ शकेल का ? "
" होय महर्षी. मी आपली जिज्ञासा अधिक काळ ताणून धरू इच्छित नाही. अयोध्येचे महाराज दशरथ यांच्या कुळात आणि महाराणी कौसल्येच्या उदरी श्रीनारायणांनी ' श्रीराम ' म्हणून अवतार घेतला आहे. सध्या त्यांची बाल्यावस्था सुरु आहे. ते आणि त्यांचे तीन लहान बंधू लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या बाललीलांनी सर्वांचे मन मोहून घेत आहेत. तुमची आणि त्याची भेटही येणाऱ्या काळात यथावकाश होईलच. तुमच्या हातून प्रभूंची एक महत्वाची सेवा घडावयाची आहे. " नारद मुनी उद्गारले.
" मुनीवर, आपली वाणी ऐकून मी धन्य झालो. मला प्रभूंचे दर्शन होणार आहे आणि त्यांची काहीतरी सेवा माझ्या हातून घडणार आहे यापेक्षा माझे अहोभाग्य ते कोणते ? माझ्यासारख्या एका यःकश्चित व्यक्तीच्या हातून प्रभूंची कोणती सेवा घडणार आहे याबाबत मला काही सांगावे मुनीवर. "
" महर्षी, आपण एक अत्यंत महत्वाचे कार्य संपन्न करणार आहात परंतु त्याबद्दल मी आताच अधिक सांगू शकत नाही. आपल्याला योग्य वेळी ते अवगत होईलच. माझी आता निघण्याची वेळ झाली आहे. आणखी काही कार्ये मला संपन्न करायची आहेत. नारायण ! नारायण ! येतो मी. " असं म्हणून नारदमुनी प्रस्थान करते झाले.
महर्षींनी त्यांना प्रणाम करून निरोप दिला. नारदमुनींच्या भेटीने आणि त्यांनी सांगितलेल्या आनंदवार्तेने महर्षी पुलकित झाले होते.
___________________________________________________________________________________
महर्षी वाल्मिकींना ब्रह्माजींचे दर्शन...
महर्षी वाल्मिकी आपल्या पर्णकुटीत विश्राम करीत होते. देवर्षी नारदांबरोबर झालेला वार्तालाप त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होता. प्रभूची कोणती तरी सेवा आपल्या हातून घडणार आहे या विचाराने त्यांना विलक्षण आनंद आणि धन्यता वाटत होती. हे पवित्र कार्य कोणते असावे आणि ते आपल्या हातून यशस्वीपणे पार पडेल की नाही हा विचारही त्यांना अधूनमधून अस्वस्थ करीत होता. आपण जे पवित्र नाम घेऊन आजपर्यंत इथवर वाटचाल केली, तेच नाम आपण सुरु ठेवू या असा विचार करून महर्षी रामनामाच्या अनुसंधानात गढून गेले. ते रामनामाच्या तंद्रीत असतानाच त्यांना आपल्या पर्णकुटीच्या छताजवळ प्रकाशपुंजांचे दर्शन झाले. ते निरखून त्याकडे पाहत असतानाच त्या प्रकाशवलयातून प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रकट झाले. महर्षींचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ते उद्गारले, ' ब्रह्माजी, साक्षात आपणच आहात की मी हे स्वप्न पाहत आहे ? '
' वत्सा वाल्मिकी, तू जे पाहतोस ते सत्यच आहे. मी तुझ्या भेटीसाठीच आलो आहे. ' ब्रह्मदेव म्हणाले.
' माझे अहोभाग्य की आपण माझ्यासारख्या अगदी सामान्य अशा व्यक्तीच्या भेटीला आलात. '
' वत्स वाल्मिकी, आता तू सामान्य राहिला नाहीस. तपश्चर्येने तुला ज्ञानप्राप्ती झाली आहे. तुझ्या हातून प्रभूंचे मोठे कार्य सिद्धीस जायचे आहे. '
' देवा, आपल्या दर्शनाने आणि आपल्या अमृतवाणीने मी आनंदून गेलो आहे. माझ्याकडून प्रभूंची कोणती सेवा होऊ शकते ते आपण कृपया मला विदित करावे. '
' वत्स वाल्मिकी, ते सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे. पृथीवर प्रभू नारायणांनी मानवरूपाने अवतार घेतला आहे हे तुला ठाऊकच असेल. '
' होय, देवा. ब्रह्मर्षी नारदांकडून मी ही शुभवार्ता ऐकली आहे. प्रभूंनी दशरथ पुत्र श्रीराम म्हणून जन्म घेतला आहे आणि सध्या त्यांचा बालपणीचा काळ ते व्यतीत करत आहेत एवढे मला ज्ञात आहे. '
' अगदी बरोबर आहे वत्सा. आता याच श्रीराम प्रभूंचे संपूर्ण मानवजातीला तारक ठरणारे असे चरित्र तुझ्या हातून लिहून व्हावयाचे आहे. '
' ही तर परम आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. माझे जीवन सार्थकी लागले असे मी समजतो. पण प्रभू, एक शंका आहे. '
वत्सा, कोणतीही शंका मनात ठेवू नको. अवश्य विचार. तुझ्या हातून हे महान कार्य घडणार आहे असे विधिलिखित आहे. '
' प्रभू, आताच आपण माझ्या विधिलिखिताचा उल्लेख केलात. विधिलिखित म्हणजे नेमकं काय हे मला अधिक स्पष्ट करून सांगाल का ? '
' होय वत्सा, सांगतो. नीट ऐक. प्रत्येक व्यक्ती, प्राणी जन्माला येण्यापूर्वी मी त्याचे भाग्य लिहीत असतो. त्यालाच विधिलिखित म्हटले जाते. ' ब्रह्मदेव म्हणाले.
' म्हणजे प्रभू, जन्माला येण्यापूर्वीच आपल्याकडून एखाद्या व्यक्तीचे भाग्य लिहिले गेले असते. आणि त्याप्रमाणेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पुढील घटना घडतात. '
' बरोबर आहे वत्सा. पण हे पूर्णांशाने सत्य नाही. ' ब्रह्मदेव उद्गारले.
' आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते मला नीटसं कळलं नाही. कृपा करून अधिक स्पष्ट करून सांगावं देवा. '
'वत्स वाल्मिकी, प्रत्येक व्यक्तीचे भाग्य मी लिहितो आणि त्याप्रमाणेच पुढील घटना त्याच्या आयुष्यात घडतात हे जरी सत्य असले तरी ते पूर्णपणे सत्य नाही. कारण जन्माला आल्यानंतर कोणते कर्म करायचे, चांगले किंवा वाईट याचा निर्णय मनुष्याच्या हातात असतो. त्याचे कर्म जर उत्तम असेल तर आपल्या कर्माने तो त्याची भाग्यरेषा बदलू शकतो. त्याचा प्रवास मानवाकडून देवत्वाकडे होऊ शकतो. नराचा नारायण होऊ शकतो. प्रभू श्रीराम आपल्या मानव अवतारात हाच आदर्श आपल्यापुढे ठेवणार आहेत. आपल्या भाग्यरेषेपेक्षा कर्माची रेषा मोठी करणे हे मनुष्याच्या हातात आहे आणि त्यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. '
' प्रभू, लक्षात आले. मनुष्य आपल्या सदाचरणाने, सत्कर्माने आपले भाग्य बदलू शकतो. त्याला काही काळ सुखदुःखाचा सामना करावाच लागतो. संकटे येतातच. पण त्यातही त्याने आपले मनोधैर्य टिकवून ठेवले आणि सत्कर्माची साथ सोडली नाही तर त्याचे भाग्य म्हणजे विधिलिखित बदलू शकते असेच आपल्या सांगण्याचे तात्पर्य आहे ना ?
' होय वत्सा, माझ्या सांगण्याचा हाच मतितार्थ आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन आणि प्रत्यक्षात तुझे देखील जीवन याच गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे. एका लुटारूपासून ते देवतुल्य अशा ऋषिपर्यंतचा तुझा जीवनप्रवास हे त्याचेच उत्तम उदाहरण नाही का ? तू आपल्या तप:सामर्थ्याने आपली भाग्यरेषा बदलून टाकली आहेस वत्सा. '
आपले बोल ऐकून मी धन्य झालो प्रभू. प्रभू श्रीरामांचे अमृतमय असे चरित्र मी नक्कीच आपल्या आज्ञेनुसार यथाशक्ती लिहिण्याचा प्रयत्न करीन. आपला वरदहस्त आपण माझ्यावर सदैव असू द्यावा. परंतु प्रभू...'
' आता आणखी कोणती शंका तुझ्या मनात आहे वत्स वाल्मिकी ? '
' प्रभू श्रीरामांच्या जीवनाबद्दल मला अधिक माहिती नाही. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यात कोणत्या घटना घडणार आहेत, प्रभू कोणते कार्य या पृथ्वीतलावर संपन्न करणार आहेत याविषयी मी अनभिज्ञ आहे. '
वत्सा वाल्मिकी, त्याची काळजी तू करू नकोस. मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो आहे. त्यायोगाने तुला प्रभू श्रीरामांच्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी ज्ञात होतील. समस्त मानवजातीसाठी त्यांचे जीवन म्हणजे एक संदेश असेल. जीवन कसे जगावे याचा आदर्श ते जगापुढे ठेवतील. त्यांचे हेच प्रेरणादायी जीवन अखिल मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला चित्रित करायचे आहे. ' असे म्हणून ब्रह्मदेवांनी आपला उजवा हात आशीर्वादासाठी वर केला. त्या हातातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. महर्षी वाल्मीकींच्या शरीरात तो दिव्य प्रकाश सामावला महर्षींच्या मुखावर एक आगळेच तेज झळकू लागले.
' वत्सा, यापुढे तू जगात महर्षी वाल्मिकी म्हणून सर्वांना वंदनीय होशील आणि तू लिहिलेली रामकथा जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या पृथीवर अमर राहील. अखिल मानवजातीला ती प्रेरणा आणि स्फूर्ती देत राहील. ' असे बोलून ब्रह्माजी अंतर्धान पावले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रामायण लेखन...
ब्रम्हाजींची भेट आणि त्यांनी सोपवलेलं श्रीरामाची जीवनकथा लिहिण्याचं कार्य यामुळे महर्षी वाल्मिकी मनोमन सुखावले होते. ब्रह्माजींनी दिलेल्या आशीर्वादामुळे आणि वरदानामुळे हे कार्य सिद्धीस जाईल याबाबत आता त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. एका सुमुर्हूतावर महर्षींनी आपलं पहाटेचं आन्हिक आटोपलं आणि श्रीरामकथा लेखनाची आस उरी धरून ते आपल्या दैवताचं म्हणजे श्रीरामचं ध्यान करू लागले. त्याची प्रार्थना करून त्यांनी आपल्याला या कार्याला यश द्यावं म्हणून विनंती केली. आपल्याला दिव्य दृष्टीचं वरदान दिलेल्या ब्रह्माजींचीही त्यांनी प्रार्थना केली. काही काळ आपले नेत्र त्यांनी मिटले.
आता त्यांच्या डोळ्यांसमोरून श्रीरामांच्या जीवनातील एकेक प्रसंग चित्राप्रमाणे साकार होऊ लागले. जसजशा त्या घटना त्यांना दिसत होत्या, तसतसे ते त्यांना शब्दबद्ध करीत होते. अयोध्येचे सूर्यवंशातील पराक्रमी महाराजा दशरथ, त्यांचा भव्य राजप्रासाद, दरबार त्यांच्या डोळ्यापुढे साकार झाल्या. महाराज दशरथ यांच्या तीनही राण्या अनुक्रमे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांचे सुशील, सुसंस्कृत आचरण त्यांनी पाहिले. महाराज दशरथांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा त्यांना दिसली. एवढे मोठे राज्य, पराक्रमी राजा, सुखी जनता या सगळ्या गोष्टी तर विद्यमान होत्या पण राज्याला अजून वारस नव्हता. त्यामुळेच महाराज दशरथ चिंतेत होते.
महाराज दशरथांचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी होते. वशिष्ठ ऋषी हे अत्यंत ज्ञानी, विद्वान आणि अंगी तपसामर्थ्य असलेले एक महान व्यक्तिमत्व होते. वशिष्ठ ऋषी आपल्या या गुणांमुळे सर्वांच्या आदरास पात्र झालेले होते. त्यांचा शब्द अखेरचा मानला जात असे. महाराज दशरथांनी आपली व्यथा वशिष्ठांच्या कानावर घातली. त्यावर वशिष्ठांनी दशरथाला पुत्रकामेष्टी यज्ञाचे आयोजन करायला सांगितले. या यज्ञासाठी ऋष्यशृंग ऋषींनी पौरोहित्य केले. यज्ञसमाप्तीनंतर यज्ञाचा प्रसाद तिन्ही राण्यांनी वाटून घेतला. यथावकाश त्या गर्भवती राहून त्यांनी चार सुपुत्रांना जन्म दिला. कौसल्येचा पुत्र राम हा ज्येष्ठ होता. सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे पुत्र प्राप्त झाले. हे सर्व राजकुमार अत्यंत पराक्रमी होते. श्रीराम तर महाराज दशरथांचा आणि प्रजेचा जीव की प्राण होता. सर्व राजकुमारांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अयोध्येला परत आले असताना दरबारात विश्वामित्र ऋषींचे आगमन झाले. विश्वामित्र ऋषी आपल्या काही ऋषीगणांसमवेत अरण्यात यज्ञ करीत होते. हे यज्ञ करताना राक्षस त्यात विघ्ने आणत असत व यज्ञ पूर्ण होऊ देत नसत. या यज्ञाचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी दशरथाकडे रामाची मागणी केली.
त्यावेळी श्रीरामाचे वय जेमतेम पंधरा सोळा वर्षांचे असेल. एवढ्या कोवळ्या वयात रामाला राक्षसांशी लढायला पाठवण्याची दशरथाची तयारी नव्हती. पण वसिष्ठांनी समजूत घातल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणाला विश्वामित्र ऋषींबरोबर पाठवण्याची तयारी दशरथाने दाखवली. वाटेत जाताना त्यांना त्राटिका नावाची भयंकर राक्षसी आडवी आली. विश्वामित्रांच्या सांगण्यावरून तिचा श्रीरामांनी वध केला. विश्वामित्रांनी अनेक दिव्य अस्त्रे श्रीरामाला प्रदान केली. यज्ञाच्या वेळी मारीच, सुबाहू इ राक्षस यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आले असता राम लक्ष्मण यांनी त्यांचे पारिपत्य केले आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.
याच सुमारास मिथिलेचा राजा जनक याने आपली कन्या सीता हिचे स्वयंवर आयोजित केले होते. या स्वयंवराची आमंत्रण जनकाने विश्वामित्र ऋषींना पाठवले आणि या प्रसंगी त्यांनी आपल्या शिष्यांसह उपस्थित राहावे अशी विनंती त्याने केली होती. त्याप्रमाणे विश्वामित्र ऋषी श्रीराम, लक्ष्मण यांना सोबत घेऊन मिथिलेकडे निघाले. मिथिलेकडे जात असताना वाटेत त्यांना एक ओसाड आणि निर्जन आश्रम नजरेस पडला. त्या ठिकाणी पाषाणरूपात एक स्त्री आकृती राम लक्ष्मणाच्या नजरेस पडली. त्यांनी त्याबाबत विश्वामित्र ऋषींना विचारले असता त्यांनी सांगितले की हा गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि ही शिळा होऊन पडलेली स्त्री म्हणजे त्यांची पत्नी अहिल्या. मग त्यांनी राम लक्ष्मणाला अहिल्येची करुण कहाणी कथन केली. ते ऐकून निरपराध अहिल्येबद्दल श्रीरामाच्या मनात करुणा दाटून आली. त्याने त्या शिळेला विश्वामित्र ऋषींच्या चरणस्पर्श केला. श्रीरामाचा चरणस्पर्श होताच त्या शिळेचे रूपांतर एका सुंदर स्त्रीत झाले. तीच गौतम ऋषींची पत्नी अहिल्या होती. तिने श्रीरामाचा चरणस्पर्श केला. नंतर गौतम ऋषींना आपण निर्दोष अहिल्येवर केलेल्या अन्यायाचा पश्चाताप होऊन त्यांनी अहिल्येला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारले.
पुढे जनक राजाच्या नगरीत सीता स्वयंवरात श्रीरामांनी भाग घेतला. तेथे पण म्हणून ठेवलेले शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न त्यांनी करताच ते मोठ्याने कडकड आवाज करीत मोडून पडले. सुकुमार सुंदर जनक कन्या असलेल्या सीतेने श्रीरामाला वरमाला घातली. अशा रीतीने श्रीरामांचा सीतेबरोबर आणि उर्वरित लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांचाही विवाह सीतेच्या इतर बहिणींसोबत संपन्न झाला. उर्मिलेचे लग्न लक्ष्मणासोबत, मांडवीचे भरतासोबत आणि श्रुतकिर्तीचे शत्रुघ्नासोबत झाले.
या सर्वांच्या विवाहामुळे अयोध्येतही आनंदाचे वातावरण होते. दशरथ राजाने श्रीरामाला युवराज म्हणून राज्याभिषेक करण्याचे ठरवले. राज्याला सुयोग्य वारस मिळाला म्हणून सर्व प्रजाजन, राजा दशरथ, चारही राण्या अत्यंत आनंदात होत्या. अशातच कैकेयीची दासी मंथरा हिने कैकेयीला तिने दशरथ राजाकडे युद्धाच्या वेळी मागितलेल्या दोन वरांची आठवण करून दिली. त्याप्रमाणे कैकेयीने दशरथ राजाकडे एका वराने श्रीरामाला चौदा वर्षे वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्य असे वर मागितले. या कैकेयीच्या मागणीने दशरथाला अतिशय दुःख झाले. पण त्याला आपल्या वचनाची पूर्तता करावी लागली. श्रीरामांनी सर्वांची समजूत घातली आणि विधीच्या इच्छेनुसार वनवासाचा पर्याय आनंदाने स्वीकारला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांवर वचनभंगाचा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी वनवास पत्करला. श्रीरामाबरोबर वनात जाण्यासाठी लक्ष्मण आणि सीतादेखील निघाले.
अशा रीतीने ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे श्रीरामांच्या जीवनातील एकामागून एक प्रसंग महर्षी वाल्मीकींच्या डोळ्यांसमोरून सरकत गेले. ते जसजसे त्यांना दृगोचर झाले, तसतसे त्यांनी ते काव्यबद्ध केले. त्यांच्या लेखणीला सरस्वतीचा स्पर्श होता. प्रतिभेची देणगी होती. त्यामुळे मुळातच अत्यंत मधुर असणारे श्रीरामाचे चरित्र वाल्मीकींच्या दिव्य लेखणीतून प्रकटताच आणखी गोडी त्यात उतरली.
श्रीरामांचा वनवास, त्या वनवासात त्यांच्यावर येणारी संकटे, श्रीरामांनी केलेला राक्षसांचा नायनाट, रावणाकडून झालेले सीताहरण, जटायूची भेट, वालीचा वध, श्रीरामांचा आदर्श भक्त आणि परमसेवक असलेल्या हनुमानाची झालेली भेट आदी प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले. त्यांच्या लेखणीने त्या प्रसंगांना अमर केले. असेच एकेक प्रसंग त्यांची लेखणी अक्षर आणि अमर करत चालली होती. हनुमानाने केलेले लंकादहन, श्रीरामांचे रावणाशी घनघोर युद्ध, रावणावर मिळवलेला विजय आदी प्रसंगाचे अत्यंत रोमांचक असे वर्णन श्री वाल्मिकी करते झाले. सीतेची अग्निपरीक्षा पार पडल्यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण आदी सर्व पुष्पक विमानात बसून अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर सर्व प्रजाजनांनी त्यांचे समारंभपूर्वक स्वागत केले. श्रीरामांचा आदर्श बंधू भरताने त्यांना पुन्हा राज्य प्रदान केले. वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाला राज्याभिषेक करून राजसिंहासनावर विधिपूर्वक बसवले. श्रीरामांच्या राज्यात सर्व प्रजाजन सुखी झाले. अशा प्रकारे आपल्या डोळ्यांसमोर दिसणारे प्रसंग महर्षींनी शब्दबद्ध केले. त्यांनी लिहिलेले हे रामायण अतिशय मधुर आणि रसाळ झाले होते. वाल्मिकींनी आतापर्यंत २४ हजार श्लोकांची छंदबद्ध रचना केली होती. आपल्या आश्रमातील शिष्यांसमोर आणि उपस्थित श्रोत्यांसमोर महर्षी जेव्हा जेव्हा ही अजरामर रचना कथन करीत, तेव्हा तेव्हा ऐकणारे मंत्रमुग्ध होत. वन्यप्राणी देखील आपली मूळ वृत्ती विसरून त्यावेळी श्रीरामकथेचे श्रवण करीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीरामांकरवी सीतेचा त्याग
श्रीराम अशा प्रकारे सुखाने आणि आदर्श राज्यकारभार करत होते. एक दिवस ते दरबारात बसले असताना एक गुप्तचर त्यांच्याकडे आला. त्याला श्रीरामांना काही सांगायचे होते पण तो सांगण्यास संकोच करीत होता. श्रीरामांनी त्याला अभय दिल्यानंतर तो म्हणाला, ' महाराज, नगरातील एका प्रजाजनाला आपल्याबद्दल अपशब्द उच्चारताना मी ऐकले आहे. त्याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झाले होते. तो आपल्या पत्नीला म्हणत होता. तू ताबडतोब माहेरी निघून जा. लंकेत रावणाकडे राहून आल्यावरही सीतेला ठेवून घेणाऱ्या श्रीरामासारखा मी नाही. ' गुप्तचराचे हे शब्द ऐकल्यानंतर श्रीरामांना अतिशय दुःख झाले. काही वेळ त्यांनी एकांतात विचार करण्यात घालवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीरामांनी आपल्या लक्ष्मणादि भावांना बोलवून त्यांना सगळी हकीगत सांगितली. ते लक्ष्मणाला म्हणाले, ' लक्ष्मणा, सीता पवित्र आहे हे मी जाणतो. परंतु लोकांच्या मनात सीतेच्या विषयी शंका असेल तर मला तिचा त्याग करायलाच हवा. मी केवळ पती नाही तर एक राजादेखील आहे. असे असताना कोणत्याही प्रजाजनाच्या मनात कोणाविषयी जर शंका असेल तर मी त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा त्याग करायलाच हवा मग ती व्यक्ती मला कितीही प्रिय असो. ' श्रीरामांचे हे बोलणे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. सगळ्यांनी परोपरीने सांगूनही श्रीराम आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी लक्ष्मणाला ही माझी आज्ञा समजून तू तिचे पालन कर. तिला वनात सोडून ये असा आदेश दिला.
श्रीरामांच्या आदेशानुसार सुमंताने रथ तयार केला होता. श्रीरामांच्या आदेशानुसार लक्ष्मण सीतेसह वनाकडे निघाला. रस्त्यात त्याने सीतेला श्रीरामाने तिचा त्याग केल्याची कल्पना मोठ्या जड अंतःकरणाने दिली. हे ऐकून सीतेला अर्थातच खूप वाईट वाटले. लक्ष्मण सीतेला सोडून अयोध्येला परतला. इकडे वाल्मिक ऋषींच्या आश्रमातील काही शिष्य आणि साधकांनी सीतेला वनात एकटे शोकमग्न अवस्थेत पाहिले . त्यांनी वाल्मिक ऋषींना ही वार्ता दिले. वाल्मिकींनी आपल्या अंतर्ज्ञानाने ती सीता आहे हे ओळखले आणि तिला आपल्या आश्रमात घेऊन आले. त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे तिला प्रेम दिला. या सुमारास सीता गर्भवती होती. लवकरच ती प्रसूत होऊन तिला दोन जुळी तेजस्वी मुले झाली. वाल्मिक ऋषींनी त्यांचे नामकरण अनुक्रमे कुश आणि लव असे केले. आश्रमातील सर्व जण सीतेची आणि लव, कुश यांची प्रेमाने काळजी घेत असत.
वाल्मिक ऋषींच्या देखरेखीखाली लव आणि कुश मोठे होऊ लागले. महर्षींनी त्यांना वेद विद्या, युद्धशास्त्र इ मध्ये पारंगत केले. हे दोन्ही राजकुमार अत्यंत तेजस्वी आणि शूर होते. भल्याभल्या धनुर्धरांची त्यांच्यासमोर डाळ शिजत नसे. वाल्मिकींनी लिहिलेले रामायण या राजकुमारांनी कंठस्थ केले.
इकडे अयोध्येत श्रीरामांचा राज्यकारभार अतिशय सुंदर पद्धतीने सुरु होता. प्रजाजन सुखी होते. श्रीरामांनी चक्रवर्ती सम्राट व्हावे म्हणून त्यांनी अश्वमेध यज्ञ करावा अशी सूचना महर्षी वसिष्ठांनी केली. श्रीरामांनी महर्षी वशिष्ठांची आज्ञा शिरोधार्य मानून त्यासाठी अनुमती दिली. नैमिष्यारण्यात गोमती नदीच्या काठावर यज्ञासाठी जागा निश्चित करून एका भव्य यज्ञमंडपाची उभारणी भरत आणि शत्रुघ्न यांनी केली. यज्ञाचा दिवस निश्चित करण्यात आला. श्रीरामांच्या आज्ञेने सीता वनात असल्याने यज्ञात श्रीरामांशेजारी ठेवण्यासाठी सीतेची सुवर्णाकृती तयार करून घेण्यात आली. अनेक राजेमहाराजे, साधू संन्यासी, ऋषीवर या सर्वांना या यज्ञप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी देखील आपले शिष्यगण आणि लव, कुश यांना घेऊन यज्ञमंडपी उपस्थित झाले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. एक दिवस या यज्ञमंडपात श्रीरामांच्या उपस्थितीत लव आणि कुश यांनी सीतेच्या वनवासापर्यंतचे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण अत्यंत मधुर स्वरात सर्वांसमोर म्हटले. हे रसाळ आणि भावविभोर करणारे रामायण ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले. श्रीरामांची नजर तर त्या दोन तेजस्वी बालकांवरून हटेना. आपल्या चरित्रातील या सगळ्या घटना या बालकांना कशा ज्ञात झाल्या याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या दोघांना जवळ बोलावून त्यांचा परिचय विचारला. लव म्हणाला, ' महाराज माझे नाव लव आणि हा माझा ज्येष्ठ बंधू कुश. '
श्रीराम म्हणाले, ' हे तेजस्वी बालकांनो, मला तुमच्या आईवडिलांबद्दल अधिक माहिती सांगा. ' तेव्हा लव म्हणाला, ' महाराज, आम्ही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात वाढलो. त्यांनीच आमचे पालनपोषण केले. विद्या शिकवली. यापेक्षा अधिक आम्ही काही जाणत नाही. ' श्रीरामांनी आपल्या सेवकांना या बालकांना दक्षिणा म्हणून अठरा हजार सुवर्णमुद्रा देण्यास सांगितले. पण आम्ही वनवासी. आम्हाला सुवर्णमुद्रा काय कामाच्या असे नम्रपणे सांगून लवकुशांनी त्या घेण्यास नकार दिला आणि ते पुन्हा वाल्मिकींच्या आश्रमात परतले.
बऱ्याचशा राजांनी जरी श्रीरामांचे आणि अयोध्येचे मांडलिकत्व मान्य केले असले तरी आपल्या चक्रवर्ती पदाला सर्वांचीच अधिकृत मान्यता मिळावी यासाठी यज्ञाचा अश्व तयार करून तो राज्याराज्यांत फिरवण्यात आला. त्यासोबत श्रीरामांची उत्तम आणि पराक्रमी सेना होती. सोबतच भरत आणि शत्रुघ्न देखील होते. या देखण्या अश्वाचे ठिकठिकाणी मोठे स्वागत होत होते. त्याचे पूजन करून तो अश्व पुढे पुढे जात होता. महर्षी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ हा अश्व येताच तो लवाच्या दृष्टीस पडला. त्याला तो देखणा अश्व अतिशय आवडला. त्याने तो अडवला आणि आपल्या आश्रमाकडे त्याला घेऊन निघाला. अश्वबरोबर असलेल्या सैनिकांनी सांगूनही लव याने तो अश्व देण्यास नकार दिला. ' तुम्हाला जर अश्व परत हवा असेल तर तुम्हाला क्षात्र धर्मानुसार माझ्याशी युद्ध करावेच लागेल ' असे सांगून त्याने सैनिकांना त्याच्याशी लढण्यास भाग पाडले. लवच्या बाणांच्या माऱ्यापुढे सैनिक टिकू शकले नाही.
युद्धभूमीपासून जवळच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची शिबिरे होती. काही सैनिक धावपळ करीत त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी युद्धाची ही बातमी त्यांच्या कानावर घातली. शत्रुघ्न आपली सेना घेऊन लढण्यासाठी निघाला. इकडे लवकुशांच्या आश्रमातील मित्रांनी ही बातमी आश्रमात कुशाच्या कानावर घातली. आपला भाऊ सैनिकांसोबत एकटाच लढतो आहे हे ऐकताच कुश त्वरेने त्याच्या साहाय्यासाठी धावला. पुन्हा लवकुश आणि सैन्यात घनघोर युद्ध झाले. ही पराक्रमी बालके कोणालाही हार जात नव्हती. अनेक मोठे योद्धे पराजित झाले. अनेक धारातीर्थी पडले. शत्रुघ्नही लढताना मूर्च्छित पडला. श्रीरामांच्या शिबिरापर्यंत ही बातमी पोहोचली. श्रीरामांनी लक्ष्मणाला लवकुशाचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याचवेळी त्या बालकांना कोणतीही इजा न करता माझ्यासमोर घेऊन या असेही श्रीरामांनी सांगितले.
पुन्हा लक्ष्मण आणि लवकुश यांच्यात घनघोर युद्ध झाले. या युद्धात लक्ष्मणाचाही टिकाव लागला नाही. नंतर श्रीरामांनी भरत आणि हनुमान यांना पाठवण्याचा निर्णय घेतला. पण पराक्रमी भरत आणि लंकेत रावणाचीही दाणादाण उडवणारा हनुमान यांचेही या शूर आणि तेजस्वी बालकांपुढे काही चालले नाही. यानंतर स्वतः श्रीराम सेनेसह या बालकांशी युद्ध करण्यासाठी आले. यावेळी श्रीराम आणि लवकुश यांच्यात अतिशय अर्थपूर्ण संभाषण झाले.
लव म्हणाला, ' महाराज हा महर्षी वाल्मिकींचा आश्रम आहे. आपण यावरही ताबा मिळवू इच्छिता का ? ' श्रीराम म्हणाले, ' आम्हाला या महर्षींच्या तपोभूमीची लालसा नाही. ' यावर लव म्हणाला की जर आपणाला या भूमीची लालसा नाही तर आपण मोठमोठे योद्धे आमच्याशी लढण्यासाठी का पाठवले ? यावर श्रीराम म्हणाले, ' बाळांनो, तुम्ही यज्ञाचा अश्व अडवला म्हणून आम्हाला तुमच्याशी युद्ध करणे भाग पडले. ' लव म्हणाला, ' हा महर्षिंचा आश्रम आम्ही स्वतंत्र ठेवू इच्छितो. ' श्रीराम म्हणाले, ' बाळांनो, हे गुरुकुल आहे. गुरुकुल हे स्वतंत्रच असते. ते कोणत्याही राज्याच्या अधीन नसते. तेव्हा तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही पकडलेल्या या अश्वाला मुक्त करा. '
यावर लव म्हणाला, ' महाराज, आता हा अश्व आपल्याला युद्ध करूनच आमच्या ताब्यातून सोडवावा लागेल. हाच क्षत्रिय धर्म आहे. ' त्या बालकांचे हे उद्गार ऐकून श्रीरामांनी आपल्या धनुष्याला हात घातला. त्याच्या टणत्काराने भूमी, आकाश थरथरले. तेवढ्यात बाहेर काही कामासाठी गेलेले वाल्मिकी आपल्या आश्रमात परतले. त्यांना या युद्धाची वार्ता कळताच ते तात्काळ युद्धभूमीवर आले. श्रीराम आता बाण सोडणार तोच वाल्मिकी म्हणाले, ' प्रभू, युद्ध थांबवा नाहीतर अनर्थ होईल. ' श्रीराम महर्षींना म्हणाले, ' कोणता अनर्थ घडेल ऋषीवर ? '
' युद्धभूमीत पिता आणि पुत्र एकमेकांचे प्राण घेणार का ? महाराज, लव आणि कुश ही दोन्ही आपली मुले आहेत. ' हे ऐकताच श्रीरामांचा आपल्या कानावर विश्वास बसेना. ते म्हणाले, ' मग सीता कुठे आहे ? ' देवी सीता माझ्या आश्रमात सुखरूप आहेत प्रभू. ' वाल्मिकी म्हणाले. लव आणि कुश यांना उद्देशून ते म्हणाले, ' बाळांनो, प्रभू श्रीराम हे तुमचे पिता आहेत. त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. ' त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर श्रीरामांनी त्यांना मोठया प्रेमभराने जवळ घेतले. पितापुत्रांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले.
वाल्मिकी श्रीरामांना म्हणाले, ' प्रभू, देवी सीता येथेच आश्रमात आहेत. आपण त्यांची भेट घेणार का ? ' त्यावर श्रीराम म्हणाले, ' होय महर्षी, मला तीव्र इच्छा आहे सीतेला भेटण्याची पण...'
' पण काय प्रभू ? वाल्मिकींनी विचारले.
' सीता निर्दोष आहे हे मला माहिती आहे पण तरीही प्रजाजनांसमोर तिने एकदा अग्निपरीक्षा द्यायला हवी. '
यापूर्वी एकदा आपण सीतामातेची परीक्षा घेतली आहे. आणि ती निर्दोष, निष्पाप आणि निष्कलंक आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. पण ठीक आहे प्रभू.. जशी आपली इच्छा. ' वाल्मिकी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी महर्षी वाल्मिकी लव कुश आणि सीता यांना घेऊन यज्ञमंडपात उपस्थित झाले. सीतेला आणि लव कुशाला पाहून सर्वांनाच आनंद झाला. यावेळी श्रीरामांनी पुन्हा सीतेला सर्वांसमोर अग्निपरीक्षा देण्यास सांगितले. वाल्मिकी म्हणाले, ' प्रभू, देवी सीता निर्दोष आहे. निष्कलंक आहेत. माझे हे बोलणे जर खोटे असेल तर माझी आजपर्यंतची तपश्चर्या विफल होईल. ' श्रीरामांच्या मनात जरी सीतेच्या निर्दोषत्वाबद्दल खात्री होती, तरी समस्त प्रजाजनांच्या समाधानासाठी त्यांनी राजा म्हणून हा निर्णय नाईलाजाने घेतला होता.
श्रीरामांचे हे बोल ऐकल्यानंतर सीतेने हात जोडून भूमीला प्रार्थना केली. ' हे माते, मी माझ्या आयुष्यात फक्त एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही. काया, वाचा आणि मनाने मी श्रीरामप्रभुंशिवाय अन्य कोणाचाही विचार केला नसेल तर हे पृथ्वीमाते तू मला आपल्या पोटात घे. ' सीतेची ही प्रार्थना ऐकताच धरणी दुभंगली. एक मोठा आवाज झाला. भूमीतून एका सिंहासनावर अधिष्ठित पृथ्वीमाता प्रकट झाली. ' ये बेटी, पृथ्वीवरील तुझा कार्यभाग आता संपला आहे. ' असे म्हणून पृथ्वीमातेने सीतेला आपल्या जवळ घेतले. सीतेला घेऊन पृथ्वीमाता पुन्हा भूमीमध्ये विलीन झाली. तेथे जमलेल्या सगळ्यांनी सीतेचा जयजयकार केला.
महर्षी वाल्मिकी जड अंतःकरणाने त्या गर्दीतून बाहेर पडले आणि वनाकडे मार्गस्थ झाले.
वाल्याचा वाल्मिकी झालेल्या महर्षींनी आपला आदर्श लोकांसमोर ठेवला होता. ठरवले तर माणसाची वाटचाल पशुत्वाकडून देवत्वाकडे होऊ शकते हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले होते. पण त्याहीपेक्षा त्यांचे श्रेष्ठ कार्य म्हणजे रामायणासारखी एक अजरामर गाथा लिहून त्यांनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी श्रीरामांचा आदर्श लोकांच्या डोळ्यांसमोर ठेवला होता. रामायणातील सगळीच पात्रे महान होती आणि त्यांचे जीवन हाच एक संदेश होता. या महाकाव्याद्वारे महर्षींनी कर्माची महती लोकांना पटवून दिली. आपले कर्म श्रेष्ठ असेल तर ते आपले भाग्यही बदलू शकते हा संदेश त्यांनी त्यातून दिला. श्रीरामांना देव म्हणून लोकांसमोर ठेवण्यापेक्षा एक आदर्श व्यक्ती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श राजा इ गोष्टी त्यातून त्यांनी लोकांच्या मनावर ठसवल्या. श्रीरामांचा मानवाकडून देवत्वाकडे होणारा प्रवास अधोरेखित केला. अखिल मानवजातीसमोर एक आदर्श ठेवला. हे महाकाव्य युगानुयुगे जगाला प्रेरणा देत राहील. जोपर्यंत मानवजात या पृथ्वीवर आहे तोपर्यंत रामायण अमर आहे. जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत महर्षी वाल्मिकी अजरामर आणि वंदनीय आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वालझिरी या गावी महर्षी वाल्मिकींचा जन्म झाल्याचे मानले जाते. तशा प्रकारचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर मध्ये आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या कॉफीटेबल बुकमध्ये देखील हा उल्लेख करण्यात आला आहे. वालझिरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिण दिशेला चाळीसगाव - पाटणादेवी रस्त्यावर पाच किमी अंतरावर आहे. या ठिकाणी भगवान शंकरांचे प्राचीन मंदिर, राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असलेले एक मंदिर, नवनाथांचे मंदिर अशी मंदिरे आहेत. महर्षी वाल्मिकींचे देखील मंदिर आहे. येथे पूर्व आणि पश्चिम दिशेला दोन मोठे वटवृक्ष आहेत. हे वटवृक्ष वाल्मीकींच्या काळापासूनचे असल्याचे भाविक मानतात.
तर ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील आजा पर्वत ज्याचा उल्लेख रामायणात अंजन पर्वत म्हणून येतो, या ठिकाणी महर्षी वाल्मिकींचे वास्तव्य होते. येथेच त्यांचा आश्रम होता असे सांगितले जाते. १९७२-७४ मध्ये कल्याण येथील विवेकानंद गोडबोले यांनी आजा पर्वतावरील महर्षी वाल्मीकींच्या समाधीचा शोध घेऊन आपल्या ' सुभे कल्याण ' या पुस्तकात त्याचा उल्लेख केला आहे. तर त्यानंतर काही वर्षांनी मुंबईचे प्राच्यविद्या अभ्यासक रवींद्र लाड यांनी संशोधन करून विवेकानंद गोडबोले यांच्या विधानाची पुष्टी केली आहे.
गोरक्षनाथांनी दहाव्या शतकात लिहिलेल्या ' किमयागार ' या ग्रंथात रामायणातील किष्किंधाकांडाचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यात वर्णन केलेला अंजनी पर्वत म्हणजेच आज त्याचा अपभ्रंश होऊन ज्याला ' आजा पर्वत ' म्हटले जाते तो हाच असावा. शहापूर तालुक्यातील साकुर्ली गावाच्या पूर्वेला हा पर्वत आहे. याच ठिकाणी श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर लक्ष्मणाने तिला आणून सोडले. लव आणि कुश यांचा जन्म येथेच झाला. येथेच महर्षी वाल्मिकींनी त्यांना सर्व शिक्षण देऊन युद्धात पारंगत केले. याच परिसरात श्रीराम आणि लव कुश युद्ध आणि त्यांची भेट झाली असावी असे संशोधक सांगतात. हा इतिहास लक्षात घेऊन पूर्वी कोणीतरी महर्षी वाल्मिकींची समाधी येथे बांधली असावी. समाधीचा काळ निश्चित सांगता येत नाही. पण नंतर शिवकाळात या समाधीचा जीर्णोद्धार जव्हारच्या राजांच्या कारकिर्दीत झाला.
हे समाधी मंदिर कौलारू आहे. त्याच्या जवळ शिवपिंडी, नंदी आदी मंदिरावशेष आढळतात. जवळपास काही साधूंच्या समाधी आहेत. एका कोरीव दगडावर राम, सीता, लव कुश यांची पावले उमटलेली दिसतात. त्यांच्या जवळच तीन वीरगळ उभे असलेले दिसतात. ते सपाट पाषाणावर कोरलेले आहेत. पूर्वीच्या काळी गोधन हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाई. या गोधनाचे संरक्षण करण्याचे काम वीरपुरुषांकडे असे. ते शत्रूपासून गावाचेही रक्षण करीत. युद्धात धारातीर्थी पडलेल्या अशा शूरवीरांचे गावकरी स्मारक उभारत. त्यांना वीरगळ असे म्हटले जाते. याच ठिकाणी वीरगळांच्या जवळील शिल्पांवर रामायणातील घटनांच्या काही प्रतिमा कोरलेल्या आपल्याला आढळून येतात. पुण्याजवळील वाल्हे गावातही महर्षी वाल्मिकींचे समाधी मंदिर आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवी म्हणून वाल्मिकींचे महत्व
महर्षी वाल्मिकींना आदिकवी म्हटले जाते. रामायण नेमके केव्हा घडले याबाबत संशोधकात मतभेद आहेत. पण ते घडून साधारणपणे पाच ते सात हजार वर्षे तरी होऊन गेली असावीत असे अनुमान विविध संशोधकांच्या निष्कर्षावरून काढता येते. पण हजारो वर्षांपूर्वी महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाची थोरवी, महत्ता आजही यत्किंचितही कमी झाली नाही. कवी म्हणून वाल्मिकींचे स्थान जेवढे श्रेष्ठ हजारो वर्षांपूर्वी होते तेवढेच आजही आहे.
प्रत्येक युगात कोणती ना कोणती तरी महाकाव्ये लिहिली जातात. त्यांची थोरवी ही वर्षानुवर्षे अबाधित असते. परंतु महर्षी वाल्मिकीकृत जे रामायण आहे त्याला लोकांनी आपल्या हृदयात जे आदराचे आणि प्रेमाचे स्थान दिले आहे, तसे भाग्य क्वचितच कोणत्या महाकाव्याला लाभले असेल. होमरचे इलियड, ओडिसी, मिल्टनचे पॅराडाईज लॉस्ट यासारखी अनेक महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. परंतु महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत आणि महर्षी वाल्मिकींचे रामायण या महाकाव्यांना भारतीयांच्या मनात जेवढे आदराचे स्थान आहे, तेवढे इतरत्र क्वचितच इतर महाकाव्यांना लाभले असेल. त्यातीलही रामायणाचे स्थान अत्यंत वरच्या दर्जाचे आहे.
इंग्रजीतील श्रेष्ठ नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर आजही श्रेष्ठ नाटककार आणि कवी म्हणून आपले स्थान जगभर रसिकांच्या हृदयात टिकवून आहे. शेक्सपिअरच्या काही नाट्यकृती ऐतिहासिक तर काही काल्पनिक आहेत. पण त्याची श्रेष्ठता त्याने ज्या पद्धतीने या नाटकातील पात्रे निर्माण केली, त्यांच्यात मानवी भावभावनांचा सुंदर अविष्कार घडवला त्यात आहे. त्यामुळेच त्याची पात्रे जिवंत आणि जवळची वाटतात. महर्षी वाल्मिकींनी रामायणात जी सुंदर चरित्रे मानवी रूपात आपल्यासमोर उभी केली आहेत, ती शेक्सपिअरच्या पात्रांप्रमाणे मानवी भावभावना व्यक्त करणारी तर आहेतच पण वाल्मिकींनी या पात्रांच्या रूपाने अनेक आदर्श आपल्यासमोर उभे केले आहेत की जे युगानुयुगे वंदनीय आहेत. मानवजातीला मार्गदर्शन करणारी आहेत. रामायण म्हणजे संस्कारांची पाठशाळाच आहे आणि या बाबतीत रामायणाची तुलना अन्य कोणत्याही महाकाव्याशी होऊ शकत नाही असे मला वाटते.
मानव आणि परमेश्वर यांच्या संबंधात दोन प्रकारचे सिद्धांत प्रचलित आहेत. पहिला म्हणजे मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देवत्वापर्यंत पोहोचू शकतो. दुसरा सिद्धांत म्हणजे या जगात परमेश्वरच कर्ता करविता असून तो या सर्व विश्वाचे नियमन करतो. पहिला सिद्धांत मानवाच्या कर्तृत्वाला वाव देतो तर दुसऱ्या सिद्धांतात माणूस दुय्यम आणि परमेश्वर श्रेष्ठ ठरतो. दुसऱ्या सिद्धांतानुसार मानवी कर्तृत्वाला फारसा वाव नाही. महर्षी वाल्मिकींनी मानवाचा विचार पहिल्या सिद्धांतानुसार केला. त्यांनी मानवाच्या कर्तृत्वाला श्रेष्ठ स्थान देऊन माणूस आपल्या कर्तृत्वाने देवपदापर्यंत पोहोचू शकतो हे श्रीरामाच्या उदाहरणातून दाखवून दिले. वाल्मीकींच्या समोर जो राम होता, तो मानव रूपातच होता. त्याच्या लोकोत्तर गुणांनी तो मर्यादापुरुषोत्तम ठरला. देवत्वापर्यंत पोहोचला.
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा
पंचकं ना: स्मरेनित्यं महापातक नाशनम
या श्लोकातील ज्या पाच महान स्त्रिया आहेत, त्यातील चार तर रामायणात आहेत. एवढी महान स्त्री पात्रे वाल्मिकींनी चितारली आहेत. केवळ सीताच नव्हे तर वालीची पत्नी तारा, रावणाची पत्नी मंदोदरी, गौतम ऋषींची पत्नी अहल्या याशिवाय लक्ष्मणाची पत्नी उर्मिला या सगळ्यांचा त्याग आणि तपश्चर्या महान आहे. वरील श्लोकात वर्णन केलेल्या पंचकन्यांचे स्मरण नित्य स्त्रिया आणि पुरुषांनीही करावे एवढी त्यांची थोरवी आणि पात्रता आहे.
गौतम ऋषींनी शाप दिल्यानंतर अहिल्या शिळा होऊन पडलेली असते. श्रीरामांचा चरणस्पर्श झाल्यानंतर तुझा उद्धार होईल असा उ:शाप तिला मिळालेला असतो. श्रीरामांचा चरणस्पर्श होताच शिळारुप झालेली अहिल्या मानवी स्वरूपात प्रकट होते. त्यावेळी महर्षींनी रामाच्या तोंडी जे संवाद घातले आहेत ते रामाचा स्त्रियांबद्दलचा आदरभाव व्यक्त करणारे आहेत. ' मनुष्यजातीने तुझ्यावर जो अन्याय केला, न केलेल्या अपराधाची शिक्षा तुला दिली त्याबद्द्दल मी समस्त मानव जातीतर्फे तुझी क्षमा मागतो, ' असे भावपूर्ण उदगार रामाच्या तोंडी आहेत. वाल्मिकींनी लोकांसमोर जो आदर्श ठेवला तो या स्त्रीजातीचा गौरव करणाऱ्या श्रीरामाचा आहे. आज समाजाला गरज आहे ती अशा स्त्रीजातीचा गौरव करून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या श्रीरामाची.
महर्षी वाल्मिकींचा मानवी मनाचा अभ्यास जबरदस्त होता. रामायणकाळातील लोकजीवनाचे ते साक्षीदार होते. ते केवळ वनात राहून काल्पनिक गोष्टी लिहिणारे महाकवी नव्हते. त्या काळात त्यांनी ज्या ज्या अनिष्ट गोष्टी पाहिल्या, त्याबद्दल त्यांनी आपल्या लेखणीद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. दशरथ राजाची कामुकता असो, सुग्रीवाच्या अंत:पुरात चाललेल्या कामक्रीडा, आपले कर्तव्य विसरलेले आणि स्वतःच्याच विश्वात आनंद किंवा धन्यता मानणारे राजाचे अधिकारी आणि सेवक यांच्यावर वाल्मिकींनी कडक शब्दात नापसंती व्यक्त केली आहे.
रामायणाची कथा वाल्मिकींनी रामायण लिहिण्याच्या आधीपासून प्रचलित होती. लोकांमध्ये अनेक आख्यायिका प्रचलित होत्या. त्या सगळ्यांना एकत्र करून, एका सूत्रात बांधून वाल्मिकींनी त्यांचा एकसंध असा अविष्कार रामायणाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवला. समाजातील ज्या गोष्टींवर त्यांना कोरडे ओढावेसे वाटले त्यावर त्यांनी रामायणातील पात्रांच्या माध्यमातून आणि समाजजीवन वर्णन करताना टीका केली. ज्या गुणांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे त्यांना वाटले त्या गुणांचा मूर्तिमंत आदर्श असलेली पात्रे त्यांनी लोकांसमोर ठेवली. या दृष्टीने वाल्मिकी हे थोर समाजशिक्षक आहेत असे मला वाटते. आख्यायिकांमधूनच इतिहास उलगडत जातो. त्याचे सुंदर दर्शन वाल्मिकींनी आपल्या रामायणात घडवले आहे.
कवी म्हणून काव्यातील नऊ रसांचा परिपोष इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी घडवला आहे की त्या त्या वेळी त्या त्या भावना अनुभवून श्रोते भावविभोर होतात. श्रीरामांचे बालपण, त्यांच्या क्रीडा यात एका अनोख्या आनंदाने आपण हरवून जातो. श्रीराम वनवासात जाताना शोकाकुल झालेल्या माता, प्रजाजन, दशरथ राजाचा आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाने तुटणारे अंतःकरण हे सगळे वाचताना आपले डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत. अशा प्रकारचे अनेक प्रसंग रामायणात आहेत. शौर्य, क्रौर्य, तिरस्कार, शोक, राग, लोभ, मोह या सगळ्या मानवी भावभावनांचा अविष्कार रामायणात आपल्याला त्या त्या प्रसंगी भावविभोर करतो.
वाल्मिकींसारखा महाकवी आणि रामायणासारखे महाकाव्य युगानुयुगातून एखादेच होते. त्यामुळे जोपर्यंत मानवजात अस्तित्वात आहे तोपर्यंत रामायण अमर आहे. आणि जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत महर्षी वाल्मिकींची कीर्ती त्याच्यारूपाने अबाधित राहणार आहे.
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥
अशा या महाकवी, आदिकवी वाल्मिकींना नमस्कार असो.
जय श्रीराम...!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
***********************************************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा