उगवतीचे रंग
श्रीओंकारेश्वर दर्शन : एक प्रसन्न अनुभव
बऱ्याच दिवसांपासून श्री ओंकारेश्वर आणि नर्मदा दर्शन घेण्याची इच्छा होती. अखेर रविवार दि १३ मार्च रोजी हा योग आला. सकाळी सातच्या सुमारास कारने चाळीसगावहून निघालेलो आम्ही दुपारी चार वा श्रीक्षेत्र ओंकारेश्वरला येऊन पोहोचलो. सध्या या पवित्र क्षेत्री निवास करणारे श्री बालमुकुंद बाळेकुंद्रीकर गावापासून काही किमी अंतरावर असणाऱ्या कमानीजवळ आम्हाला घ्यायला आले होते. कर्नाटकातील बेळगावजवळ बाळेकुंद्री म्हणून ठिकाण आहे. त्या ठिकाणी होऊन गेलेले अधिकारी संत पुरुष श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे वंशज म्हणजे श्री बालमुकुंद बाळेकुंद्रीकर. केंद्र सरकारी नोकरीतून मोठ्या अधिकाराच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नर्मदेच्या दोन परिक्रमा केल्या. सध्या ते ओंकारेश्वर येथेच सन्यस्त वृत्तीने राहतात. ओंकारेश्वर मंदिरातील आणि परिसरातील सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झालेले असून सर्व लोक त्यांचा अतिशय आदर करतात. माझ्या चाळीसगावच्या घराला त्यांचे पवित्र चरण काही महिन्यांपूर्वी लागले होते. त्या परिचयातूनच मी ओंकारेश्वरला येत असल्याचे त्यांना कळवले आणि ते स्वतः आम्हाला घेण्यासाठी आले.
' नर्मदे हर ' या त्यांच्या खणखणीत आवाजाने आमचे स्वागत झाले. त्यांच्यासोबतच मग आम्ही रेवा गुर्जर धर्मशाळेत पोहोचलो. त्यांनी आधीच सांगून ठेवल्यामुळे दोन खोल्या आमच्यासाठी राखून ठेवल्या होत्या. थोडा वेळ तेथे थांबून आम्ही अंघोळीचे कपडे घेऊन नर्मदाकाठी पोहोचलो. नर्मदेच्या शीतल जलात स्नान केले. पितरांना तर्पण आणि सूर्यदेवांना अर्घ्य दिले. पुन्हा खोलीवर येऊन कपडे बदलले. पुन्हा मंदिराकडे आलो. नर्मदेवर असणारा पूल पार करून मंदिरात पोहोचता येते. नर्मदेच्या विशाल पात्रावर हा पूल बांधणे हे सुद्धा आव्हानात्मकच ! पण तो अतिशय सुंदर आणि मजबूत बांधला आहे.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ असलेली नर्मदा ! नर्मदा मैय्या, रेवा मैय्या अशाही नावांनी ती ओळखली जाते. कोणी प्रेमाने तिला माई म्हणतात. सर्व नद्या दक्षिणोत्तर वाहतात. पण नर्मदा एकमेव अशी नदी आहे की जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. तिच्या जलात भगवान शंकरांसह सर्व देवांचा निवास आहे असे मानले जाते. नर्मदा ही भगवान शंकरांची कन्या आहे. ' नर्मदा ' या नावाचे अनेक अर्थ सांगितले जातात. नर आणि मादा. भगवान शिव स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही रूपात आहेत. म्हणून ती नर्मदा. नर्म या शब्दाचा अर्थ प्रसन्न, हलकेफुलके. आपल्या घरात एखादी लहान मुलगी असेल, तर तिच्याकडे पाहून अतिशय प्रसन्न वाटते, नर्म सुख ती आपल्याला प्रदान करते. तशीच नर्म सुख देणारी, मन प्रसन्न करणारी भगवान शंकरांची ही कन्या. म्हणून नर्मदा. ही नर्मदा मैय्या तुम्ही मनापासून तिच्याकडे प्रार्थना केली तर इच्छिलेले सगळे देते. तुम्ही काही मागितले नाही तरी आई म्हणून ती तुमच्या मनातला भाव ओळखते. मात्र या आईकडे तुम्ही लहान आणि नम्र होऊनच जायला हवे.
नर्मदेचं वैशिष्ट्य असं की भगवान शंकरांच्या मंदिराला लागूनच वाहते. इतर क्षेत्री नद्या मंदिरापासून काही अंतरावर आहेत. पण श्री ओंकारेश्वराचं दर्शन घेताना आधी आणि नंतर नर्मदामैय्या प्रसन्न दर्शन देते. मंदिरातूनही सगळ्या बाजूने मैयाचे दर्शन घडते. तर असे हे मैयाचे दर्शन घेऊन, स्नान करून आम्ही साधारण रात्री आठच्या सुमारास ओंकारेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो. फारशी गर्दी नव्हती. तेथील पुरोहित श्री बाळेकुंद्रीकर यांनी सांगून ठेवल्यामुळे आम्हाला थेट गाभाऱ्यापर्यंत घेऊन गेले. श्री ओंकारेश्वरांचे प्रसन्न दर्शन आम्ही अनुभवले. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य असे की येथे श्री शंकर भगवान माता पार्वतीसह विराजमान आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे स्थान म्हणजे शंकर आणि पार्वती यांचे शयनगृह आहे. म्हणूनच या ठिकाणी त्रिकाल गुप्त आरती केली जाते. इतर देवस्थानात केली जाणारी आरती आपण पाहू शकतो पण येथील आरतीला उपस्थित राहण्याची आपल्याला परवानगी नाही. या ठिकाणी आपल्याला सारीपाट मांडून ठेवलेला आपल्याला दिसतो. आपण पुराणातील अनेक कथांमधून श्री शंकर पार्वती सारीपाट खेळत असल्याच्या कथा ऐकतो. या ठिकाणी तो पट आपल्याला प्रत्यक्ष मांडून ठेवलेला दिसतो. एवढेच नव्हे तर असे सांगितले जाते की शिवरात्रीच्या दिवसानंतर पहाटे जेव्हा मंदिर सकाळी पाच वाजता पुन्हा उघडले जाते, तेव्हा हा पट विखुरलेला किंवा त्याचे स्थान बदललेले आपल्याला दिसून येते.
येथील दर्शन घेऊन आम्ही आणखी वरच्या मजल्यावर असणाऱ्या पार्वतेश्वर महादेवाच्या मंदिरात आलो. त्या ठिकाणी श्री महादेवाच्या पिंडीचे आणि माता पार्वतीचे पूजन सुरु होते. त्या ठिकाणी आम्हाला सुमारे अर्धा ते पाऊण तास निवांत बसता आले. पूजा अनुभवता आली. जे पुजारी शिवलिंगाची पूजा करत होते, ते जवळपास अर्धा तास आपल्या भक्तीमध्ये लीन होते. तिथे आमच्याही कपाळाला शिवलिंगाला लावण्यात येणारा चंदनाचा लेप लावण्यात आला. त्याला अत्यंत दिव्य सुगंध होता. हा सुगंध दुसऱ्या दिवशीपर्यंत आम्ही अनुभवला. आमचा हा अर्धा ते पाऊण तास खरोखरीच एका वेगळ्या वातावरणात आणि भारलेल्या अवस्थेत गेला असे म्हणायला हरकत नाही. या काळात आम्ही श्री महामृत्युंजय मंत्राचा मानसिक जप केला. पुजाऱ्यांनी महादेवाच्या पिंडीभोवती आणि पार्वतीमातेच्या प्रतिमेभोवती फुलांची आकर्षक आरास केली होती. त्या ठिकाणी आम्हालाही पुष्पांजली वाहण्याचे सौभाग्य लाभले.
या मंदिरात भगवान शंकरांना जो त्रिकाल नैवेद्य दाखवला जातो, त्याचे पुरोहित पण ठरलेले आहेत. सकाळी श्री ओंकारेश्वर ट्रस्टचे पुजारी नैवेद्य दाखवतात. दुपारचा नैवेद्य किंवा भोग ग्वाल्हेरच्या सिंदिया घराण्यातील वंशपरंपरेने पौरोहित्य करणारे पुरोहित लावतात. रात्रीचा भोग लावण्याचा मान अहिल्याबाई होळकर यांच्याकडील पुरोहितांकडे वंशपरंपरेने चालत आला आहे. भगवान शंकरांना नैवेद्य किंवा भोग लावणारे श्री दीक्षित यांच्याशी पण आमची भेट झाली. त्यांच्या अनेक पिढ्या तेथेच जन्मल्या, वाढल्या. श्री ओंकारेश्वराच्या भक्तीतच त्यांनी आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानली आहे. त्यांच्या वडिलांची आत्या अंघोळीनंतर ओल्या वस्त्राने स्वयंपाक करून मंदिरात नैवेद्य आणून ठेवत होत्या. त्यांच्याच सेवेचा आदर्श श्री दीक्षित यांनी पुढे सुरु ठेवला आहे.
रात्री साडेनऊला आम्ही पुन्हा ओंकारेश्वराचे दर्शन घेतले. आरती संपलेली होती. बरोबर नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मंदिराचे दरवाजे बंद होतात. तेव्हा यावेळी पुन्हा निवांत आणि मनसोक्त दर्शनाचे भाग्य आम्हाला लाभले. त्यानंतर एका ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या धर्मशाळेतील खोल्यांमध्ये आलो. सकाळी परतीचा प्रवास होता. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा श्री ओंकारेश्वराचे दर्शन घ्यायचे होते. दिवसभर थकल्याने रात्री अंग टाकल्याबरोबर झोप लागली. सकाळी चार साडेचारला उठून अंघोळ करून पुन्हा श्री ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. यावेळी साधारण साडेपाच वाजले होते. मंदिरात जाण्यासाठी नर्मदेवर बांधलेल्या पुलावर आलो. सकाळच्या रेवामैयाच्या दर्शनाने तर सगळा शीण हरपला. शांत आणि प्रसन्न सौंदर्य काय असते ते अनुभवायचे असेल तर सकाळी नर्मदेचे दर्शन घ्यावे. पहाटेच्या वेळी दिसणाऱ्या नर्मदामैयाच्या प्रसन्न वातावरणाचे छायाचित्र सोबत जोडले आहे.
नर्मदामैयाचे दर्शन घेऊन मंदिरात आलो. मंदिरात भगवंतांना स्नान घालणे सुरु होते. पुनश्च एकदा दर्शन घडले. श्री ओंकारेश्वराच्या दर्शनाचा अशा रीतीने त्रिवार लाभ झाला. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो. समोर नर्मदामैया प्रसन्न दर्शन देत उभी होती. सूर्यदेवांच्या सहस्त्ररश्मी किरणांनी नर्मदेचे जल आणि वातावरण सोनेरी झाले होते. अशा पवित्र समयी श्री बाळेकुंद्रीकर यांनी आपल्या खणखणीत आवाजात आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले नर्मदाष्टक म्हटले. तालासुरात म्हटलेले हे नर्मदाष्टक ऐकणे ही सुद्धा एक आनंदाची पर्वणी असते. ही रचनाच इतकी सुंदर आहे की आपण त्यातील अर्थ, भाव याच्याशी आपण नकळत एकरूप होऊन जातो. या सगळ्या वास्तव्यात श्री बाळेकुंद्रीकर आमच्या सोबत होते हे आमचे मोठेच भाग्य !
मंदिरातून बाहेर आलो. सर्वानी चहा घेतला. रूमवर जाऊन सामान घेतले. पुनश्च एकदा मैयाला आणि भगवंतांना मनोमन नमस्कार केला आणि परतीचा प्रवास सुरु झाला. जातानाचे आम्ही कोरडे होतो. येताना मात्र श्री ओंकारेश्वर आणि नर्मदामैया यांच्या भक्तीत भिजून आलो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०३/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा