मुख्य सामग्रीवर वगळा

कल्हईवाला...

 उगवतीचे रंग 

कल्हईवाला... 

परवाच्या दिवशी खूप दिवसांनी कल्हईवाला आमच्या घराजवळून चालला होता. एक जुनी पुराणी सायकल, त्यावर टांगलेली एक जाड ताडपत्री पिशवी आणि अंगात साधा पायजमा आणि सदरा असा त्याचा वेष होता. खूप दिवसांनी कल्हईवाला दिसल्याने माझ्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या. जास्त जुने नाही पण साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी आपण वापरायचो. वापरून वापरून आतला मुलामा झिजल्याने किंवा अगदीच न वापरल्यामुळे त्यावर एक प्रकारचा गंज चढायचा. अशा वेळी अधूनमधून भांड्याना कल्हई करून घेणे आवश्यक असायचे. त्याशिवाय त्यात भाज्या, अन्नपदार्थ शिजवता यायचे नाहीत. 

माझ्या दारावरून जाणाऱ्या त्या कल्हईवाल्याला मी थांबवले. सौ. ला म्हटलं आपल्याकडे जुनी पितळेची भांडी आहेत. आपण त्यांना कल्हई करून घेऊ या का ? कधी कधी माझ्या एखाद्या प्रस्तावाला ती चटकन होकार देते...! तसे यावेळी झाले. फक्त अडगळीत ठेवलेली भांडी काढून देण्याचे काम माझ्यावर आले. ती चार लहानमोठी पितळी पातेली आणि एक पितळेची बादली मिळाली. बरेच दिवस वापरात नसल्यामुळे ती खराब झाली होती. आतील मुलामा निघून गेला होता. 

कल्हईवाल्याने आपल्या हातपंख्याच्या भट्टीची नळी जमिनीत एक छोटासा खड्डा करून रोवली. त्याच्याजवळ असलेले थोडेसे कोळसे त्या खड्ड्यात टाकले. हातपंख्याची दांडी तो गरगर फिरवू लागला. एक गमतीदार विचित्र आवाज करत त्या कोळशांनी चांगलाच पेट घेतला. लाल निखारे दिसू लागले. कल्हईवाल्याने मग एक भांडे घेतले आणि त्या विस्तवावर ठेवले. ते चांगले तापल्यावर त्याच्या जवळ असलेल्या पुडीतून नवसागराचा बारीक केलेला भुगा घेऊन त्या भांड्यात टाकला. आता खूपच धूर सुटला. ते भांडे चिमट्याने धरून त्याच्याजवळ असलेल्या फडक्याने त्याने पुसून घेतले आणि त्याच्याजवळ असलेल्या कथिलाच्या पट्टीने त्या भांड्यात एकदोन रेषा ओढल्या. हे सगळे करताना एक वेगळाच वास सुटला होता. पुन्हा त्याने ते भांडे पुसले. तो जणू जादू झाली. आतापर्यंत एकदम काळवंडलेले दिसणारे ते भांडे जणू चांदीचा मुलामा दिल्यासारखे चकचकीत झाले. मग त्याने जवळच भरलेल्या पाण्याच्या बादलीत ते थंड होण्यासाठी टाकले. त्यामुळे तो मुलामा टिकावू होणार होता. 

मला लहानपण आठवले. तेव्हा लोक मोठ्या प्रमाणात तांब्या पितळेची भांडी वापरत असल्याने त्यांना कल्हई करावी लागायची. कल्हईवाला नियमितपणे वर्षातून तीनचार वेळा तरी यायचा. तो कल्हई करत असताना पाहणे मोठे गमतीचे असायचे. आम्ही सगळे बालगोपाळ त्याच्या भोवती कडे करून ती नवलाई बघत असायचो. खराब असलेली भांडी काही काळातच उजळून निघायची. ही किमया न्यारीच होती. पण पुढे पुढे अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी आली. तांब्या पितळेची भांडी मोडीत निघाली किंवा अडगळीत पडली. या अल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यांना कल्हईची गरज राहिली नाही. काही नवीन आले की माणूस जुन्या गोष्टींना विसरून जातो. तसेच या भांड्यांचेही झाले. कधी कधी जुन्या चांगल्या गोष्टी आपण त्या केवळ जुन्या किंवा कालबाह्य झाल्या म्हणून टाकून देतो. पण कधी तरी कालांतराने त्याचे महत्व पटते. आरोग्यासाठी हीच भांडी चांगली होती असे जाणकार सांगतात. 

आता कल्हईवाले कालानुरूप अस्तंगत होत चालले आहेत. तांब्या पितळेची भांडी फारशी कोणी वापरत नसल्याने त्यांचा धंदा होत नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन नाहीसे होत चालले आहे. मला त्या कल्हईवाल्याची जुनी सायकल, अंगावरचे साधे कपडे, साधे राहणीमान आणि त्याही परिस्थितीत त्याच्या चेहऱ्यावर असलेले हास्य पाहून कौतुक वाटले. सगळे असूनही दुर्मुखलेले राहणाऱ्या, सतत कुरकुरणाऱ्या लोकांपेक्षा हा कल्हईवाला आहे त्या परिस्थितीत किती आनंदी होता ! त्याने सांगितलेले पैसे तर मी त्यालाच दिलेच पण त्याला विचारले, ' बाबा, चहा घेणार का ? 'त्याला हा प्रश्न अनपेक्षित असावा. तो चमकला. ' असू द्या...' म्हणाला. पण मी त्याला थांबवले आणि चहा दिला. त्याने चहा घेतला पण त्याचा चेहरा तसा निर्विकार होता. चहा मिळाला काय आणि न मिळाला काय त्याने दोन्ही गोष्टींची तयारी ठेवली असावी. जीवनाचे खरे तत्वज्ञान जणू तो कोळून प्यायला होता. 

सिद्धहस्त कवी जगदीश खेबुडकर यांचे ' चुडा तुझा सावित्रीचा ' या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. जयवंत कुलकर्णी यांनी हे अर्थपूर्ण गीत आपल्या स्वरातून साकार केलंय.  ' लावा भांड्याला कल्हई....' हे ते गाणं ! या गीतात शेवटी कवी म्हणतो 

कधी स्वप्‍नी मलाही दिसले
ओठी भिडले चांदीचे पेले
हाती कथलाचे पुसणे आले
परि त्याचे सोने झाले
कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी

चांदीचे पेले त्याला स्वप्नात दिसत असतात. पण नशिबाने हाती कथिलाचे पुसणे, कल्हई करणे येते. पण तो जे काही करतो, त्याचे सोनेच झाले आहे. सोन्याचांदीच्या भांड्यातून जेवण्यापेक्षा आपल्या कशातून मिळवलेली सुखाची भाकरी त्याला प्रिय आहे... ! 

खरंच आपलं जीवनही असंच असतं नाही. जीवनातल्या समस्यांमुळे, अडचणींमुळे आपल्या मनावरचा सुंदर मुलामा कधी कधी निघून जातो. त्यालाही अशीच अधूनमधून कल्हई करणं आवश्यक असतं. घरातला केरकचरा नाही का आपण साफ करत...! परिस्थितीची भट्टी नाही तरी आपल्याला भाजतच असते. कुंभाराचे मडके सुद्धा आगीत भाजल्याशिवाय पक्के होत नाही. सोन्यालाही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. सदविचारी लोकांचा संग हा नवसागर असतो. कथिलाची तार म्हणजे गुरुतत्वाचा स्पर्श असतो. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की किमया घडते. भांडे उजळून निघते. तांब्या पितळीला चांदीचे मोल प्राप्त होते. एक कल्हईवाला येऊन त्याचे काम करून गेला होता. भांड्याबरोबर मनाचाही गाभारा उजळला होता. 

सिद्धहस्त कवी जगदीश खेबुडकर यांचे ' चुडा तुझा सावित्रीचा ' या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे. जयवंत कुलकर्णी यांनी हे अर्थपूर्ण गीत आपल्या स्वरातून साकार केलंय.  ' लावा भांड्याला कल्हई....' हे ते गाणं ! या गीतात शेवटी कवी म्हणतो 

कधी स्वप्‍नी मलाही दिसले
ओठी भिडले चांदीचे पेले
हाती कथलाचे पुसणे आले
परि त्याचे सोने झाले
कष्टाची मोलाची भाकर हक्काची खावी

चांदीचे पेले त्याला स्वप्नात दिसत असतात. पण नशिबाने हाती कथिलाचे पुसणे, कल्हई करणे येते. पण तो जे काही करतो, त्याचे सोनेच झाले आहे. सोन्याचांदीच्या भांड्यातून जेवण्यापेक्षा आपल्या कशातून मिळवलेली सुखाची भाकरी त्याला प्रिय आहे... ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१०/०३/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...