उगवतीचे रंग
व्यापून विश्व सारे... !
विविध भूमिका असती तुझ्या जरी
साऱ्या विश्वाची तू होशी आई.
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।।१ ।।
तू लक्ष्मी सरस्वती, चंडिका तू होशी बाई
वर्णावी मी काय तव रूपांची नवलाई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। २ ।।
तू प्रेरणा कवींची आणि साहित्यकृतींची
दैवी रूपगुण वसती तव ठायी
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ३ ।।
जनकाची लाडकी श्रीरामाची सीतामाई
पवित्र तरी तव अग्निपरीक्षा ठायी ठायी
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ४ ।।
प्रेम भक्ती वैराग्याचा फुलविण्या मळा
विठाई, तुकाई आणि तूच ज्ञानाई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ५ ।।
अहंकारी अज्ञानी कितीएक ते चांगदेव
उद्धरिसी त्याते होऊनि मुक्ताई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ६ ।।
तू तेजस्वी याज्ञसेनी द्रौपदी स्वाभिमानी
कौरवांचा वंश संपुनिया जाई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ७।।
शिवबांना जन्म देशी तू माऊली
स्वराज्याची आस असे तव ठायी
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ८ ।।
ज्योतिरावांची होशी सावित्रीही तूच
शिक्षणाची गंगा आणलीस माई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ९ ।।
घरदार, नोकरी, संसार हा सारा
तुझ्याविना होणे नाही नाही
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। १० ।।
तू त्यागाचे आगर, कर्तव्याचा सागर
तूच गुलाब, तूच जाई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। ११ ।।
घरोघरी मंगलाचा आणि ईश्वराचा वास
नाव त्या रूपाचे असे फक्त आई
व्यापून विश्व सारे तू दशांगुळे बाई ।। १२ ।।
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०८/०३/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा