मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 

मी कल्हईवाला बनतो... 

खूप दिवसांपूर्वी कधी नव्हे तो कल्हईवाला माझ्या दारी आला होता. त्याच्याकडून मी मग  माझ्याकडे असलेल्या पितळेच्या भांडयांना कल्हई करून घेतली होती. त्याचं व्यक्तिमत्व, कल्हई करण्याची पद्धत, तो त्यासाठी वापरत असलेलं सामान, वापरत असलेले पदार्थ आदींचे निरीक्षण करून मी त्यावर एक लेख लिहिला होता. तो कल्हईवाला मला फार आवडला होता. त्याने माझ्या बालपणीच्या स्मृती जागृत केल्या होत्या. त्याने कल्हई केलेली भांडी पाहून मला खूप समाधान वाटले. त्याचे कल्हईचे काम मी जीवनाशी जोडले. माणसाच्या मनालाही कधी कधी असाच गंज चढतो. त्यालाही तो काढून कल्हई करण्याची गरज असते वगैरे अशा छान छान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. 

लेख लिहून झाल्यावर तो माझ्या वाचकांसाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या भिंतीवर टाकला. वाचकांकडून तो खूप आवडल्याचा प्रतिसाद यायला लागला. अनेकांनी आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्याचे सांगितले. कोणाला तो कल्हईचा विशिष्ट वास आठवला. कोणाला त्या लेखात दिलेले ' लावा भांड्याला कल्हई ' हे गाणं आवडलं वगैरे. हे सगळं पाहून आपले श्रम सार्थकी लागल्याचे मला वाटले. 

दुसऱ्या दिवशी हा लेख मी ईमेलने एका वर्तमानपत्रासाठी पाठवून दिला. तीनचार दिवसातच मला त्या संपादकांचा उलट टपाली संदेश आला की आम्ही तुमचा लेख आमच्या पेपरसाठी घेत आहोत. तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवून द्यावा. मला मोठा आनंद झाला. मी त्वरेने माझा फोटो पाठवून दिला. पेपरमध्ये लेख कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. आणि धन्य तो मंगळवारचा दिवस उजाडला. एका नामांकित पेपरच्या पुरवणीत माझा लेख आला होता. सकाळी आठ पासून मला त्या संदर्भात फोन यायला सुरुवात झाली. त्यावरून मला कळले की आज अमुक अमुक पेपरमध्ये आपला लेख आला आहे. मी माझ्याकडे नेहमी पेपर टाकणाऱ्या मुलाला त्या पेपरबद्दल विचारणार तोपर्यंत तो दुसरा पेपर टाकून ( खरं म्हणजे फेकून ) पसार झाला. 

त्यानंतर पहिला फोन आला तो औरंगाबादहून. आमचे झालेले संभाषण असे 

हॅलो, मी औरंगाबादहून बोलतो. तुम्ही भांड्यांना कल्हई करता का  ? 

( मी उडालोच...! ) कोण मी ? नाही बुवा. 

अहो, असं काय करता ? पेपरमध्ये लेखाखाली तुमचा नंबर दिला आहे. 

( आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला ) मी म्हटले, ' अच्छा, असं होय. पण अहो' मी तो लेख लिहिला आहे. मी कल्हईवाला नाही. 

बरं, पण भेटला तर सांगा. नंबर द्या त्याचा किंवा भेटला तर पाठवून द्या.  

मी म्हटलं, ' हो, हो अगदी नक्की...' 

परत दुसरा फोन अगदी तसाच. मला लोकांचं मोठं नवल वाटू लागलं. यांना एवढंही समजूही नये का की हा दिलेला नंबर लेखकाचा आहे म्हणून ! या सगळ्या धक्क्यातून सावरून मी बाहेर पडलो. आता प्रत्यक्ष पेपर पाहिल्याशिवाय काही लक्षात येणार नाही तेव्हा पेपर आणायचा म्हणून निघालो. घराच्या थोडेसेच पुढे गेलो. तो एका ए सी पी ऑफिसमधून फोन. मी अमुक अमुक पोलीस स्टेशनमधील हवालदार बोलतो आहे. पेपरमध्ये तुमचा लेख वाचला. त्याचे माझे झालेले संभाषण 

तुम्ही कल्हई करता का ? 

नाही. मी तो लेख लिहिला आहे. 

मग तो कल्हईवाला तुमच्या ओळखीचा आहे का ? 

नाही. 

 त्याचा नंबर आहे का ? 

नाही. 

कुठे राहतो ? 

माहिती नाही. 

तुम्हाला कसा आणि कुठे भेटला ? 

अहो, तो दारावर आला होता. त्याच्याकडून माझ्या भांड्यांना कल्हई करून घेतली. 

ठीक आहे. तो भेटला तर त्याचा नंबर घ्या. आम्हाला या नंबरवर कळवा. आम्हाला महत्वाचे काम आहे. 

असे म्हणून हवालदार साहेबांनी फोन ठेवला. मी मात्र हवालदिल झालो. या महाशयांचे काय काम असावे कल्हईवाल्याकडे ? पोलीस स्टेशनमध्ये कधी तांब्यापितळेची भांडी पाहिल्याचे मला आठवत नाही. म्हटलं जाऊ द्या. आपल्याला काय करायचे ! नाहीतरी अलीकडे सगळ्याच गोष्टींना कल्हई करायची गरज आहे ! 

अशा प्रामाणिक विचारात रस्ता पार केला. पेपरवाल्याकडे आलो. त्याला म्हटलं, ' बाबा, अमुक अमुक पेपर आहे का ? 

आहे ना साहेब. 

त्याला पुरवणी आहे का ? ( कधी कधी एखाद्या पेपरमध्ये त्यांचे पुरवणीचे पान टाकायचे राहून जाते ) 

आहे ना साहेब. त्याने पाहून खात्री केली. 

मी पैसे दिले, पेपर घेऊन मार्गाला लागलो. रस्त्यात पेपर उलगडून पाहिला. त्यात कल्हईवाल्याच्या छायाचित्रासह माझा  लेख आला होता. संपादक महाशयांनी लेखाच्या वर माझे नाव, फोटो छापला होता. लेखाच्या मध्यभागी ' कल्हईवाला ' असे ठळक शीर्षक होते. आणि लेखाच्या खाली संपर्कासाठी क्रमांक म्हणून माझा फोन नंबर दिला होता. आता लोकांचा काय गोंधळ झाला असावा याचा उलगडा मला झाला. लेखाच्या खाली दिलेला नंबर कल्हईवाल्याचा समजून त्यांनी मला फोन केला होता. 

त्या दिवशी मला असे मोजून सातआठ फोन आले. एकाने तर चक्क विचारले की माझ्याकडे तांब्यापितळेची जुनी भांडी आहेत. ती वितळवून तुम्ही त्याच्या देवांच्या मूर्ती घडवून द्याल का ? त्या दिवशी मला अशा खूप नवनवीन गोष्टी कळल्या. नवीन उलगडा झाला. आपल्या लेखातून मनाला थोडीफार कल्हई करण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते  काही बरोबर नाही. आपल्याला आता प्रत्यक्ष कल्हईवाला होण्याची आवश्यकता आहे असेही वाटून गेले. ज्याची लोकांना गरज आहे असा एक नवीन व्यवसाय गवसला. आता कल्हई शिकून घेण्यासाठी तरी त्या कल्हईवाल्याला भेटणे आवश्यक झाले. तो पुन्हा कधी भेटतो बघू या. यावेळी मात्र मी त्याचा नंबर घ्यायला विसरणार नाही. त्या पोलीस स्टेशनला पण कळवावा लागेल ना ! 

माझ्या मनात ' डफलीवाले डफली बजा ' च्या चालीवर उगाचच एक गाणे आकार घेऊ लागले. 

कल्हईवाले, इधर तो आ 

सारी दुनिया बुलाती हैं 

तेरी कल्हईसे मेरे बर्तनपर क्या रंग आने लगा हैं 

चांदी के जैसा बर्तन ये मेरा मुझको लगने लगा हैं 

इधर भी आओ, उधर भी जाओ 

बुला रहे हैं दुनियावाले... 

कल्हईवाले, इधर तो आ.. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२४/०३/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...