उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस
तृप्त मी, कृतार्थ मी...
आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद करून ठेवलेली नाही. कर्म करणाऱ्याने निष्ठेने आपले कर्म करत जावे. गाणाऱ्याने गात जावे, लोकांना आनंद देत जावा. गाण्यांची मोजदाद करू नये. पुरस्कारांची करू नये. तेच दीदी करत आल्या आहेत. जणू गीतेतील निष्काम कर्मयोग त्या जगल्या आहेत. त्यांच्या गाण्यांची, पुरस्कारांची नोंद हवी तर चाहत्यांनी ठेवावी आणि तसेच होत आले आहे.
बरेचदा दीदी त्यांना मिळालेले पुरस्कार त्यात स्वतःची भर घालून ते त्या संबंधित संस्थेला देऊन टाकतात. मिळालेले स्मृतिचिन्ह मात्र सोबत आणतात. अनेकविध संस्था, विद्यापीठे यांनी त्यांचा वेळोवेळी गौरव केला आहे. दीदींकडे आता पुरस्कार एवढे झाले आहेत की पुरस्कार ठेवायलाही जागा उरलेली नाही. त्यांना भारत सरकारतर्फे दिले जाणारे नागरी पुरस्कार चढत्या क्रमाने मिळत गेले आहे. शासनाने त्यांच्या गायन क्षेत्रातील योगदानाची नोंद घेऊन त्यांना १९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला. १९९९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला. २००१ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे ' भारतरत्न ' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण हस्ते हा पुरस्कार दीदींना देण्यात आला.
संगीत क्षेत्रातील त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यात उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. या शिवाय पार्श्वगायनासाठी अनेक वेळा त्यांची फिल्मफेअर पुरस्कारासाठी निवड झाली. या पुरस्कारांसाठी त्यांच्याशी स्पर्धा करेल अशी गायिका असणे दुरापास्त होत असे. शेवटी १९६९ मध्ये स्वतः दीदींनीच गायकांना देखील उत्तेजन आणि संधी मिळावी म्हणून आपण फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारणार नाही असे जाहीर केले. हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा ! १९८९ मध्ये चित्रपट क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला. दीदींना मिळालेले हे एकेक पुरस्कार पाहिले तर यातील एकेक पुरस्कार मिळण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी एखाद्याला आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागेल. त्या केवळ गायिका नाहीत. एक उत्कृष्ट संगीतकार देखील आहेत. लतादीदींनी केवळ पाचच मराठी चित्रपटांना ' आनंदघन ' या नावाने संगीत दिले. पण त्यातील ' शूर आम्ही सरदार ', डौल मोराच्या मानेचा, राजाच्या रंगमहाली, रेश्माच्या रेघांनी, ऐरणीच्या देवा, नको देवराया..' माळ्याच्या मळ्यामंदी, यासारखी गाणी अक्षरशः अजरामर केली आहेत. त्यातील साधी माणसं या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ठ पार्श्वगायिका म्हणून आणि उत्कृष्ठ संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
अनेक विद्यापीठांनी दीदींना सन्माननीय डी लिट पदवी देवून गौरविले आहे. त्यात बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आदी विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त संकेश्वरपिठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ' स्वरभारती ' या पुरस्काराने गौरवले तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ' स्वरमाऊली ' या सार्थ नावाची पदवी देऊन सन्मानित केले. खरे तर आता अशी वेळ आली होती की दीदींना पुरस्कार देण्याऐवजी त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना गौरवले गेले पाहिजे. आणि तसेच झाले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्य सरकारांनी ' लता मंगेशकर ' नावाचा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. मध्यप्रदेश दीदींची जन्मभूमी. कारण त्यांचा जन्म इंदूरला झाला. आणि महाराष्ट्र ही कर्मभूमी. या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश सरकारतर्फे देखील ' लता मंगेशकर पुरस्कार ' प्रदान केला जातो. एखाद्या गायिकेच्या नावाने तीन राज्ये पुरस्कार देतात, हा दीदींचा केवढा मोठा गौरव !
दीदींना मिळालेले काही पुरस्कार किंवा सन्मान असे आहेत की त्यांनी केवळ दीदींचाच गौरव झाला असे नाही तर आपल्या भारताची मानही गर्वाने उन्नत झाली. जगातील अनेक देशांना लतादीदी या आपल्या आहेत असे वाटू लागले. अनेक राष्ट्रांनी त्यांना आपले नागरिकत्व प्रदान केले. खऱ्या अर्थाने ' वसुधैव कुटुंबकम ' चा प्रत्यय दीदींना आणि भारतालाही आला. फ्रान्समधील सर्वोच्च मानाचा ' लीजन ऑफ ऑनर ' हा पुरस्कार दीदींना देण्यात आला. १९८० मध्ये द. आफ्रिकेतील जॉर्ज टाऊन, गियाना येथे त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याच वर्षी त्यांना द. अमेरिकेतील सुरिनाम प्रजासत्ताकाकडून सन्माननीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. १९८५ मध्ये दीदींचा टोरांटो, कॅनडा येथे दौरा होता. तेथील त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ ९ जून हा दिवस कॅनडा सरकारतर्फे ' आशिया दिन ' म्हणून जाहीर करण्यात आला. हा एका भारतीय गायिकेचा केवढा मोठा गौरव आहे ! दीदींचा सर्वात मोठा गौरव म्हणजे त्यांना लंडनमधील ' अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची मिळालेली संधी. यापूर्वी कोणत्याही भारतीय व्यक्तीला तिथे कार्यक्रम करण्याची संधी दिली गेली नव्हती.
अल्बर्ट हॉल म्हणजे ब्रिटिशांच्या अस्मितेचे जणू प्रतीकच ! ब्रिटिशांखेरीज तिथे कार्यक्रम करण्याची परवानगीच मिळायची नाही. ज्या भारत देशावर ब्रिटिशांनी राज्य केले, त्यांच्याच अल्बर्ट हॉलमध्ये लतादीदींच्या सुरांनी राज्य केले. एवढेच नव्हे तर एका खास कार्यक्रमात दीदींना इ एम आय लंडनचा ' गोल्डन डिस्क ' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते वर्ष होतं १९७४ . या कार्यक्रमाच्या वेळी माई मंगेशकर सुद्धा उपस्थित होत्या. मास्टर दीनानाथांचे ' एक दिवस माझी मुलगी राज्य करेल ' हे शब्द लतादीदींनी खरे ठरवले होते. १९८७ मध्ये ह्युस्टन टेक्सास ( अमेरिका ) तर्फे सन्माननीय नागरिकत्वाची पदवी बहाल करण्यात आली. या शिवाय विविध जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, आशा भोसले पुरस्कार या पुरस्कारांच्या त्या प्रथम मानकरी आहेत.
लतादीदी हे पुरस्कारात बसणारं व्यक्तिमत्व नव्हे किंवा मिळालेल्या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचं मोजमाप करता येणार नाही. त्यांच्या कार्याचं मापन करायचं तर सगळ्याच फूटपट्ट्या कमी पडतील. अथांग आभाळाला कोणती फुटपट्टी लावणार ? हिमालयाची उंची फुटात, मीटरमध्ये मोजताही येईल कदाचित पण त्याचे सौंदर्य, त्याची भव्यता यांना कोणते मोजपट्टी लावणार ? तो तर भारताच्या अस्मितेचे प्रतीक ! तशीच गोष्ट या स्वरसमाज्ञीची देखील. तिची कारकीर्द, तिने गायलेली गाणी, तिला मिळालेले पुरस्कार मोजता येतीलही, पण ज्या स्वरचांदण्याचा अमृतवर्षाव त्यांनी आपल्यावर केला आहे, त्याचा हिशेब कसा लावणार ? त्या वर्षावात चिंब भीजणेच श्रेयस्कर !
( या लेखमालेचा शेवटचा भाग बुधवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२०/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा