मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस



उगवतीचे रंग
भारतरत्नावली

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

रंगुनी रंगात साऱ्या...

' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे.

या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्या या गुणांची साक्ष देणारी आहे. सुरेश भटांचा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, त्याच सुमारास ग. दि. माडगूळकर यांना कवी म्हणावं की गीतकार अशी चर्चा सुरु होती. त्याबद्दल लिहिताना दीदी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ' तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की या कसोटीला निश्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते, गीतकाराला कवी मानावे की नाही या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे उत्तम काव्यही असावे लागते याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसे पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची मोगरा फुलला, पैल तो गे काऊ कोकताहे, घनु वाजे घुणघुणा किंवा रूप पाहता लोचनी ही गीतेच आहेत ना ? पण त्यातले काव्य अस्सल नाही असे कोण म्हणेल ? '

मालवून टाक दीप ' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. ' बोल ऱे हळू उठेल चांदण्यावरी तरंग ' या सारखी त्या गीतातील नाजूक आणि रम्य कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली. ' आपल्या प्रस्तावनेत पुढे त्या म्हणतात, ' हे गाणं किंवा जे काव्य कलावंताच्या हृदयातून उत्स्फूतपणे प्रकट होते ते ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरळता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात प्रवेश करतो. आपल्या संतकवींची कितीतरी काव्य अशी उत्कट आणि हृदयस्पर्शी आहेत. ' ही प्रस्तावना बरीच मोठी आहे पण दीदींच्या काव्याच्या मर्मग्राही प्रतिभेचं दर्शन घडवण्यासाठी वरील मजकूर पुरेसा बोलका आहे.

दीदींचं क्रिकेटप्रेम, त्यांची छायाचित्रणाची छायाचित्रणाची आवड या गोष्टी तर बहुतेक सर्वाना माहिती आहे. त्या उत्तमोत्तम पदार्थ करून घरच्यांना खाऊ घालतात. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ त्या उत्तम करतात. पण यापेक्षाही काही वेगळ्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दीनानाथ मंगेशकर यांचे अतिशय जवळचे संबंध होते. दोघांचेही एकमेकांकडे येणेजाणे होते. स्वा. सावरकरांच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने भारून जात असे. दीदी लहान असताना त्यांच्याकडे जात असत. इतरांशी राजकारणावर तासनतास बोलणारे तात्याराव छोट्या लताशी तो विषय सोडूनच बोलत. ते आपल्या मुलीप्रमाणे तिला वागणूक देत. एकदा लताने स्वतःहूनच त्यांना विचारले की मी देशसेवा करण्यासाठी राजकारणात जाऊ का ? त्यावर ते म्हणाले, ' बेटा, तुला तुझ्या वडिलांप्रमाणे संगीताचा कान आहे. संगीत हा तुझा श्वास.. सूर हेच तुझं दैवत ! मग या देवतेचीच उपासना कर. हे सोडून तू राजकारणात पडू नकोस. ' स्वा. सावरकरांच्या या शब्दांचा दीदींवर एवढा प्रभाव पडला की त्यांनी तत्क्षणी राजकारणात येण्याचा विचार सोडून दिला तो कायमचाच आणि स्वतःला संगीतात वाहून घेतले.

त्यांच्या आईला म्हणजे माईला रहस्यकथा वाचण्याची आवड होती. ही आवडही लतादीदींकडे जणू वारशाने आली. त्यांना रहस्यकथा वाचायला आवडतात. सी आय डी ही त्यांची आवडती मालिका आहे. लतादीदी आणि पं भीमसेन जोशी या दोन भारतरत्न प्राप्त महान कलाकारांमध्ये गायन या कलेशिवाय आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे दोघांनाही रहस्यकथा वाचायला आवडतात. पं भीमसेन जोशींची गायकी जेव्हा ऐन बहरात होती, तेव्हा त्यांना आपल्या दौऱ्यानिमित्ताने वारंवार विमान प्रवास करावा लागे. त्यामुळे पु. ल. देशपांडे त्यांना गमतीने ' हवाई गंधर्व ' म्हणत. अशा या हवाई गंधर्वांच्या बॅगेत रहस्यकथांची पुस्तके असत. बाबुराव अर्नाळकर हे त्यांचे आवडते लेखक. दीदींना त्यांची ही आवड माहिती होती. त्यामुळे जेव्हा केव्हा विमानतळावर त्या दोघांची भेट होई, तेव्हा दीदी त्यांच्याकडून हक्काने ती पुस्तके मागून घेत. तेही मग हसत हसत आपल्याजवळील पुस्तके काढून दीदींना देत असत.

दीदींना आलेला एक आगळावेगळा अनुभव. हा अनुभव दीदींनीच स्वतः हरीश भीमाणी यांना एकदा सांगितला आहे. हा अत्यंत खाजगी ( पर्सनल ) अनुभव असल्याने तो छापू नका असे स्वतः दीदींनीच त्यांना सांगितले होते. पण नंतर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी या गोष्टीला काही आक्षेप घेतला नाही. दीदींना आपलं गाणं गाताना अनेकदा हा अनुभव आला आहे. एखादं गाणं सुरु असतं. त्याची रिहर्सल किंवा रेकॉर्डिंग सुरु असताना दीदींच्या कानात मधूनच ' लता ' असा आवाज येतो. त्या दचकतात. आवाज तर स्पष्टपणे ऐकू आलेला असतो. त्या चमकून वादकांकडे पाहतात. पण त्यांचे वाद्य वाजवणे नेहमीप्रमाणे सुरूच असते. मग त्या पुन्हा गायला सुरुवात करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या गाण्याच्या वेळी असा आवाज त्यांना ऐकू आला ते गाणं अत्यंत लोकप्रिय होतं. हरीश भीमाणीनी दीदींना विचारले की हा आवाज तुम्हाला तुमच्या वडिलांचा असावा असं वाटतं का ? त्यावर दीदींनी ' होय ' असे उत्तर दिले. त्यावेळी हृदयनाथही उपस्थित होते. ते एवढेच म्हणाले, ' दीदीच्या गळ्यातून बाबा गात असतात. '

दीदी पूर्वी अनेक वेळा आळंदीला जात असत. त्यावेळी समाधीवर आजच्यासारखा मुखवटा नव्हता. मूळ समाधी होती. त्यावेळी दीदींच्या मनात येई की इथे या समाधीखाली ज्ञानेश्वर माऊलींचे वास्तव्य आहे. त्यांचे अस्तित्व त्यांना उत्कटपणे जाणवत असे. त्या तेथील पुजाऱ्यांना म्हणत, ' मला एका कोपऱ्यात शांतपणे बसू द्या. ' मंदिरात एका कोपऱ्यात त्या निवांत बसून राहत. त्यावेळी त्यांना खूप आंतरिक समाधान वाटत असे. कसला तरी आधार आपल्याला मिळतो आहे अशी आतून प्रचिती त्यांना येत असे. हीच एकरूपता, हेच आंतरिक समाधान त्यांनी माऊलींचे अभंग जेव्हा गायले तेव्हा त्यांना अनुभवण्यास मिळाली. आळंदीला कधीही आले तर त्यांच्या मनाला मुक्त, निर्भर आनंद मिळत असे. पण पुढे पुढे आळंदीला गर्दी होऊ लागली, त्यांना हवी असलेली शांतता मिळेनाशी झाली. दुकाने, गजबजाट वाढू लागला. माणसे त्यांच्याभोवती गर्दी करू लागली. तेव्हापासून त्यांनी आळंदीला जाणे कमी केले.

दीदींना कधी कधी आपल्या दैनंदिन जीवनाचा कंटाळा आला की सरळ पन्हाळा किंवा त्यांच्या आवडीचे एखादे निसर्गरम्य ठिकाण गाठत. अशा वेळी त्या निर्माते, संगीतकार कोणालाही आपला पत्ता लागू देत नसत. तेथे त्यांच्या मनाला अपार शांतता मिळत असे. पण आता आळंदीसारखीच स्थिती या किल्ल्यांवर झाली आहे. तेथील शांतता, पावित्र्य नष्ट होत चालले आहे. तेथे होणाऱ्या पार्ट्या, नाचगाणी इ मुळे निर्माण झालेल्या घाणेरड्या वातावरणामुळे दीदी आता व्यथित होतात.

दीदींना भेटण्यासाठी नेहमी वेगवेगळे लोक येतात. त्यांच्या भेटीला कुणी बंगाली माणूस आला की त्यांचे त्या माणसाशी सुरुवातीला अस्खलित बंगालीत पंधरावीस मिनिटे बोलणे सुरु राहते. ' कि खोबोर दादा ? ' तो माणूस आश्चर्यचकित होतो. कोणी पंजाबी व्यक्ती आली की ' ससरी गल महाराज ' आणि उर्दूबद्दल तर काही बोलायलाच नको. उर्दूचे प्रसिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी तर म्हणतात, ' हमारे गीतोमे सिर्फ लताजी ही कुछ फर्क कर सकती हैं ' एवढे त्यांचे विविध भाषांवर प्रभुत्व आहे.

दीदींबाबत घडलेला एक गमतीदार किस्सा मीनाताई खडीकर यांनी आपल्या ' तिची मोठी सावली ' या पुस्तकात सांगितला आहे. दीदी जरी स्पष्टवक्त्या असल्या तरी कधी कधी समोरच्या व्यक्तीची त्यांना भीड पडते. त्यातूनच निर्माण झालेला हा गमतीदार प्रसंग. एकदा दीदी स्टुडिओत गेल्या असताना तिथे एका नवोदित गायिकेचे गाणे रेकॉर्ड होत होते. त्या बाईंचे गाणे अगदीच सुमार दर्जाचे होते. बराच वेळ ते ऐकल्यावर दीदी कंटाळल्या. पण त्या बाई ओळखीच्या असल्याने त्यांना तिथून निघून जाणेही योग्य वाटेना. शेवटी त्या रेकॉर्डिस्टला म्हणाल्या, ' या बाई काही फार चांगल्या गात नाही हो. ' हे ऐकल्यावर तिथे जवळच उभे असणारे एक गृहस्थ म्हणाले, ' अहो, ती माझी बायको आहे. ' दीदींना जरा ओशाळल्यासारखे झाले. त्या म्हणाल्या, ' नाही. तसं नाही. बाईंचा आवाज आणि गाणं तसं चांगलंच आहे. पण चाल चांगली असती तर हे गाणं चांगलं झालं असतं. आता ते गृहस्थ थोड्याशा नाराजीनेच म्हणाले, ' चालही माझीच आहे. ' आता दीदींची जरा पंचाईतच झाली. त्या म्हणाल्या, ' तशी तर चालही खरे म्हणजे चांगलीच आहे. पण काव्य ? त्यात काही रस नाही हो. त्यात तुमचा काय दोष ? ते चांगलं असतं तर तुमच्या चालीला आणि आवाजालाही न्याय मिळाला असता. ' आता ते गृहस्थ अगदीच ओशाळले. ते म्हणाले, ' दीदी, हे काव्य सुद्धा मीच लिहिले आहे.' आता मात्र दीदींची सपशेल विकेट पडली होती.

असा एखादा अपवादात्मक प्रसंग सोडला तर दीदी नेहमी खेळकर, हसतमुख, विनोदी वृत्तीच्या. चेहऱ्यावर एक प्रसन्नता. मुद्रा आणि वृत्ती मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे आणि त्यांच्या गाण्याप्रमाणे ताजी टवटवीत. दीदींचा हा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्या आनंदाचं, दीर्घायुष्याचं रहस्य सांगताना दीदी म्हणतात, ' मी जगण्यातला आनंद घेत गेले. जे आवडेल ते खाल्लं. पण त्यातही शिस्त बाळगली. मग ते अंगवळणी पडलं. समृद्धी आल्यानंतरही जर जगण्यातला आनंद लुटला नाही तर ते कसलं जगणं ? माणसानं आनंदयात्री असायला हवं असं मला वाटतं. जगण्यात आनंदाचे निखळ क्षण उपभोगलेत, तर मनानं तुम्ही आपोआप फिट राहता. शरीर फिट राहण्यासाठी मन अधिक फ्रेश हवं. मी कुठल्याही फिटनेस सेंटरमध्ये गेले नाही. ना माझे कोणी फिटनेस गुरु आहेत. वाचते, मोजकं खाते. कुटुंबियांसोबत आनंदात वेळ घालवते. फक्त तीच गाणी गाते जी मी मनापासून सहजतेने गाऊ शकेन. मग वर्षभरात अशी एकदोन गाणी मिळाली तरी चालतील.दर्जेदार संगीताचं अस्तित्व पार नष्ट झालेलं नाही. असं गाणं जे मनाला पटेल तेच मी गाते. केवळ गाणं गायचं म्हणून मन मारून गाणं मला जमणार नाही. .. आजही मी चांगलं संगीत ऐकते, रियाझ करते. माझं मन, माझा आत्मा सूर आणि संगीत यांच्यापासून कधीही दूर होऊ शकत नाही. ..' दीदींचे हे शब्द पुरेसे बोलके आहेत. ते त्यांच्या अनुभवाचं सार आहे.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१६/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...