उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग सदोतीस
नायिका अनेक, स्वर एक
लतादीदींनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत अनेक नायिकांना आवाज दिला आहे. रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रींच्या अभिनयाला जिवंत करण्याचे श्रेय निर्विवादपणे लतादीदींना द्यावे लागेल. लतादीदींनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याआधी चित्रपटात जर दोन अभिनेत्री असतील तर दोघींसाठी वेगवेगळ्या गायिकेचा आवाज वापरला जायचा. पण लतादीदी आल्या आणि गाण्यांची परिभाषाच बदलली. संगीतकार पूर्वीच्या गायिका डोळ्यांसमोर ठेवून ज्या चाली करायचे, त्यांना गायिकांच्या आवाजाची मर्यादा असायची. पण लतादीदींचे आगमन झाले आणि संगीतकारांना जणू आपली ड्रीम सिंगर गवसल्याचा भास झाला. आता ते अवघड रचना केवळ लतादीदींना डोळ्यासमोर ठेवून बांधू लागले. कधी कधी संगीतकारांना आपल्या मनातील भाव शब्दात सांगता यायचा नाही. पण लतादीदींचे वैशिष्ट्य असे की संगीतकाराच्या चाली, त्याच्या मनातील भाव शतपटीने, सहस्रपटीने सुंदर होऊन दीदींच्या गळ्यातून बाहेर पडायचे.
एक काळ होता की जेव्हा दीदींचा आवाज पातळ आहे, किनरा आहे, तो नायिकेला शोभणारा नाही म्हणून नाकारला गेला होता. पण संगीतकार गुलाम हैदर यांच्यासारख्या रत्नपारख्याने या हिऱ्याची अचूक पारख केली होती. लतादीदींचा आवाज नाकारणाऱ्या शशिधर मुखर्जींना त्यांनी सांगितले होते की एक दिवस सगळी चित्रपटसृष्टी हिच्या पायाशी लोळण घेईल. तिच्यासाठी निर्माते, संगीतकार तिष्ठत राहतील. त्यांचे भाकीत शब्दशः खरे ठरले. प्रत्येक नायिकेला लतादीदींचा आवाज आपल्या भूमिकेसाठी हवा असे वाटू लागले. निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आपले चित्रपट ' लता ' या चलनी नाण्याशिवाय चालणार नाहीत असे वाटण्याचा एक काळ आला. तिच्या तारखा मिळाव्या म्हणून निर्माते आपल्या चित्रपटांची निर्मिती तिची तारीख मिळाल्यानंतर करू लागले.
विविध चालींची, विविध ढंगांची गाणी त्यांनी गायली. कधी कधी अल्लड,अवखळ तरुण मुलीच्या भावना त्यांच्या गाण्यातून व्यक्त झाल्या तर कधी त्यात होती प्रणयाची गोडी, कधी गाण्यांमधून प्रकटली प्रेमाची उदात्त भावना, कधी विरह, कधी भक्तिभाव. नायिकांच्या अनेक पिढ्या सरल्या पण दीदींच्या आवाजाची जादू, खुमारी तशीच राहिली. जुन्या जमान्यातल्या अगदी नर्गिस, मधुबाला, वैजयंती माला, वहिदा रहमान, आशा पारेख, साधना, सायराबानू, हेमा मालिनी, जयाप्रदा, रेखा, राखी, जया भादुरी , श्रीदेवी, जयाप्रदा, नितु सिंग पासून ते अगदी अलीकडील काजोल, भाग्यश्री, रती अग्निहोत्री, टीना मुनीम, माधुरी दीक्षित पर्यंत. दीदींच्या गळ्यातील गंधार म्हणजे ईश्वरी देणगी ! पण त्याला त्यांनी अपार कष्टाची, साधनेची जोड दिली. त्या सतत नवनवीन गोष्टी शिकतच राहिल्या. म्हणूनच त्या आपले सर्वोच्च स्थान टिकवून ठेवू शकल्या.
त्यांच्या अनेक नायिका आणि अनेक चित्रपटातली गाणी माझ्या डोळ्यासमोर फेर धरून नाचताहेत. माझ्या डोळ्यासमोर येतं आहे ' मेरा साया ' मधील गाणं. ' तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा..' हे ते अप्रतिम गीत. साडी नेसलेली, गजरा बांधलेली प्रसन्नवदना साधना आणि सुनील दत्त यांच्यावर हे गीत चित्रित झालं आहे. प्रेमाची उत्कटता, परिपूर्णता, एकजीव होणं म्हणजे काय असतं ते हे गीत जो मनापासून ऐकेल त्याला वेगळं सांगावं लागत नाही. हीच तर लतादीदींच्या सुरांची जादू आहे. गाणंच इतकं सुंदर आहे की साधनाला फार अभिनय करण्याची गरज पडली नसावी. दीदींचा हा अमृतात न्हालेला स्वर खरंच आपलीही सावलीप्रमाणे साथ करतो. आपल्याला आश्वस्त करतो, धीर देतो. युगायुगातून होणारी लतादीदींसारखी एखादी गायिका चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. अशा वेळी चित्रपट संगीताला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर नवल नाही ! चित्रपट संगीताला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर नायक नायिकेप्रमाणे गायक, गायिका, गीतकार आणि संगीतकारही ' स्टार ' झाले. नायक नायिकांप्रमाणे त्यांचेही चाहते ( आजच्या भाषेत फॅन ) निर्माण झाले.
अभिनेत्री चित्रपटातील ' सा रे गम प ...' हे गाणं आठवा. अवखळ अशी हेमा मालिनी आणि शशी कपूरचा निष्पाप, निरागस चेहरा. लतादीदींचा सूर आणि हेमा मालिनीचा अभिनय यामुळे हे गाणं जिवंत झालं आहे. त्याचप्रमाणे ' सावन का महिना पवन करे शोर ...' मधली नूतन. दोन्ही गाण्यांची सिच्युएशन बहुतेक सारखीच आहे. दोन्ही गाण्यात गाणं शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नायिका दोन आहेत, हेमा मालिनी आणि नूतन. पण स्वर एकच आहे. तो म्हणजे लतादीदींचा ! अशी शेकडो उदाहरणं !
लतादीदींनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली पण प्रत्येक वेळेला त्यांचं नवीन गाणं हे ताजं टवटवीत वाटतं. दीदींचा आवाज, त्यांची गायनाची शैली, त्यांची एखाद्या गाण्याचा विचार करण्याची पद्धत कोणासारखी आहे ? तर ती त्यांच्यासारखीच ! Lata is unique ! उसका अंदाजही कुछ अलग है ! ' लता ' हे एक वेगळेच रसायन आहे. संगीतकार दत्ता डावजेकरांच्या शब्दात सांगायचं तर ' लता ' मधला ' ल ' म्हणजे लय आणि ' ता' म्हणजे ताल. हे दैवी लेणं घेऊनच ती जन्माला आली आहे. आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रत्येक भावभावनांना लतादीदींनी आपल्या स्वरांनी मूर्त रूप दिले आहे. गाणं गाणाऱ्या गायिका खूप असतात पण आपलं गाणं कोण गाणार आहे, तिचं वागणं, बोलणं या सगळ्यांचा विचार करून लतादीदींचं गाणं आकार घेतं. प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे यांनी लतादीदींचा गौरव करताना म्हटले आहे, ' लता गाते तेव्हा ती नायिका होते आणि पडद्यावरच्या सुंदर नायिका पार्श्वनायिका होतात. '
असं का होत असेल याचा विचार करताना मला असं वाटतं की मुळातच दीदींमध्ये एक अभिनेत्री दडलेली आहे. दीदींनी पडद्यावरच्या भूमिका करणं सोडलं पण ही भूमिका त्या आयुष्यभर करत राहिल्या. गाणं गाताना त्या त्या अभिनेत्रीच्या भूमिकेत शिरतात. दीदींना जणू परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त आहे. त्याशिवाय का हे शक्य आहे ? लतादीदींच्या या अलौकिक सामर्थ्याबद्दल बोलताना अभिनेत्री नर्गिस यांनी म्हटलं आहे, ' त्यांचा दर्दभरा आवाज कानात साठवावा आणि सरळ कॅमेऱ्यापुढे जावं. अभिनय करावाच लागत नाही. ' तर मीनाकुमारींनी म्हटलं होतं, ' त्यांनी गायलेलं गाणं पडद्यावर साकार करताना आम्हाला मुळीच कष्ट होत नाहीत. त्यांचे स्वर कानावर पडले की आपोआपच स्फूर्ती येते. ' या अभिनेत्रींच्या बोलण्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. त्यांचंच काय पण त्यांनी गायलेल्या कोणत्याही अभिनेत्रीचं गाणं आठवा, याच प्रत्यंतर आपल्याला येईल. मीनाकुमारीचं ' अजीब दास्तां हैं ये कहाँ सुरू कहाँ खतम ' हे गाणं घ्या किंवा पाकिजा मधलं ' मौसम हैं आशिकाना ' असो लतादीदींचा आवाज आणि मीनाकुमारीची अदा अगदी एकरूप झाल्या आहेत. कुठेही वेगळेपण, कृत्रिमता जाणवणार नाही. ' मधुबालाला ईश्वरी सौंदर्याची देणगी लाभली. पण तिचं सौंदर्य आणि लतादीदींचा स्वर यांचा सुंदर मिलाफ जेव्हा होतो तेव्हा ' मुगल-ए-आजम ' मधील ' प्यार किया तो डरना क्या ' सारखी अजरामर गाणी जन्म घेतात. मधुबालाचं सौंदर्य आणि लतादीदींचा स्वर म्हणजे दुधात साखर असं म्हणण्यापेक्षा त्याची उत्तम प्रतीची बासुंदीच तयार होते. ही बासुंदीची वाटी सरळ उचलावी त्या स्वर्गीय चवीचा आस्वाद घ्यावा. ज्याला ही चव कळली, चाखता आली, तो भाग्यवान !
नायिकांच्या विविध भाव भावना लतादीदींनी किती समर्थपणे व्यक्त केल्या आहेत याची काही सुंदर उदाहरणं पाहू या. ' आयेगा आनेवाला ' किंवा ' जरासी आहट होती हैं तो दिल सोचता हैं ' मधली वाट पाहणारी प्रेयसी, ' रसिक बलमा ' मधील प्रेयसीची व्याकुळता व्यक्त करणारी नर्गिस, ' काटो से खिंचकर ये आंचल ' मधील आपला आनंद मुक्तपणे व्यक्त करणारी वहिदा रहमान, ' क्या जानू सजन ' या गीतातील प्रियकराच्या आगमनाने आनंदून गेलेली आशा पारेखच्या रूपातील प्रेयसी, ' दिल तो हैं दिल ' मधील आपल्या प्रेमाचा आनंद व्यक्त करणारी राखी, ' न जाने क्यूँ ' या गीतातील मनाची कातर अवस्था व्यक्त करणारी विद्या सिन्हा , ' चॉकलेट, लाईम ज्यूस ' या गाण्यातील अल्लड माधुरी दीक्षित, ' तुझसे नाराज नहीं जिंदगी ' मधील गुलजार यांच्या गीताचं सोनं दीदींच्या आवाजानं केलं आहे. या सुंदर गाण्याची तारीफ करण्यासाठी शब्द कमी पडतील. विचारप्रवृत्त करणारं, जीवनाचं सार सांगणारं हे अर्थपूर्ण गाणं या गाण्यातील भावना लतादीदींच्या आवाजात मूर्त होऊन समोरच्याच्या काळजाचा ठाव घेते. अशी किती तरी अप्रतिम गाणी. काही गाण्यांचा फक्त उल्लेख करतो.
' कटी पतंग ' मधलं ना कोई उमंग हैं , ' वह कौन थी ' मधलं ' लग जा गले ', ' लुकाछुपी बहुत हुई ' मधील मातेची आर्तता , ' आजकल पांव जमीं पर नही पडते मेरे ' मधील मुक्त आनंदाची भावना व्यक्त करणारी प्रेयसी, ' दीदी तेरा देवर दिवाना ' मधील खेळकरपणा, ' मेरा पढने में नही लागे दिल ' मधील अवखळपणा, ' ओ सजना बरखा बहार आई ' मधील आनंद व्यक्त करणारी प्रेयसी या गाण्यातील पावसाचा वर्षाव जणू आपल्यावरही होतो. आपण या स्वरांमध्ये चिंब भिजतो एवढे सामर्थ्य लतादीदींच्या आवाजात आहे. उदाहरणं दिली तेवढी कमी आहेत. आपणही या सुरांच्या वर्षावात भिजू या आणि इथेच थांबू या. लतादीदींच्या गाण्यांवर जास्त बोलण्यापेक्षा ती गाणी ऐकणे या सारखा दुसरा आनंद नाही.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०९/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
(लेख आवडल्यास नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा