उगवतीचे रंग
चला, आपण आधुनिक कोलंबस होऊ या...
परवाच्या दिवशी आमच्या घर आणि जवळच्या परिसरात माकडे आली होती. पूर्वी क्वचितच मानवी वस्तीत दिसणारे हे वन्य जीव आता दिसणे नित्याचे झाले आहे. माकडे दिसली की त्यांच्या मागे वस्तीतील कुत्री लागतात. लहान मुले त्यांना मारण्यासाठी दगड घेऊन त्यांच्या मागे पळतात. माझा लहान नातू माझ्याकडे आला होता. त्याने विचारले, ' आजोबा, माकडं तर जंगलात राहतात ना ? मग आपल्या घराजवळ कशी काय येतात ती ? ' तसा तो लहान असल्याने त्याला फार काही सांगण्यात अर्थ नव्हता. पण त्याला म्हटलं, ' अरे, आपल्याला कसं रोज जेवण हवं असतं ना...! तसं त्यांनाही हवं असतं. पण आता दिवसेंदिवस जंगलात त्यांना काही मिळत नाही. म्हणून आपल्या अन्नाच्या शोधार्ध ते मानवी वस्तीत येतात.
माणसानं आपल्या बेसुमार हव्यासापायी निसर्गाला हवं तसं ओरबाडलं आहे. शेखचिल्ली जसा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता, तसाच मानवही जणू शेखचिल्लीच झाला. शेखचिल्ली मूर्ख होता, त्याला ही फांदी तोडल्याने आपणच खाली पडून मरणार आहोत हे कळत नव्हते. पण माणसाला मात्र कळतं. माणूस शिकला, त्याने प्रचंड वैज्ञानिक, भौतिक प्रगती केली. तरीही पृथ्वीतलावरील साऱ्या प्राण्यांपेक्षा बुद्धिमान म्हणून शेखी मिरवणारा माणूस आपले हित समजण्यात मात्र प्राण्यांपेक्षा कमीच पडला असं दुर्दैवानं म्हणणं भाग पडतं. माणसानं बेसुमार जंगलं ओरबाडली, नद्यांचे प्रवाह धरणे बांधून अडवले, बांधकामासाठी वाळू लागते म्हणून नद्यांची पात्रे वाळूविरहित केली. नद्यांवर, समुद्रकाठावर भर घालून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांचे परिणाम स्पष्ट दिसत असून, त्यामुळे होणारी हानी डोळ्यांनी पाहूनही तो सुधारायला तयार नाही. बिल्डरांच्या लॉब्या, रेतीचे ठेकेदार आणि त्यांना छुपा पाठिंबा असणारे पुढारी या सगळ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाची वाट लावली आहे. ज्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, अशांवर जीवघेणे हल्ले झाले. तर सर्वसामान्यांची कळते पण वळत नाही अशी स्थिती आहे.
तसे तर ' जीवो जीवस्य जीवनम ' हे निसर्गाचेच तत्व आहे. जंगलामध्ये वाघ, सिंह, लांडगे आदी प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात. समुद्रामध्ये मोठे मासे छोट्या माशांना आपला आहार बनवतात. हे चक्र निसर्गात सुरूच असते. पण त्यातही एक सुसूत्रता असते. निसर्गातील समतोल प्राण्यांमुळे आपोआपच राखला जातो. पण मानवाने त्याच्यातही हस्तक्षेप केला. आपल्या हौसेखातर वन्यजीवांचे शिकार करून प्राण घेतले. मानव जसजसा आक्रमक, विध्वंसक, ओरबाडणारा बनत आहे, तसतसा निसर्गही त्याला तडाखा देतो आहे. समुद्रात मोठ्या माशांनी छोट्या माशांना गिळंकृत करणे नैसर्गिक होते. मानवाने त्याच्या भुकेसाठी जाळे घेऊन मासे पकडणे सुरु केले. तिथपर्यंतही ठीक होते. पण पुढे मोठमोठे मासेमारी करणारे ट्रॉलर्स आले, माणसाच्या हाती विज्ञानाने विध्वंसक शस्त्रे दिली. मग माशांनाही माणसाच्या या वृत्तीचा अंदाज आला. तेही यापासून सावध राहून दूर पळू लागले. तेही त्यांच्या स्वसंरक्षणासाठी प्रयत्न करणारच ना ! आज माणूस विषाणूंमुळे होणाऱ्या विविध आजारांची फळे भोगतो आहे. ते या निसर्गचक्रात हस्तक्षेप केल्यानेच. साध्या डोळ्यांनी न दिसणारा व्हायरस आज प्रगत मानवाला आव्हान म्हणून उभा ठाकला आहे. तो ही टिकून राहण्यासाठी त्याच्या स्वरूपात बदल घडवून आणतो आहे.
कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. त्याच्या मागोमाग युरोपियन माणसे नवीन जागेचा शोध लागल्याने सत्ता, संपत्तीच्या शोधात येऊ लागली. या जंगलात रेड इंडियन्स राहत होते. ते आदिवासी होते. पण नैसर्गिक जीवन जगत होते. त्यांची उपजीविका पूर्णपणे जंगलावर अवलंबून होती. आलेली माणसे गोऱ्या कातडीची होती. त्यांना आपल्यापेक्षा वेगळा वर्ण असलेले रेड इंडियन्स मागासलेले वाटले. गोऱ्यांजवळ प्रगत शस्त्रे होती. त्यांनी केवळ मजा म्हणून जंगलातल्या प्राण्यांची बेसुमार शिकार करायला सुरुवात केली. वाघ, सिंह, हत्ती, हरणांचे कळपच्या कळप त्यांच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडू लागले. त्यांना त्यात बहादुरी वाटू लागली. निसर्गाशी एकजीव झालेल्या आदिवासींना कळेना की हे बाहेरून आलेले लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना का मारत आहेत ?
आदिवासीदेखील प्राण्यांना मारतच होते. पण केवळ तेव्हाच जेव्हा ती आवश्यक गरज होती त्याचवेळी. भूक लागली आणि आता खाण्यासाठी काहीही उपलब्ध नाही, त्यावेळी ते प्राण्याची शिकार करीत. प्राण्याच्या मांसाचा वापर खाण्यासाठी, त्याच्या कातडीचा वापर कमरेभोवती गुंडाळण्यासाठी ते करत. पण या आक्रमकांनी विनाकारण आणि केवळ हौसेखातर मारलेल्या प्राण्यांच्या मृतदेहाचा खच आता जंगलात पडू लागला. ते मृतदेह सडून त्याची दुर्गंधी उठू लागली. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला. आता त्या आदिवासी लोकांना कळेना की हे लोक असे का वागतात ? यांना काही कळत नाही का ? हे असंस्कृत आहेत का ? पुढारलेले युरोपियन ज्यांना असंस्कृत समजत होते, त्याच आदिवासींच्या दृष्टीने हे पुढारलेले गोरे असंस्कृत होते. निसर्गाचे विनाकारण नुकसान करणारे होते. केवळ शिकले, वैज्ञानिक प्रगती केली म्हणून त्यांना सुसंस्कृत म्हणायचे का ?
नद्यांना माता म्हणणारे आपण त्या नद्यांना किती प्रदूषित करतो ! अनेक नद्यांचे पाणी एवढे प्रदूषित झाले आहे की आपण ते शुद्ध केल्याशिवाय पिऊ शकत नाहीत. पवित्र गंगा आपण एवढी प्रदूषित केली की गंगा शुद्धीकरणाची मोहीम आपल्याला राबवावी लागते. तरीही नदीपात्रात कारखाने, गटारांचे प्रदूषित पाणी सोडणे सुरूच आहे. हे सगळे कमी होते म्हणून की काय मध्यंतरी कोरोनाने मृत पावलेल्यांचे मृतदेह उचलून सरळ नदीत फेकून दिले गेले. पण सुदैवाने आज काही हात निसर्ग संवर्धनासाठी पुढे येत आहेत. कोणी एखादी टेकडी त्यांच्यापरीने हिरवीगार करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोणी अशिक्षित स्त्रीपुरुष जंगले वाचवण्यासाठी आयुष्य वेचताना दिसत आहेत. एखादी आदिवासी स्त्री नैसर्गिक बी बियाण्यांचे जतन करताना दिसते आहे. या सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी पेपरमधून वाचत असतो किंवा टीव्ही वर बातम्यातून बघत असतो. पण आजपर्यंत मानवाने निसर्गाचे जेवढे नुकसान केले आहे, त्याच्या संवर्धनासाठी या झगडणाऱ्या हातानं बळ देण्याची गरज आहे.
पर्यावरण शिक्षण शाळांमधून दिले जाते आहे. पण तो केवळ परीक्षेपुरता एक विषय बनून राहिला आहे. पर्यावरणविषयक दोनचार धडे शिकवले, काही प्रोजेक्ट्स करून घेतले की आम्ही पर्यावरण शिक्षण देत आहोत म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण त्यातून फारशी पर्यावरणविषयक जागृती होताना दिसत नाही. ती जागृती तेव्हाच वाढेल जेव्हा तो केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासाचा विषय न राहता आमच्या जगण्यामरण्याशी संबंधित असा हा विषय आहे याची जाणीव आम्ही विद्यार्थ्यांना करून देण्यात यशस्वी होऊ तेव्हा. अन्यथा आम्ही शिक्षित होऊ पण सुसंकृत होऊ का हा प्रश्न आहे. नाहीतर अमेरिकेतल्या रेड इंडियन्सला जसा प्रश्न पडला होता की खरे सुसंस्कृत कोण तशीच आपलीही गत व्हायची. आपल्या भोवतीचा निसर्ग, प्राणी हा आपल्या जीवनाचा असलेला एक घटक आहे. किंबहुना आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत आणि भोवतालचा निसर्ग, प्राणी पर्यावरण यांच्याशी जेव्हा आपण जुळवून घेऊ, त्याला आपल्या जीवनाचा एक भाग समजू तेव्हा खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांचे ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' प्रत्यक्षात येऊ शकेल. नाहीतर तो केवळ तुकाराम गाथेतील केवळ अभंग म्हणूनच राहील.
विज्ञानाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. पण वैज्ञानिक प्रगती याचा अर्थ निसर्गाला हवे तसे ओरबाडणे असा होत नाही. जेव्हा निसर्ग आणि वैज्ञानिक किंवा भौतिक प्रगती हातात हात घालून चालतील तेव्हाच मानवाचा प्रगतीचा, शांततेचा मार्ग प्रशस्त होईल. जशी फळे ही दोन प्रकारची असतात. मधुर, रसाळ आणि सडकी, नासकी किडकीदेखील. आपण रसाळ, मधुर फळे ठेवून घेतो आणि नासकी, किडकी फळे फेकून देतो त्याप्रमाणे निसर्गाच्या, पर्यावरणाच्यासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टी टाकून देता आल्या पाहिजेत. तरच मधुर रसाळ फळे आपल्या हाती लागतील.
त्या कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. त्याच्या मागोमाग जी माणसे तेथे गेली, त्यांनी तेथील निसर्ग, प्राणी इ वर आधाशासारखे आक्रमक करून त्यांचे नुकसान केले. आपल्याला व्हायचे आहे आधुनिक कोलंबस. कोलंबस म्हणजे विजीगीषु वृत्तीचे प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा, निराश न होणारा, आपल्या सहकाऱ्यांना बळ देणारा. तोच कोलंबस आपण होऊ या. भावी पिढ्यांना नवीन रम्य, सुंदर जग दाखवू या. असे जग की जेथे माणसे असतील निसर्ग, झाडे, पशुपक्षी, प्राणी आणि हो माणसांवर सुध्दा प्रेम करणारे...
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२७/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा