उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग अडोतीस
शाश्वत स्वर...
बालकवींचं एक सुंदर गीत लतादीदींनी म्हटलं आहे. गीत अतिशय अर्थपूर्ण आहे.
माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे
सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात.
“निरध्वनी हे, मूक गान हे” यास म्हणो कोणी
नभांत हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले
ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्गानाची गति ही शेवटली.
दीदींच्या गाण्याला हे गीत तंतोतंत लागू पडते. हे नित्याचे गाणे आहे, शाश्वत गाणे आहे. अक्षय गाणे, अभंग गाणे आहे. म्हणूनच या लेखाचं नाव शाश्वताचा स्वर असं दिलं आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीतून तरुन वर आले. काळाच्या कसोटीवरही ते ' अ-भंग ' ठरले. दीदींचा स्वर असाच आहे. त्यांच्या आवाजाला काळाची सीमा नाही. जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात संगीत आहे, तोपर्यंत हा स्वर शाश्वत आहे, अक्षय आहे, अभंग आहे.
हा शाश्वताचा स्वर ज्यांना चित्रपट आवडतात त्यांना तर आवडतोच पण ज्यांना चित्रपट बघायला आवडत नाहीत ( अशीही काही माणसे आहेत ) त्यांनाही प्रिय आहे. सर्वसामान्य माणसांपासून तर संगीताचे जाणकार असलेल्यांनी या सुरांचा गौरव केला आहे. एक प्रसंग आहे. एकदा बडे गुलाम अली खांसाहेब आपल्या शिष्यांसोबत गात होते. बाजूला असलेल्या रेडिओवर अचानक लतादीदींचं गाणं सुरु झालं. खांसाहेबानी आपलं गाणं थांबवलं. शिष्यानाही थांबवलं. आपल्या कानाच्या पाळीला हात लावून ते म्हणाले, ' सुनो, बडे खांसाहेब गा रहे हैं... ' एकदा लतादीदींचे स्टुडिओत गाणे सुरु होते. मो. रफी बाहेरच थांबले होते. त्याचवेळी तिकडून मीनाताई ( दीदींची लहान बहीण ) आल्या. त्यांनी पाहिले तर मो रफींच्या डोळ्यात पाणी होते. रफीसाहेब म्हणजे निर्मळ मनाचा सच्चा माणूस. मीनाताईंनी रफीसाहेबांना त्यांच्या डोळ्यातील अश्रुंचे कारण विचारले तर ते म्हणाले, ' सुनो, लता क्या गा रही हैं. कितनी पाक आवाज हैं. क्या सूर हैं मानो अल्ला की देन. कुदरत का करिष्मा हैं...' बडे गुलाम अली खांसाहेब, मो. रफी यांच्यासारख्या व्यक्तींची ही अवस्था तर सर्वसामान्य माणसाचे काय !
दीदींचं कोणतंही गाणं ऐका. ते थेट हृदयापर्यंत पोहोचतं एवढी त्याची ताकद आहे. कितीही पाषाणहृदयी व्यक्ती असो पण जेव्हा दीदींच्या स्वरातील ' प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई...' कानावर पडलं की त्याचे डोळे ओलावल्याशिवाय राहणार नाही. ' जा मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा ' हे ऐकल्यावर भगिनींचा पदर डोळ्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. ' चंदा हैं तू मेरा सुरज हैं तू..' ऐकल्यानंतर प्रेमाची, वात्सल्याची, ममतेची भावना उरी दाटून येते. ' या चिमण्यांनो परत फिरा रे...' ऐकताना डोळे ओलावल्याशिवाय राहत नाहीत. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...' कानावर पडलो की आपण जेथे असू त्या जागेचे मंदिर झाल्याचा भास होतो. गंध बुक्क्याचा वास येतो. कानी टाळ मृदूंगाचा ध्वनी निनादू लागतो. म्हणूनच हा शाश्वताचा स्वर आहे. शाश्वततेवर विश्वास दृढ करणारा स्वर आहे. स्थल कालाच्या मर्यादा पार करून तो आपल्याला कैवल्याकडे, ब्रह्मानंदाकडे सहज घेऊन जातो.
लतादीदींनी आजवर हजारो गाणी गायली आहेत. या गाण्यांवरून कधी कधी रसिकांचा, तज्ज्ञांचा वादही होतो. सारे मग आपापल्या परीने त्या गीतांची क्रमवारी लावण्याचा प्रयत्न करतात. पण वाऱ्याची कधी मोट बांधता येते का ? जे विश्वव्यापी आहे, त्याला सीमांमध्ये कसं बांधणार ? शेवटी एकच निष्कर्ष निघतो. प्रत्येकच गाणं श्रेष्ठ आहे. गाण्यांची प्रतवारी लावण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाची आवड वेगळीच असते. एखाद्या दागिन्यांच्या दालनात गेल्यावर तऱ्हेतऱ्हेचे दागिने आकर्षकपणे मांडलेले असतात. त्यातील कोणाला कोणता आवडेल हे सांगता यायचे नाही. जो ज्याची जशी क्षमता, पात्रता असेल त्याप्रमाणे दागिन्यांचे मोल करील. पण एक गोष्ट मात्र नक्की असते. दागिने जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यात असलेले सोने एकच असते. दीदींचा स्वर म्हणजे शुद्ध बावनकशी सोनं !
देव, देश, धर्म, भाषा,साहित्य, संस्कृती या दीदींच्या अस्मितेच्या गोष्टी. त्यांना थोडाही धक्का लागलेला त्यांना सहन होत नाही. या विषयांशी संबंधित गाणी असतील तेव्हा तर तो दीदींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मग देशभक्तीने भारलेले ' ऐ मेरे वतन के लोगों...' चे स्वर जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडतात, तेव्हा देशांच्या पंतप्रधानांच्या डोळ्यातही अश्रूंची दाटी होते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मीराबाईंचे अभंग असोत त्यातील पवित्र भावना जणू शब्दातून बाहेर पडून दीदींच्या स्वरात सजीव, साकार होते. स्वा सावरकर, समर्थ रामदास रचना त्यांच्या मुखातून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत सारा देश दीदींच्या सुरांनी बांधला गेला आहे. सगळ्यांना भारतीयत्वाच्या धाग्यात बांधणारा हा सूर आहे. हे बंधन न दिसणारे आहे. ' बंधन ' आहे पण सर्वांना हवेहवेसे वाटणारे आहे. हे असे ' अनोखे बंधन ' आहे की जे कोणी बांधावे लागत नाही. बांधणारा आपण होऊन बांधून घेतो. ' मिले सूर मेरा तुम्हारा...' या गीतात जसे सर्व भाषांतील, सर्व प्रांतातील सूर, संगीत, संस्कृती एकरूप झाली आहे तसाच दीदींचा स्वर भारतीय संस्कृतीशी एकरूप झाला आहे. त्या जेव्हा परदेशात कार्यक्रमांसाठी गेल्या, तेव्हा जणू त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूतच होत्या.
संगीतकार अनिल मोहिले दीदींबद्दल बोलताना म्हणतात, ' दीदींना जेव्हा केंद्र सरकारचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्या इंग्लंडमध्ये होत्या. मी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले. त्यांना म्हटलं की खरं तर आपल्याला हा पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता. तेव्हा त्या म्हणाल्या, ' अनिल, आयुष्यात लवकर आणि उशिरा असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. ' या उद्गारातून त्यांची स्थितप्रज्ञता दिसून येते.
एकदा स्टुडिओत एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरु होतं. त्यावेळी मी त्यांना गमतीनं म्हणालो, ' दीदी, तुमच्या गळ्यात गंधार आहे असं सर्वजण म्हणतात. म्हणजे काय ? ' त्यावर लगेच हसून दीदी म्हणाल्या, ' अनिल, माझ्या गळ्यात ' गंधारचे ' लॉकेट तुला कुठे दिसते आहे का ? ' यावर मी त्यांना म्हणालो, ' माझ्या कल्पनेप्रमाणे तंबोरा परिपूर्ण मिळवला असता, त्याच्या खर्जाच्या षड्जातून अनुध्वनित होणारा गंधार म्हणजेच सुरेलपणाची उच्चतमता आपल्या गायनात आहे. संगीतातील तीनही सप्तकात दीदींचा स्वर लीलया विहार करीत असतो. संगीतावरील अढळ निष्ठा, आत्मविश्वास, रियाझ इ च्या बळावर त्यांनी या संगीतसृष्टीतील सर्वोच्च मानाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यांचे गाणे झऱ्याच्या निर्मळ पाण्यासारखे आहे. नवीन गायकांनी दीदींच्या गाण्यांची अभ्यासपूर्ण श्रवणभक्ती करावी कारण दीदींचे गाणे म्हणजे भारतीय संगीताचे स्वर विद्यापीठच आहे. '
साडेसात दशकांपेक्षा अधिक काळासाठी हा आवाज गात आला आहे. या आवाजाला परतत्त्वाचा स्पर्श आहे. मोगऱ्याच्या सुगंधाचा ताजेपणा आहे, इंद्रधनुष्यातले सातही रंग त्यात एकवटले आहेत. सहस्रकातील हा अजरामर स्वर आहे. आचार्य अत्रे यांच्या शब्दांचा आधार घेऊन बोलायचे तर गेल्या दहा हजार वर्षात अशी गायिका झाली नाही आणि होणारही नाही.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा