उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग एक्केचाळीस ( अंतिम )
' स्वरमाऊली... '
आतापर्यंत ' आनंदघन : लता मंगेशकर ' या लेखमालेचे चाळीस भाग झाले. या भागातून दीदींचे जीवन, त्यांची सांगीतिक कारकीर्द, त्यांनी केलेले विविध संगीतकारांसोबत काम, त्यांचा स्वभाव, गुणवैशिष्ट्ये आदी गोष्टींचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला. पण चाळीस भाग झाले तरी कुठेतरी काहीतरी राहिल्याची जाणीव किंवा दीदींचे व्यक्तिमत्व आपण शब्दात पुरेसे न बांधू शकल्याची खंत मनात होतीच. अर्थात हा एक्केचाळिसावा भाग झाला तरी ती मनात उरणारच आहे. त्याचे कारण म्हणजे परमेश्वर जसा सर्व चराचर सृष्टी व्यापून दशांगुळे वर उरतो, तसेच हे व्यक्तिमत्व आहे. शब्दात न बसणारे. परमेश्वराचे वर्णन करताना वेद, उपनिषदे थकून शेवटी ' नेति नेति ' म्हणतात. तशीच अवस्था दीदींबद्दल लिहिताना होते. दीदींची थोरवी एका वाक्यात सांगायची झाली तर ' दीदींसारख्या दीदीच ! ' असे म्हणावे लागेल किंवा त्यांनीच गायलेलं गाणं ' मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे...' असंच सांगावं लागेल.
परवा रेडिओवर त्यांनीच गायलेलं एक सुंदर असं भक्तीगीत लागलेलं होतं. संत तुकाराम महाराज देवाचं वर्णन करताना म्हणतात,
' कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेमसुख जाणो...'
प्रत्यक्ष परमेश्वराला त्याच्या नावाची महती, गोडी कुठे माहिती आहे ? ती तर भक्तांनाच माहीत ! कमळाला तरी कुठे त्याच्या सुगंधाची जाणीव असते ? ती तर भ्रमरच जाणतात. त्यांना सांगावं लागत नाही. ते आपोआपच त्याच्याकडे आकर्षित होतात. अगदी तशाच लतादीदी ! या स्वरकमलाकडे रसिक श्रोते नामक भ्रमर आकर्षित होतात आणि त्यांना जी त्याची मोहिनी पडते ती कायमचीच !
मागे एकदा कुठल्यातरी टीव्ही वाहिनीवर संगीतविषयक एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात तज्ज्ञ परीक्षक म्हणून बाळासाहेब ( हृदयनाथ मंगेशकर ) उपस्थित होते. त्यांनी एका कवितेच्या संदर्भात एक किस्सा सांगितलेला आठवतो. ते विदर्भात काही कार्यक्रमासाठी गेले असताना तेथे त्यांना एक कविता लिहिलेली आढळली. ती त्यांना इतकी आवडली की त्यांनी ती लिहून घेतली आणि त्या कार्यक्रमात ( टीव्ही वर झालेल्या ) म्हणून दाखवली. मलाही ती ऐकताच तत्क्षणी आवडली. ती कविता अशी आहे -
सागर पोहत बाहू बळाने ।।
नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥
विदर्भातील कवी बोबडे यांची ही कविता आहे. कविता पुरेशी बोलकी आहे. मला वाटतं लतादीदींना ती पुरेपूर लागू पडते. मास्टर दीनानाथ यांचे अकाली निधन झाल्यानंतर पोरसवदा असलेल्या दीदींवर जी जबाबदारी नियतीने टाकली ती म्हणजे आपले घर, लहान भावंडाना सांभाळण्याची. त्यांनी कोणाच्या सहकार्याची अपेक्षा केली नाही. ' सागर पोहत बाहुबळाने..' जे केले ते स्वसामर्थ्याने. त्यांनी स्वतःमधली आत्मशक्ती ओळखली. त्या आत्मशक्तीच्या बळावर त्या स्वतःच प्रकाश झाल्या. आपल्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे, स्वा. सावरकरांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आपले जीवन गायनासाठी वाहून घेतले.
नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥
स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥
तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥
जो करी कर्म अहेतू निरंतर ॥
वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥
ओळख पटली ज्यास स्वतःची ॥
देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥
विदर्भातील कवी बोबडे यांची ही कविता आहे. कविता पुरेशी बोलकी आहे. मला वाटतं लतादीदींना ती पुरेपूर लागू पडते. मास्टर दीनानाथ यांचे अकाली निधन झाल्यानंतर पोरसवदा असलेल्या दीदींवर जी जबाबदारी नियतीने टाकली ती म्हणजे आपले घर, लहान भावंडाना सांभाळण्याची. त्यांनी कोणाच्या सहकार्याची अपेक्षा केली नाही. ' सागर पोहत बाहुबळाने..' जे केले ते स्वसामर्थ्याने. त्यांनी स्वतःमधली आत्मशक्ती ओळखली. त्या आत्मशक्तीच्या बळावर त्या स्वतःच प्रकाश झाल्या. आपल्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे, स्वा. सावरकरांना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आपले जीवन गायनासाठी वाहून घेतले.
श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला जो कर्मयोग सांगितला, तो अर्जुनासह आपल्या सर्वांसाठी आहे. आपले कर्म निरंतर करीत राहणे हाच धर्म. हाच स्वधर्म. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ' विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ' असं म्हणतात. स्वामी विवेकानंद सुद्धा ' ड्युटी इज द फर्स्ट रिलिजन ' असं म्हणतात. हेच दीदी आयुष्यभर करीत आल्यात. ज्याला आपलं कर्म निर्हेतुक, निरंतर करत राहणं हाच आपला धर्म आहे हे कळलं आणि ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला वेदादि गोष्टी कळल्या काय किंवा नाही, परमेश्वर भेटला काय किंवा नाही या गोष्टींनी काही फरक पडत नाही. म्हणूनच स्वतःमधील परमेश्वराला ओळखा असा या कवितेचा सारांश आहे. तेच नेमकं दीदींनी केलं. निरंतर साधना त्या करीत राहिल्या. ' गाणं हाच आपला धर्म आहे ' हे ओळखून अविरत गायनकलेची उपासना केली आणि रसिकांना आनंद दिला.
करवीर पिठाचे शंकराचार्य यांनी लतादीदींना ' स्वरमाऊली ' ही पदवी दिली आहे. मला वाटतं त्यांचं वर्णन करणारे यापेक्षा दुसरे अधिक योग्य शब्द असू शकत नाहीत. स्वरसम्राज्ञी, स्वरांची महाराणी, गानकोकिळा, स्वरलता आदी विशेषणे ' स्वरमाऊली ' या शब्दापुढे फिके पडतात. आपल्या संतांनी पंढरपूरच्या विठुरायाला माऊली असे संबोधले आहे. ही माऊली साऱ्यांचे दुःख, चिंता हरण करते. दीदींच्या गाण्यानेही हेच काम केले आहे, नाही का ? पंढरीच्या वाटेवर वाटचाल करणारे वारकरी विठुमाऊलीवरील श्रद्धेने एकमेकांना देखील ' माऊली ' संबोधत वाटचाल करतात. माऊलीचे दर्शन हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते. पण माऊलीचे दर्शन होवो न होवो, नुसत्या कळसाच्या दर्शनाने सुद्धा ते धन्य होतात. तसे सगळे रसिक श्रोते म्हणजे गानपंढरीचे वारकरी. लतादीदी म्हणजे ' स्वरमाऊली '. या माऊलीचे दर्शन, प्रत्यक्ष भेट घडावी असे कोणाला वाटत नसेल ? पण त्यांचे अमृतस्वर कानावर पडणे हेही मंदिराचा कळस दिसण्यासारखेच आहे. त्या त्यांच्या गाण्यात आहेतच !
आपले वडील मास्टर दीनानाथ हे अकाली गेले. त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळाले नाहीत. ते मिळाले असते तर ते नक्कीच वाचले असते ही खंत दीदी, त्यांची भावंडे आणि त्यांच्या मातोश्री माई मंगेशकर यांना आयुष्यभर सलत राहिली. केवळ पैशाअभावी कोणीही उपचारापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने त्यांनी पुण्यात ' दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची ' स्थापना केली. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सत्तरीच्या वयात दीदींनी निधी जमवण्यासाठी कार्यक्रम केले. हृदयनाथ मंगेशकरांनी तर या कामाला वाहून घेतले होते. आपल्या दुखऱ्या पायाची पर्वा न करता त्यांनी यासाठी अपार मेहनत घेतली. या हॉस्पिटलसाठी अनेक दानशूर लोकांनी देखील हातभार लावला. २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या वास्तूचे उदघाटन केले. या हॉस्पिटलमध्ये चाळीस टक्के गरजू रुग्णांना मोफत उपचार दिले जातात.
या दीनानाथ रुग्णालयाबद्दल बोलताना दीदी म्हणतात, ' असं पहा, माझं जे हॉस्पिटलचं कार्य आहे, ती कदाचित समाजसेवाच म्हणून गणली जाईल. आणि हे कार्य तर माझ्या आयुष्याच्या ह्या वाटेवर येण्याआधीपासूनच सुरु आहे. एक सेवा म्हणून नाही, तर माझ्या मनाची इच्छापूर्ती म्हणून मी हे कार्य करत आहे हा भाग वेगळा. बोलणारे काय, ह्यालाही माझा स्वार्थच म्हणू शकतील. धर्माचरण गोष्ट म्हणाल तर, तिचं पालन मी माझ्या लहानपणापासूनच करते आहे. परमेश्वरानं मला कधीचाच संदेश/प्रेरणा दिली होती की, संगीत हाच तुझा धर्म आहे आणि माझ्या त्याच संगीतधर्माचं पालन/आचरण करण्यात मी आजही मग्न आहे. '
आपल्या वयाबद्दल सांगताना त्या म्हणतात, ' जोपर्यंत मी आरशासमोर येत नाही तोपर्यंत मला माझ्या वयाची जाणीव होत नाही. पूर्वी ज्या गोष्टी मला आवडायच्या त्या आजही मला तितक्याच प्रिय आहेत. विमानात खिडकीशी बसणं, चविष्ट, तिखट खाणं, विनोदी किस्से ऐकणं, प्रवास करणं. माझी आवडती फिल्म ' पडोसन ' अधूनमधून पाहणं. ' दुसऱ्या शब्दात सांगायचं तर दीदी या आनंदयात्री आहेत. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' हा संदेश त्यांनी अमलात आणला आहे. त्यांची एक खंत आहे. त्या म्हणतात, ' माझा रियाझ कमी झाला आहे. पण अजूनही शिकायची उर्मी तितकीच तीव्र आहे. ' त्यांची जीवनाशी असलेली ही बांधिलकी अशीच कायम राहो.
आजच्या संगीताबद्दल बोलताना त्या म्हणतात, ' आपल्या संगीतातलं माधुर्य हरपत चाललं आहे. इंग्रजीने आपल्या भाषेवर आक्रमण करून आपल्या भाषांना फासावर लटकवलंय. खरं तर आपल्या संगीतात इतकी शक्ती आहे की त्यांनीच आपली नक्कल केली पाहिजे. पण इथं तर सगळं उलटंच होतंय. आणि केवळ संगीतच नाही तर अगदी आपल्या रोजच्या जीवनात आपण त्यांचंच अनुकरण करतोय. '
जवळपास साडेसात दशके हा अमृतस्वर लोकांना जीवन जगण्याची ऊर्जा, आनंद देत आला आहे. कदाचित येणाऱ्या पुढील पिढ्यांचा अशी कोणी व्यक्ती होऊन गेली यावर विश्वास बसणार नाही. लतादीदी हा जिताजागता चमत्कार आहे. शी इज अ लिव्हिंग लिजण्ड ! एखादा सम्राट एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर राज्य करतो. त्याच्या राज्यालाही कुठेतरी सीमा असते. शिवाय तो त्या प्रदेशावर राज्य करीत असला तरी, लोकांच्या मनावर राज्य करीत असेलच असे सांगता येत नाही. लतादीदींच्या स्वरसाम्राज्याला सीमा नाही. जातपात, धर्म, भाषा आदी बंधने नाहीत. शिवाय त्या रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करत आहेत. हे हृदयसिंहासन लाभण्याचे भाग्य फार थोड्यांच्या नशिबी येते. या अर्थाने त्या ' स्वरसम्राज्ञी ' आहेतच.
त्यांच्याबद्दल अधिक काय लिहावे ? संगीतकार नौशाद यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेल्या ओळी मला फार आवडल्या. त्याच ओळींनी या लेखाचा आणि लेखमालेचा समारोप करू या.
राहों में तेरे नगमे, महफिल में सदा तेरी,
करती हैं सभी दुनिया, तारीफ लता तेरी ;
दिवाने तेरे फन के इन्सा तो फिर इन्सा हैं,
हद यह हैं कि सुनता हैं आवाज खुदा तेरी;
तुझे नगमों की जां एहले-नजर युंही नही कहते,
तेरे गितों को दिल का हमसफर युहीं नही कहते;
सुनी सबने मुहब्बत की जुबां आवाज में तेरी,
धडकता हैं दिल-ए-हिंदोस्ता आवाज में तेरी !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
संदर्भ ग्रंथ
सप्तसुरांच्या पलीकडे लता मंगेशकर - हरिष भिमाणी
मोठी तिची सावली - मीना मंगेशकर-खडीकर
स्वरसाधना - संपादन - अप्पा परचुरे, रेखा चवरे
स्वरप्रतिभा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा