मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 

एक गोष्ट सांगू... ? 

मंडळी, एक गोष्ट सांगू..? असं म्हटलंय खरं. पण मी गोष्ट वगैरे काही सांगणार नाहीये. म्हणजे आपली अशी म्हणण्याची पद्धत आहे हो ! आपल्या कोणाबरोबर तरी गप्पा सुरु असतात. मध्येच समोरची व्यक्ती म्हणते 'एक गोष्ट सांगू का ? ' म्हणजे ती व्यक्ती काही खरोखरोच गोष्ट सांगणार नसते. तिला आपल्याला काही तरी सांगायचे असते. बोलताना अशा खूप गमती जमती घडतात. पण अशी वाक्ये बोलण्याचा एक उद्देश हा असतो की समोरच्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे. 

घराघरातून कानावर पडणारे ' अहो, ऐकलं का...' हे वाक्यही आपणा सर्वाना परिचित असेलच. मी बऱ्याच वेळा गमतीनं ' नाही ' असं म्हणतो कारण मी त्या आधी काही बोललं गेलेलंच नसतं. तो फक्त आपल्याला बोलावण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी ठेवावी म्हणून केलेला इशारा असतो.  ' अहो, ऐकलं का...' या तीन अक्षरी संबोधनात खूप मोठा अर्थ भरलेला असतो हे मला अनुभवाने कळलं आहे. प्रत्येक वेळा परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळा संदर्भ असतो. उदा. ' अहो, ऐकलं का ? तेवढा फळीवरचा डबा काढून देता का पासून तर त्या अमुक एका दुकानात साड्यांचा सेल लागला आहे, सोन्याचे भाव कमी झालेत म्हणे..! यासंदर्भात अनुभवी आणि जाणकार व्यक्ती अधिक सांगू शकतील. तर फोनवर बोलताना काहींना ( विशेषतः भगिनी वर्गाला )  ' ऐक ना किंवा ऐका ना..' असे शब्द बोलण्याची सवय असते. आता अर्थात आपण जेव्हा फोनवर बोलत असतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचे ऐकतच असतो. त्यातूनही आणखी ' ऐक ना किंवा ऐका ना...' म्हणजे काही तरी व्हेरी इम्पॉर्टन्ट असावे...! ( आणि तुम्ही त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, नाही तर काही खरं नाही...! )

माझ्या एका मित्राची गंमत तुम्हाला सांगतो. बरेचदा आम्ही बरोबर फिरायला जात असतो. त्याला खूप गप्पा मारण्याची सवय आहे. ( तुम्ही त्याला बडबड वगैरे म्हणू शकता. तो बढाया पण खूप मारतो. पण ते जाऊ द्या. ) चालता चालता तो मोठमोठ्याने बोलत असतो. मी त्याचे बोलणे ऐकतही असतो. पण त्याला आपलं उगीचच असं वाटतं की याचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही. मग तो काय करतो की चालता चालता माझा खांदा जोरात दाबतो. आणि ' बरं का, औ, ऐक ना...' यातलं काही तरी म्हणत असतो. मी त्याला सांगत असतो की अरे बाबा मी ऐकतो आहे तुझं ( त्याशिवाय जाणार कुठं ? ) मग बरेच वेळा फिरून आल्यानंतर माझा एका बाजूचा खांदा दुखत असतो नाहीतर हुळहुळा तरी झालेला असतो. कधी कधी खांदा दुखत असला तर दाबला जातो. पण अनुभवाने आता मी शहाणा झालो आहे. एक खांदा बऱ्याच वेळा दाबला गेल्यानंतर मी माझी चालण्याची बाजू बदलून घेतो. म्हणजे दुसराही खांदा दाबला जातो. 

आणखी एक मित्र आहे. त्याची बोलण्याची पद्धत वेगळीच. एकदा गप्पांचा फड सुरु झाला की तो कमालीचा रंगात येतो. मग तो प्रत्येक वाक्य अशा पद्धतीने बोलत असतो की आपण काहीतरी खास बोलत आहोत. असे बोलत असताना त्याचा एक हात टाळीसाठी सदैव पुढे असतो. ( द्या टाळी ! ) मग काय ? आमचे बोलणे संपेपर्यंत टाळ्यांचा व्यायाम छान होतो. ( रामदेव बाबांना हा प्रकार बहुधा माहित नसावा, नाहीतर योगाच्या पॅकेजमध्ये त्यांनी त्याचा अंतर्भाव केला असता  ! ) 

एकदा एक कसला तरी कार्यक्रम व्यासपीठावरून सुरु होता. वक्त्याचे भाषण ऐन रंगात आले होते. माझ्या शेजारी बसलेला माझा एक मित्र मधून मधून हसत होता. मी पाहिले की तो वक्ता काही विनोदी तर बोलत नव्हता. मग माझा हा मित्र का हसत होता ? मी त्याला तसे विचारले. तो म्हणाला. '  नीट ऐका ' या ठिकाणी ' हा शब्द ते किती वेळा बोलतात. ' अच्छा, असं आहे तर... ' मी म्हटले. आता मला एक नवीनच उद्योग लागला. ते वक्ते काय बोलतात याकडे लक्ष देण्यापेक्षा ते ' या ठिकाणी ' किती वेळा बोलतात याकडे मी लक्ष देऊ लागलो. कार्यक्रम संपला तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे चक्क शंभर ते सव्वाशे वेळा ' या ठिकाणी ' बोलले गेले होते असं मी ( या ठिकाणी ) सांगतो. काही काही कार्यक्रमात तर अगदी सुरुवातीपासून ' या ठिकाणी ' चा पाढा सुरु होतो. उदा. या ठिकाणी उपस्थित श्रोते, या ठिकाणी उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे, त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो वगैरे... ! याची झलक आपल्याला टीव्ही वरील बातम्यात अगदी काही मिनिटांसाठी आपलं मत व्यक्त करणाऱ्या राजकीय नेते, वार्ताहर आदींच्या बोलण्यात पाहायला मिळते. तुम्ही नीट निरीक्षण करा ( असं ' या ठिकाणी ' सांगायला हरकत नाही. असो )

आमचे एक शिक्षक मित्र होते. ते आपण गप्पा मारीत असलो की म्हणायचे, ' मला काय म्हणायचं...? ' मी ते ऐकल्यावर मनातल्या मनात म्हणायचो की अरे बाबा, तूच बोलतो आहेस. त्यामुळे ' मला काय म्हणायचं ' हे वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यांना आपलं उगीचच असं वाटत असावं की आपल्या म्हणण्याकडे हे लक्ष देताहेत की नाही.   राजकीय पार्ट्यांच्या प्रवक्त्यांच्या गमतीजमती आणि कोलांट्याउड्या तर वेगळ्याच ! एखाद्या विषयावर आपलं मत तर मांडायचं. पण पुन्हा कोणी काही म्हणेल या भीतीनं ' हे माझं वैयक्तित मत आहे ' असं नंतर  म्हणण्यासारखे आहे. म्हणजे आपण नेमके काय बोलतो आहोत याबद्दल त्यांना तरी नीट कळलेले असते की नाही कोणास ठाऊक ! त्याच्यातही पार्टीतला एखादा वाचाळवीर भलतंच काही बोलून गेला तर बिचाऱ्या पक्षप्रमुखाची फार अडचण होते. मग अशा वेळी ' ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. ती पार्टीची अधिकृत भूमिका नाही ' असा काहीतरी खुलासा करतात. संबंधित व्यक्तीला पण कानफटात मारल्यासारखे होते. मग अशा वेळी ते फार सुंदर खुलासा करतात. ' मला तसे म्हणायचेच नव्हते. माझे म्हणणे मोडून तोडून मांडले गेले. संदर्भ सोडून मांडले गेले वगैरे. ( सध्या प्रत्येक पक्षात असे वाचाळवीर आहेत. पक्षप्रमुखांना त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागते. असे ' नाना ', संजय, विजय आदी मंडळी आहेत. बऱ्याच वेळा एखादा प्रवक्ता नेमका कोणत्या पार्टीचा आहे हे समजणेही कठीण होते. असो. आपला विषय बोलण्यातील गमतीजमती हा आहे. राजकीय विषयाकडे अजिबात वळायचे नाही. ) 

हल्ली काही काही शब्द बोलण्याचा ट्रेंडच झाला आहे. एखाद्याला काही विचारलं तर तो सुरुवात करतो ' ऍक्च्युअली ' शब्दापासून. प्रत्येक वेळी खुलासा करताना ऍक्च्युलीची ऍक्च्युली काही गरज आहे का ? तर काही व्यक्ती आपलं मतप्रदर्शन करताना ' खरं सांगू का...  ? ' या शब्दांचा वापर करतात. एखाद्या वेळी ' खरं सांगू का ठीक आहे. पण प्रत्येक वेळी ' खरे सांगू का...? ' असे म्हणणे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही खरे सांगत नाही असा होतो. (' खरे सांगू का 'असं म्हणतात त्यावेळी तरी ते खरं बोलत असावेत असं गृहीत धरू... ) एखाद्याला एखादी गोष्ट विचारावी तर तो म्हणतो, ' एक काम करा...' म्हणजे ज्याला काही सांगावं किंवा विचारावं तोच आपल्याला ' एक काम करा ' असा सल्ला देत असतो आणि तो देताना आपण खूप काही कठीण गोष्ट सोपी करून सांगितली आहे असा आव आणत असतो. अरे बाबा, मला ते काम करता आले असते तर कशाला तुला विचारायला आलो असतो...  ! ( जाऊ द्या, एक काम करा. त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. )

आमचे एक प्राध्यापक होते. विद्वान होते. आम्हाला तत्वज्ञान विषय शिकवायचे. त्यांना बोलता बोलता एक दोन वाक्ये झाली की ' असो ' हा शब्द म्हणायची सवय होती. विद्यार्थ्यांना त्यांची ही सवय चांगलीच परिचयाची होती. एकदा ते शिकवत असताना त्यांची दोनचार वाक्ये बोलून झाली. ते किंचित थांबले. वर्गातला एक खोडकर विद्यार्थी मागून हळूच पण सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात ' असो ' म्हणाला. सरांनीही ते ऐकले.  आता सर रागावतील आणि काहीतरी भयंकर घडेल अशा भीतीने सगळे चिडीचूप होते. पण सरांनीच या शांततेचा भंग केला आणि हसून म्हणाले, ' असो ' आणि वर्गातील तणावाचे वातावरण क्षणार्धात निवळले आणि हास्याचा एकच स्फोट झाला. ( असो )

आमचे एक मित्र होते त्यांना असं बोलायची सवय होती. म्हणजे जे काही बोलायचं ते सगळं चालू वर्तमानकाळात. ( बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं ना की वर्तमानात जगा. हा सल्ला बोलताना तरी त्यांनी पुरेपूर अमलात आणला होता. ) ते बोलताना असं बोलायचे, ' मी काय सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे का ? मी काल त्याच्या घराकडे जात आहे तर तो तिकडून येत आहे आणि मला म्हणत आहे की मी तुझ्याकडेच येत आहे. ' यावेळी मला क्रिकेट कॉमेंट्रीची आठवण होते. सगळं कसं लाईव्ह... ! ' चेंडू तेंडुलकरकडे येत आहे. तेंडुलकरने धावत चेंडू पकडला आहे. आता तो फलंदाजाकडे धावत त्याच्या दिशेने गोलंदाजी करतो आहे.  अचूक गोलंदाजी. त्रिफळा उडाला आहे. गोलंदाज बाद झाला आहे. ' वगैरे. 

टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात बातम्या देणाऱ्या वार्ताहरांचा शब्दसंग्रह फार मर्यादित असावा असं मला बऱ्याच वेळा वाटतं. कारण त्याच त्या विशेषणांचा, शब्दांचा वापर ते करत असतात. सध्या कोरोनामुळे ' सोशल डिस्टंसिंग ' हा शब्द सगळ्यांना माहित झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाची बातमी देताना त्या ठिकाणी गर्दी असली की ' सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला ' असेच शब्द ते वापरतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही किंवा त्याची वाट लागली त्यासाठी आपल्या समृद्ध मराठी भाषेत ' फज्जा उडाला ' एवढेच शब्द असावेत की काय असे मला वाटले. गंमत म्हणजे मी गुगलवर ' फज्जा उडणे ' म्हणजे नेमके काय हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुगलने मला त्याचा अर्थ न सांगता समान उच्चार असणारे शब्द ' कज्जा, मज्जा, सज्जा आदी शब्द दाखवले. आणि आणखी गंमत म्हणजे पुढे अशा सगळ्या बातम्या दाखवल्या की ज्यात गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा ' फज्जा ' उडाला होता. अशी ही ' फज्जा ' ची मज्जा... !

तर बराय मंडळी. 'एक गोष्ट सांगू का ' असं म्हणत बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, नाही का ? 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

३०/०६/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...