मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सतरा

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सतरा 

वेगळ्या वाटेवरची गाणी 

दीदी या आनंदघन आहेत. त्यांच्या आवाजातील गाणी मग ती कोणत्याही भाषेतील असो, ती ऐकायला गोडच वाटतात. कवी ग्रेस यांच्या कवितेप्रमाणे ' तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला. ' साऱ्या भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेलेला हा अमृत स्वर आहे. कितीही ऐकला तरी ज्याची गोडी काही कमी होत नाही असा हा स्वर्गीय आनंद देणारा स्वर आहे. हिमालयात पर्यटनाला जा की कन्याकुमारीला, पूर्वेकडील देशात जा किंवा पश्चिमेकडील देशात जा, जिथे कुठे भारतीय माणूस आहे, तिथे त्याच्या जोडीला हा स्वर्गीय आवाज असतोच असतो. थोडक्यात म्हणजे भारतीय मनामनाला जोडणारा हा स्वर आहे. नादब्रह्माची अनुभूती देणारा हा स्वर आहे. 

आतापर्यंत दीदींनी विविध अशा सुमारे ३६ भाषांमधून  पन्नास हजाराच्या आसपास गाणी नक्कीच गायिली असतील. हा फार मोठा विक्रम आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. दीदींच्या सुरांना भारतीय मातीचा सुगंध आहे. मराठमोळ्या संस्कृतीचा गंध आहे. आपली संस्कृती, भाषा, देव, धर्म यांचा अभिमान आहे. मात्र त्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाही, त्याला कोणताही राजकीय, पक्षीय, जाती, धर्माचा रंग नाही. स्वच्छ नितळ पाण्यासारखा तो पारदर्शी आहे, तीर्थाची पवित्रता त्यात आहे. 

हिंदी चित्रपटात दीदींनी हजारो गाणी गायिली. पण चित्रपटातील गाणी त्याच्या कथेशी निगडित असतात. बहुतेक सारे चित्रपट कुठल्या ना कुठल्या प्रेमकथेवर आधारित असतात. त्यामुळे त्यातील बहुतेक गाणी ही प्रेमगीतेच असतात. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार सांगतील तीच गाणी गायकांना गावी लागतात. त्याप्रमाणे दीदींनीही गायिली. या गीतांनी त्यांना पैसा, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण तेवढ्याने दीदी समाधानी नव्हत्या. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी सल होता. श्रीकृष्ण, श्रीराम, शंकर ही दीदींची श्रद्धास्थाने. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचे त्यांना पहिल्यापासून आकर्षण. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, मीराबाई यासारख्या व्यक्तिमत्वांबद्दल प्रचंड आदर.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराने त्याही प्रेरित झालेल्या. या सगळ्या संतांचे, थोर महापुरुषांचे आपल्यावर ऋण आहे. तो आपला वारसा आहे. तोही आपल्याकडून कुठेतरी जपला जावा ही त्यांच्या अंतर्यामीची तळमळ होती. 

यासाठी त्यांना एका अनवट वाटेने जाणाऱ्या प्रतिभासंपन्न अशा संगीतकाराची साथ लाभली. कोण होता हा संगीतकार ? हा वेगळी वाट चोखाळणारा प्रतिभावान संगीतकार म्हणजे प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकर, म्हटलं तर दीदींचा लहान भाऊ आणि म्हटलं तर संगीतातील गुरु ! हृदयनाथ उर्फ बाळासाहेब दीदींपेक्षा वयाने कमी असतील पण त्यांचा अधिकार फार मोठा. संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेला हा संत माणूस. संसारात राहूनही विरक्ती अंगात भिनलेले व्यक्तिमत्व. दीदींप्रमाणे त्यांनाही वेगळी वाट निवडावी असे वाटत होते. त्यांनीच दीदींसमोर आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वर माऊली यावर आपण काम करू या असा प्रस्ताव ठेवला. दीदींना तर ते हवेच होते. भगवद्गीतेतील अध्याय ध्वनिमुद्रित करण्याचे ठरवल्यावर त्या अक्षरशः भारावून गेल्या. दीदी आणि बाळासाहेब दोघेही परफेक्शनिस्ट. परिपूर्णतेचा ध्यास असलेले. या भगवद्गीतेच्या श्लोकांचे ध्वनिमुद्रण करताना त्यात कोणतीही चूक राहू नये या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु झाले. 

संस्कृत शब्दांचे उच्चार निर्दोष व्हावेत यासाठी थोर साहित्यिक गो नी दांडेकर उर्फ अप्पा यांना मंगेशकरांच्या निवासस्थानी म्हणजे ' प्रभुकुंज ' मध्ये सादर आमंत्रित करण्यात आले. गीतेच्या श्लोकांचे ध्वनिमुद्रण होईतो अप्पांचा मुक्काम प्रभुकुंज मध्येच होता. सकाळी लवकर दीदींची शिकवणी सुरु व्हायची. अंगात धोतर, बंडी असा अत्यंत साधा पण स्वच्छ पोशाख आणि प्रेमळ मुद्रा असलेले अप्पा दीदींना संस्कृत श्लोकांची संथा द्यायचे. दीदींच्या खोलीत हात पाठीशी बांधून येरझाऱ्या घालताना दीदींकडून ते श्लोक म्हणवून घेत. दीदींचा एखादा उच्चार चुकला किंवा सदोष वाटला तर तो दहा वेळा म्हणायला लावत. दीदी एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे ऐकत. त्यावेळी दीदींनी बाहेरची चित्रपटातील गाणी गाणे थांबवले होते. त्यांचं घर जणू गीतामय होऊन गेलं होतं. ज्ञानेश्वर माऊली हा अल्बम करताना जणू ज्ञानेश्वर माऊलींचा ' अमृतातेही पैजा जिंकणारा ' बोल प्रभुकुंज मध्ये भरून राहिला होता. जोडीला अप्पांचे रसाळ विवेचन, समजावून देणे. या काळात दीदींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज विलसत होते. 

यानंतर दीदी आणि हृदयनाथ यांनी तुकाराम महाराजांचे अभंग, मीराबाईंचे अभंग, शिवकल्याण राजा, आजोळची गाणी, गालिब यासारख्या विविध प्रकारच्या रचना गाऊन त्यांचे स्वतंत्र अल्बम काढले. हे सगळे अल्बम फारच लोकप्रिय झाले. सुरुवातीला रेकॉर्डिंग कंपन्यांनी हे अल्बम रेकॉर्ड करण्यासाठी साशंकता दाखवली. फक्त चित्रपट गीतांचेच अल्बम खपतात असा त्यांचा समज होता. पण दीदी आणि हृदयनाथ यांनी केलेल्या या गैरफिल्मी अल्बम्सनी त्यांची ही शंका खोटी ठरवली. हे सगळे अल्बम करताना या बंधुभगिनींनी अपार मेहनत घेतली. उषा मंगेशकर या उत्तम गायिका तर आहेतच पण त्यांची संगीताची जाण सुद्धा प्रचंड. या सगळ्या गीतांच्या चाली उषाताईंच्या देखरेखीखाली पास झाल्या. संगीताच्या ज्ञानाबरोबर त्यांची चित्रकलाही उत्तम. या सगळ्या अल्बम्सवरील कल्पक चित्रे काढण्याचे श्रेय उषाताईंचेच. 

जसं ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता करताना गोनीदांचं मार्गदर्शन लाभलं, तसं शिवकल्याण राजा करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन मिळालं. या काळात बाबासाहेब स्वतः प्रभुकुंज मध्ये येऊन राहिले. दीदी आणि बाळासाहेब यांच्यासाठी त्यांनी शिवकाल जिवंत केला आणि मग ' आनंदवन भुवनी ', ' निश्चयाचा महामेरू ' 'वेडात दौडले वीर मराठे.. ' या सारखी मराठी माणसाच्या अंगावर अभिमानाने रोमांच उभी करणारी गाणी जिवंत झाली. मीरेची कृष्णभक्तीतील आर्तता, तुकोबांचे अभंग आणि त्यातील तळमळ, ज्ञानदेवांची अमृतवाणी, कबीराचे दोहे हे सारे सारे जिवंत आणि अमर झाले ते दीदींच्या स्वरातून. मीराबाईच्या रचना गाताना तर दीदींच्या पोटात प्रचंड दुखत होते पण आपले काम अपूर्ण राहील या भीतीने त्यांनी कोणालाच त्याबद्दल सांगितले नाही. शेवटच्या गाण्यापर्यंत त्यांनी या असह्य वेदना सहन केल्या. मग त्यांना दवाखान्यातच दाखल करावं लागलं. दीदींच्या पोटात ट्युमर झालेला होता. छोटंसं ऑपरेशन करून ही गाठ काढून टाकावी लागली. 

गालिबच्या रचना ध्वनिमुद्रित करताना प्रसिद्ध गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचं वास्तव्य प्रभुकुंज मध्ये होतं. त्याशिवाय दीदींना उर्दू शिकवणारे मेहबूबमियाँ पण उपस्थित असत. या दोघांकडून उर्दू शब्दांचे उच्चार, अर्थ. लहेजा, अदब दीदींनी आत्मसात केला. एखादी गोष्ट परिपूर्ण व्हावी, बिनचूक व्हावी यासाठीचा केवढा हा ध्यास ! आपण एक महान गायिका आहोत मग आपल्याला फार काही शिकण्याची गरज नाही अशी भूमिका दीदींची कधीच नव्हती. कोणाकडूनही नवीन काही शिकण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. 

जसे हे अल्बम त्यांनी केले तशीच शांता शेळके यांच्या इतर गाण्यांबरोबरच त्यांची अवीट गोडीची कोळीगीतेही दीदींनी गायिली. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा या हेमंतकुमार यांच्यासोबत गायिलेल्या गीताची खुमारी काय सांगावी. दर्याची गाज, खाऱ्या पाण्याचा वास जणू प्रत्यक्षात आला आहे. केसातला गजरा, अंजिरी साडी, नाकातली नथनी कोळी स्त्रीची प्रतिमा प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभी करतात. हृदयनाथांचं संगीत कानात घुमत राहतं. आपोआप पाय ठेका पकडतात. अशीच गाणी वादळ वारं सुटलं ग, राजा सारंगा ही अवीट गोडीची आहेत. ' कशी काळनागीणी ' हे कविवर्य भा रा तांबे यांचे गीत मन मोहून घेते. आरती प्रभूंचे ' नाही कशी म्हणू तुला..' कवी ग्रेस यांचं ' भय इथले संपत नाही..' सुरेश भटांचे ' मेंदीच्या पानावर.. ' ना धो महानोरांची ' जैत रे जैत ' मधली गाणी मराठी रसिक कधीही विसरू शकणार नाहीत. दीदींच्या कोणत्या गाण्यांबद्दल आणि किती सांगणार..! खरे तर तो ऐकण्याचाच विषय आहे !

( क्रमशः पुढील भाग रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
 २३/०/४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...