मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठरा

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग अठरा 

सिनेसंगीतातील अनोखे पर्व - शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर 

शंकर जयकिशन आणि लता मंगेशकर यांना एकत्र आणून सिनेसंगीताच्या क्षेत्रात एक अनोखं रम्य दालन उघडण्याचं श्रेय निःसंशय राजकपूर यांना दिले पाहिजे. आपल्या ' आग ' या चित्रपटानंतर राजकपूर ' बरसात ' या नव्या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले होते. याच सुमारास त्यांनी एका प्रसंगी लता दीदींचा आवाज ऐकला आणि त्यांना जणू आपल्या हाती एक अनमोल रत्न आल्याचा भास झाला. या नवीन आवाजाने ते झपाटून गेले. राजकपूर नेहमी नवीन चेहऱ्यांच्या शोधात असत. आपल्या नवीन चित्रपटासाठी त्यांनी हुस्नलाल भगतराम या संगीतकारांच्या हाताखाली काम करणारी तरुण संगीतकारांची जोडी निवडली. या जोडीचे नाव होते शंकर आणि जयकिशन. दोघंही संगीतातले दर्दी होते आणि दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की त्यांच्यापैकी कोणीही एखाद्या गीताची चाल बांधली तरी कोणीही एकटा त्याचे श्रेय आपल्या नावावर घेत नसे. राजकपूर यांनी लतादीदी आणि शंकर जयकिशन यांना एकत्र आणले आणि या त्रयीने पुढे चित्रपटसंगीतात इतिहास निर्माण केला. शंकर जयकिशन यांना तर पुढे पुढे आपल्या चित्रपटांसाठी गायिकेचे फक्त एक आणि एकच नाव आठवायचे आणि ते नाव होते सात अक्षरी आणि सप्त सुरांची स्वामींनी असलेल्या लता मंगेशकर यांचे. 

शंकर जयकिशन ही संगीतकारांची अत्यंत प्रतिभावान जोडी. या जोडीने अनेक जुन्या प्रथा मोडीत काढल्या आणि चित्रपटातील संगीतक्षेत्रात क्रांती घडवून आणली. लतादीदींनी यापूर्वी अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, नौशाद, सी रामचंद्र इ संगीतकारांकडे अनेक गाणी गायिली होती. पण या संगीतकारांच्या आपापसातील स्पर्धेमुळे त्यांची गाणी जरी उत्तम असली तरी गाण्यांच्या चाली गुंतागुंतीच्या होत चालल्या होत्या. शंकर जयकिशन यांचे कौशल्य हे की त्यांनी अत्यंत सोप्या चाली बांधल्या. ज्या कोणीही गुणगुणू शकत होते, ज्या चालींवर सहज ठेका धरला जाऊ शकत होता. दागिन्यांचं ओझं परिधान केलेली एखादी नवयुवती असावी आणि तिचं मूळ सौंदर्य दागिन्यांमुळे झाकलं जावं तस सिनेसंगीताचं झालं होतं. शंकर जयकिशनने या दागिन्यांचं ओझं जणू बाजूला केलं आणि दीदींच्या आवाजाचं नैसर्गिक सौंदर्य मूळ स्वरूपात लोकांसमोर आणलं. दीदींच्या आवाजाचं हे सुरेल रूप रसिकांना अत्यंत भावलं. एखाद्या मोराचा रंगीबेरंगी पिसारा पूर्णपणे उलगडला जावा तशी अनेक मोरपंखी रंगी गाणी या त्रयीने रसिकांना दिली. शंकर जयकिशन या जोडीने आणखी एक काम केले. त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये दीदींचा हाय पीच आवाज वापरला. यापूर्वीच्या संगीतकारांना तसा तो वापरता आला नाही. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांमध्ये दीदींच्या हळुवार स्वरांनी सुरुवात होते आणि हळूहळू गाण्याच्या आवश्यकतेनुसार तो टिपेला पोहोचतो. ' घर आया मेरा परदेसी ', ' झनन झनन झनन झनन घुंगरवा बाजे ' 'रसिक बलमा ', या सारख्या अनेक गाण्यात दीदींच्या आवाजाने ही किमया केली आहे. 

शंकर जयकिशन यांनी दीदींचा आवाज वापरण्यापूर्वी चित्रपटात अशी प्रथा होती की चित्रपटात जर दोन नायिका किंवा दोन अभिनेत्री असतील तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला उठाव येण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गायिकांचा आवाज वापरला जायचा. पण जेव्हा राजकपूर यांच्या ' बरसात ' ची निर्मिती झाली तेव्हा या जोडीने हा नियम मोडीत काढला. ' बरसात ' मध्ये नर्गिस आणि निम्मी या दोन नायिका होत्या. शिवाय आणखी एक स्त्री पात्र होते. या तिन्ही अभिनेत्रींनसाठी त्यांनी फक्त लतादिदींच्याच आवाजाला पसंती दिली. आणि असंही होऊ शकतं याचा साक्षात्कार इतर संगीतकार आणि चित्रपट रसिकांना झाला. ' बरसात ' चित्रपटाने नावाप्रमाणे गाण्यांची बरसातच रसिकांवर केली. ' हवामे उडता जाये ', ' बरसातमे हमसे मिले तुम ' , ' जिया बेकरार हैं ', अब मेरा कौन सहारा ', मुझे किसीसे प्यार हो गया...', ' छोड गये बालम ', ' पतली कमर है...' या सारखी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली आणि मग ही त्रयी रसिकांवर गाण्यांची ' बरसात ' करतच राहिली. 

शंकर जयकिशन  प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी चित्रपट संगीतात अनेक नवीन यशस्वी प्रयोग केले. विशेष म्हणजे हे सगळे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले. बरसात चित्रपटात 'छोड गये बालम ...' हे मुकेश आणि दीदींनी गायिलेले गीत आहे. या गीतात एका गायकाचा आवाज दुसऱ्या गायकाच्या आवाजावर ओव्हरलॅप करण्याचा नवीन प्रयोग या संगीतकारांनी केला. या गाण्यात अनेक ठिकाणी मुकेश यांच्या आवाजावर दीदींचा आवाज ओव्हरलॅप होतो आणि दीदींच्या आवाजावर मुकेश यांचा आवाज ओव्हरलॅप होतो. या गाण्यात एवढे माधुर्य आहे की ते आजही ताजे वाटते. याच चित्रपटातील ' पतली कमर हैं ...' या गाण्यात द्रुतगतीचा वापर करून रसिकांना एक अनोखी मेजवानी दिली.  तेव्हापासून हिंदी चित्रपटात या नाविन्यपूर्ण गोष्टींचा वापर पुढे अनेक संगीतकारांनी केला. शंकर जयकिशन यांच्या लोकप्रियतेत दीदींच्या आवाजाचं जेवढं योगदान आहे, तेवढंच दिदींनाही लोकप्रियता मिळवून देण्यात या जोडीचं आहे हे नाकारता येणार नाही. दोघेही एकमेकांसाठी पूरक ठरले. 

शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनात दीदींनी गायिलेल्या आणि रसिकांना आनंद देणाऱ्या विविध गाण्यांचा मी उल्लेख करणार आहे. या विविध गाण्यांमध्ये जशी दर्दभरी गीते आहेत, तशीच अवखळ भाव प्रकट करणारी गीते आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते आहेत. नायक नायिकेच्या मनातील तरल प्रेमभावना व्यक्त करणारी गीते आहेत. बऱ्याच गाण्यांमध्ये लतादीदींसोबत या जोडीने मुकेश, मन्नाडे, तलत मेहमूद आणि हेमंतकुमार या गायकांना संधी दिली. दीदींच्या अवखळ गाण्यातील आवाज एखाद्या खळाळत्या नदीसारखा आहे. आपल्या डोळ्यांसमोर एखादी अल्लड वयाची गाणारी तरुणी उभे करण्याचं सामर्थ्य या गाण्यांमध्ये आहे. या गाण्यांमध्ये तारुण्याचा उत्साह भरलेला आहे, मन मोहवणारी प्रसन्नता आहे. 

' तेरा जलवा जिसने देखा ' ( उजाला ), शिशा -ए-दिल इतना ( दिल अपना और प्रीत पराई ), काश्मीर की कली हूँ ( जंगली ), मैं का करू राम ( संगम ) यासारखी अनेक गाणी दीदींच्या आवाजातील अवखळपणा आणि अल्लडता दाखवतात. तर जब से बलम घर आये ( आवारा ), हम से ना पूछो ( काली घटा ), तुम्हे और क्या दु ( आई मिलन की बेला ), आजा आई बहार ( राजकुमार ), झुमे झुमे दिल मेरा ( पूनम ), मैं पिया 'तेरी ( बसंत बहार ) या सारखी गाणी मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करतात. 

एका इंग्रजी साहित्यिकाने म्हटले आहे की ' अवर स्वीटेस्ट सॉंग्ज आर अवर सॅडेस्ट सॉंग्ज. ' दीदींच्या आवाजातील शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकली हे म्हणणे अक्षरशः खरे वाटते. मन रे तुही बता ( हमराही ), सुनो छोटीसी गुडिया की ( सीमा ), ये शाम की तन्हाईयां ( आह ), बिछडे हुए परदेसी ( बरसात ),  ओ बसंती पवन पागल ही विरहगीते अवीट गोडीची आहेत. मनाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य दीदींच्या सुरात आहे. अजीब दास्तां हैं ये ( दिल अपना और प्रीत पराई ), हम तेरे प्यार मे सारा आलम, रुक जा रात ठहर जा चंदा ( दिल एक मंदिर ), आज कल में ढल गया ( बेटी बेटे ), तडप ये दिन रात की ( आम्रपाली ) ही गाणी मनाला हुरहूर लावतात. 

शंकर जयकिशन यांनी विविध गायकांबरोबर संगीतबद्ध केलेली दीदींची गीते तर वेड लावणारी आहेत. प्रेमिकांच्या मनातले सगळे नाजूक भाव या गीतातून प्रकट झाले आहेत. द्वंद्वगीतांसाठी या जोडीने दीदींबरोबर प्रामुख्याने मुकेश आणि मो. रफी यांचा आवाज वापरला आहे. तर मन्नाडे, किशोरकुमार, तलत मेहमूद, हेमंतकुमार यासारखे गायकही अनेक गाण्यांत दीदींसोबत आहेत. एक सवाल मैं करू ( ससुराल ), तुझे जीवन की डोरसे ( असली नकली ), दिन सारा गुजारा  ( जंगली ), मुझे कितना प्यार हैं  ( दिल तेरा दिवाना ), दिल की नजरसे ( अनाडी ),  तुम रुठी रहो ( आस का पंछी ), ओ मेरे सनम, हर दिल जो प्यार करेगा ( संगम ) यासारखी अनेक अवीट गोडीची द्वंद्वगीते आजही टवटवीत वाटतात. 

शास्त्रीय संगीतातातील राग भैरवी हा या जोडीचा आवडता राग होता. या रागातील आणि इतर अनेक रागातीलही अनेक अजरामर गीते दीदींच्या आवाजात या जोडीने रसिकांना दिली. मी काही गाण्यांचा नमुन्यादाखल फक्त उल्लेख करणार आहे. रसिक बलमा ( राग बागेश्री , चोरी चोरी ), बनवारी रे ( राग पिलू, एक फुल चार कांटे ), जाओ रे जोगी तुम ( राग कामोद केदार, आम्रपाली ), इचकदाना बिचकदाना ( राग यमनी बिलावल, श्री ४२० ), ओ  मेरे सनम ( राग शिवरंजनी, संगम ), अजी हमसे रुठकर ( राग मांड , आरजू ), गर तुम भुला न दोगे ( राग यमन, यकिन ) एहसान तेरा होगा ( राग शिवरंजनी, प्रोफेसर )  अशा विविध रागातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली. काही काळ मात्र लतादीदी आणि शंकर जयकिशन यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण तो संपल्यानंतर ' संन्यासी ' चित्रपटात त्यांनी पुन्हा दीदींचा आवाज वापरून राग भैरवीतील गाणी निर्माण केली. 

दीदी आणि शंकर जयकिशन कलाकार आणि प्रतिभावंतांची अनोखी त्रयी. त्यांची गाणी अजरामर आहेत. आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांची गाणी ऐकणं यासारखा आनंद नाही. 

( क्रमशः पुढील भाग बुधवारी ) 

©️विश्वास  देशपांडे,चाळीसगाव 
२५/०४/२०२१ 
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...