उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग चौदा
समज आणि गैरसमज ( २ )
याही भागात लतादीदींबद्दल असलेल्या काही गैरसमजांचा आपण आढावा घेणार आहोत. दीदींसारख्या ज्या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात असतात, अशा व्यक्तींच्या खाजगी आयुष्याबद्दल लोकांना फार कुतूहल असते. खरे म्हणजे अशा व्यक्तींच्या जीवनाकडे एका महान कलाकाराचे जीवन या दृष्टीने पाहिले जाणे उचित असते. त्यांची कामगिरी, कारकीर्द ही या दृष्टीने महत्वाची असते.
दीदींनी आपले वडील आणि गुरु असलेले मास्टर दीनानाथ यांच्या अकाली मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. घरातील सगळ्यांच्याच मनाविरुद्ध लग्न करून काही काळ घरातून निघून गेलेल्या आशाताईंचा त्यांनी पुन्हा घरात स्वीकार करून त्यांची संगीतातील पुढील करिअर एकप्रकारे सुरक्षित केली. आपली लहान बहीण मीनाताई हिचे मोठ्या थाटामाटात इंदूरचे दत्तात्रय विनायक खडीकर यांच्यासोबत करून दिले. हे लग्न कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओत अतिशय भव्य प्रमाणात साजरे झाले. लग्नाच्या वेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. लग्नाच्या दिवसात पं भीमसेन जोशी यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. शिवाजी गणेशन पासून चित्रपट सृष्टीतील मोठमोठे नट, दिग्दर्शक, निर्माते या प्रसंगी हजर होते.
आपल्या भावंडांसाठी एवढं सगळं करणाऱ्या दीदींनी लग्न का केलं नाही असा प्रश्न काहींना पडतो. पूर्वी एखाद्या मासिकात दीदींनी लग्न केलं अशीही निराधार बातमी छापून यायची. दीदींना एकदा या बाबतीत विचारलं गेलं, तेव्हा त्या हसत हसत उतरल्या, ' मी गुपचूप लग्न केलं असंही मी वाचलंय. एक लक्षात घ्या, लग्नच करायचं असेल तर ते जाहीरपणेच का करू नये ? ' आणि दीदींचा साधा सरळ आणि निष्कपट स्वभाव पाहता त्यांनी जे काही म्हटले ते आपल्याला पटते. पुढे त्या म्हणतात, ' या साऱ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. मी लहान होते तेव्हा माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि नंतर मी माझ्या कामात इतकी व्यस्त झाले की ... बस्स ! ते काही झालंच नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. '
१९५० ते १९६० च्या दशकात ज्यांनी वेगळ्या गाण्यांनी आपली ओळख निर्माण केली असे एक महान संगीतकार म्हणजे ओ पी नय्यर. दलसुख पंचोली हे ' आसमान ' या चित्रपटाची निर्मिती करीत होते. पंचोली आपल्या चित्रपटात नेहमीच नवनवीन कलाकारांना संधी देत असत. दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते प्राण, मनमुराद हसवणारे ओमप्रकाश, गायिका शमशाद बेगम, संगीतकार गुलाम हैदर ही सगळी पुढे नावारूपाला आलेली मंडळी म्हणजे पंचोली यांनी चित्रपटसृष्टीला दिलेली रत्ने आहेत. ओमकार प्रसाद नय्यर म्हणजेच ओ पी नय्यर हा ही त्या काळातील होतकरू आणि उदयोन्मुख संगीतकार. त्यांना आपल्या ' आसमान ' चित्रपटासाठी पंचोलींनी संधी दिली. ओपींचं ' प्रीतम आन मिलो ...' हे गीत त्यावेळी चित्रपट रसिकांमध्ये लोकप्रिय झालं होतं. ' आसमान ' या चित्रपटातील एका गीतासाठी लता मंगेशकरांना करारबद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्या गीताची चाल ओपींनी खास लतादीदींसाठी बांधली होती. ' मोरी निंदिया चुराये गयो...' हे ते गीत. पण झालं असं की ज्या दिवशी त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं त्याच दिवशी दीदींना इतरही अनके गाण्यांची रेकॉर्डिंग करायचं होतं आणि त्याही तारखा आधीच ठरलेल्या होत्या. त्यामुळे ती सगळी रेकॉर्डिंग पूर्ण करता करता उशीर झाला. दीदी स्टुडिओत पोहोचू शकल्या नाहीत. रात्र एवढी झाली होती की फोन करून सांगणंही त्यांना उचित वाटेना. असं लागोपाठ दोनतीन दिवस घडलं.
आपण नवोदित संगीतकार आहोत म्हणून आपल्याला अशी वागणूक मिळते असा गैरसमज ओपींचा झाला. त्यांना आपला हा अपमान वाटला. दीदींच्या काही अडचणी असतील हे जाणून न घेताच त्यांनी दीदींबद्दल पंचोली यांच्याकडे तक्रार केली आणि ते वृत्त विकृत स्वरूपात दीदींपर्यंत पोहोचलं. या दोन महान कलाकारात त्यामुळे सुरुवातीलाच गैरसमज होऊन कायमचं वितुष्ट आलं. अन्यथा रसिकांना या जोडीची अवीट गोडीची अजरामर गाणी नक्कीच ऐकायला मिळाली असती. पण नियतीला ते मान्य नसावे. पुढे ' आसमान ' चित्रपटातील ते गीत त्या वेळच्या ज्येष्ठ गायिका राजकुमारी यांच्याकडून गाऊन घेतले गेले. पण ते गीत ऐकल्यानंतर त्या गीताची चाल दीदींना अनुरूप अशीच ओपींनी बांधली होती हे जाणकार सांगू शकतात. पुढे याच ओपींनी आशाताईंकडून अनेक अजरामर गीते गाऊन घेतली. त्या गाण्यांमध्ये रसिकांना अत्यंत आवडणाऱ्या ( अर्थात मलाही ) चैनसे हमको कभी, आओ हुजूर तुमको सितारोंमे ले चलू , आप युहीं अगर हमसे मिलते रहे, उडे जब जब जुल्फे 'तेरी... या सारख्या लोकप्रिय आणि अजरामर गाण्यांचा समावेश आहे.
कधी कधी कारण किरकोळ असते किंवा कधी कधी विनाकारण गैरसमज निर्माण होतात. असे गैरसमज निर्माण व्हावेत अशी काही व्यक्तींची हेतुपुरस्सर इच्छा असते. तलत महमूद हा रेशमी, मुलायम आवाजाचा गायक मो. रफी आणि मुकेश यांच्या काळात आपले वेगळे स्थान राखून होता. सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा त्याचा आवाज. दर्दभऱ्या गजल आणि तेवढीच रोमँटिक प्रेमगीते गाण्यासाठी तो प्रसिद्ध होता. प्रसिद्ध गायक सैगल यांचा त्यावर अतिशय प्रभाव होता. त्यालाही रसिक प्रतिसैगल म्हणूनच ओळखत.
१९६० च्या दशकात तलत महमूद आणि लतादीदी यांच्यात काही द्वंद्वगीतं करण्याचे ठरले होते. पण लतादीदी आणि तलत महमूद यांच्यात वितुष्ट यावे असे वाटत असणाऱ्या काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी तलत महमूद यांचा गैरसमज करून दिला. तुम्ही मुस्लिम असल्याने लतादीदींनी तुमच्यासोबत गायला नकार दिला असे खोटेनाटे सांगून लोकांनी त्यांचे कान भरले. पण दोन्ही व्यक्ती महान होत्या. त्यांनी लोकांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती समजून घेतली आणि एकमेकांचा गैरसमज दूर करण्यात यशस्वी झाले. दीदी त्यांना म्हणाल्या, ' मी रफीसाहेब, नौशादसाहेब यांच्याबरोबर काम करते. युसूफभाईंना ( दिलीपकुमार ) मी तर भाऊच मानले आहे. अमान अली आणि अमानत अली खान साहेब यांचा मी गंडा बांधला आहे. ' दीदींच्या या स्पष्टीकरणाने तलत महमूद यांचा गैरसमज दूर झाला. इतना न तू मुझसे प्यार बढा, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे.., सीने मे सुलगाते हैं अरमान यासारखी अनेक लोकप्रिय गीते या जोडीने दिलीत.
प्रसिद्ध संगीतकार एस डी बर्मन आणि लतादीदी यांच्यातही काही लोकांनी भांडण लावण्याचा प्रयत्न केला. काही नियतकालिकात या दोघांच्याबद्दल उलटसुलट बातम्या छापल्या गेल्या. पण दोन्ही कलाकार महान आणि परिपक्व असल्याने दोघांनीही याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे दोघांमध्ये संवादाचा दरवाजा नेहमीच खुला होता. बिमलदा यांच्या ' बंदिनी ' चित्रपटासाठी काही गाणी गाण्याची विनंती त्यांनी दीदींना केली होती. त्यावेळी त्या स्टुडिओत असताना राहुल ( पंचम ) हा एस डी बर्मन यांचा मुलगा दीदींना भेटायला आला. त्याने आपल्या पहिल्या चित्रपटासाठी दीदींनी गाणे गावे अशी विनंती केली. दीदींनीही मोठ्या मनाने त्याची विनंती मान्य केली. त्यानंतर एका दिवशी दीदींना अचानक बर्मनदांचा ( एस डी ) फोन आला. ते म्हणाले, ' लोता ( त्यांचे उच्चार ), हमको कुछ जरुरी काम हैं. तुम हमारे घरमे आयेगा क्या ? ' दिदींनाही त्यांचे संबंध सुरळीत व्हावे असे वाटतच होते. त्या बर्मनदांच्या घरी गेल्या. ते म्हणाले, ' लोता, तुम हमारे लिये क्यू नही गाता ? ' दीदी उतरल्या, ' ऐसी तो कोई बात नही हैं. ' त्यावर बर्मनदा म्हणाले, ' कोई बात नही हैं ना ? तो बाकी सब भूल जाओ. हम भी भूल गया हैं. '
अशा रीतीने दोघांमधील दुरावा संपुष्टात आला. मग या जोडीने काही अप्रतिम गाण्यांची मेजवानी चित्रपट रसिकांना दिली. ' बंदिनी, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, आराधना, शर्मिली, तेरे मेरे सपने, अभिमान, चुपके चुपके .., फैली हुई है सपनोंकी, चांद फिर निकला, मोरा गोरा अंग लैले, रात का समा, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना हैं ... अशी किती म्हणून नावे सांगावीत ?
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०४/२०२१

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा