उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग सोळा
एक गायिका म्हणून...
लतादीदी अलीकडेच म्हणाल्या होत्या की मी गेली ८३ वर्षे गाते आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. खरंच आपल्याला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. सत्तर-ऐंशी वर्षे गात राहणं म्हणजे काही चेष्टा नाही. याचा अर्थ दीदी जाहीर कार्यक्रमात आठ नऊ वर्षांच्या असल्यापासूनच गायला लागल्या होत्या. याचा उल्लेख सुरुवातीच्या भागात आलाच आहे. दीदींच्या गाण्याची गंमत काय आहे बघा, आपण बरेचदा चित्रपट विसरतो, त्यातील नायक नायिका विसरतो पण लक्षात राहतात ते दीदींच्या गाण्याचे बोल. हे त्यांच्या गाण्याचं सामर्थ्य आहे. त्यांच्या सुरांना हे सामर्थ्य काही एकाएकी प्राप्त झालं नाही. त्यामागे तपश्चर्या आहे. गाण्याची तयारी आहे. आपण आयुष्याचा जो काही ध्येयमार्ग निवडला त्यावर अविचल निष्ठा आहे. त्यासाठी त्या किती मेहनत घेत होत्या याचा एक अलीकडचा किस्सा आहे.
भारतीय हवाई दलासाठी एक गीत दीदींना गायचं होतं. ही गोष्ट १९९३ मधली आहे. दीदी बराच वेळ आपल्या खोलीत होत्या. रात्रीचे नऊ वाजले होते. काही वेळाने त्या आपल्या खोलीतून बाहेर आल्या. काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाल्या की उद्याचं ध्वनिमुद्रण मी काही करू शकणार नाही. त्या आधी आपल्या खोलीत त्या गीताच्या म्युझिक ट्रॅकवर गीताचे शब्द जुळवत बसल्या होत्या. परंतु शब्द आणि त्यांच्या मात्र यांचा मेळ जमत नव्हता. शब्दांमध्ये काही बदल करावा लागणार होता. गाण्याचं संगीत तर ध्वनिमुद्रित झालं होतं. मग संबंधितांना शब्दात बदल करण्यास सांगितले गेले. त्यामुळे गाण्याचे रूप, रंग आकार सारेच बदलले. हे करत करत रात्रीचे अकरा साडेअकरा झाले. तेव्हा आता हे गीत ध्वनिमुद्रण करण्यायोग्य झालं आहे असा निर्णय त्यांनी घेतला. एखादी गोष्ट परिपूर्णच व्हावी, त्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी वयाची साठी ओलांडलेली ( त्यावेळी ) ही गायिका केवढी काळजी घेते हे यातून दिसून येतं. त्यांचा हाच परिपूर्णतेचा ध्यास अजूनही कायम आहे.
दीदींसारख्या प्रथितयश गायिकेची काही गाणी त्यांच्या दैवी प्रतिभेमुळे सिंगल टेक मध्ये रेकॉर्ड होत असली तरी अशी अनेक गाणी होती की जी रेकॉर्ड करताना त्यांना अनेक टेक द्यावे लागले. पण त्यासाठी कितीही टेक घ्यावे लागले तरी त्या कंटाळत नाहीत. शिवाय प्रत्येक वेळी आवाजात तेच माधुर्य, तीच सुरेल फेक आणि ताना . एवढी सहनशीलता नवीन गायकांमध्ये पाहायला मिळत नाही. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दीदींना एका नवीन गायकासोबत गाणे गायचे होते. संगीतकार भप्पी लाहिरी होते. तो नवीन गायक गाताना चुका करत होता. असे तीनचार वेळा झाले. शेवटी कंटाळून तोच म्हणाला की माझा भागही तुम्हीच रेकॉर्ड करून टाका. पण दीदी त्याला हसत खेळत न कंटाळता समजावून देत राहिल्या. पुढे या गाण्याचे नऊ टेक झाले आणि त्यानंतर गीताचं ध्वनिमुद्रण पार पडलं. दीदी म्हणतात, ' नौशाद साहेबांच्या एका गीताचं तर अठ्ठावीस वेळा रेकॉर्डिंग करावं लागलं. एकदा मी गाणं स्वीकारलं की घड्याळाकडे पाहत नाही. ' गाणं म्हणण्यासाठी एकदा हेडफोन चढवला आणि संगीत सुरु झालं की जणू जादू घडते आणि दीदी त्या गीताच्या भावनेत हरवून जातात. त्यांना दुसऱ्या कशाचेच भान राहत नाही. कधी कधी तर भावनांचा हा आवेग इतका प्रचंड असतो की ती ती गीते म्हणताना दीदींना रडूही कोसळले आहे. आपल्या गाण्याशी, त्याच्या भावनांशी ही केवढी एकरूपता... ! आपले काम कोणतेही असो, जी व्यक्ती अशा निष्ठेने ते पार पाडते, ती आपल्या क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
' लेकिन ' हा राष्टपती पुरस्कार विजेता चित्रपट. या चित्रपटातील ' यारा सिली सिली ' हे दीदींच्या आवाजातील अतिशय सुंदर पण गाण्यासाठी तेवढेच कठीण असलेले गाणे. पण एकाच टेकमध्ये ते ओके झाले. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे परिपूर्णतेचा आग्रह धरणारे संगीतकार. त्यांच्यासोबत दीदींना ' सत्यम शिवम सुंदरम ' हे गीत गायचे होते. शुद्ध उच्चाराचा आग्रह धरणारे पंडित नरेंद्र शर्मा आणि आपल्या अपेक्षेनुसार गायकाला गायला लावणारे राजकपूर ही त्रयी यावेळी हजर होती. पण आश्चर्य म्हणजे हे गाणे दीदींनी एकाच टेकमध्ये गाऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. ही दिग्गज मंडळी चकित झाली. त्यांना एकही दोष काढता आला नाही. पं नरेंद्र शर्मा गमतीने दीदींना म्हणाले, ' आम्हाला बोलण्याची एकही संधी द्यायची नाही असं आमची बेटी घरूनच ठरवून आलेली दिसते. '
संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत निर्देशनात दीदींनी सुरुवातीला अनेक मराठी आणि हिंदी गाणी म्हटली आहेत. ते दीदींबद्दल बोलताना म्हणतात,' लताला नवं गाणं शिकवताना तुम्हाला काहीच कष्ट पडत नाहीत. ती नेहमी हसतमुख असते. संगीतकाराने गाऊन दाखवलेल्या ओळींचं तिला लगेच आकलन होतं. त्यावेळी फक्त तिचे ओठ गुणगुणताना तुम्हाला दिसतील. जेव्हा ध्वनिमुद्रणाची वेळ तेव्हा तेच शब्द गीत होऊन तिच्या कंठातून बाहेर पडतात. माइकपासून किती जवळ अथवा दूर उभं राहावं, कोणत्या शब्दाच्या वेळी माईक जवळ करायचा किंवा टाळायचा यासारख्या अनेक गोष्टी तिला कधीही सांगाव्या लागत नाहीत. ' म्हणून दीदींच्या बाबतीत संगीतकार वनराज भाटिया म्हणतात ' शी इज अ कम्पोझर्स ड्रीम. ' म्हणजे प्रत्येक संगीतकाराला आपलं गाणं ज्या पद्धतीनं गायकांनी गावं असं वाटतं ते स्वप्न साकार करणारी गायिका म्हणजे लता मंगेशकर.
साधारणपणे एखादा गायक किंवा गायिका आपलं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर स्टुडिओत थांबतात, ते गाणं कसं झालं आहे हे ऐकतात. लोकांच्या प्रतिक्रिया अजमावतात. दीदी मात्र आपलं गाणं ध्वनिमुद्रित झालं की ते ऐकायला तिथे अजिबात थांबत नाहीत. गाणं चांगलं झालं आहे की नाही हे ठरवण्याची जबाबदारी त्या संगीतकार, दिग्दर्शक आणि ध्वनिमुद्रणकार यांच्यावर सोपवतात. ध्वनिमुद्रण झाल्यावर न थांबण्याचे आणखी एक कारण त्या सांगतात. त्या म्हणतात, ' माझे गाणे संपल्यानंतर तिथे माझी वारेमाप प्रशंसा केली जाते आणि मला त्याची नेहमीच भीती वाटते. पुष्पगुच्छ, हार, फोटो इथपर्यंत ठीक आहे पण लोक माझी आणि माझ्या गाण्याची इतकी तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात की जणू तेच माझ्या करिअरचं सर्वोत्तम गीत आहे. मला मात्र इतकी खात्री नसते. मी तर अगदी शरमिंदी होऊन जाते. ' दीदींचे हे बोल त्यांच्या विनम्रतेचे निदर्शक आहेत. ते त्यांचा मोठेपणा दाखवतात.
दीदींनी जेव्हा गायला सुरुवात केली, तेव्हा निघणाऱ्या गाण्याच्या रेकॊर्ड्सवर गायकाचे नाव टाकले जात नसे. दीदींनी ते टाकायला लावून त्या प्रथेची सुरुवात केली आणि एक प्रकारे गायकांना न्याय मिळवून दिला. चित्रपटांना आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना अनेक वर्षांपासून फिल्मफेअर राष्ट्रीय पुरस्कार दिले जात होते. पण त्यात चित्रपटांचे पार्श्वगीत गायन करणाऱ्यांसाठी पुरस्कारच नव्हते. दीदींनी त्यासाठी संघर्ष केला. पार्श्वगायकांना या समारंभात पारितोषिक मिळण्याचा मार्ग दीदींमुळेच मोकळा झाला. १९५८ पासून पार्श्वगायनासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. लतादीदींचं मोठेपण एवढं की त्यांनी १९६९ पासून आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं जाहीर केलं आणि नवीन पार्श्वगायकांना पुरस्कार मिळण्याचा मार्ग खुला झाला.
सुरुवातीच्या काळात गायकाला त्याच्या गाण्याचे हवे तेवढे पैसे दिले की पुढे त्या गाण्याच्या ज्या रेकॉर्ड्स खपत त्यावरील उत्पन्न रेकॉर्डिंग कंपनी आणि निर्माते तहहयात वाटून घेत. दीदींनी संघर्ष करून निर्मात्यांना आणि रेकॉर्ड्स कंपन्यांना रॉयल्टी देण्यास भाग पाडले. चित्रपटसृष्टीत एक ओ पी नय्यर आणि लता दीदी हे दोनच कलाकार असे होते की जे रॉयल्टीशिवाय काम करीत नसत. किशोरकुमारही महान कलाकार होते पण पैशाच्या बाबतीत अत्यंत व्यवहारी होते. आपल्या हातात पैसे पडल्याशिवाय ते कामच करत नसत. जोपर्यंत हातात पैसे नसत तोपर्यंत त्यांच्या गळ्यात खरखर असे. पैसे मिळाले की मात्र ते गाण्याचं सोनं करीत असत. पुढे पुढे त्यांच्या संघटनेत मुकेश, किशोरकुमार, तलत महमूद, मन्नाडे आदी कलाकार सामील झाले. सुप्रसिद्ध निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक राजकपूर तर गायकांना रॉयल्टी देण्याच्या विरोधात होते. ते या मुद्द्यावर कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नसत पण जेव्हा दीदींना त्यांचे पैसे मिळाले नाहीत, तेव्हा दीदींनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी गाणे गायचे नाकारले. राजकपूर यांनी नंतर मात्र आपली भूमिका बदलली.
मो रफींशी मात्र रॉयल्टीच्या मुद्द्यावरून दीदींचे मतभेद झाले होते. रफीसाहेब गायक म्हणून आणि माणूस म्हणूनही महान होते. पण त्यांच्या साध्याभोळ्या स्वभावाचा फायदा निर्माते आणि रेकॉर्डिंग कंपन्यांनी करून घेतला आणि त्यांना आपल्या बाजूने फितवले. या कालावधीत जवळपास तीन वर्षे लतादीदी आणि रफीसाहेब यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नव्हते. त्यामुळे चित्रपट रसिक मात्र या दोघांच्या चांगल्या गाण्यांना मुकले. पुढे हा दुरावा दूर झाला. मो रफी जेव्हा वारले तेव्हा दीदींना अपार दुःख झालं. त्यांचे उद्गार होते, ' काय बोलू ? आकाशातल्या चंद्राचा अस्त झाला की चित्रपट संगीतातील सूर्याचा हे समजतच नाही. ' पुढे दीदींच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांना श्रद्धांजली म्हणून ताजमहाल चित्रपटात त्या दोघांनी गायीलेलं ' जो वादा किया वो निभाना पडेगा...' हे गीत त्या म्हणत असत.
एकदा लंडनमध्ये दीदींचा कार्यक्रम करण्याचे ठरले होते. त्यांचा कार्यक्रम म्हणजे रसिकांची गर्दी होणार. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी जागेचा शोध घेण्यात आलं त्यासाठी योग्य जागा म्हणजे लंडनमधील प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल. या हॉलमध्ये कार्यक्रम सादर करायला मिळणं हे कलाकार आपलं भाग्य समजतात. पण तेव्हा इंग्लंडच्या परंपरेनुसार अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम सादर करण्याची परवानगी फक्त ब्रिटिश नागरिकांपुरतीच मर्यादित होती. परिणामी दीदींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. दीदींना हा आपला आणि आपल्या देशाचा मोठा अपमान वाटला. त्यांनी ठरवून टाकले की कार्यक्रम करायचा तर अल्बर्ट हॉलमध्येच नाहीतर करायचा नाही. शेवटी ब्रिटिश प्रशासनाला दीदींपुढे मान तुकवावी लागली आणि सारे नियम आणि संकेत बाजूला ठेवून दीदींच्या कार्यक्रमाचे मोठ्या सन्मानाने तेथे आयोजन करण्यात आले. राज्यसभेत खासदार म्हणून जेव्हा त्यांची निवड करण्यात आली तेव्हा त्यांना त्यांच्या स्वभावानुसार राजकारणात रस नव्हता. पण त्यांना मिळणाऱ्या निधीचा त्यांनी विधायक कामासाठी केला. त्या स्वतःच्या खर्चाने दिल्लीला जात येत आणि स्वतःच्या खर्चाने हॉटेलमध्ये राहत असत. फोन, गॅस कनेक्शन, प्रवासभत्ता आदी सर्व गोष्टी त्यांनी नाकारून एक आदर्श घालून दिला.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा