उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणीस
संगीतकार नौशाद आणि लता मंगेशकर
चित्रपट सृष्टीतील दीदींची कारकीर्द नुकतीच सुरु झाली होती. अशातच त्यांना नौशाद अली या गुणी संगीतकाराने हेरलं. नौशाद म्हणजे रत्नपारखीच. लता मंगेशकर नावाच्या हिऱ्याची पारख त्याने अचूक केली आणि आपल्या पहिल्यावहिल्या ' अंदाज ' या चित्रपटासाठी त्यांना गायनाची संधी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मेहबूब खान. या चित्रपटात दिलीप कुमार, राजकपूर आणि नर्गिस असे दिग्गज कलाकार होते. स्वतः मेहबूब खान आणि दिलीपकुमार यांच्या मते लता ही मराठी मुलगी होती जिने नुकतीच गायला सुरुवात केली होती. तिला उर्दू शब्दांचे उच्चार नीट करता येणार नाहीत असे त्यांचे मत होते, त्यामुळे नर्गिस सारख्या अभिनेत्रीवर चित्रित होणारी गाणी तिला देऊ नये असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. पण आपल्या मतांबाबत संगीतकार म्हणून नौशाद आग्रही होते. त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यापूर्वीच लतादीदींनी आपल्या उर्दूच्या उच्चारांवर मेहनत घेतली होती. शिवाय नौशाद सांगतील तशा पद्धतीचे उच्चार, चाली त्यांनी लगेच आत्मसात केल्या.
नौशाद हे प्रतिभावंत संगीतकार होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात शिस्त आणि प्रेमळपणा यांचा सुंदर मिलाफ होता. अंदाज चित्रपटाच्या ' तोड दिया दिल मेरा...' या गीताचा सराव सुरु असतानाची ही गोष्ट. मुंबईतील ' कारदार ' स्टुडिओमध्ये या गीताचा सराव सुरु होता. पावसाळ्याचे दिवस होते. मुंबईत मुसळधार पाऊस बरसत होता. अशा वातावरणात दीदी स्टुडिओत जाण्यासाठी निघाल्या होत्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हातातली छत्री काही कामाची राहिली नव्हती. मनगटावरचं घड्याळ खाली केव्हा पडलं तेही त्यांना लक्षात आलं नाही. अशा परिस्थितीत चालत चालत त्या स्टुडिओपर्यंत पोहोचल्या. पण शिस्तीचे भोक्ते असलेल्या नौशाद साहेबांनी उशीर झाल्यामुळे त्यांना घरी जायला सांगितलं. ' आता मी आलेच आहे, तर सराव करू या ' अशी विनंती दीदींनी केली. तेव्हा सराव काय उद्याही करता येईल असे उत्तर नौशाद साहेबांनी दिले.
खरं म्हणजे दीदी नौशाद साहेबांच्या संपर्कात कशा आल्या याचाही एक किस्सा सांगितला जातो. मुकेशचंद्र माथूर अर्थातच गायक मुकेश यांनी आग्रहाने दीदींना नौशाद यांच्याकडे नेलं. त्यावेळी मुकेश पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धीला आले होते आणि त्यांची बरीच गाणी लोकप्रिय झालेली होती. एखाद्या संगीतकाराकडे जाणं म्हणजे आपल्या गायकीची, आवाजाची पुन्हा त्याच्यासमोर परीक्षा देणं असा त्याचा अर्थ होता. याआधी दीदींनी काही गाणी गायली होती आणि काही संगीतकारांकडे त्या गायिका म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे पुन्हा एखाद्या संगीतकाराकडे जायला त्या नाखूष होत्या. पण मुकेश यांनी आग्रह केला आणि असंही सांगितलं की नौशाद हे अतिशय मोठे संगीतकार आहेत आणि ते तुम्हाला गायला सांगणार नाहीत. मुकेश यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच नौशाद यांनी दीदींना म्हटले, ' हे पहा मला तुमची परीक्षा घ्यायची नाही. तुम्ही उत्तम गाता हे मला माहिती आहे. ' याचा अर्थ त्यांनी दीदींची गाणी ऐकली होती हे उघडच होते. पण तरी त्यांनी मला तुमचा एक चाहता म्हणून एखादं गाणं म्हणून दाखवा. दीदींनी मग त्यांना ' लाहोर ' चित्रपटातली एक गजल ऐकवली आणि तिथूनच मग नौशादसाहेब आणि लता मंगेशकर यांच्या संगीतपर्वाला सुरुवात झाली.
गाण्यांच्या तालमी सुरु झाल्या. ' अंदाज ' चित्रपटातलं नर्गिस यांच्या तोंडी असणारं ' तोड दिया दिल मेरा ' हे गाणं बसवणं सुरु होतं. हे गीत ध्वनिमुद्रित करणं म्हणजे दीदी आणि नौशाद यांची एक प्रकारे परीक्षाच होती. दीदींनीही कमालीची मेहनत घेतली होती. नौशाद म्हणतात, ' लताला प्रत्येक वेळी जेवढं शिकवलं जाई, त्यापेक्षा जास्त ती आत्मसात करीत असे. नौशाद यांचे एक वैशिष्ट्य होते की ते गायकाची किंवा वादकाची उणीव कधीही कोणासमोर दाखवत नसत. त्यांच्या या स्वभावामुळे गायक किंवा वादकांना एक प्रकारे उत्तेजनच मिळत असे. ज्या दिवशी गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते त्यादिवशी एक नवीन मराठी मुलगी गाणं म्हणणार म्हणून झाडून सारे नामवंत कलाकार, दिग्दर्शक वगैरे मंडळी हजर होती. गाण्याच्या आधी सहा सात वेळी तालमी झाल्या नंतर दीदींच्या पुढे माईक ठेवण्यात आला. नौशाद यांनी माईकपुढे कसे गायचे याचा कानमंत्र आधीच देऊन ठेवला होता. त्यांनी सांगितले होते की इथे गाणे आणि त्याची चाल जाणणारे आपण दोघेच आहोत आणि तू तर एकटीच गाऊ शकतेस. तेव्हा आपण सोडून सारे मूर्ख आहेत असं समजायचं आणि गायचं. दीदींच्या समोर माईक आला आणि त्यांचा निर्मळ, नितळ सुरेल शब्दोच्चार असलेला आवाज ऐकून साऱ्यांच्या त्यांच्याबद्दलच्या शंका विरून गेल्या. राजकपूर तर एवढे प्रभावित झाले की त्यांनी दीदींना लगेच आपल्या ' बरसात ' चित्रपटासाठी आमंत्रित केले.
' अंदाज ' मधील ' तोड दिया दिल मेरा ', ' डर ना मोहोब्बत कर ले ' ' मेरी लाडली रे मेरी लाडली, बनी हैं ' ही गाणी प्रचंड गाजली. त्यातील उर्दू शब्दांचे उच्चार कोणी मराठी मुलीने मराठी ढंगाने केले अशी चुकूनही शंका येत नाही इतके ते अस्सल वाटतात. नौशाद यांच्यासाठी दुलारी या चित्रपटातील आठ गाणी दीदींनी गायली. तकदीर जगा के आई हूँ, मोहब्बत हमारी जमाना हमारा, ना वह हमसे जुदा होंगे ना उल्फत दिल से निकलेगी, ऐ दिल तुझे कसम हैं , आंखोमे आजा या सारखी अप्रतिम गाणी आहेत. या सगळ्या गाण्यांनी लता मंगेशकर यांना चित्रपट सृष्टीत गायिका म्हणून अढळ स्थान मिळवून दिले. अर्थात या सगळ्या यशस्वी प्रवासात दीदींची अपार मेहनत होती.
१९५४ मध्ये महेबूब खान यांचा ' अमर ' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ' तेरे सदके बलम, ना करे कोई गम ' या गाण्याची तालीम सुरु होती. यावेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती. त्यांना सायनसचा त्रास होत होता. या गाण्यातील एक मुरकी काही केल्या दीदींना जमत नव्हती. एक क्षण असा आला की दीदींची शुद्ध गाता गाता हरपली. शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे पहिले शब्द होते, ' नौशाद साहब , वो मुरकी मैं नही ले पायी. ' एवढं समर्पण आपल्या गाण्यांबद्दल दीदींचं होतं. पुढे नौशाद साहेबांच्या बरोबर दीदींची अनेक सुंदर अजरामर गाणी ध्वनिमुद्रित झाली. त्यात ' गंगाजमुना ' या चित्रपटात वैजयंती माला यांच्या साठीची ' दो हंसो का जोडा ', ढुंढो ढुंढो रे साजना ' ही गाणी लोकांच्या ओठावर रेंगाळत राहिली. ' मेरे मेहबूब तुझे ', तेरे प्यार मे दिलदारा ही गाणी अभिनेत्री साधनासाठी त्यांनी ' मेरे मेहबूब ' चित्रपटात म्हटली. ती देखील कमालीची लोकप्रिय झाली. वहिदा रेहमानसाठी ' फिर 'तेरी कहानी याद आई ' आणि ' पालकी ' चित्रपटातील ' दिलकी कश्ती भंवरमें आई हैं ' ही अवीट गोडीची गाणी या जोडीने केली.
या सारखी अनेक सुंदर गीते या जोडीने रसिकांना दिली आहेत. नौशाद अलींच्या संगीत निर्देशनात जवळपास १६१ गाणी दीदींनी गायिली आहेत. त्यातील काही नमुनादाखल पाहू. ' लो प्यार की हो गयी जीत ' ( जादू ), ले जा मेरी दुवाए ले जा ( दीदार ), बचपन की मुहोब्बत को ( बैजू बावरा ), उठाये जा उनके सीतम ( अंदाज ), न शिकवा हैं कोई ( अमर ), मरना 'तेरी गली में ( शबाब ), हमारे दिल से न जाना ( उडन खटोला ) यासारखी सांगता येतील. नौशाद यांच्याबरोबरच्या गाण्यांमध्ये सर्वात लोकप्रियतेचा कळस गाठला तो ' मुगले आजम ' च्या गाण्यांनी. प्यार किया तो डरना क्या.. ' आणि ' मोहें पनघट पे नंदलाल छेड गयो रे..' ही ती सदाबहार गाणी. या गाण्यात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सौंदर्यसम्राज्ञी मधुबाला यांचा अप्रतिम संगम झाला आहे.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/०४/२०२१

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा