उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग वीस
ये जिंदगी उसी की हैं ... ( लता मंगेशकर आणि सी रामचंद्र )
सी रामचंद्र म्हणजे रामचंद्र नरहर चितळकर. अहमदनगर जिल्ह्यातील चितळी त्यांचं मूळ गाव. वडील रेल्वेत असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त त्यांचे विविध ठिकाणी राहणे आणि फिरणे झाले. पण रामचंद्रला शालेय शिक्षणात फारशी रुची नव्हती. त्याऐवजी गाणी, शास्त्रीय संगीत यामध्ये त्याला स्वारस्य होते. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. तरुण वयात चित्रपटसृष्टी त्यांना खुणावत होती. आपणही नट होऊन नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. काही चित्रपटात त्यांनी सुरुवातीला भूमिकाही केल्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते मिरसाहेब या संगीत दिग्दर्शकांच्या सहवासात आले. त्यांच्यामुळे त्यांचा मास्टर भगवान उर्फ भगवान दादा यांच्याशी परिचय झाला. मा. भगवान यांनी त्यांना मद्रासला बोलवून घेतले. तिथे त्यांनी तीन तामिळी चित्रपटांना संगीत दिले. रामचंद्र चितळकर तेथेच सी रामचंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे भगवान दादांबरोबर ' अलबेला ' हा चित्रपट त्यांनी केला. त्यातील गाणी तुफान गाजली. त्यातील भोली सुरत दिल के खोटे, श्याम ढले खिडकीतले, शोला जो भडके या सारखी गाणी आजही चित्रपटरसिकांना भुरळ घालतात. शशधर मुखर्जी यांच्या ' शहनाई ' चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीत आणि त्यातील ' आना मेरी जान संडे के संडे ' हे गाणं तर खूपच गाजलं.
सी रामचंद्र हे अत्यंत गुणी आणि प्रतिभावान संगीतकार होते. गाण्याची चाल अत्यंत कमी वेळात ते बांधत. रात्री आकाशातून पडणारा एक तारा पाहून ' धीरे से आजा रे अखियन में ...' या अंगाई गीताची चाल त्यांना सुचली. हे गाणं ध्वनिमुद्रित करताना त्यांनी गीतावरून नजर फिरवली. हार्मोनियमवरून त्यांची बोटं भराभर फिरू लागली आणि नंतर काही क्षणातच हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. या अंगाई गीतातील माधुर्य इतकं आहे की त्यानंतर कुठल्याच संगीतकाराला असं सुंदर अंगाईगीत करणं शक्य झालं नाही. आजही त्यांच्या लोकप्रिय गाण्यातील या गीताचा क्रमांक खूप वरचा आहे. सी रामचंद्र यांच्यासोबत लतादीदींनी गाणी गायिलेला पहिला चित्रपट ' पतंगा ' या चित्रपटात निगार सुलताना, श्याम, पूर्णिमा या कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात दीदींची तीन गाणी होती. त्यातील ' ओ जानेवाले, तुने अरमानोंकी दुनिया लूट ली आणि दिलसे भुला दो तुम हमे ही गाणी पूर्णिमा या अभिनेत्रीच्या तोंडी होती. ' कभी खामोश हो जाना, कभी फरियाद कर लेना ' हे गाणं निगार वर चित्रित झालं होतं. या गाण्यांमध्ये असणारा दीदींचा मधुर आवाज आणि सी रामचंद्र यांचं कर्णमधुर संगीत यामुळे ही गाणी चित्रपट रसिकांच्या ओठावर खेळू लागली.
पुढे या जोडीचा ' अनारकली ' हा सदाबहार चित्रपट आला. यातील गाण्यांनी तर संगीतकार म्हणून सी रामचंद्र यांना आणि गायिका म्हणून लतादीदींना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील ' ये जिंदगी उसी की हैं ' या गाण्याची मोहिनी चित्रपट रसिकांच्या मनावर आजही कायम आहे, पुढेही राहील. या गाण्यात तीन रागांचा वापर सी रामचंद्र यांनी अत्यंत कुशलतेने केला आहे. सुरुवात ' काफी ' रागात होऊन नंतर किरवाणी आणि शेवटी भीमपलास या तीन रागांचा सुरेख संगम या गीतात आहे. यात लतादीदींनी या तिन्ही रागात गाताना आपल्या गळ्यातील लवचिकता, माधुर्य यांचे मनोहर दर्शन घडवले आहे. या गीतासोबतच या चित्रपटातील आ जा, अब तो आजा, मुझसे मत पुछ, दुआ कर गमे दिल, जाग दर्द ए इष्क जाग,मोहोब्बत मे ऐसे कदम डगमगाये, ओ आसमावाले ही गाणी रसिकांना आवडली. लतादीदी आणि सी रामचंद्र दोघंही अत्यंत प्रतिभावान आणि संगीताची दैवी देणगी लाभलेले महान कलाकार होते. याचा अनुभव त्यांची गाणी ऐकताना येतो.
' दुआ कर गमे दिल ' या गाण्याची चाल सी रामचंद्र यांनी फक्त तीस सेकंदात बांधली यावर आपला विश्वास बसणं कठीण आहे. पण ती हकीगत आहे. आणि त्या गाण्याचा आशय समजावून घेऊन ते गाताना दीदींनी त्यामध्ये आपला सारा जीव ओतून ते अशा प्रकारे गायलं की ते रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. दीदी आणि सी रामचंद्र यांचा जणू समसमा संयोग झाला होता. दोघेही एकमेकांसाठी गायक आणि संगीतकार म्हणून पूरक ठरले. ' अनारकली ' या चित्रपटाची गीतं भारतात आणि भारताबाहेरही कमालीची लोकप्रिय झाली. ही गाणी इंग्लंडमध्येही पोहोचली. लंडनच्या ' लंडन डेली ' या वृत्तपत्रात लतादीदींचा ' लता एखाद्या देवदूतासारखी गाते ' या शब्दात गौरव करण्यात आला. खरंच दीदींसाठी ' देवदूत ' हा किती सार्थ शब्द वापरला त्यांनी ! एखादा देवदूत पृथ्वीवर येतो, लोकांचे दुःख हरण करतो, लोकांना आनंद वाटतो. तेच काम दीदींनी आपल्या गीतातून आयुष्यभर केले आहे ! म्हणून तर त्यांच्या सुरांनी न्हाऊन चिंब भिजलेल्या रसिकांच्या ओठातून उद्गार निघतील की ' ये जिंदगी उसी की हैं ...'
पुढे ही जोडी रसिकांना अनेक अवीट गोडीची गाणी देत राहिली. भारतीय संस्कृतीला नात्यांना नवीन परिमाण देण्याचा, त्यातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या गीतातून केला. राधा आणि कृष्ण हे तर भारतीयांना युगानुयुगे भुरळ घालत आलेले मनोरम नाते. या नात्याचे विविध गूढ पदर अनेकांनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच त्या नात्यातील गूढ संबंधाचा, प्रेमाचा अर्थ अप्रत्यक्षरीत्या सी रामचंद्र आणि लतादीदींनी आपल्या अनेक गाण्यातून रसिकांना देण्याचा प्रयत्न केला. छोटासा देखो मोरा नादान बालमा ( शगुफा ), तू न आया और होने लगी श्याम ( आशा ), कान्हा बजाये बांसुरी ( नास्तिक ), छोड गयो मोहे ( झांजर ), सजना आजा, दरस दिखा जा ( लडकी ) या सारखी गीते चित्रपट रसिकांची आवडती आहेत. ही गीते ऐकताना पुरुष आपल्या मनातील राधेला जणू साद घालतो, तर तरुणी आपल्या मनातील श्रीकृष्णाला.
सी रामचंद्र यांच्या संगीत निर्देशनात जवळपास २९८ गाणी दीदींनी गायिली आहेत. ही सगळीच गाणी एकापेक्षा एक सरस आहेत. त्यातील काही गाण्यांचा केवळ नमुनादाखल उल्लेख करणं या ठिकाणी शक्य होईल. फिर वोही चांद, फिर वोही तनहाई हैं ( बारिश ), महफिल में जल उठी शमा ( निराला ), सोयी सोयी चांदनी हैं ( खजाना ), ऐ आँखे अब ना रोना ( सिपाहीया ), आँखो से जो आंसू बहेगा ( सगाई ), भर भर के जाम पिला दे साकी ( यास्मिन ), अरे पत्थर के भगवान ( नास्तिक ), डूब जाये जो किस्मत का तारा ( परछाई ) ही गाणी कमालीची लोकप्रिय झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ या गाण्यांमुळे सुरु झाला.
सी रामचंद्र यांनी स्वतः अनेक मराठी, हिंदी गाणी गायली, संगीतबद्ध केली. त्यांना लोकप्रियताही लाभली. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. चिनी फौजा थेट आसामपर्यंत पोहोचल्या होत्या. या युद्धात भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ केली. पण लष्करी विजय चीनने मिळवला. काही प्रदेश त्याने गिळंकृत केला. नंतर माघारही घेतली. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून प्रसिद्ध कवी प्रदीप यांनी भारतीय सैन्याच्या योगदानावर आधारित ' ऐ मेरे वतन के लोगो.. ' हे देशभक्तीपर अजरामर गीत लिहिले. या गीताचं सोनं सी रामचंद्र आणि लता मंगेशकर या जोडीनं केलं. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात पं नेहरूंच्या उपस्थितीत सी रामचंद्र आणि लतादीदींनी हे गीत सादर केलं. आधीच भारत-चीन युद्धामुळे व्यथित मनस्थिती असताना नेहरूंच्या कानावर हे गाणं जेव्हा पडलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. त्यांनी सी रामचंद्र आणि लतादीदींची पाठ थोपटली. सी रामचंद्र यांच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा प्रसंग !सी रामचंद्र यांनी ' माझ्या जीवनाची सरगम ' हे आत्मचरित्र लिहिले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. या प्रसंगी दीदींना तर पं नेहरू म्हणाले, ' बेटी, तुमने तो मुझे आज रुला दिया. ' पण फक्त पं नेहरूच नव्हे तर अख्ख्या देशाचे डोळे या गीताने पाणावले आणि सी रामचंद्र आणि लतादीदी यांच्या अजरामर गाण्यात या गैरफिल्मी गाण्याने सर्वोच्च लोकप्रियता मिळवली. हे सगळे पाहिल्यानंतर लतादीदी आणि सी रामचंद्र यांच्यासमोर आपण आदराने नतमस्तक होतो.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे,चाळीसगाव
३०/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा