उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग पंधरा
निर्भयता रोमारोमात..
दीदींचं जीवन हे गंगेसारखं निर्मळ आणि पवित्र आहे. ज्यांना एखाद्या व्यक्तीच्या केवळ चुकाच दिसतात किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये दोषच काढण्याची सवय असते अशांना माझं हे विधान कदाचित आवडणार नाही. पण त्यांच्या जीवनाकडे पाहताना मला जे जाणवलं ते मी सांगितलं. दीदींच्या स्वभावातील निर्भयतेसोबतच त्यांचा स्पष्टवक्तेपणा देखील मला भावतो. जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही, ती स्पष्टपणे नाकारण्याचे आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला तसे स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये आहे. मग ती समोरची व्यक्ती कोणीही असो. ती व्यक्ती प्रख्यात गीतकार, संगीतकार, निर्माता किंवा दिग्दर्शक कोणीही असो. अशा वेळी त्या आपल्याला असे केल्याने काय नुकसान होईल याचा विचार करत नाहीत. असा स्पष्टवक्तेपणा फार कमी लोकांना जमतो.
कदाचित या सगळ्याचे मूळ त्यांना लहानपणी जे बाळकडू आपल्या मात्यापित्यांकडून मिळाले त्यात असू शकेल. मास्टर दीनानाथ आणि माई हे दोघेही तसे निर्भय, साहसी आणि स्पष्टवक्ते होतेच. लतादीदींमध्ये तर दीनानाथांचे धैर्य, शौर्य आणि माईंचे व्यवहारचातुर्य यांचा सुरेख संगम झाला आहे. दीदी म्हणतात, ' जेव्हा मी आठ वर्षांची होते, तेव्हा माझे वडील, जे माझे गुरुही होते, ते मला एकदा म्हणाले की, एकदा तुला समजले की जे तू करते आहेस ते बरोबर आहे, खरे आहे; तेव्हा कधीही घाबरू नकोस ! घाबर ते फक्त आपलं आपल्यालाच ! आणि आजपर्यंत मी त्या मंत्राचे पालन करत आले आहे...' दीदी आपल्या वडिलांच्या शब्दांना मंत्र म्हणतात, यातूनच त्या त्यांच्या शिकवणीला किती महत्व देतात हे कळते !
दीदींच्या जीवनातील बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आहे. दरवर्षी त्या आपल्या भावंडांसोबत नाशिकजवळील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जात असत. अशाच एका प्रसंगी त्यांच्यासोबत भालजी पेंढारकर आणि त्यांचा एक सहायक हे देखील होते. हृदयनाथ आणि उषाताई हे देखील सोबत होते. हे सगळे भराभर वर जात होते. दीदींना निसर्गाची आणि छायाचित्रणाची आवड असल्याने त्या रमतगमत चालत होत्या. आपल्या कॅमेऱ्याने फोटो घेत होत्या. एका ठिकाणी झरा वाहत होता. ते ठिकाण आवडल्याने त्या झऱ्यात पाय सोडून त्याचा आनंद घेत होत्या. अशा वेळी वरून उषाताई आणि हृदयनाथ हे पाहत होते. त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांनी पाहिले की दीदींच्या जवळ एक सिंह आहे. उषाताई वरूनच ओरडल्या, ' दीदी, पळ तुझ्या मागे सिंह आहे. ' दीदींनी मागे वळून पाहिले तो त्यांना एक कुत्रा दिसला. त्या म्हणाल्या, ' सिंह ? कुठे आहे तो ? एक कुत्रा आहे आणि तो तर कधीपासून माझ्या मागे मागे येतोय. ' आता हृदयनाथही ओरडले, ' दीदी, पळ लवकर. तुझ्या मागे सिंह आहे. ' दीदींनी पुन्हा एकदा मागे वळून पाहिले तो खरोखरीच सिंह त्यांना आढळून आला. पण घाबरून पळणे किंवा मागेही जाणे शक्य नव्हते. त्यांच्यात एक अनोखं बळ संचारलं आणि त्या न घाबरता सरळ वरच्या दिशेने चालू लागल्या. तो सिंह त्यांच्या मागेच होता. त्या आपल्या भावंडांच्या पुरेशा जवळ आल्यावर तो सिंह खालच्या पायवाटेने जंगलात कुठेतरी अदृश्य झाला. सगळेजण धावत त्यांच्याजवळ आले. दीदींना जवळ घेऊन विचारू लागले, ' तुला काय झालं दीदी ? तू पळाली का नाहीस ? तुला काही झालं असतं म्हणजे ! ' पण या प्रसंगाबद्दल बोलताना दीदी म्हणतात की ती कदाचित दैवी योजना किंवा काही दैवी संकेत असावा. सिंह हे सप्तशृंगी देवीचं वाहन आहे. देवीनेच त्या रूपात येऊन मला अभय दिले अशी माझी श्रद्धा आहे.
प्रख्यात अभिनेत्री सुलोचनाबाईंनी दीदींच्या निर्भय स्वभावाबद्दल बोलताना आपली एक आठवण सांगितली. त्या वेळी त्याही चित्रपटसृष्टीत नवीन होत्या. कोल्हापूरला ' प्रफुल्ल पिक्चर्स ' मध्ये त्यांना सहायक म्हणून काम मिळाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कमालीचा उकाडा होत होता. अशा वेळी सुलोचनाबाई त्या ठिकाणी असलेल्या नायिकेच्या रूममध्ये जाऊन बसल्या. आपल्या रूममध्ये एका नवीन आलेल्या मुलीने थांबावे हा त्या नायिकेला स्वतःचा अपमान वाटला. तिने सुलोचनाबाईंवर येथेच्छ तोंडसुख घेऊन त्यांना त्या रूममधून बाहेर काढले. सुलोचनाबाईंना हा अपमान एवढा जिव्हारी लागला की त्या एका झाडाखाली जाऊन रडत बसल्या. त्याचवेळी लतादीदी तिथे आल्या. सुलोचनाबाईंना रडताना पाहून त्यांनी त्यांची चौकशी केली. जेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळली तेव्हा त्या इतक्या संतापल्या की त्या सुलोचनबाईंना ओढतच त्या खोलीकडे घेऊन गेल्या. त्या नायिकेसमोरच त्यांनी सुलोचनाबाईंना तिथे बसायला सांगितले आणि म्हणाल्या, ' बघतेच तुला कोण हाकलून लावतं ते ! ' या घटनेच्या वेळी दीदींचं वय होतं फक्त चौदा पंधरा वर्षांचं. अन्याय सहन करणं हे दीदींच्या स्वभावातच नाही.
दीदींनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर काही वर्षांनी घडलेली ही घटना आहे. नक्षब नावाच्या एका गीतकाराशी त्यांची गाठ पडली. ' महल ' चित्रपटाचं ध्वनिमुद्रण सुरु होतं. त्यावेळी दीदींजवळ एक सुंदर पेन होता. तो नक्षब यांना खूप आवडला. त्यांनी त्याची खूप तारीफ केली. ते पाहून दीदी आपल्या स्वभावानुसार म्हणाल्या, ' तुम्हाला आवडले ना.. ! मग हे पेन असू द्या तुमच्याजवळ. ' असे म्हणून त्यांनी ते पेन त्या गीतकाराला देऊन टाकले. त्या पेनवर दीदींचे नाव कोरलेले होते. नक्षब यांनी या गोष्टीचा गैरफायदा घेतला. ते प्रत्येकाला ते पेन दाखवू लागले आणि आमच्या दोघात काही ' खास ' संबंध आहेत अशी अफवा पसरवू लागले. आता हा माणूस गाण्याच्या वेळी देखील दीदींशी नको इतकी सलगी करून जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. पण एकदा त्याने हद्द ओलांडली. तो एका दिवशी दीदी राहत असलेल्या नाना चौकातील त्यांच्या घरीच येऊन धडकला. दीदी त्यावेळी अंगणात आपल्या बहिणींसोबत खेळत होत्या. त्यांनी त्याला धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी त्याला थोडे बाजूला नेले. आपल्या साडीचा पदर खोचला आणि दुर्गेचा अवतार धारण केला. ' मूर्ख माणसा, तुझी इथपर्यंत येण्याची हिंमतच कशी झाली ? पुन्हा इकडे फिरकण्याची नुसती हिंमत जरी केलीस तर तुकडे तुकडे करून गटारात फेकून देईन. ' त्यांचा हा अवतार पाहून नक्षबची भीतीने गाळण उडाली. त्याने पुन्हा त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस केले नाही.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीला त्याचा द्वेष करणारे, त्याच्या कार्यात अडथळे आणणारे खूप लोक भेटतात. काही पाठीमागे कपट कारस्थाने करतात कारण समोरासमोर बोलण्याची किंवा काही करण्याची त्यांची हिंमत नसते. अशा व्यक्ती जीवनात नेकीने आपले काम करणाऱ्या प्रत्येकालाच भेटतात. अशा लोकांच्या वागण्याने विचलित व्हायचे नसते, घाबरायचे नसते आणि आपली ध्येयमार्गावरची वाटचाल कदापि सोडायची नसते. दीदींच्या जीवनातील एक प्रसंग आहे. राजकपूर यांच्या ' आवारा ' चित्रपटातील गीतांचे ध्वनिमुद्रण सुरु होते. त्यासंबंधातील काही आवश्यक रेकॉर्डिंग साठी दीदींना राजकपूर यांचा फोन आला. रात्रीच उशिरा आर के स्टुडिओमध्ये दीदींना बोलावलं होतं. दीदींना बऱ्याच वेळा अशा प्रसंगी जावं लागत असे. त्यामुळे त्या तयारी करून निघणार, तेवढ्यात एक फोन आला. समोरून त्यांचा कोणीतरी हितशत्रू बोलत होता. कदाचित दीदींची प्रसिद्धी त्याला सहन होत नसावी. तो अत्यंत अर्वाच्य आणि उर्मट भाषा बोलत होता. तो म्हणाला, ' तू स्वतःला फार शहाणी समजतेस काय ? तू ज्या रस्त्याने रेकॉर्डिंगला जाते आहेस, त्याच रस्त्याने हिंमत असेल तर परत येऊन दाखव. ' दीदींच्या घरातील सदस्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना जाऊ नकोस म्हणून सांगितले. पण दीदींनी त्या व्यक्तीचे बोलणे एक आव्हान म्हणून स्वीकारले होते.
त्या स्टुडिओत गेल्या. शांतपणे आपले काम केले आणि त्याच मार्गाने परत यायला निघाल्या. बराच उशीर झाला होता. त्यावेळेस तो रस्ता निर्जन आणि एकाकी होता. दिवसादेखील त्या रस्त्याने जाण्याची लोकांना भीती वाटत होती. त्या ओसाड आणि निर्जन भागात आपल्या गाडीचा वेग कमी करायला त्यांनी ड्रायव्हरला सांगितले. गाडी अगदी हळूहळू जात राहिली. पण कोणीही समोर आले नाही किंवा काही अप्रिय घडले नाही. अशा धमक्या देणारी माणसे बहुधा भित्री आणि कोत्या मनाची असतात. समोरच्या व्यक्तीला विचलित करणे हेच त्यांचे ध्येय असते. दीदी अशा प्रकारच्या धमक्यांना कधीच घाबरल्या नाहीत वा त्यामुळे विचलित झाल्या नाहीत.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१८/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा