उगवतीचे रंग
नात्यांचं महावस्त्र – भाग सतरा : 'शेजारी' (घराच्या उंबरठ्याबाहेरचा खरा आप्त)
'नात्यांचं महावस्त्र' विणताना आपण पहिल्या टप्प्यात कौटुंबिक रक्ताच्या नात्यांचे पदर अनुभवले, तर दुसऱ्या टप्प्यात आत्मिक दृष्टी देणारे 'गुरू' आणि जीवाभावाचा सखा असणारा 'मित्र' हे रक्तापलीकडचे वैश्विक बंध पाहिले. या महावस्त्रातील पुढचा अत्यंत जिव्हाळ्याचा, रोजच्या जगण्याशी निगडित आणि घराच्या अगदी उंबरठ्याशी जोडलेला पदर म्हणजे साक्षात आपले सख्खे 'शेजारी'!
माणूस नवीन घर घेताना किंवा भाड्याने राहायला जाताना घराचे बांधकाम, वास्तू, रंगरूप याबरोबरच सर्वात आधी एकच गोष्ट बारकाईने पाहतो. ती म्हणजे आपल्या शेजारी कोण राहतं ? कारण चार भिंतींचे घर आपण सिमेंट-विटांनी बांधू शकतो, पण त्या घराभोवतीची खरी सुरक्षितता, सुख-समाधान आणि शांतता मात्र नाही म्हटलं तरी शेजाऱ्यांवरच अवलंबून असते. म्हणूनच जुनी जाणती माणसे नेहमी म्हणतात, "घर बघावं बांधून आणि शेजारी बघावा पारखून !"
माझी आई नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगायची, "माणसाने आयुष्यात शेजाऱ्यांचा नेहमी थोडा का होईना पण धाक बाळगला पाहिजे !" त्यावेळी मला वाटायचे की शेजाऱ्यांचा धाक कशासाठी बाळगायचा? पण तिचे हे म्हणणे किती खरे होते, हे मला पुढे वयाने आणि अनुभवाने समजले. शेजाऱ्यांचा धाक का बाळगायचा? तर आपल्या हातून नकळत कोणतीही अयोग्य, अनिष्ट किंवा गैर गोष्ट घडू नये म्हणून! चारचौघांत आपण वावरताना आपल्या वर्तनाने कोणाला त्रास होणार नाही आणि शेजारी आपल्याला नावे ठेवणार नाहीत, याचे एक नैतिक नियंत्रण या धाकामुळे राहते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणूनच म्हटले असावे,"निंदकाचे घर असावे शेजारी..."
तुकोबांनी निंदकाला शेजारी का ठेवायला सांगितले? कारण निंदक हा आपला शत्रू नसून तो विनाशुल्क आपली चूक दाखवणारा एक आरसा असतो! तो आपल्यातील उणिवा, दोष उघड करतो, ज्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये काय सुधारणा करायची आहे हे नेमके समजते. माणसाच्या मनातील 'आपण सर्वतोपरी उत्तम आहोत' हा अहंकार निंदकाच्या टीकेमुळे गळून पडतो, सहनशीलता वाढते आणि चित्त शुद्ध होते. एका अर्थाने आपल्यावर ' नजर 'ठेवणारा जागरूक शेजारी हा माणसाला चांगल्या वळणावर ठेवणारा 'आत्मसुधारणेचा निःस्वार्थ गुरू'च असतो.
आपले रक्ताचे नातेवाईक कितीही जवळचे आणि जिवाभावाचे असले, तरी ते अनेकदा दुसऱ्या शहरात, परगावी किंवा दूर अंतरावर राहतात. रात्री-अपरात्री घरात अचानक उद्भवलेले वैद्यकीय संकट असो किंवा आलेली कोणतीही अकल्पित अडचण; नातलग पोहोचेपर्यंत सर्वात पहिल्या हाकेला धावून येतो तो फक्त आणि फक्त शेजारीच! संकटसमयी धावून येणारा शेजारी हा लांबच्या रक्ताच्या नातलगापेक्षाही अधिक हक्काचा आणि सख्खा वाटतो. या नात्यातूनच आपल्या संस्कृतीत 'शेजारधर्म' हा सुंदर आणि पवित्र शब्द निर्माण झाला असावा.
मला माझ्या बालपणीचा एक अत्यंत भावस्पर्शी प्रसंग आजही स्पष्ट आठवतो. मी साधारण सातवी-आठवीत असेन, तेव्हा आम्ही एका खेड्यावरून तालुक्याच्या शहरात राहायला आलो होतो. आमची परिस्थिती अत्यंत बेताची आणि साधारण होती. त्या नव्या शहरात आमच्या शेजारी 'आबा देशपांडे' नावाचे प्राथमिक शाळेतून निवृत्त झालेले एक मुख्याध्यापक राहत होते. त्यांना आमच्या घरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. आबांनी माझ्या आईला आपली सख्खी मुलगीच मानले होते! आणि ते नाते आबांनी शेवटपर्यंत निभावले.
पैशांची गरज असो वा अन्य कोणतीही कौटुंबिक अडचण; आबा देशपांडे आणि त्यांचे कुटुंब नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझा शाळेत गणित हा विषय थोडा कच्चा होता. निवृत्त मुख्याध्यापक असलेल्या आबांनी स्वतः मला जवळ बसवून माझ्याकडून गणिताचा कसून सराव करून घेतला. माझ्या लहान भावंडांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ते स्वतः आस्थेने सोबत घेऊन गेले. आमच्या प्रत्येक सुख-दुःखात ते धावून आले. खेड्यातून अनोळखी शहरात आलेल्या एका सामान्य कुटुंबाला ज्या शेजाऱ्यांनी मायेचे छत्र दिले, त्या आबा देशपांड्यांचे ऋण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही!
अनेकदा आई-वडील कामाला गेलेले असताना चिमुकल्या लेकरांवर प्रेमाने नजर ठेवणारी, त्यांना मायेने खाऊ घालणारी शेजारची काकू किंवा आजी साक्षात माऊलीचे रूप घेते. उपेक्षित राहिलेल्या मुलांना संस्कार देऊन मोठे करणारे शेजारी म्हणजे देवाचेच रूप असतात.
केवळ आपल्या संस्कृतीतच नव्हे, तर जागतिक स्तरावरही शेजारधर्माला सर्वोच्च स्थान आहे. बायबल (The Bible) मध्ये एक प्रसिद्ध वचन आहे,"Love thy neighbor as yourself" (अर्थात आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखेच प्रेम करा). ख्रिश्चन परंपरेतही चांगला शेजारी असण्याला ईश्वराच्या भक्तीइतकेच महत्त्व दिले आहे.
मराठी साहित्यातही या शेजारधर्माची श्रीमंती दाखवणारे अनेक दाखले मिळतात. रणजीत देसाई यांच्या 'स्वामी' कादंबरीत शनिवार वाड्यातील कौटुंबिक आणि शेजारील जिव्हाळ्याचे सुंदर दर्शन घडते; तर व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'बनगरवाडी'मध्ये दुष्काळासारख्या संकटात संपूर्ण वाडी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कशी उभी राहते, याचे वास्तव चित्रण आहे. आजच्या दुष्काळाच्या काळात हा संदर्भ मनाला अधिकच भिडतो. कथाकार वपु काळे यांनी 'वपुर्झा' आणि आपल्या कथांतून मुंबईच्या चाळ संस्कृतीतील शेजारधर्माचे अप्रतिम पदर उलगडले आहेत.
आणि पु. ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ' तर शेजारधर्माचा मुकुटमणी आहे! घरांच्या भिंती एकमेकांना खेटून असल्याने तिथे प्रायव्हेसीचा (खाजगीपणाचा) अभाव असला, तरी प्रेमाची अथांग श्रीमंती होती. सत्यनारायणाची पूजा असो वा कोणाचे आजारपण; अख्खी चाळ एकत्र धावून यायची.
पण काळाच्या ओघात समाज बदलला आणि सिमेंटच्या जंगलात 'फ्लॅट संस्कृती' उभी राहिली. या फ्लॅट संस्कृतीत माणसे ज्या पद्धतीने स्वतःला कुलूपबंद करून घेतात, त्याला पाहिल्यावर एखाद्या प्राणीसंग्रहालयाचीच उपमा द्यावीशी वाटते! प्राणीसंग्रहालयात ज्याप्रमाणे प्राणी आपापल्या पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त असतात, अगदी तसेच माणसेही आज आपापल्या कोट्यवधींच्या आलिशान फ्लॅटरूपी पिंजऱ्यात स्वतःला कोंडून घेताना दिसतात.
शेजारच्या घरात कोण राहते, त्यांची नावे काय, त्यांच्या घरात काय चालले आहे, याची साधी कल्पनाही नसते. दारावर केवळ 'नेमप्लेट' असते, पण त्यामागे माणसांचे जिवंत मन मात्र हरवून गेलेले असते. अशा वेळी माणसाने फक्त घराचीच दारे नव्हे, तर आपल्या मनाची दारेही सताड उघडी केली पाहिजेत!
"मीच का आधी बोलायचं?", "मीच का सहकार्य करायचं?", "प्रत्येक वेळी आपणच का दुसऱ्यासाठी झिजायचं?"—हा संकुचित हिशोबी स्वभाव बाजूला ठेवून शेजाऱ्यांसाठी निःस्वार्थपणे मदतीचा हात पुढे केला पाहिजे. आपण टाकलेले एक आपुलकीचे पाऊल समोरील अलिप्ततेची भिंत क्षणार्धात पाडू शकते.
यातल्या त्यात आशेची बाब म्हणजे, आज अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव, दिवाळी, स्वातंत्र्यदिन यांसारख्या सणांच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, परस्परांची सुख-दुःखे जाणून घेतात आणि संवादाचा पूल बांधतात. हरवत चाललेल्या शेजारधर्माला नवसंजीवनी देणारी ही सुखद किरणे आहेत.
नात्यांच्या या भरजरी 'महावस्त्रा'चा हा 'शेजारी' नावाचा पदर घराच्या उंबरठ्याला सुरक्षिततेची किनार देणारा, आबा देशपांड्यांसारख्या वडीलधाऱ्यांची माया देणारा आणि संकटाच्या वेळी सर्वात आधी धावून येणारा अत्यंत मोलाचा पदर आहे. हा शेजारधर्म आपण जेवढ्या आत्मीयतेने आणि अटींशिवाय जपू, तेवढे आपले घर आणि संपूर्ण समाज अधिक सुसंस्कृत व आनंदी राहील!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा